‘लोकसत्ता स्वरगप्पा’मध्ये विलक्षण अवलिया गायक म्हणून ख्यातकीर्त असलेले  पं. मुकुल शिवपुत्र यांच्यासोबत गिरीश कुबेर आणि मुकुंद संगोराम यांनी रंगविलेल्या  मैफलीचा वृत्तान्त..

काय असते संगीत? काय असते रागदारी? काय असतो रियाज? काय असतात श्रुती?

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

‘नि रे ग म ध नि सा.. सा नि ध प म ग रे सा..’ अशी सांधणी केली की उमलतो यमन? किंवा मग ‘सा रे म प ध सा.. सा ध प ध म रे सा ध सा’ अशी सांधणी केली की हाती लागतो दुर्गा?

ठाशीव नियम ध्यानी ठेवले, त्याबरहुकूम स्वरांची रचना केली की हाती गवसते का सुरेल गाणे?

संगीत म्हणजे एक गणित, एवढे नक्की. त्याचा हिशेब तालाचा, मात्रांचा. मात्र, ही एवढीच बेरीज पुरेशी आहे?

..प्रश्न अनेक. आणि तेही संगीतासारख्या तशा विदेही कलारूपाबाबतचे. प्रश्नांचे रान अत्यंत घनदाट. आणि उत्तरे कुठे कुठे, कसल्या कसल्या झाडांआड दडून बसलेली. ती शोधायची तर सोबत हवे सुरांचे समृद्ध रानच ज्याच्या आत उगवून आलेले आहे, असाच शहाणा वाटाडय़ा.. ज्याला त्या रानातील वाटा तळहातावरील रेषांइतक्या सुस्पष्ट ठाऊक आहेत. आणि हा वाटाडय़ा कसा हवा? तर ज्याला गाताही येते, आणि गाण्याची गोष्ट सांगताही येते..

‘लोकसत्ता स्वरगप्पां’च्या अरभाट मैफलीत हा असा शहाणा वाटाडय़ा समोर प्रकटतो. खूप काही सांगतो. सारेच शब्दांमधून नाही.. तर काही शब्दांच्या मधल्या अवकाशातूनही. खूप काही मांडतो तो. जे ऐकताना आतून आपण सघन होत चालल्याची अनुभूती येते.

हा गाता वाटाडय़ा प्रश्नांच्या रानातून अचूक उत्तरांपर्यंत घेऊन जातो. पण तो केवळ तेथेच थांबत नाही. तो तुम्हाला अधिक प्रश्न पडावेत यासाठी प्रवृत्त करतो. तुमच्यातील संगीताच्या धुनीला हलकेच आणखी चेतवतो. त्याने असोशी अधिकच जागते ती संगीताच्या रानभुलीत पुरते हरवून जावे अशी.

या वाटाडय़ाचे नाव मुकुल शिवपुत्र कोमकली.. अद्भुत प्रतिभेचा, अखंड गाण्यात बुडालेला अवलिया गायक.

‘लोकसत्ता’च्या या गप्पांच्या कार्यक्रमात मुकुलजी भरभरून बोलतात. त्यांच्या कलंदर, मनस्वी अशा सर्वपरिचित ओळखीच्या लोभस खाणाखुणा मिरवीत खूप काही सांगतात. वडील व श्रेष्ठ गायक कुमार गंधर्व यांच्या आठवणींपासून ते आजच्या फ्यूजन संगीतापर्यंत.. नाद- लय- श्रुती यांच्या व्याकरणापासून ते त्यांच्या आवडत्या गायक-संगीतकारांपर्यंत.. कलावंताच्या कलेत विरघळून जाण्याच्या वृत्तीपासून रियाजापर्यंत. आणि संगीताचे मर्मही सांगून जातात ते ‘वह दिल की बात है..’ अशा साध्या-सोप्या शब्दांत. हे सगळे सांगताना अधेमधे अजिबातच वज्र्य नसलेला मिश्कीलतेचा सूरही हवाहवासा.

