पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात, असं प्रतिपादन करणं हा धर्मद्रोह असल्याचा आरोप ठेवून गॅलिलिओला धर्मद्रोही ठरवले गेले आणि बहिष्कृत करण्यात आले. या घटनेला या वर्षी ४०० वर्षे होत आहेत. शास्त्रज्ञ गॅलिलिओची ही बंडखोर वृत्ती त्याने तरुण वयात लिहिलेल्या कवितांमधूनही प्रकर्षांने दिसून येते. शास्त्रज्ञ म्हणून जगाला सुपरिचित असलेल्या गॅलिलिओची ही अनोखी ओळख..
गॅलिलिओ गॅलिली हा आपल्याला पदार्थ-वैज्ञानिक म्हणून ठाऊक असतो. त्याचबरोबर त्यानं स्वत: एक दुर्बीण बनवली, असं शाळेत आपण शिकलो. त्यानं दुर्बीण बनवली नव्हती, तर ‘दूरदर्शी’ बनवली होती. दुर्बीण म्हणजे बायनाक्युलर-म्हणजे दोन नळ्यांमध्ये भिंग बसवलेली यंत्रणा! तर दूरदर्शी म्हणजे टेलिस्कोप! या दूरदर्शीने- म्हणजे दूरचं स्वच्छ दाखवणाऱ्या यंत्राने गॅलिलिओनं गुरूचे उपग्रह पाहिले, शनीची कडी पाहिली, खगोलशास्त्रात गॅलिलिओनं उलथापालथ केली, त्यानं लंबकाच्या हालचालीचा नियम निश्चित केला, आदी बऱ्याच गोष्टी आपण शिकलो. मात्र, आपल्याला गॅलिलिओ हा कवी होता, याबद्दल माहिती नसते. ‘आधुनिक पदार्थविज्ञानाचा जनक’ असा ज्याचा आदराने उल्लेख होतो, त्या गॅलिलिओचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. गॅलिलिओ हे काळाच्या फार पुढे गेलेले दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व होते.
गॅलिलिओंनी पर्यावरणवादाचीही सुरुवात केली. ते चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अ‍ॅलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळे वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं.
जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. तो ‘मून बुक्स’ या प्रकाशन संस्थेनं प्रसिद्ध केला आहे. या पंच्याऐंशी पानांच्या कवितासंग्रहावर गॅलिलिओंच्या मूळ काव्याचं मूळ नाव आणि लेखन त्याकाळच्या प्रथेप्रमाणे अर्थातच लॅटिनमध्ये होतं. ‘काँगो इल् पोर्तार ला टोगा’ हे ते मूळ नाव. या काव्याचे अनुवादक गिओव्हानी हे इटालियन स्पेस एजन्सीमध्ये पदार्थवैज्ञानिक म्हणून काम करतात. शासकीय अवकाशसंस्थेत अवकाश विज्ञानात संशोधन करणाऱ्या व्यक्तीने हा अनुवाद करावा याचं खरं तर आश्चर्यच वाटतं. अनुवाद ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. त्यात काव्याचा नीट अर्थ समजून तो परभाषेत नेण्याचा प्रयत्न करणे, ही तर तारेवरचीच कसरत. बिग्नामी यांनी लॅटिन आत्मसात केल्यानंतर त्यांना इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवावं लागलं असणार. ते वैज्ञानिक असल्याने वस्तुनिष्ठ विचारांची त्यांना सवय आहे. त्यामुळेच अनुवादाला हात घालण्यापूर्वी त्यांनी भाषाप्रभुत्वाचा विचार नक्की केला असणार.
बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या कवितांतून दोन कविता अनुवादासाठी निवडल्या. त्यांच्या मते, गॅलिलिओंच्या या सर्वोत्कृष्ट कविता आहेत. या पुस्तकाचं सर्वत्र कौतुक झालं. साहित्यिक नियतकालिकांनी त्याची स्तुती केलीच; त्याचबरोबर ‘नेचर’सारख्या विज्ञान-नियतकालिकालाही त्याची दखल घ्यावीशी वाटली, हे विशेष. या पुस्तकाची मर्यादित प्रतींची आवृत्ती हातोहात खपली. या पुस्तकाच्या फक्त दोन हजार प्रती छापण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रतीवर क्रमांक होता. या पुस्तकाची निर्मिती करताना ते गॅलिलिओंच्या काळात छापलं आहे असं वाटावं याची काळजी घेण्यात आली आहे. खरं तर ‘होती’ असं म्हणायला हवं, कारण आता यातली एकही प्रत बाजारात उपलब्ध नाही. हे पुस्तक कापसापासून बनवलेल्या कागदावर छापण्यात आलं होतं. पूर्वी प्रत्येक पान वेगळं छापलं जाई आणि बांधणी झाल्यावर पानांच्या कडा कापणी यंत्रानं कापतात तशी सोय गॅलिलिओंच्या काळात नसल्यानं पानांच्या कडा काहीशा ओबडधोबड असत. त्यामुळे या पुस्तकाची पानंही न कापता ते बांधण्यात आलं आहे. (बांधणी झाल्यावर त्याची कापणी करण्यात आलेली नाही.) या पुस्तकात एकच काळजी घेतली गेली आहे, की कागद बऱ्याचदा पिवळा पडतो, तो पडू नये यासाठी पुस्तकात अत्याधुनिक तंत्र वापरलं गेलं आहे. कागदाची निर्मिती करताना त्यातील सर्व आम्लांचं उदासीकरण करून कागदाचं ढऌ मूल्य ‘उदास’ (न्यूट्रल) राहील याची काळजी घेण्यात आली आहे. (ज्या द्रवाचं ढऌ मूल्य ७ असतं तो द्रव उदास (न्यूट्रल) मानला जातो. त्यापेक्षा जास्त मूल्य असलेल्या पदार्थाला आम्ल, तर ढऌ मूल्य सातपेक्षा कमी असेल तर त्यास ‘अल्कली’ म्हटलं जातं.) आम्ल ज्या कागदात टिकून राहतं तो कालांतरानं त्या आम्लाच्या हवेतील घटकांशी होणाऱ्या प्रक्रियेनं पिवळा पडतो. पूर्वी कागदनिर्मितीत आम्ल उदासीकरणाची सोय नव्हती. मात्र, या पुस्तकाचे महत्त्व लक्षात घेऊन एवढा एकच अपवाद करताना आधुनिक तंत्र वापरण्यात आलं आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर एक निवेदन आहे. हे पुस्तक हातशिलाईने बांधण्यात आलं असून त्याला जाड चामडय़ाचं आवरण घालण्यात आलं आहे. ते व्हॅनिला आईस्क्रीमच्या रंगाचं असून त्यावर गॅलिलिओंच्या सहीचा ठसा आहे. तसंच एक खुणेचा पुठ्ठा- बुकमार्कसुद्धा त्याच्याशी त्या काळातील सुतासारख्या धाग्यानी जोडण्यात आला आहे.
मुखपृष्ठावर पुस्तकाचं शीर्षक असून त्याखाली ‘द लिनियन सोसायटी’चं बोधचिन्ह छापण्यात आलं आहे. त्या खूण-पुठ्ठय़ावरही हेच बोधचिन्ह असून, त्याखाली ‘इ. स. १६११’ असा सनाचा आकडा आहे. या वर्षी गॅलिलिओ लिनियन सोसायटीचे सदस्य बनले होते. या संस्थेनं गॅलिलिओंचे खगोलशास्त्र-विषयक दोन ग्रंथ छापले होते. बिग्नामी हेही या संस्थेचे सदस्य आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बिग्नामी म्हणतात, ‘या कवितांकडे फार गांभीर्याने बघू नका. तरुण असताना माणूस असं काहीतरी करून जातो.’ गॅलिलिओंनीही ते हयात असते तर या म्हणण्यास दुजोराच दिला असता.
