गिरीश कुलकर्णी

हमरस्त्यावर सोलापूरच्या दिशेनं फाटय़ावर एक परमिटरूम होते. कारखान्यापासून तिथे पोहोचायला चालत अर्धा तास लागे. संध्याकाळी काम संपल्यावर मी तिकडे जाई. लहान होतो अठरा- एकोणीसचा. त्यामुळे दारूबद्दलचं आकर्षण तिच्याबद्दलच्या भयापेक्षा कमी होतं. शीतपेयासोबत दोन सिगारेटी पिऊन मी स्वत:ला मोठं झाल्याचं भासवीत तिथे जेवण घेई. परत येताना चंद्र असता मजा वाटे; अन्यथा भीती. भुताखेताची भीती वाटण्याइतपत अडाणीपण असल्यानं मागे पाहात पाहात चालणे होई. चंद्र असताना मात्र दृष्टी सभोवार फिरे. चिंतनापेक्षा मनोराज्य चाले. या ५०० रु. मासिक वेतनाच्या पहिल्या नोकरीनं मला भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर आणलं होतं. तिथल्या गेस्ट हाउसवर एक तमिळ इंजिनीयर सोबतीला होता. असेच एकदा ‘तो बी.एससी. असल्यानं स्वत:स इंजिनीयर म्हणवून घेऊ शकत नाही’ असा मूर्ख वाद घालत दमून झोपलो होतो. अपरात्री आरडाओरडय़ानं जाग आली. खोलीत सात-आठ जण घुसले होते. खाटांवर लाथा मारीत आम्हाला शिव्या घालीत होते. आम्हा उभयतांच्या कुळातील स्त्रीवर्गाच्या अवयव उल्लेखातून पुरेसं उन्मादून झाल्यावर बसली मंडळी खाटेवर दमून. आम्ही कोपऱ्यात उभे. एक म्हातारबा, डोईवर गांधीटोपी अन् खाली धोतर ल्यालेले. ते एका खाटेचं सिंहासन करून ऐसपस अन् बाकीची सहा खुळी दुसऱ्या खाटेवर चीमटून. ते म्हणे कारखान्याचे माजी संचालक होते. आम्हाला धाडणाऱ्या कंपन्या चोर असून बॉडीवरच्या लोकांशी संगनमत करून कारखाना बुडवीत आहेत, असा आम्हा दोघांना बोल लावीत होते. ‘कारखाना तुमच्या बापाचाय का?’ असं म्हणत ‘माझ्या अन् फक्त माझ्याच बापाचाय’ हे सांगत होते! सत्ता गेल्याचा परमिटरूमातनं भरून आणलेला ‘गम’ िहदकळत होता बोलण्यातून.

‘आता फटफटेल,’ असं ओरडत पहिला पक्षी उडाला तसे ते हलले. आम्ही हतबुद्ध पाहात बसलो एकमेकांकडे.

राजपुत्र गौतमाला कसं सर्वसंग परित्याग करीत बाहेर पडताच दारिद्य्र, दु:ख वगरे दिसलं होतं अन् त्याचे ठायी करुणा प्रकटून तो बुद्ध झाला होता; त्या टाइपमध्ये मलाही पैसे कमवायला बाहेर पडताच या पहिल्याच नोकरीनं बरंच काही दाखवलं. त्यात जशी शहरी संगनमतातनं बॉडीवरच्यांच्या पार रक्तातून डोकावणारी भ्रष्टाचाराची साखर होती, तसा तोडणी मजुरांचा पाचटागत रानोमाळ विखुरलेला संसारही होता. ऐन थंडीत कुडकुडणारी लक्तरी पोरं आपल्या खपाटी पोटातल्या जाळाच्या उबेनं पोसणाऱ्या मायमाऊल्या होत्या अन् काजू-बदाम खात होणाऱ्या संचालकांच्या ऐदी मिटिंगाही. ऊस मोडून गाडय़ा भरून गेल्या, की धडधडा शिवारं पेटवून परमिट रूमात बरळणारे अडाणी शेतकरी होते अन्  माझ्यासारखे असून नसल्यासारखे भोट पोटार्थी नोकरदारही. कारखाना सगळंच पोसत होता. दिसायचं सगळं, पण अर्थ कशाचाही लागत नसे. परिणामी हतबुद्ध तेव्हढं होत होतो सतत.