मुझे वो मुकाम ना देना

जिनसे होकर मैं गुजर चुका हूँ।

मुझे वो राह ना चलना पडे

जिससे होकर मैं गुजर चुका हूँ।

 

मुझे वो अनुभव देना

जो अभी हुवे नहीं।

मुझे वो मंजिल देना

जहाँ कोई पहुँचा नहीं।

 

मुझे उसी स्तर की प्रतिभा न देना

जो व्यक्त हो चुकी हो।

मुझे वो सिद्धी देना

जो अभी तक असाध्य रही हो।

 

मुझे वो नजारे नहीं देखने

जो दिख चुके हों।

मुझे वो स्वरूप दिखाना

जिसके दर्शन न हुवे हों।

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आठवणींचा सूर एकदम तब्येतीत लागलेला.

मुकुलजी दहा-बारा वर्षांचे असतानाचा प्रसंग. कवी अनिल कुमारांच्या देवासच्या घरी मुक्कामास आलेले. अनिल यांच्या ध्यानी येते- हा छोटासा मुलगा सतत गुणगुणतोय.. गातोय. त्याला बाकी कशातही रस दिसत नाहीये. ना खेळण्यात.. ना गप्पांत. दिवस सरून रात्रीचा प्रहर आला तरी हा गातोय. मग त्यातून अनिल यांना सुचलेले.. ‘कुणी जाल का, सांगाल का..’ हे पुढे अजरामर झालेले गाणे.. या आठवणींच्या अनुषंगाने मुकुलजी तो काळ समोर उभा करतात.

‘‘माझ्या वडिलांइतका गाण्यात राहिलेला, गात राहिलेला माणूस मी पाहिलेला नाही. लहानपणी त्यांची दुर्गा रागातील रचनेची रेकॉर्ड ऐकली. तेव्हा लक्षात आले की, आपण आत्ता ज्या वयाचे आहोत त्याहीपेक्षा कमी वयाचे असताना ते गायला लागले. नुस्ते गायला लागले नाही तर इतके चांगले गायले, की तेव्हा त्यांची रेकॉर्ड निघाली. त्यांच्या गाण्यात सातत्य होते. आणि ते सातत्य दर्जाला धरूनच होते. ही फार मोठी गोष्ट आहे.’’

‘‘लहानपणची गोष्ट. मी भरपूर गाणे ऐकावे अशी त्यांची इच्छा असे. मग त्यासाठी ते एक करीत. जुन्या काळच्या रेकॉर्ड्स प्लेअरवर ऐकायच्या म्हणजे त्याला चावी द्यावी लागायची. ती चावी द्यायला ते मला सांगायचे. रेकॉर्ड झिजायला लागली असेल तर ती बोटाने उचलून थोडी वर धरावी लागे, म्हणजे तिचा वेग राखला जाई. ते कामही ते मला सांगत. एकदा त्यांनी रेकॉर्डवर सिंदुरा लावला होता आणि मला रेकॉर्ड धरून ठेवायला सांगितली. ती ऐकून मी म्हटले की, ‘हे होळीचं गाणं वाटतंय.’ त्यामुळे त्यांना बरं वाटलं असावं. म्हणजे पोराला रागातील, गाण्यातील भाव प्रतीत होतोय तर! त्याला हे वर्षांगीत वाटले नाही हे काही कमी नाही, अशी भावना असावी त्यांची.’’

याच आठवणींच्या ओघात विषय येतो तो कुमारजींकडे असलेल्या आणि मुकुलजींकडेही वारसाहक्काने आलेल्या अभिजात सौंदर्यदृष्टीचा.

‘‘सौंदर्यदृष्टी होतीच कुमारजींकडे. अनेकदा असे होते की, इतरांनी गायलेली एखादी रचना आपल्याला तितकीशी भावत नाही; पण तीच कुमारजींकडून ऐकली की प्रतिक्रिया उमटते ती ‘क्या बात है!’ अशीच. हीच ती सौंदर्यदृष्टी. ते उत्तम कम्पोजर होते. त्यांनी रागही रचले, रचनाही केल्या. त्यासोबत ते उत्तम परफॉर्मरही होते. त्यांच्या रचना या एकमेवाद्वितीय अशा आहेत..’’  मुकुल शिवपुत्र नामक एका श्रेष्ठ गायकाने कुमार गंधर्व नामक श्रेष्ठ अशा गायकाचे केलेले हे मूल्यमापन. त्याचसोबत- शब्द आणि स्वर एकमेकांना जितके बिलगून येतील तेवढे गाणे उत्तम होते, हे सांगणे.. आणि त्याच ओघात रविशंकर, विलायत खाँ, बडे गुलाम अली खाँ, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर.. अशा कितीतरी मंडळींचे वाजवणे, गाणे केवळ अविस्मरणीय, हे नमूद करणे.

गप्पांच्या ओघात विषय उपस्थित होतो तो ‘अनाहत’ आणि ‘आहत’ नाद या संकल्पनांचा. ‘अनाहत नाद ही संकल्पनाच थोडी विरोधाभासाची वाटत नाही का?’ असा प्रश्न येतो. आणि त्यावर मुकुलजींचे उत्तर एखाद्या तत्त्ववेत्त्यासारखे..

‘‘आपण जो नाद ऐकतो तो काळाला बिलगून आलेला नाद आहे. या नादाला काळ कंपने देतो. हा आहत नाद नियमबद्ध आहे. ‘सा रे ग म प ध नि’च्या आवर्तनानंतर पुन्हा ‘सा’ येतोच. तो नियमानुसार येणारच. या नादाला लयीत कंपने दिली की तो चांगला वाटतो. या आहत नादाच्या पलीकडे असलेल्या अनाहत नादाचे तसे नाही. अनाहत नाद हा कालनिरपेक्ष आहे आणि म्हणूनच तो शाश्वत आहे. अनाहत नाद, पूर्ण शांती, परमप्रकाश या शाश्वत कल्पना आहेत. त्या अनेकांना जाणवल्या आहेत.. पटल्याही आहेत..’’ – इति मुकुलजी. याचसोबत ते मौलिक भाष्य करतात ते ‘शांती’ या संकल्पनेवर. ‘‘आपण सारेच सतत एका ठरावीक प्रकारच्या अशांततेत वावरत असतो. पाण्याचा आवाज घ्या.. पंख्याचा आवाज घ्या. पूर्ण शांती अशी नसतेच आपल्याभोवती. ती असली तर सहनही होत नाही,’’ असे सांगून ते दाखला देतात स्वप्नात आलेल्या शांतीचा. ‘‘मी एकदा दिवसभर ओम शांती.. ओम शांती केले. मग झोपल्यावर ती स्वप्नात आली. म्हणाली, खूपच ध्यास घेतलाय माझा- तर आले स्वप्नात. माझा स्वभावच असा आहे की कुणीही येते आणि मला अशांत करून जाते. आणि तेव्हाच शांती म्हणजे काय असते, ते कळते. माझा भाऊ  आहे नाद नावाचा. त्यालाही ठरावीक रीतीने अशांत केलेत तर छान वाटते..’’

स्वर आणि श्रुतींमध्ये गवसणाऱ्या सौंदर्याचे विवेचन करताना मुकुलजींचा थाट असतो अगदी थेट एखाद्या सौंदर्यशास्त्राच्या तालेवार प्राध्यापकासारखा. ‘‘श्रुती आणि स्वर यांत फरक नाही तसा. स्वराचा शाब्दिक अर्थ स्वत:चा प्रकाश. आणि श्रुती म्हणजे जी ऐकू येते ती. अमुक एक श्रुतीवर स्वर स्थिर आहे, असे आपण म्हणतो. भरतमुनींना श्रुतीचा पहिला अनुभव जेथे आला त्याला त्यांनी ‘प्रमाण श्रुती’ असे संबोधले. अशा २२-२४ सूक्ष्म श्रुती आहेत. साधारणत: आपल्याला १२ शुद्ध स्वर सहज जाणवतात आणि दोन शुद्ध धैवतात एक प्रमाण श्रुती असते,’’ असे विवेचन करीत, ‘‘आपल्यासाठी एवढय़ा खूप आहेत,’’ अशी मिश्कील टिप्पणी ‘प्राध्यापक’ मुकुल शिवपुत्र यांची!

एक प्रश्न येतो तो प्रतिभावंतांच्या सादरीकरणामागील गणिताचा. ‘‘तुम्ही एखादा राग सादर करता तेव्हा डोक्यात नेमकी काय गणिते असतात?’’ असा हा प्रश्न. त्यावरील मुकुलजींचे उत्तर तसे साधे.. मात्र मूलगामी.

‘‘अमुक एक राग, अमकी बंदिश गाठीला असतेच. मात्र, मागे छान तंबोरे लागले आहेत.. तबल्याचा नाद सुरू झाला आहे असे वातावरण असले की तोच राग, तीच बंदिश गाताना.. सादर करताना वेगळे काहीतरी सुचते. एखाद्या नव्या जागी नवी तान, एखाद्या नव्या जागी नवा पलटा. ख्याल-संगीतात सर्जनाचा हा असा भाग खूप आहे. गाणे गाताना ठरवून असे काही होत नाही. त्या, त्या वेळी जे सुचते त्यातून गाणे वेगळेच होते.. आणि त्यातच मौज आहे. त्यातला आनंद गाणाऱ्यालाही मिळतो आणि ऐकणाऱ्यालाही.’’

याच अनुषंगाने मुकुलजी गाण्यामागील व्याकरण उलगडतात. ‘‘व्याकरण असे काही नसते हो..’’ असे प्रारंभी काहीसे धक्कादायक वाटणारे विधान करून मग त्याची फोड ते करतात- ‘‘गाण्यातील व्याकरण हे शास्त्रीय आहे. म्हणजे कसे.. तर ‘सा रे ग म प ध नि’ झाले की पुढे ‘सा’ येणारच. तू येऊ  नको, असे सांगून तो यायचा थांबायचा नाही. हे झाले वैज्ञानिक शास्त्र. दुसरे शास्त्र परंपरेचे. त्यात सौंदर्यदृष्टीने तुम्ही किती खोलवर जाता ते महत्त्वाचे. आता या परंपरेचे स्वत:चे असे वजन, ओझे असतेच. ते समजले तर ठीक. आणि ते समजून स्वातंत्र्य घेता आले तर ठीक. पण उपरे स्वातंत्र्य घेतले गाताना की ते असुंदर होऊन जाते..’’

‘‘कुमारजींच्या रूपाने घरात हिंदुस्थानी संगीत असताना कर्नाटकी संगीत का शिकलात?’’ या प्रश्नाला मुकुलजींचे उत्तर थोडे गमतीचे. ‘‘आपण आपल्या घरात राहतो. मग शेजारी कोण राहतोय, त्याचा मुलगा काय करतो, पत्नी काय करते, त्यांचे काय चाललेय, याची काहीच माहिती ठेवायची नाही असे कसे होईल?’’ पण या उत्तरासोबतच ते कर्नाटकी संगीताची व हिंदुस्थानी संगीताचीही मीमांसा करतात. ‘‘कर्नाटकी संगीत हे मुळात तेलुगू संगीत आहे. त्या संगीतामधील वाद्यसंगीत खूपच सुस्वरी आहे. मात्र, तुलनेत कंठसंगीत सुस्वरी नाही. सुरात गात नाहीत ते..’’ असे म्हणत- ‘‘हिंदुस्थानी संगीतातही असे लोक आहेतच. कणसुरे आहेत लेकाचे..’’ अशी खास शैलीदार टिप्पणीही ते करतात. ती करताना मुद्दा अधोरेखित करतात- ‘संगीतात सौंदर्य हवेच..’ हा.

मी तर म्हणतो सारेच लोकसंगीत!

ज्येष्ठ संगीत अभ्यासक अशोक रानडे यांनी ‘चित्रपट संगीत हे त्या, त्या काळातील लोकसंगीत असते,’ असा मुद्दा मांडला होता, याकडे लक्ष वेधताच मुकुलजी त्यास १०० टक्के सहमती दर्शवितात. वर त्यास जोड.. ‘‘तुम्ही जे अनायास गाता- मग ते न्हाणीघरात असो वा देवापुढे बसून, किंवा जे अनायास ऐकता- ते सारेच लोकसंगीत..’’ अशी.

त्यासोबत मार्गी व देशी अशी संगीतमांडणीही ते करतात. ‘‘तुम्ही जे सहज गाता ते देशी. ते असतेच. म्हणजे एखादा खाद्यपदार्थ छान झाला आहे, अशी दाद तुम्ही देता तेव्हा त्यास जिऱ्याची फोडणी घातलीये की अन्य काही, हिंग किती टाकलाय, असले प्रश्न तुम्ही विचारत नाही. हे झाले देशी. पण तुम्ही तो पदार्थ कसा तयार केला ते समजून घेता, ते मार्गी. मार्गी संगीत म्हणजे जे संगीत मार्गानी निबद्ध झालेले आहे ते. आणि गायकांसाठी संगीतातील हे असे मार्ग नुसते माहिती असून चालत नाहीत.. त्यावर तुम्ही कसे चालता, ते महत्त्वाचे. हिमालयातील गिर्यारोहणाचे उदाहरण घ्या. तेथे आधी प्रवास केलेल्या गिर्यारोहकांनी आपल्या खाणाखुणा सोडलेल्या असतात. त्यावरून तुम्हाला मार्ग कळतात. म्हणजे बुवा आपल्याला केदारनाथला जायचेय, तर हा मार्ग नको.. येथे दरी आहे. तो मार्ग चांगला- असा विचार तुम्ही करू शकता. पण फक्त विचार नको.. त्या मार्गावर चालायलाही हवे.’’

‘‘कुमार गंधर्व यांनी रचलेले मालवती, सोहनी भटियार हे राग बिहाग, यमन या मूळ सिद्ध रागांसारखेच टिकून राहतील का?’’ या प्रश्नाला मुकुलजींचे ठाम उत्तर ‘हो’ असेच. त्याच प्रश्नाला जोडून एक उपप्रश्न येतो.. ‘‘जे राग उपलब्ध आहेत ते आपल्या अभिव्यक्तीसाठी अपुरे पडतायत म्हणून नव्या रागांची निर्मिती होते का?’’ या प्रश्नाला मुकुलजींनी दिलेले उत्तर संगीत आणि कलावंत यांच्यातील अद्वैत सांगणारे आणि त्याचसोबत कलाकाराचे अस्तित्व कलेच्या अस्तित्वापुढे नेमके काय असते, किंबहुना- काय असावे, हे सांगणारे.. ‘‘माझे कसले आलेय अस्तित्व? राग काय म्हणत आहेत ते मी समजावून घेतले पाहिजे. काय रे बाबा, कसा आहेस, अशी त्याची वास्तपुस्त केली पाहिजे. त्याची आळवणी केली पाहिजे. मी काय अभिव्यक्त करतोय, हे महत्त्वाचे नाही. ते काय अभिव्यक्त करतायत, ते महत्त्वाचे. आणि नवीन राग असे काही नसतात. सगळे जुनेच असतात. अस्तित्व रागाचे आहे; माझे नव्हे. त्याला काय म्हणायचे आहे, ते मी उमजून घेतले पाहिजे. माझ्या अस्तित्वाचे काय घेऊन बसला आहात?’’

कलावंताचे अस्तित्व, त्याची ओरिजिनॅलिटी यावर मुकुलजी भाष्य करतात ते अत्यंत तरल पातळीवर..

‘‘कलाकार त्यांच्या ओरिजिनॅलिटीचा फार विचार करतात. ती सूक्ष्म पातळीवर असतेच असते. ती तुम्ही नाकारूच शकत नाही. पण ती असण्यासाठी तुम्हाला काहीच करावे लागत नाही. ती स्वयंभू असतेच. आता प्रत्येकाचे अक्षर वेगळे असणारच. ते असायलाच हवे. हे वेगळेपण किती चांगले आहे, किती प्रखर आहे, ते महत्त्वाचे. हुसेनचा ब्रश जरा वेगळा होता. त्याच्या ब्रशचा फटकारा जरा वेगळा होता, हा.. जरा मोलाचा होता पण. ओरिजिनॅलिटीची गंमत बघा. मी लहानपणी ज्या कविता वाचल्या.. मैथिलीशरण गुप्त, पद्माकर, सेनापती आदींच्या, तर त्या कविता आज मला माझ्या वाटतात. म्हणजे ज्या कवितांनी मी घडलो त्या आज मला माझ्या वाटतात. पण मी स्वत: लिहिलेल्या कविता जेव्हा पुस्तक काढून वाचतो तेव्हा परक्या वाटतात. परक्या कशा अर्थाने? तर त्या वाचून वाटते, अच्छा लिखा है.. किसने लिखा है.. यह भी पढना चाहिये. तर असे आहे. आता असे असताना ओरिजिनॅलिटीवर काय बोलणार!’’

‘‘मी संगीताला काहीच देऊ  शकलेलो नाही,’’ या मुकुलजींच्या आधीच्या एका उद्धृताची आठवण निघते. त्यावर मुकुलजींचे भाष्य पुन्हा एकदा कला व कलाकार यांच्यातील नाते सांगणारे आणि श्रुतीबाबत भाष्य करणारे. या अनुषंगाने मुकुलजी ऐकवतात त्यांच्या एका मित्राचे वाक्य.. ‘‘एक मित्र मला म्हणाला होता, कुमारजी आणि तू यांच्यात फरक असा की, कुमारजींनी संगीताला जीवन दिले नि तू संगीतामुळे जिवंत आहेस..’’ पुढे त्यांचे सांगणे- ‘‘संगीतातील बेसिक्स.. मूलाधार कायम असतात. त्याच आधारावर शक्य होईल ते करीत राहायचे. संगीतात शेड्स भरपूर; पण म्हणजे शुद्ध धैवत आणि मध्यम घेऊन कालवीत बसलोय असे होत नाही. ती शेड, तो स्वर तुम्हाला स्ट्राइक व्हावा लागतो. स्वरावली गाताना एखादा स्वर दिसतो. त्याचा अर्थ उमजतो, जाणवतो. तो कलात्मक असतो.. सौंदर्यपूर्ण असतो. मारवा गाताना मारव्यातील ऋषभ लागतो. श्रुती म्हणजे काय? तर जी ऐकली आहे, जी जाणवली आहे, जी स्मृतीत आहे ती श्रुती. गाताना हा धैवत लागलाय, हा निषाद लागलाय असे जाणवते ती श्रुती. ती माझ्या स्मृतीत असते.’’

‘शास्त्रीय संगीत हे फक्त अभिजनांसाठीच; ते सामान्यांसाठी नाही,’ हा मुद्दा मुकुलजींना अमान्य. ‘‘संगीत ऐकणाऱ्यांबाबत असे काही नसते. तुम्हाला संगीताचा कान किती आहे, जाण किती आहे, यावर ते अवलंबून असते. एखाद्याला असा कान कमी असतो, एखाद्याला अधिक असतो, इतकेच,’’ असे त्यांचे सांगणे. आणि ‘‘शास्त्रीय संगीताचा प्रचार तर प्रचंडच झाला आहे. आज ते मुबलक प्रमाणात, हवे तेवढे, हवे तेथे.. क्वचित नको तेथेही उपलब्ध आहे. काय पाहिजे तुम्हाला? भीमसेन? कुमार? रविशंकर? ही घ्या कॅसेट. ही घ्या सीडी.. असे झाले आहे,’’ हे त्यांचे म्हणणे. याच ओघात ‘शास्त्रीय संगीत श्रेष्ठ.. लावणीसारखा संगीतप्रकार तुलनेने कनिष्ठ’ असाही मुद्दा येतो. मुकुलजींनी बांधलेली लावणी उत्तम, चित्रपटांतील लावणी तुलनेने कमी दर्जाची असे मानले जाते, याकडे लक्ष वेधले जाते. त्यावर मुकुलजींचे म्हणणे.. ‘‘असे काही श्रेष्ठ-कनिष्ठ नाही. ज्याच्या त्याच्याकडे ज्याचे त्याचे संगीत आहे. त्याला सौंदर्याचा स्पर्श झाला की ते सुंदर होऊन जाते..’’

होऊन गेले ते थोरच आहे..

शास्त्रीय व एकूणच संगीताच्या परिप्रेक्ष्यात मोलाचे प्रश्न विचारले जातात ते आजच्या संगीताविषयी. ‘‘वसंतराव देशपांडे यांच्या भाषेत बोलायचे तर- गायक खूप गातात, पण त्यांच्याकडे सांगण्यासारखा मजकूर फार नसतो- असे आज होते आहे का? कालच्यांनी जे संगीत निर्माण केले त्याच्या पल्याड जाणे आजच्यांना शक्य होणार नाही का?’’ अशा प्रश्नांना मुकुलजींचे उत्तर.. ‘‘असे बघा, बडे गुलाम अली खाँ, विलायत खाँ, पलुस्कर, रविशंकर आदींनी जे निर्माण करून ठेवले आहे ते ऐकल्यानंतर असे वाटते की, आता यापेक्षा आणखी चांगले कोण गाणार..? कोण वाजवणार? आणि मुळात ते कुणाच्या हातात नाहीये ना. आता सुगम संगीताचे, चित्रपट संगीताचे उदाहरण घ्या. लता मंगेशकर यांनी जे गाऊन ठेवले आहे त्याने ‘चांगले गाणे म्हणजे लताबाईंचे गाणे’ असे समीकरणच तयार झालेले आहे. आता त्यापेक्षा वेगळा आणि पुन्हा चांगला असा कुणाचा आवाज असेल तर त्याचे स्वागत होईलच. पण तसे होणे खरोखर खूप मुश्कील वाटते.’’

एक मुद्दा उपस्थित होतो तो भारतीय रागसंगीतात.. ख्याल-ठुमरी संगीतात प्रयोग होत नसल्याचा.. त्यात काही नवीन होत नसल्याचा. त्यावरील मुकुलजींचे भाष्य आपण परंपरेचे विनम्र पाईक गायक असल्याची लख्ख खूण पटवणारे. ‘‘उत्तर भारतीय संगीत, त्यातील ख्याल व ठुमरी संगीत हे स्वरप्रधान आहे. त्यात रागविस्तार आहे. तो आमचा मार्ग आहे. त्या मार्गावर काय वेगळे करता येईल, त्यावर काय वेगळे पाहतो, असा विचार आम्ही करीत नाही. आम्ही विचार करतो तो त्या मार्गावर आम्ही किती चाललो, हा. तो जो चष्मा आहे तो आमच्या डोळ्यांवर जन्मजातच आहे म्हणा ना. आणि प्रयोगांच्या बाबतीत बोलायचे तर ख्यालसंगीतातून पुढचा काही टप्पा गाठता येईल का, तर तसे शक्य आहे. म्हणजे पखवाजमधून तबला जन्मास आला, रुद्रवीणेतून सतार आली, तसे ख्यालसंगीतातूनही काही नवे रूपांतरित होऊ  शकते. पण मुळात आज जे ख्यालसंगीत आहे, जी ध्रुपद गायकी आहे, त्यात आणखी उंची गाठण्याच्या शक्यता आहेतच की! जे आहे ते अधिक चांगले करण्याच्या शक्यता आहेतच. त्यासाठी सल्ला म्हणाल तर स्वरसाधनेकडे लक्ष देणे.’’

फ्युजन कसले? हे तर कन्फ्युजन!

संगीतामधील प्रयोगांच्या मुद्दय़ाला धरून प्रश्न विचारला जातो तो फ्युजन संगीताबाबत. त्याबाबत मुकुलजींचे मत अतिशय परखड.. ‘‘फ्युजन कसले..? ते तर संगीताच्या नावाखाली कन्फ्युजनच! हे कसे आहे.. तू तामिळीतून बोल, मी मराठीतून बोलते. आपण दोघे प्रेम करू आणि मग भांडू. जिलेबीबरोबर कबाब खाण्यासारखे आहे ते. भारतीय लोक जेव्हा फ्युजन ऐकतात तेव्हा त्यांना भारतीय संगीताशी काही देणेघेणे नसते. आणि पाश्चात्त्य लोक जेव्हा फ्युजन ऐकतात तेव्हा त्यांना पाश्चात्त्य संगीताशी काही देणेघेणे नसते. असे लोक फ्युजन ऐकू शकतात. मी नाही ऐकू शकत. भारतीय आणि पाश्चात्त्य असे फ्युजन सोडाच; उत्तर भारतीय संगीत आणि दक्षिण भारतीय संगीत अशी जुगलबंदीही मला अजिबात आवडली नाही. वांग्याच्या भरीताबरोबर पुरणपोळी कशाला खायची? हा.. आता तालवाद्याचे फ्युजन चांगले वाटते. मात्र, स्वराचे फ्युजन नाही चांगले वाटत. शब्दांचे फ्युजन तर अजिबातच चांगले नाही वाटत..’’

दिल की बात है, वह दिल की बात है..

गप्पांच्या समारोपानंतर कुमारांच्या भजनाकडे येण्याच्या वाटेवर असताना मुकुलजी कुमारजींची एक आठवण सांगतात गमतीदार. ‘‘कुमारजी एकदा दौऱ्यावरून घरी आले. मी नेहमीप्रमाणे त्यांना माझ्यासाठी काय आणले म्हणून विचारले. त्यांनी सुटकेसमधून एक पुस्तक काढून माझ्या हातात दिले. चांगले जाडजूड पुस्तक. ते होते सौंदर्यशास्त्रावरचे. मी अगदी उत्साहाने त्यांना सांगितले.. वा! वा! क्या बात है!! मी वाचणार हं हे पुस्तक पहिल्यांदा. त्यावर सौंदर्यशास्त्रावरच्या त्या जाडजूड पुस्तकाकडे एक नजर टाकून ते म्हणाले, सौंदर्य काय एवढे जड असते की काय? वर पुढे आणखी.. लोकांना वाटते, कुमार गंधर्व फार अभ्यासू आहे म्हणून. पण तशी बौद्धिकता जरा त्याज्यच आहे मला. अरे दिल की बात है, वह दिल की बात है..!’’

कुमारजींची आठवण सांगितल्यानंतर तंबोरायंत्र सोबतीला घेत, स्वत:च स्वत:ला तबल्याची साथ करीत मुकुलजी आपल्या अवधूत स्वरात कुमारजींचीच ‘गुरा तो जी ने ग्यान की जडिम्या दई..’ ही रचना सादर करतात. गुरूने ज्ञानमूळ हाती दिल्यानंतरच्या अवस्थेचे वर्णन करणारी ही रचना.

कार्यक्रम संपतो तेव्हा दोन तासांच्या संवादाची आणि ‘गुरा तो जी ने..’ या रचनेची भूल पडलेल्या प्रत्येकाच्याच मनात एक भावना असते.. आपल्याही मनात असेच काहीतरी रुजून आले आहे.. रुजून येत आहे.. असेच काहीतरी आपल्याही हाती लागले आहे..

 

एका कलंदर, अस्वस्थ कलावंताची खूण काय असते? मुकुलजींची जी कविता या कार्यक्रमात सादर झाली त्यावरून ही खूण ध्यानात यावी..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com