|| सिद्धार्थ खांडेकर

‘फुटबॉल विश्वचषक – २०१८’मध्ये अजिंक्यपद मिळवल्यानंतर फ्रान्समध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण असले तरी अलीकडेपर्यंत तरी तिथली परिस्थिती निराशाजनकच होती. बहुवर्णीय आणि बहुवांशिक फ्रेंच समाजाचे धागे ठिकठिकाणी उसवले जाऊ लागले होते. निमित्त होते- २०१० मधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे! ती आफ्रिकेतली पहिलीवहिली विश्वचषक स्पर्धा. उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सच्या फ्लोरेंट मलूडा या खेळाडूला खेळवले गेले नाही. यावरून फ्रेंच खेळाडूंनी प्रशिक्षक रेमंड डॉमेनेक यांच्याविरुद्ध बंड पुकारले. त्यात प्रमुख होते निकोलस अनेल्का आणि पॅट्रिक एव्हरा. मलूडा आणि एव्हरा कृष्णवर्णीय, तर अनेल्का मिश्रवर्णीय. डॉमेनेक गोरे. वास्तविक डॉमेनेक यांनीच २००६ मध्ये झिनेदिन झिदानच्या फ्रेंच संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. त्या संघातील अनेक खेळाडू २०१० मध्येही खेळले. तरीही त्या स्पर्धेत एकही सामना जिंकता न आल्यामुळे फ्रान्सचे हसे झाले. प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या समसमान अहंकारातून ही नामुष्की ओढवल्याचे विश्लेषण काहींनी त्यावर केले. इतरांनी अधिक गंभीर मुद्दय़ावर बोट ठेवले. वांशिक आणि वर्णीय एकजिनसीपणाच्या अभावातून असे घडल्याचे त्यांनी म्हटले. ही अस्वस्थता आणि अस्थैर्य तेथेच संपले नाही. डॉमेनेक यांची हकालपट्टी झाल्यानंतर लॉरां ब्लां यांची प्रशिक्षकपदावर नियुक्ती झाली. २०११ मध्ये ब्लां यांनी फ्रेंच फुटबॉल संघटनेसमोर गाऱ्हाणे मांडले : ‘फ्रान्समधल्या युवा अ‍ॅकॅडमी ताकद आणि वेगावरच लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या लेखी तंत्र आणि चातुर्याला फार महत्त्व नसते. या अ‍ॅकॅडमींमध्ये बहुतांश कृष्णवर्णीयच खेळाडू असतात!’

ब्लां यांच्या शेवटच्या वाक्याने घोळ झाला. काळ्या खेळाडूंमध्ये ताकद आणि वेग असतो, पण चातुर्य नसते असा त्यांच्या विधानाचा एक अर्थ निघाला. त्यामुळे गौरेतर स्थलांतरितांमध्ये त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त झाला. तर स्थलांतरितांविरोधात राजकीय भूमिका मांडणाऱ्या ‘फ्रीडम रॅली’च्या मारीन ला पें यांनी ‘अस्सल फ्रेंच’ खेळाडूंचा मुद्दा उपस्थित केला. मारीन ला पें यांचे वडील ज्याँ-मारी ला पें यांनी १९९८ मधील फ्रेंच जगज्जेत्या संघाबद्दल बोलताना त्या संघात काळेच काळे आहेत, असे विधान केले होते. स्वातंत्र्य, बंधुता आणि विविधता ही फ्रेंच समाजाची त्रिसूत्री फ्रेंच फुटबॉल संघात प्रतिबिंबित व्हावी अशी तेथील सर्वसामान्य नागरिकांची आणि किमान समज असलेल्या राजकारण्यांची अपेक्षा असते. २०१०-११ मधील या घटनांमुळे सर्वसमावेशकतेची ही वीण उसवण्याचा धोका निर्माण झाला होता. फ्रेंच सरकार व फ्रेंच फुटबॉल संघटना या दोहोंनी तो वेळीच ओळखला आणि त्यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली. प्रशिक्षकपदावर (गोऱ्याच, पण) अधिक सौम्य आणि नेमस्त अशा प्रशिक्षकाची नियुक्ती झाली. त्या व्यक्तीचे नाव- दिदिए देशाँ! हे नाव फ्रान्समधील फुटबॉलप्रेमींना सुपरिचित होते. फ्रान्सने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला त्यावेळी त्या यशाला फ्रान्सच्या संमिश्र संस्कृतीचे यश म्हणून गौरवले गेले. ‘ब्लेक-ब्लां-ब्यू’ (काळे-गोरे-अरब) हा त्यावेळी परवलीचा शब्द बनला होता. ते खरेही होते. झिनेदिन झिदान हा त्या संघाचा मेरुमणी अल्जेरियन वंशाचा होता. २३ जणांच्या संघातील बहुतेक जण कोणत्या ना कोणत्या स्थलांतरिताच्या घरात जन्माला आलेले होते. त्या संघाचा कर्णधार होता- दिदिए देशाँ!