आत्ता परवा जेव्हा ‘माती परीक्षणा’च्या प्रशिक्षण वर्गाला गेलो तेव्हा मात्र लख्खं उजाडलं. ‘‘आपल्या शेतांमधली माती शेतीयोग्य राहिली नाही. त्यातला सेंद्रिय कर्ब नावाचा घटक खूप कमी झालाय. पण शेतकऱ्यांना हे माहीतच नाही. माती परीक्षण करून आपल्याला त्यांना ते समजावून सांगायचं आहे.’’ पुरंदर तालुक्याचे ‘पाणी फाउंडेशन’च्या टीममधले तांत्रिक प्रशिक्षक सांगत होते. समोर निरनिराळ्या गावाहून आलेली साठ-सत्तर शहरी माणसं. ही सगळी नव्यानं जलमित्र झालेली आणि खास माती परीक्षणाच्या कामी मदत करायला तयार असलेली मंडळी.

‘‘पाण्याचं काम करतानाच शेतकऱ्याला मातीविषयीचं ज्ञान देऊन सुजाण करायचंय. एकदा का त्याला मातीच्या गुणधर्माची ओळख करून दिली आणि तिच्या पोषणाचे उपाय शिकवले की तो सक्षम होईल.’’

मग एक प्रयोग रंगला. मातीचे समान वजनाचे दोन नमुने घेऊन त्यात झारीनं समसमान पाऊस पाडला गेला. एका नमुन्यातली बरीच माती पाण्याबरोबर वाहून गेली, तर दुसरीनं धरून ठेवलं पाणी. मग या भिजलेल्या नमुन्यांचं परत वजन केलं गेलं. तर जीनं धरून ठेवलं होतं पाणी तिचं दुप्पट झालं वजन अन् जिनं वाहून जाऊ दिलं पाणी तिचं साहजिकच अगदीच कमी वाढलं वजन. म्हणजे सेंद्रिय कर्ब पुरेशा प्रमाणात असलेली माती भुसभुशीत असते आणि अंगावर पडलेला पाऊस जागीच मुरवते. तर, हे प्रमाण कमी असलेल्या मातीत पाणी तर थांबत नाहीच, पण आपल्याबरोबर मातीलाही वाहून नेते. मग एक फिल्म दाखवली गेली. दोन माती नमुन्यांतला फरक त्यात सकारण स्पष्ट करून समजावला होता. तसंच सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कसं वाढवायचं, हेही सांगितलं होतं. ‘आगपेटीमुक्त शिवार’ या संकल्पनेत पीक काढल्यानंतर उरणारा काडीकचरा पेटवून न देता शेतातच जिरवून सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवता येतं हे सांगितलं होतं. हेच ज्ञान वापरून सातारच्या चिवटेमामांनी आपल्या उसाच्या तहानेला निम्म्यावर आणलं. मग ठिबकद्वारे ती तहान आणखी निम्म्यावर आणून ठेवली. म्हणजे दोष उसाचा नाही, तर माणसांचा आहे. अडाणीपणाचा आहे.

वाटलं, आमच्या या अडाणीपणामुळेच तर सत्ता मिळवता येते. या अडाणीपणाचा प्रतिपाळ करण्याचा वसा एकदा का घेतला, की मग हर आमदार, खासदार शेवटपर्यंत तो टाकत नाही. समस्या टिकवून सिंहासनं स्थिर ठेवली जातात. आमच्या अज्ञानाचे उत्सव सजतात अन् आम्ही गावोगावच्या राजांमागं मोकाट गर्दी करत नाचत राहतो. कसं बदलणार हे?

अचानक मागच्या वर्षीच्या दौऱ्यात दिसलेली उसतोडणी मजुरांच्या गावातली लेकरं आठवली. सहा महिने आईबापामागं फिरून शिक्षणाचा, भाषेचा, लिखाणाचा पार खेळखंडोबा झालेला. पण गावात काहीतरी बरं होतंय हे कळल्यागत टिकाव, फावडी चालवणाऱ्या आई-बापांना ही वानरसेना पाणी पाजत मदत करत होती. गावोगावी हीच कथा. मग या पोरांकरता ‘माझं श्रमदान’ या विषयावर निबंध स्पर्धा जाहीर केली मी. प्रत्येक गावातल्या एका सर्वोत्कृष्ट निबंधाला बक्षीस देणार, असं घोषित केलं. संतोष अन् इरफाननं सगळे निबंध गोळा करून मला पाठवले पुण्याला. त्या पानांतनं लेकरांनी मलाच बक्षीस पाठवलंय असं वाटलं. मी नव्हताच ठेवला विश्वास ती लिहितील यावर. त्यांनी मात्र मनापासून पानं भरून पाठवली होती. सात-आठ गावांतून चाळिसेक निबंध आले. त्या चाळीस निबंधांतून जणू आशाच दिली की हो पाठवून पोट्टय़ांनी! कुणीतरी लिहिलं होतं, ‘आजपर्यंत कुनी आमच्या गावात आलं नाही. इतके दिवस पानीसुद्दा आलं नाही. आता आमीर खान, गिरीस कुल्क्रनी आशे टीवीमदले लोक आल्यानं आशा वाटत आहे.’ अनेक शंका घेऊन गेलेल्या माझ्यात कुठून दिसली असेल आशा? छे! शालजोडीतून हाणतंय बेणं. अनेकरंगी शिकवण दिली त्या निबंधांनी. ती किडूकमिडूक भाबडी अक्षरं वाचून माझी पोरगी शारवी म्हणाली, ‘‘सगळ्यांनाच दे की बक्षीस!’’ एकेक छानशी बक्षिसाची पिशवी या प्रत्येक गुरूला दिली मग पाठवून. असेलही त्यांच्यातला कुणी पाटसला दिसलेला. तेव्हाच त्यानं शिकवायचा यत्न केला असावा. पण मला वाचता आल्या नव्हत्या त्या मूक नजरा. म्हणून धाडली मग ही अक्षरं. बदलेल हे सगळं असा विश्वास देणारी!

परीक्षण वर्गाला आलेली मंडळी वेगवेगळ्या व्यवसायातली होती. शेतीबद्दलच्या, मातीबद्दलच्या त्यांच्या अज्ञानाला त्यांच्या भोवतालचे रंग होते. पण सगळ्यांचा भाव एकच होता. या चालू असलेल्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा. ‘माझा खारीचा वाटा असू देत’, ‘माझ्या पुढच्या पिढीला माझे त्रास नकोत’, ‘निसर्गाची आवड आहे’, इ. विविध कारणं देत सगळे परिचित झाले एकमेकांशी. मोहिते सरांनी मग ताबा घेतला वर्गाचा. हे खरं तर सरकारी नोकरीत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘वॉटर कप’च्या या विशेष कामगिरीवर पाठवलेलं. हसतखेळत मोहितेसरांनी माती परीक्षणाचं आणि सेंद्रिय कर्बाचं महत्त्व विषद केलं. आम्हा परीक्षणार्थीच्या ‘वाट्टेल त्या’ शहरी प्रश्नांना उत्तरं दिली. काही वेळा ‘‘आतापुरतं एवढं करू, बाकीचं तुम्ही मला स्वतंत्र भेटा मग सांगतो.’’ असं म्हणत गांभीर्यही राखलं. आणि मग सुरू झाली प्रत्यक्ष माती परीक्षा. बी.ए.आर.सी. (भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र) नं एक सुटसुटीत माती परीक्षण कीट तयार केलंय. दोन रासायनिक १ींॠील्ल३२ अन् माती यांचं मिश्रण करायचं आणि काही वेळाने त्या द्रावणाचा बदललेला रंग दिलेल्या रंग तक्त्याशी जुळवून पाहायचा. प्रत्येक रंगछटेखाली सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणाची रेंज लिहिलेली. ती पाहून निदान करायचं.