या कवितासंग्रहातली पहिली कविता इ. स. १५९० मधली आहे. त्यावेळी गॅलिलिओंचे वडील हयात होते. या कवितेतला गॅलिलिओ हा चिंतामुक्त जीवन जगणारा उच्छृंखल तरुण आहे हे जाणवतं. वडिलांचं आर्थिक पाठबळ असलेला कुठलाही तरुण मौजमजा करत आयुष्य उपभोगताना जसा बेफिकीर असतो, ती बेफिकिरी या कवितेत दिसून येते. गॅलिलिओंच्या वडिलांचं १५९१ मध्ये निधन झालं. त्यानंतर गॅलिलिओंवर त्यांच्या मोठय़ा एकत्रित कुटुंबाची जबाबदारी आली. जरी गॅलिलिओंना त्याकाळी प्राध्यापकाची नोकरी होती तरी मिळणारा पगार अत्यल्प आणि हा मोठा कुटुंबकबिला चालविण्याच्या दृष्टीनं अपुराच होता. ज्या कवितेवरून या पुस्तकाचं शीर्षक घेतलं आहे- ‘अगेन्स्ट द डॉनिंग ऑफ द गाऊन’ ही कविता गॅलिलिओंचं लेखन धर्मद्रोही ठरवून त्यावर बंदी घालण्याच्या आधीची- म्हणजे इ. स. १६१६ च्या आधीची आहे. त्यात प्राध्यापकांना डोक्यावर सपाट माथ्याची टोपी आणि काळे पायघोळ झगे घालण्याचा जो त्या काळात नियम होता, त्याची टिंगल करणारी ही कविता ३०१ ओळींची आहे. त्यातून हा नियम मोडल्याबद्दल गॅलिलिओंना बऱ्याचदा दंड भरावा लागला असावा हे दिसून येतं. वरकरणी हे काव्य विनोदी वाटतं. त्यात गॅलिलिओ लिहितात- ‘एखाद्यानं गाऊन घालून शिकवलं की त्याचं शिकवणं चांगलं होतं आणि विद्वत्ता वृद्धिंगत होते; तर एखाद्यानं सर्व वस्त्रं उतरवून शिकवलं तर त्याचं शिकवणं टाकाऊ ठरतं आणि विद्वत्ता लयास जाते असं नाही.’ यावरून त्यांचा प्रचलित व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याचा स्वभाव स्पष्ट होतो. पुढं त्यांनी चर्चविरोधात केलेल्या बंडखोरीचे त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही. ‘अगेन्स्ट द डॉनिंग ऑफ द गाऊन’मध्ये विज्ञान कमी असलं तरी गॅलिलिओंची वस्तुनिष्ठ विचारसरणी दिसून येते.
या संग्रहातील दुसरी कविता एक सुनीत असून तिचं शीर्षक ‘एनिग्मा’ असं आहे. ‘एनिग्मा’च्या जवळपास पोहोचणारे मराठी शब्द म्हणजे- रहस्य किंवा कोडं. गॅलिलिओंना अखेपर्यंत एका खगोलशास्त्रीय घटनेनं त्रास दिला होता. या कवितेत ते लिहितात- ‘मी एक राक्षस आहे. माझा आकार चमत्कारिक आहे. रूप विचित्र आहे. मी लांब केसांची आलदा आहे की आकारविहीन भूत?’
