फ्रान्स म्हटले की पॅरिसचा आयफेल टॉवर, सीन नदी व विविध मोठाली संग्रहालयं.. हेच चित्र समोर येतं. या ठिकाणांना भेट दिली की पर्यटकांची फ्रान्सवारी पूर्ण होऊन ते युरोपमधील इतर देशांकडे वळतात. फ्रान्समध्ये पॅरिसच्या पलीकडे पर्यटक सहसा बघतच नाहीत, पण मला फ्रान्समधील ‘टय़ुलूस’ हे शहर बघण्याची संधी नुकतीच मिळाली आणि या देशात पॅरिसशिवाय अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याची खात्री पटली.

‘‘तुम्हाला काही हवंय का? हवं असल्यास सांगा. कॉफी आणू?’’ जेट फ्रान्स अलायन्सच्या विमानात हवाईसुंदरीने आमच्याशी मराठीत संवाद साधला. पॅरिसपासून एक तास दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टय़ुलूसकडे जाण्यासाठी चार्लस दि गॉल विमानतळावरून आम्ही प्रयाण केले. टय़ुलूसच्या विमानतळावर उतरल्यावर अंधार झाल्याने हॉटेलला जाण्यासाठी बसचा पर्याय असूनही तीस युरोची टॅक्सी ठरवून वीस मिनटांत टय़ुलूसच्या मध्यवर्ती कॅम्पान्स कॅफरेली (campans caffarelli) भागातल्या मर्कूर (mercure) हॉटेलवर पोहचले.

दुसऱ्या दिवशी ‘ग्लोबल ओशन वीक’चे वेळेवर उद्घाटन झाले. त्या हॉलमध्ये प्रतिनिधींसमोर विषयासंबंधी बोलणारे मान्यवर, बाजूला फ्रेंच भाषेतील निवेदक, त्याच्या बाजूला इंग्लिश अनुवादक व परिषदेचा एकच फलक आणि फोटोग्राफर. किती वेळ, पसा, मॅन पॉवर वाचते. समुद्रासंबंधी विविध विषयांवर- जसे हवामान बदल, सागर संपत्तीची होणारी घट आदींवर चर्चा व उपाययोजना शोधण्यासाठी ‘ग्लोबल ओशन वीक’साठी एकूण अठ्ठावीस देशांचे दोनशेहून अधिक प्रतिनिधी हजर होते.

दरम्यान, परिषदेची व्यवस्था बघणाऱ्या महिला प्रतिनिधीस टय़ुलूसमध्ये कोणती प्रेक्षणीय स्थळं आहेत असे विचारले असता, व्यग्र असूनही एका कागदावर तेथील प्रेक्षणीय स्थळांना कसे जायचे हेही तिने समजावून सांगितले. यावरून फ्रान्सला जास्तीत जास्त पर्यटक का जातात याचे उत्तर मिळाले.

‘कॅपिटॉल बिग स्क्वेअर’ (Capitole Big square) हे ठिकाणचे नाव लिहिलेला कागद घेऊन जवळच्या बसथांब्यावर गेले. वातानुकूलित लांबलचक बसला पुढे, मध्ये आणि मागे अशी उघडणारी तीन दारे होती. बसथांब्यावर शिस्तीत थांबून सर्व प्रवासी बसमध्ये आपला पास पंचिंग करत होते.  मला दुसऱ्याच बसथांब्यावर त्यांनी उतरायला सांगून खुणेनेच उजवीकडून सरळ पुढे जा, असे सांगितले. सौजन्य म्हणून पसे घेतले नाही आणि तिकिटही दिले नाही. विचारत विचारत पुढे गेल्यावर चारही बाजूने खुला असा मोठा चौरस बघितला. बऱ्याच लोकांची ये-जा चालू होती. चौफेर नजर टाकताच गाडीवर माल विकणाऱ्या दुकानांची रांग होती. हॉटेलबाहेरच्या पदपथावरील टेबल-खुच्र्या भरलेल्या होत्या. समोर पाहाते तर नक्षीकामयुक्त भलामोठा पॅलेस आणि चौरसाच्या मध्यभागी एक चित्र होते. पॅलेसजवळ बंदूकधारी सनिक होते. प्रथम मला समजेना. काही गोपनीय असेल, तरीही सनिकाजवळ जाऊन शब्दांची, खुणेची देवाण-घेवाण करीत पर्स उघडून दाखवली आणि आत गेले. फ्रेंच राजाच्या उभ्या पुतळ्याजवळून पहिल्या मजल्याकडे प्रशस्त पायऱ्यांवरून जाताना बाजूच्या भिंती आणि छतावरील चित्रे, झुंबर पाहातच मी वर चढून गेले. सर्व भिंतींवर टय़ुलूसच्या इतिहासातील महत्त्वाचे प्रसंग चित्रित केलेले होते. दोन्ही रिसेप्शन हॉल जोडणाऱ्या मार्गाच्या भिंतींवर रंगसंगतीचे उत्तम नमुने असलेली भव्य चित्रे होती.

मेट्रोने टय़ुलूस ऑफिसमध्ये जाऊन तीन दिवसांचा बसचा पास काढला आणि मुंबई दर्शनच्या बसप्रमाणे टय़ुलूसची सिटी टूर बस पकडण्यासाठी गेले. तेथे कोणतेही ऑफिस नाही, बोर्ड नाही, स्टॉप नाही. कोणतीही खूण नसल्याने आणि नंतर मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे त्याच भागात भरकटले. सिटी टूर बस वेळेवर आली. कोठेही न थांबता, न उतरता, न संवाद साधता दीड तासात टय़ुलूसच्या रस्त्यांवरून फक्त शहराचे दर्शन घेतले. काही जागा लक्षात ठेवल्या. तसेच आदल्या दिवशी पाहिलेल्या ‘कॅपिटॉल’च्या उजव्या बाजूला त्याच्या मागेच टय़ुलूस ऑफिस आहे, हे लक्षात आले. राहत्या हॉटेलला लागूनच असलेल्या पार्कमधून अनेकांचा जाण्यायेण्याचा मार्ग मी सकाळ-संध्याकाळ पाहत होते. औत्सुक्यापोटी तेथे गेले. हिरवळयुक्त पटांगण झाडाझुडपांनी भरलेले होते. दुसऱ्या बाजूला बागेची, बागेतल्या झाडांची, दगडांची वेगवेगळ्या थरांवर केलेली मांडणी नितांत सुंदर होती. जपानी झाडांनी सजलेली सर्व वयोगटांसाठी असणारी लक्षात राहील अशी ही ‘ले जार्डीन जपान बाग’ होय.

तिसऱ्या दिवशी ‘ला सिटी द स्पेस’ या अवकाश ठिकाणाला भेट देण्यासाठी निघाले. टय़ुलूस शहराच्या एका बाजूला २५०० चौ.मी.च्या प्रांगणात हे अवकाश संशोधन केंद्र आहे. लांबून आकाशातील अनंताचा दरवाजा उघडा आहे असे सांगणारे ५३ मीटर उंचीची एरिअन-५ रॉकेटची प्रतिकृती आपणाला खुणावते. रशियन स्पेस क्राफ्ट, मिर यानात प्रवेश, टेलिस्कोप, ग्रह मंडल, पाच एकरच्या बागेतून फिरताना अनेक प्रतिकृती, मुलांना प्रयोगासाठी दोन स्वतंत्र इमारती, नासाकडून भेट मिळालेला चंद्रावरचा दगड, आयमॅक्स प्लॅनेटोरियम आणि मोठय़ा थ्रीडी पडद्यावरील शो बघून मी तिथून बाहेर पडले. सवार्र्नी भेट द्यावी असे हे जगातील मोठे प्लॅनेटोरियम आहे.

चौथ्या दिवशी ‘सेंट रेमंड संग्रहालया’तील काही पोर्टरेट, मार्बलचे पुतळे, पुरातन वस्तूंचा संग्रह पाहून ‘ऑगस्टिन चर्च’चा टॉवर पाहातच त्या संग्रहालयामध्ये गेले. मध्यभागी झाडेझुडपे असलेले चौकोनी प्रांगण. प्रांगणाच्या चारी बाजूने पिलर्ससहित बसण्यासाठी रुंद कठडा, चालण्यासाठी रुंद व्हरांडा, सर्व बाजूने तळ आणि पहिल्या मजल्यावर १५ ते २० व्या शतकातील उच्च दर्जाची पेंटिंग्ज्, शिल्पांचे नमुने पाहून हरवून जायला होते. गॉथिक रचना, चित्र-शिल्पांच्या या विद्यापीठात वेगवेगळी चित्रं-शिल्पांसमोर शालेय शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागातून शिकवीत होते. लहान वयातच भिंतीबाहेरील या दालनाला भेट, हाच ज्ञानरचनावाद!

एव्हाना रस्ते परिचित झाले होते. थोडं स्थिरावल्यावर युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा यादीतील ‘कॅपिटॉल’ला पुन्हा भेट दिली. ज्या ठिकाणाहून टय़ुलूस शहराचे प्रशासन चालत होते ती प्रशासकीय इमारत कॅपिटॉल. युनेस्कोच्या जागतिक पुरातन वारसा वास्तूंमधील १८ व्या शतकातील उत्तम नमुना असलेला ‘ले कॅपिटॉल.’ पाच एकरचा हा मोठा चौरस टय़ुलूसकरांची दिवसा-रात्री फिरण्याची आवडती जागा. येथे बरेच कार्यक्रम होत असतात. सर्व प्रकारच्या खरेदीची ब्रॅण्डेड दुकाने, मॉल, हॉटेल्स असल्याने कायम वर्दळ असते. म्हणून या भागाला ‘टय़ुलूस शहराची नाडी’ असेही म्हणतात. ही जागा टय़ुलूस शहराच्या मध्यभागी असल्याने ती ‘हार्ट ऑफ द सिटी’ आहे. त्याच दिवशी ‘कॅनल डू मिडी’ या कालव्याजवळून जाताना रस्त्याच्या जवळ असलेल्या शिडीने खाली उतरले. कालव्याच्या दोन्ही बाजूला वरच्या उंचीवर तपकिरी-पिवळसर लाल रंगाची पाम ट्रीसारख्या पानांच्या झाडाची रांग आहे. चालताना प्रसन्न वाटले आणि नवलही वाटले. कारण कालव्याजवळ राहती घरे, कार्यालयीन इमारती असूनही पाण्यात कचऱ्याची एक काडीही नव्हती. दोन्ही बाजूने पडणाऱ्या झाडांच्या प्रतिमा स्वच्छ पाण्यात विलोभनीय दिसत होत्या. पुढे जाताच नदीचे रुंद पात्र, नदीवरचा पूल, पुलापाशीच रुंद घाट सगळेच विस्तीर्ण होते. २४० कि.मी. लांबीच्या कालव्यापासून नदीकिनाऱ्यामाग्रे सायकल आणि बोटीतून समुद्रापर्यंत जाऊ शकतो. कॅनल मिडी हा १९व्या शतकातील जागतिक वारसा केंद्र असून, ते तिथले महत्त्वाचे पर्यटनस्थळही आहे.

चार दिवस एकटी फिरताना टय़ुलूसचा नकाशा, कागद, पेन, तसेच बसथांब्यांच्या आणि जाण्याच्या ठिकाणांच्या नावाचा कागदही हातात होता. हॉटेलचे कार्ड, पासपोर्टची प्रत, जास्तीचे पसे, पाण्याची बाटली, सुका खाऊ पर्समध्ये ठेवले होते. भाषेचा मोठा प्रश्न होता. थोडय़ा लोकांनाच इंग्लिश येत होते. मध्यमवयीन माणसांनी आस्थेने मार्गदर्शन केले.

आपल्याकडील मर्यादित युरो पाहता सिटी टूरचे १५ आणि बस पासचे २९ युरो महाग वाटले. म्यूझियमला तिकीट नव्हते. महत्त्वाचे म्हणजे मी ज्या हॉटेलात उतरले होते ते शहराच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर होते. तिथून सर्व ठिकाणे जवळच होती. एकटी असल्याने मनसोक्त फिरत होते, कितीही वेळ थांबत होते. मुक्तपणे फोटो काढले. ‘चला, निघू या,’ म्हणायला कोणी नव्हते. थंड हवा असल्याने, विविध प्रकारचे उबदार कपडे, बूट असा लोकांचा पेहराव. बाबागाडीसह महिला सर्वत्र दिसत होत्या. भाजी वगैरे तत्सम खरेदी करताना पिशवीऐवजी प्रत्येकाकडे चार चाकी ट्रॉली दिसत होती. युवा पिढीचे दृश्य सर्वत्र सारखेच होते. सायकलवरून प्रवास करणारे अनेक होते. ऑफिसच्या वेळेत बसला गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक होते. येथे मेट्रोचे जाळे पूर्णपणे रस्त्याच्या खाली आहे. मेट्रोकडे जाण्यासाठी पदपथावर जिना, जिन्याच्या बाजूलाच लिफ्ट होती. वयस्कर आणि बाबागाडीचे पालकच लिफ्टचा उपयोग करीत होते.

सगळ्यात महत्त्वाचे कुठेही कशाही इमारती किंवा घरे उभी नाहीत. शहराची रचना आखीव रेखीव आहे. रुंद पदपथाच्या एका बाजूने जास्त उंच नसलेल्या सर्व इमारती एका सरळ रेषेत सपाट प्रतलाप्रमाणे दिसतात. टय़ुलूसमधील सर्व महत्त्वाच्या वास्तू, कार्यालये, इमारती विटकरी तांबूस गुलाबी रंगाच्या आहेत. टय़ुलूस शहराला ‘ला विले रोझ’ (La Ville Rose) अर्थात् ‘पिंक सिटी’ या नावाने संबोधतात. टय़ुलूस हे शहर दक्षिण फ्रान्समधील गॅरोन नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. टय़ुलूस शहराचा ट्रेडमार्क म्हणजे गुलाबी विटा-दगडांनी बनलेले सुंदर, अतिशय शांत व संथ शहर. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. पहिल्याच दिवशी महिला प्रतिनिधीने कागदावर कॅपिटॉल आणि गॅरोन नदीचे नाव लिहून दिले होते. सुरुवातीला कॅपिटॉल महालाने माझे स्वागत केले आणि जाताना गॅरोन नदीच्या किनाऱ्यावर सुखावले. मधल्या दोन दिवसांत अवकाशाने वर खुणावले, तर म्यूझियमने कला-संस्कृती दाखवली. सर्वानाच धन्यवाद देत पिंक सिटीला गुडबाय केले आणि अनुभवाची गाठ ओढणीला बांधून पॅरिसला मार्गस्थ झाले..

मृणालिनी कुलकर्णी   mbk1801@gmail.com