१९९८ च्या फ्रेंच संघात केवळ वांशिक आणि वर्णीय वैविध्य नव्हते, तर एकोपा आणि बंधुताही होती. याच एकोप्याच्या जोरावर फ्रान्सने २००० मध्ये युरो चषकही जिंकला. देशाँ यांनी २०१२ मध्ये फ्रेंच प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी त्यांच्यासमोर १९९८ आणि २०१० मधील घटना ताज्या होत्या. यातील कोणते मॉडेल स्वीकारायचे आणि राबवायचे याविषयी त्यांच्या मनाची बैठकही पक्की होती. कोणी कितीही लोकप्रिय आणि प्रतिभावान खेळाडू असला, तो कोणत्याही वंशाचा किंवा वर्णाचा असला तरी त्याची बांधिलकी प्रथम संघातील सहकाऱ्यांशी आणि नंतर फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाशीच राहील, ही देशाँ यांची एकमेव, पण महत्त्वाची अट होती. या निकषावर जे उतरणार नाहीत अशांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यातून तत्कालीन फ्रेंच संघाचे किती नुकसान होते आहे वगैरे बाबी देशाँ यांच्या दृष्टीने गौण होत्या. ‘रेआल माद्रिद’ या प्रतिष्ठित फुटबॉल क्लबकडून खेळणारा करीम बेन्झिमा हा अरब वंशाचा फ्रेंच खेळाडू फ्रान्सच्या संघात मात्र दिसत नाही, त्याचे कारण- सहकाऱ्यांशी फार जुळवून घेण्याचा त्याचा स्वभाव नाही. केवळ अरब वंशाचा आहे म्हणून त्याच्यावर मेहेरबानी करावीशी देशाँ यांना अजिबात वाटली नाही. आता त्याचा बहर ओसरलेला असला तरी पाचेक वर्षांपूर्वी तो बऱ्यापैकी जोशात होता. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वोत्तम २३ खेळाडू निवडण्यापेक्षा मैदानावर आणि मैदानाबाहेर एक कुटुंब म्हणून राहतील आणि वावरतील असे खेळाडू देशाँ निवडत गेले. त्यांच्या या धोरणामुळे धिम्या गतीने, पण शाश्वत  यश मिळत गेले. २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सचा संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला आणि चुरशीच्या लढतीत (नंतर जगज्जेते ठरलेल्या) जर्मनीशी हरला. त्याच जर्मनीला २०१६ मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सने तुलनेने सहजपणे हरवले. अंतिम फेरीत फ्रान्सचा संघ पोर्तुगालशी एका गोलने पराभूत झाला. तरीही देशाँ किंवा त्यांच्या संघातले कोणीही विचलित झाले नाहीत.

रशियातील स्पर्धेपूर्वीही हा संघ संभाव्य विजेत्यांमध्ये गणला जात असला तरीही त्यांची सुरुवात लौकिकास साजेशी होऊ शकली नव्हती. ऑस्ट्रेलिया व पेरूविरुद्ध अनाकर्षक विजय आणि डेन्मार्कविरुद्ध गोलशून्य बरोबरी ही संघाची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नव्हती. बाद फेऱ्यांमध्ये मात्र फ्रान्सने जणू गियर बदलला. प्रथम अर्जेटिना, मग उरुग्वे आणि नंतर बेल्जियमशी त्यांचा सामना झाला. अर्जेटिनाचा संघ दर्जेदार नव्हता. पण लिओनेल मेसी त्या संघात असल्यामुळे त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा केली जात होती. ती अर्थातच फोल ठरली. उरुग्वे आणि बेल्जियम हे संघही फ्रान्सप्रमाणेच संभाव्य विजेते म्हणून गणले जात होते. त्यावेळेपर्यंत जर्मनी, स्पेन आणि ब्राझील या अन्य बलाढय़ संघांचा निकाल लागला होता. पुन्हा आपापल्या गटातील तिन्ही सामने जिंकण्याची किमया उरुग्वे आणि बेल्जियम यांना साधली होती. पण अतिशय चतुराईने या दोन्ही संघांचा निकाल लावत फ्रान्सने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या चिमुकल्या क्रोएशियाला भारतासह जगभरातील फुटबॉल रसिकांची सहानुभूती मिळाली तरी काहीतरी चमत्कार झाल्याशिवाय फ्रान्सला तेही रोखू शकणार नव्हतेच. क्रोएशियाकडून भेट मिळालेला स्वयंगोल वगळता फ्रान्सचे उर्वरित तीन गोल केले- आंत्वाने ग्रिझमन (गोरा), पॉल पोग्बा (काळा) आणि कायलान एम्बापे (आफ्रिकन अरब) यांनी! पुन्हा एकदा ‘ब्लेक-ब्लां-ब्यू’ घटकांची एकत्रित ताकद फ्रान्सने जगाला दाखवून दिली. आणि या सगळ्यांचा वापर कसा करून घ्यायचा याचा धडा देशाँ यांनी घालून दिला. पोग्बाला ‘इंग्लिश प्रीमियर लीग’मधील ग्लॅमरची सवय. ग्रिझमन हा फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर. एम्बापेने तर विशीही ओलांडलेली नाही. पण तरीही प्रतिस्पर्धी हाफमध्ये मुसंडी मारण्याची संधी एम्बापेला दिली गेली. पोग्बा तर खूपच मागे खेळायचा. देशाँ यांच्या व्यूहरचनेनुसार सगळे खेळाडू खेळले. त्यात वैयक्तिक मताला किंवा पसंतीला स्थान नव्हते. फ्रान्सचा संघ या स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण संघ होता. पण त्यांचा खेळ कसलेल्या संघाप्रमाणे झाला. जर्मनी, स्पेन, ब्राझील, अर्जेटिना यांच्यापेक्षा अधिक ताजातवाना आणि कल्पक खेळ या संघाने करून दाखवला.

फ्रान्सच्या या निर्भेळ यशाचे रहस्य काय? कदाचित देशाँ यांच्यासारखा विश्वविजेत्या संघाचा कर्णधार राहिलेला प्रशिक्षक त्यांना लाभला, ही त्यांची सर्वाधिक जमेची बाजू. फ्रान्सच्या संघाने बाद फेऱ्यांमध्ये एकूण पाच गोल खाल्ले. पण ११ गोल प्रतिस्पध्र्यावर मारले. अंतिम सामन्यात क्रोएशिया आणि उपांत्य सामन्यात बेल्जियम या संघांनी फ्रान्सपेक्षा कितीतरी अधिक काळ चेंडूवर ताबा मिळवला होता. फ्रान्सपेक्षा अधिक फटके त्यांनी गोलच्या दिशेने लगावले. तरीही निर्णायक गोल मात्र फ्रान्सकडूनच झाले. गोल केल्यानंतर शांतपणे बसून वाट पाहणे आणि संधी मिळताच प्रखर प्रतिहल्ले करणे हे धोरण फ्रान्सच्या संघाने अतिशय कौशल्याने राबवले. युवा संघाने अशा प्रकारची प्रगल्भता विश्वचषक स्पर्धेच्या मोक्याच्या सामन्यांमध्ये इतक्या सातत्याने दाखवल्याचे दुसरे उदाहरण नाही.

फ्रान्सचे अनेक खेळाडू युरोपातील बडय़ा व्यावसायिक लीगमधून खेळतात, हे या कामगिरीमागील एक कारण असावे. परंतु हा फायदा क्रोएशिया, स्पेनसारख्या संघांनाही मिळायला हवा होता. पूर्वी ब्राझील, जर्मनी, इटली अशा संघांकडे फुटबॉल गुणवत्तेची खाण म्हणून पाहिले जायचे. आज त्यांची जागा नि:संशय फ्रान्सने घेतलेली आहे. एकटय़ा पॅरिसच्या बाहेरील उपनगरांमध्ये फ्रान्सच्या संघातील २३ पैकी आठ खेळाडू वाढले आणि विकसित झाले. वस्त्यांमध्ये, शाळांमध्ये, रस्त्यांवर फुटबॉलच चालते. ‘फुटबॉलमुळेच आम्ही घरातून बाहेर पडतो. शाळांमध्ये जातो. फुटबॉल हीच आमची ओळख. फुटबॉल हेच माझ्यासारख्यांचे आशास्थान..’ असे पोग्बा म्हणतो. सुमारे ३० हजार फुटबॉल प्रशिक्षक एकटय़ा पॅरिसमध्ये कार्यरत आहेत. या शहरातून जितके फुटबॉलपटू उदयाला येतात तितके जगात कोणत्याही शहरातून येत नाहीत. १९९८ मध्ये पहिल्यांदा विश्वविजेते ठरल्यानंतर फ्रान्समध्ये फुटबॉल प्रशिक्षण आणि युवा विकास कार्यक्रमावर भर देण्यात आला. ‘क्लेयरफाँटेन’ ही केंद्रीय अकादमी निर्माण झाली. फुटबॉलची आवड आणि आसक्तीला तंत्रशुद्ध शास्त्रीय प्रशिक्षणाची जोड मिळू लागली.

स्पेन व जर्मनीतील युवा फुटबॉलपटूंची एक पिढी परिपक्व होऊन अस्तंगत होऊ लागली आहे. इटली आणि अर्जेटिनामध्ये अशा कार्यक्रमाचीच वानवा आहे. इंग्लंडमध्ये आता कुठे युवा खेळाडू निर्माण होऊ लागले आहेत. ब्राझीलमध्ये अजूनही नैसर्गिक गुणवत्तेवरच विसंबून राहण्याची प्रवृत्ती कायम आहे. अशा परिस्थितीत फ्रान्स आणखी काही काळ तरी फुटबॉलमधली महासत्ता राहील अशीच चिन्हे आहेत. या संघाच्या बहुवांशिक, बहुवर्णीय बांधणीमुळे फ्रेंच संघाचे ‘अपील’ अधिक वैश्विक आहे. याच गुणवैशिष्टय़ामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत हा संघ लवकरच ब्राझील आणि कदाचित अर्जेटिनालाही मागे टाकेल आणि सातत्याच्या बाबतीत जर्मनीवर कुरघोडी करेल अशी चिन्हे आहेत. या रेनेसाँची पहिली झलक रशियात पाहायला मिळाली!

siddharth.khandekar@expressindia.com