या कोडय़ाचं उत्तर गॅलिलिओंनी या (दीर्घ) काव्यात कुठंही दिलेलं नाही. हा त्रासदायक, विसविशीत प्राणी अंधारात राहतो आणि अनेक शिकारी त्याचा पाठलाग करत असतात, असं ते पुढं म्हणतात. या कोडय़ाचं उत्तर बिग्नामींनी दिलंय आणि ते पटण्यासारखं आहे. डोनाटा अल्मेची या गॅलिलिओंच्या समकालीन आकाश निरीक्षकाने धूमकेतूचं रेखाटन करून प्रसिद्ध केलं होतं, त्याला उद्देशून हे काव्य आहे, असं ते सांगतात आणि त्याचं स्पष्टीकरणही देतात.
सतराव्या शतकातले तत्त्वज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ धूमकेतूंच्या स्वरूपाबद्दल अनेक तर्कवितर्क करीत असत. त्या काळात दूरदर्शी नुकतीच अस्तित्वात आली होती. या नव्या यंत्राच्या साहाय्यानं आकाश निरीक्षणाला जोर चढला होता. गॅलिलिओंची प्रकृती त्या काळात यथातथाच होती. त्यामुळं रात्री-अपरात्री उठून धूमकेतूंचं निरीक्षण करणे गॅलिलिओंना शक्य होत नसे. खरं तर गॅलिलिओंनी दूरदर्शीमध्ये सुधारणा करून अवकाश निरीक्षणाला चालना दिली होती. तरीही त्यांना धूमकेतू प्रत्यक्ष बघणे शक्य झाले नव्हते. ते धूमकेतूंना ‘वातावरणाच्या वरच्या थरावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाने निर्माण झालेले दृष्टीभ्रम’ असं म्हणत असत. ‘एनिग्मा’ कवितेच्या अखेरीस- ‘मी गलितगात्र झालोय. लढाईची अखेर जवळ येत चाललीय. मला आता या देहाचा, या जीवाचा, या आत्म्याचा निरोप घेण्याची घटिका जवळ येत चाललीय..’ असं ते म्हणतात.
इ. स. १६१६ मध्ये गॅलिलिओंवर धर्माविरोधात विधाने करून धर्मद्रोह केल्याचा खटला व्हॅटिकनमध्ये चालवला गेला. त्याला या वर्षी ४०० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘कोपर्निकसचा सिद्धान्त मला मान्य नाही!’ असं कबूल केल्यास गॅलिलिओंना माफ करण्याची तयारी व्हॅटिकननं दाखवली होती. सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरतात, असं म्हणणं हा धर्मद्रोह केल्याचा आरोप खोडून काढण्याची संधी न देताच, गॅलिलिओंना कोपर्निकसचं हे म्हणणं मान्य आहे, असं ठरवून धर्मद्रोही म्हणून बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्या घटनेला यंदा ४०० वर्षे होत आहेत.
पुढे सोळा वर्षे गॅलिलिओ रोमच्या आसपासही फिरकले नाहीत. १६३२ मध्ये नव्या पोपची नेमणूक झाली. ते गॅलिलिओंचे परिचित होते. ते आपलं म्हणणं ऐकून घेतील व माफ करतील या आशेने गॅलिलिओ रोमला गेले. तिथे त्यांना व्हॅटिकनमध्ये नेऊन नजरकैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचे निधन व्हॅटिकनला नजरकैदेत असतानाच झालं. मृत्यूसमयी त्यांचं ग्रहगती सिद्धान्ताचं पुस्तक चर्चची नजर चुकवून प्रसिद्ध करण्यात आलं. त्यावेळी गॅलिलिओंना दिसत नव्हतं. त्या पुस्तकावर हात फिरवत गॅलिलिओ म्हणाले, ‘ते काहीही म्हणोत, पृथ्वी तरीही सूर्याभोवती फिरतेच!’
..आणि त्यांनी डोळे मिटले.

निरंजन घाटे

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
kavita medhekar shares emotional memory
“पाच महिन्यांची गरोदर असताना…”, कविता मेढेकरांनी सांगितली भावुक आठवण; म्हणाल्या, “त्या प्रयोगानंतर खूप रडले”
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन