|| जुई कुलकर्णी

कांचन प्रकाश संगीत लिखित ‘गहुराणी’ या ललित  लेखसंग्रहाच्या वेगळ्या शीर्षकामुळे वाचक जरा चमकून जातो. पुस्तकाची अर्पणपत्रिका आणि प्रस्तावनेचे शीर्षक वाचून हे आध्यात्मिक पुस्तक आहे की काय, असा गरसमज होऊ शकतो. परंतु ‘गहुराणी’ हे एक भाबडं, संवेदनशील लेखन आहे. या ललित लेखनात भाबडय़ा काळाच्या खुणा दिसतात. ‘गहुराणी’मध्ये आठ-नऊ लेख आहेत. ललित लेखन प्रकारात प्रत्यक्ष अनुभव कधी कधी इवलासाच असतो, परंतु लेखकाच्या कौशल्यावर तो किती फुलवायचा ते ठरते. त्यासाठी लेखकाला स्वत:ची अशी एक जीवनदृष्टी असावी लागते. त्याचसोबत आयुष्यात घेतलेले अनुभव गोष्टीवेल्हाळ पद्धतीने सांगण्याची शैलीही त्याच्याकडे असावी लागते.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

या संग्रहातील लेखांची शीर्षके वैशिष्टय़पूर्ण आहेत. उदाहरणार्थ, ‘चोचपि’ हा पहिलाच लेख. या शीर्षकातून काहीही बोध होत नाही. त्यात चहाची चटक लागलेल्या एका इवल्याशा मुलीपासून लेखिकेच्या आयुष्यातलं रसाळ चहापुराण सुरू होतं.

‘ढग विशाल तान्हुला मेघ’ हा लेख हे प्रारंभी एक निसर्गचित्र आहे असंच वाटतं. पण नंतर अनाथ मुलांचे, अनाथाश्रमाचे अनुभव त्यात येतात आणि वाचकाला हलवून टाकतात.

‘घारी घागरी चपळ सयानी’ हा लेख लेखिकेच्या बालपणीच्या आठवणीतली म्हशींवरचा आहे. मानव आणि त्याचे पशुधन यांचे संबंध फार प्राचीन. यांत्रिकीकरण होण्याआधी पशुधन आणि मालकाचे संबंध अधिक मऊ आणि  स्नेहाचे होते.

‘हवळा’ हा हरबऱ्याच्या भाजीविषयी सुरू होणारा लेख पुढे एकदम हरवलेल्या मत्रिणीच्या आयुष्याकडे जातो. आयुष्य सरत जातं तसतसं आयुष्यातली एकेक नाती हरवू लागतात. कधी कधी समोरून नातं विरून जातं. त्याचा मनोज्ञ मागोवा या लेखात आढळतो.

‘रोमाएसएस आणि हुकुमाचा एक्का’ या लेखात तरुण मुलांचे ट्रेकिंगचे अतरंगी, धाडसी अनुभव आणि वाघ-बिबटय़ांचे रोमांचक अनुभव आहेत. ‘चिंचिआ आणि लाचिंचिआ’ हा लेख म्हणजे लहान लहान वस्तूंची हौस असणाऱ्या चिमुकल्या मुलीचे गमतीशीर अनुभव आहेत.

‘आपलं काय?’ हा लेख दुर्दैवाच्या फेऱ्याने ग्रासलेल्या एका जोडप्यावर आधारित आहे. या जोडप्याचं आयुष्य हे एखाद्या करुण कथेचा दमदार ऐवज होऊ शकला असता.

‘अवघं मन निळंभोर’ हा लेख माणूस आणि सृष्टीतील प्राणी-पक्षी यांच्या मनोहारी संबंधांवर आहे. काही माणसांना प्राणी-पक्षीविश्व धार्जणिं असतं. लेखिकेची बहीण अशांपकीच एक. माणूस हा उर्वरित समस्त निसर्गसृष्टीसाठी शत्रू ठरण्याआधी सृष्टीचा अविभाज्य भाग होता. अजूनही आहे. परंतु मनुष्य ते विसरला आहे. हा लेख वाचून हे प्रकर्षांनं जाणवतं.

‘गहुराणी’ पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एका नाजूकशा छोटय़ा मुलीचे लोभस चित्र आहे.‘गहुराणी’ हा अशाच एका निरागस मुलीच्या नजरेतून दिसणारा काळाचा भाग आहे. या लिखाणातले बरेचसे संदर्भ पन्नास-साठ वर्षांपूर्वीचे आहेत हे प्रकर्षांनं जाणवतं. निसर्ग आणि माणूस हा त्या काळी कृषीसंस्कृतीमुळे परस्परांच्या निकट होते. या लेखांत छोटी छोटी गावं आहेत. तिथली मोठमोठी एकत्र कुटुंबं आहेत. पेरूच्या बागा आहेत. मुलांना प्रेमाखातर दहा-पंधरा पेरू देणारे स्नेही आहेत. महिनोन् महिने गावी राहणारे नातेवाईक आहेत. हे काहीसं संथ, निवांत जग आहे. झाडं, वेली, नदी-नाले, शेतं, बागा, पशुपक्षी यांच्या सान्निध्यात असणारं. गहुराणीच्या राज्यातील हे जग फार जुनं नाही खरं तर; पण आत्ताच्या सुपर टेक्निकल डिजिटल जगात ते खूपच जुनं वाटतं.

या लेखनामध्ये जगातल्या हिंसेचे, फसवणुकीचे, स्त्री-पुरुष संबंधांतल्या विषमतेचे चित्रण दिसतच नाही असे नाही, पण यातल्या कथनाचा सूर हा निर्मळ आणि काहीसा भाबडा आहे. लेखिकेची जगाकडे बघण्याची दृष्टी संवेदनशील व तरल आहे. सगळ्या जगाबद्दलची कुतूहलाने भरलेली लहान मुलीची नजर लेखिकेकडे आहे. या लेखनात अधूनमधून लेखिकेच्या श्रद्धेच्या खुणाही दिसतात. सध्याचं निसर्गापासून तुटलेलं, माणसांशी फक्त डिजिटली जोडलेलं आणि अफाट तांत्रिक प्रगतीने भारलेलं कोरडं वाटणारं जग आपल्याला थकवतं. अशा वेळी आपल्या एखाद्या काकू-मावशीचा पदर धरून तिच्याकडून गप्पा ऐकत निवांतपणे पडायला कसं वाटेल, तसा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.

 

  • ‘गहुराणी’- कांचन प्रकाश संगीत,
  • प्राजक्त प्रकाशन,
  • पृष्ठे- २६४, किंमत- २८० रुपये.