हे साधं-सोपं तंत्रज्ञान ज्यांच्या कार्यकाळात सिद्धीस गेलं त्या डॉ. अनिल काकोडकरांना अलीकडेच भेटण्याचं भाग्य लाभलं होतं. एक शांत निगर्वी ज्ञानी माणूस कसा दिसावा, तसेच आहेत काकोडकर सर. ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’चे चेअरमन आहेत सध्या. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन (एम.के.सी.एल.) ही ज्ञानविकेंद्रीकरणाचं, तंत्रज्ञानाचा प्रसार अन् शिक्षणाचं अत्यंत महत्त्वाचं काम करणारी एकमेवाद्वितीय संस्था आहे. तिचे संस्थापक आणि कत्रेधत्रे विवेक सावंत हे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व. पाहताच पुढय़ात मांडी घालून ऐकायला बसावं इतकी रसाळ अन् ओघवती वाणी. या वाणीसह आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत महाराष्ट्रच नव्हे, तर भारतात आणि भारताबाहेरही तंत्रज्ञानाद्वारे नवनवे प्रयोग राबवीत सामान्य माणसास समृद्ध, ज्ञानसंपन्न करण्याचा ध्यास घेत फिरणारे सावंत साहेब. तर बरं का, ‘बी.ए.आर.सी.’ने तयार केलेलं हे कीट ‘एम.के.सी.एल.’मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन गुरुजनांनी सुरू केलं होतं. आणि सुदैवानं याची माहिती पाणी फाउंडेशनला वेळेवर मिळाली. ‘वॉटर कप’ स्पध्रेत माती परीक्षणासाठी पाच गुण आहेत. मात्र ते मिळवण्याकरिताची साधनं अनेक गावात नाहीत. म्हणजे जिथे माती परीक्षण होऊ शकतं अशा शासकीय प्रयोगशाळांची संख्या मर्यादित आहे. अशानं मग काही गावांवर अन्याय होण्याची परिस्थिती. अशात ‘एम.के.सी.एल.’नं मदतीचा हात पुढे केला. वेगानं उत्पादन करीत काही लाख मातीनमुने तपासण्यासाठी संच उपलब्ध करून दिले. उपकरणाच्या उपलब्धतेची अडचण सोडवतानाच एकीकडे हजारो शहरी जलमित्रांची महाराष्ट्रभर प्रशिक्षण शिबिरं घेतली गेली. प्रत्येक जलमित्राची समग्र नोंद करीत त्यांना प्रशिक्षित करण्यात आले. आता स्पध्रेच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा गावकरी जोमानं राहिलेली कामं पूर्ण करत असतील तेव्हा माती परीक्षणाच्या पाच गुणांची चिंता त्यांस नसेल. त्यांचा वेळ वाचावा म्हणून हजारो शहरी जलमित्र गावोगावी वा तालुक्यात जाऊन हे परीक्षण करून देतील.

तर बरं का, तिथं सासवडात जमलेल्या माणसांत एक ‘जॉन’ नामे जलमित्र आला होता. तरुण सॉफ्टवेअर इंजिनीयर. मूळचा बेंगरूळूचा, पण सध्या पुण्यात नोकरी करणारा. पाणी फाउंडेशनच्या कामाचं कुतूहल वाटून आलेला. तसाच एक अमरेंद्र- रांचीचा! ‘‘आखिर अपने देश की ही तो मिट्टी हैं! महाराष्ट्र हो या झारखंड ये काम तो करना ही करना है.’’ असं म्हणणारा.  म्हटलं, ‘‘तुझ्या गावाकडं हा कार्यक्रम राबवण्याचा विचार येतो का मनात?’’ तर म्हणाला, ‘‘तोच पहिल्यांदा येतो. हे काम आपल्याकडंही व्हायला हवं, पण ते का होत नाही? हा प्रश्नही पडतो. पाणी फाउंडेशन झारखंड मे आयेगा क्या?’’ मी म्हटलं, ‘‘देखो, गडय़ा, ये सब उपरके लोग ठरवते हैं. म निरोप देता हूं.’’

मी विनोद केला खरा. पण हे ‘उप्परके लोग’ असं इथं फार काही नाही. सत्यजित तालुकास्तरीय कार्यकर्त्यांच्या अखंड संपर्कात असतो. डॉ. पोळ फिरत असतात. लॅन्सी फर्नाडीस सूचना, हरकती, कल्पना सगळं सगळं ऐकून टिपत असतात. सर्व समन्वयकांच्या बठकीत हरेकजण आपले प्रश्न मांडतो अन् प्रश्नांना सगळे मिळून उत्तरं शोधतात. इथं चुका करायची परवानगी आहे, पण त्यातून शिकण्याचा प्रेमळ आग्रहसुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाची मेख म्हणजे कुणावरही कसलीही सक्ती नाही आणि आनंदाची तर जणू हमीच आहे.

‘‘तुमचं काय नाव ताई?’’ मी एका ग्रामीण भागातून आलेल्या ताईंना विचारलं.

‘‘पद्मा मोहन जगताप, बेलसर.’’

‘‘तुम्ही आता हे प्रशिक्षण घेतलंत, बरोबर? तर आता समजा की मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतातली माती तपासायला घेऊन आलोय तुमच्याकडे. तर तुम्ही काय करणार?’’

‘‘पहिल्यांदा तुमाला सांगनार की दादा, तासाभरानं या.’’

सगळे हसले, पण त्या माऊलीनं लगोलग उलगडा केला. ‘‘तसं न्हाई. मंजे त्याला पन कळतं की बाबा टाइम लागनारे. आन् आपन पन शांतपने काम करू शकतो. उगा त्यांनी ‘झालं का, झालं का’ करत बसायला नको.’’ इतक्या सगळ्या शहरी मंडळींत एका छोटय़ा गावातून आलेली ही ताई अगदी कंबर कसून निश्चयानं स्पध्रेत उतरली होती. गावानं स्पध्रेत उतरण्याचा निर्णय घेतला आणि पद्माताईंनी प्रशिक्षणाला जाण्याचा.

‘‘ते बचतगटाचं काम करून निगायला मला वेळ झाला. पन पयल्या दिवशी काय मी तिथं जाऊ शकले नाई, पन दुसऱ्या दिवशी निगाले. थोपटेदादांच्या घरी जायचं होतं. मग रात्रीची अंधारात बसमधून उतरले. रस्त्यावर कुनी नाई. थोपटेदादांना फोन केला. ते म्हनाले, ‘थांबा ताई, मी येतो.’ पन ते रेल्वेफाटकापाशी आले आन् मी पुडं उतरले होते. तर दोन मान्सं मोटार सायकलीवरून चालली होती. ती म्हनाली, ‘तुमी काय करताय रात्रीच्या हिकडं येकटय़ा?’ तर म्हनलं थोपटे दादांकडे निगाले. खूप भीती वाटली. पन मी निर्भयागटाचं पन काम करते. म्हनलं भ्यायचं नाई. आनं परत चालत आले. पानी फाउंडेशनला जायचंच आसं ठरवलं होतं आनि मग आलेच.’’

तुम्ही पाहिलंत का चुकून या ताईला त्या ‘एफबी’च्या भिंतीवर? आम्ही ‘एफबी- लाइव्ह’ केलं हे सगळं. निर्भय होत पुढे जाण्यासाठी चंद्राची सोबत पुरे आहे. आता मागे पाहात चालणे नाही. आता निर्धार आहे मातीचं हे ऋण फेडण्याचा. तिची शुश्रूषा करायलाच तर जमलेत हे जॉन, पद्माताई आणि अमरेंद्र. अशी माणसं भेटवलीत या पाण्याच्या कामाने, की त्यांच्या कहाण्यांची पुस्तकं व्हावीत. हे सगळं घडतं आहे. लहान लहान अक्षरांतून आशा रुजते आहे.

माझ्याबरोबर या प्रशिक्षण शिबिराला माझ्या दोस्तांच्या गटातील दहा जणं आली होती. १ मेच्या श्रमदानानं कमाल केली. आलेल्यांपकी कोणी समर्पक शब्दांत अनुभव मांडले, तर कोणी कविता केली. सोबत आलेल्या चिमुरडय़ांच्या हकिकती तर अहाहा! त्यातल्याच काहींनी मग माती परीक्षणाला यायचा हट्ट धरला. एक वेगळा व्हॉट्स-अ‍ॅप गट तयार झाला. मागचे वेळी प्रवास खर्च २५० आणि परीक्षण संचासाठी म्हणून ऐच्छिक १०० रु. वर्गणी काढली होती. काहींनी अगोदरच संचासाठी वर्गणी दिली होती. पण १ मेचा अनुभव घेऊन आल्यावर जणू चढाओढ लागली. कुणी एक, तर कुणी दहा, तर कुणी शंभर संचांचे पसे भरले. सगळ्या रोजच्या रोज जमा होणाऱ्या पशांचा हिशोब ठेवण्याचं अवघड काम प्रमोद पत्रेनं स्वीकारलं. अमरेंद्र जोशी ‘जमीन’ गटाचा प्रमुख. त्यानं सगळीकडे आवाहन करायला सुरुवात केली. जी मंडळी प्रशिक्षणाला येऊ शकली नाहीत, पण प्रत्यक्ष कामाला यायला तयार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करून आयोजनाची आखणी करायला सुरुवात केली.  मी सत्यजितला विचारलं, ‘‘असं चालेल ना?’’ तो म्हणाला, ‘‘का नाही? हे तुमचंही काम आहे. आणि त्यातली जबाबदारी तुम्हाला कळलेली आहे. बरं आपलं प्रशिक्षणही अगदी साधं आहे. जास्तीत जास्त लोकांना अनुभव मिळू दे. आपल्याला माणसं घडवायची आहेत. मग अशी माणसं सगळं करतील जबाबदारीनं.’’ अगदीच पटलं मला. मी पाहातही होतोच. तपासणीसाठी आलेली माती आजारी असल्याचा निष्कर्ष निघाल्यावर माणसांचे पडलेले चेहरे मी पाहिले होते. मोहितेसरांना घाईनं ‘‘हे दुरुस्त कसं करता येईल?’’ हे विचारताना कुणा रक्ताच्या नातलगाच्या आजारपणाशी लढायची असोशी दिसली होती.

आज माझ्या परस्पर चेतन कुलकर्णी कुणा धनिकाला भेटून संचसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, तर अमरेंद्र जलमित्र वाढवण्याच्या. आनंद पंडित कुठल्याशा संस्थेत जाऊन या कामासंबंधी बोलतो आहे, तर संजय चोरडिया आपल्या मित्रांना सामील करून घेण्याकरिता शब्द टाकतोय. स्वातीताईचा (स्वाती भटकळ) आस्थेनं फोन येतो. माझ्या मित्रांची ती चौकशी करते. पुढचे प्लान्स विचारते. कौतुक करते. मीही ऐटीत सांगतो की, ‘‘त्यांना ना आमिरला भेटायचंय, ना स्वत:ची नावं कुठे झळकवायची आहेत. ती मग्न आहेत या कामातला आनंद लुटण्यात.’’ मागच्या वर्षीच्या स्पध्रेत पाणीदार (‘तेजस्वी’ या अर्थीही) झालेल्या गावातल्या एका शिक्षकानं या सगळ्याचं फार अचूक निदान करीत म्हटलं होतं, ‘‘आम्हाला या कामातनं आत्मिक आनंद मिळाला. पाणी तर मिळणार होतंच.’’

माझ्या धाकटय़ा भावानं, शिरीषनं आमच्या देविदासच्या जोडीनं फुलविलेल्या शेतीत मी मोठय़ा अभिमानानं मित्र घेऊन गेलो होतो. मातीबद्दलचं, पर्यावरणाबद्दलचं, पिकांच्या वाढीबद्दलचं त्याचं ज्ञान ऐकून माझ्यासकट सगळी चाट पडली. ‘सेंद्रिय कर्ब’ हा शब्द त्याच्या तोंडी प्रथम ऐकला. आज मला त्याचं पूर्णाशी महत्त्व कळलंय. मलाच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक जलमित्रांनाही. येत्या दिवसांत हे ज्ञान चौखूर वाटून शेतकरी शहाणा करण्याचं, सक्षम करण्याचं काम आम्ही करणार आहोत. हे मी लिहीत असलेलं वाचून कोण कोण माणसं या कामात जोडली जातायत. भर मुंबईतल्या गोरेगावातून पहाटे शिस्तबद्धरीत्या माणसं श्रमदानाला घेऊन जाणारा सुनील बर्वे, कुणा मत्रिणीनं आग्रह केला म्हणून आलेला जॉन, निर्धारानं अंधारात पाऊल पुढे टाकणारी पद्माताई, सरकारी कर्मचारी असून समाजासाठी झटणारे मोहितेसर, रांचीचा अमरेंद्र, सोबतीस पुण्याचा एक अमरेंद्र, परीक्षण संचाचं योग्य वितरण करणारा गेवराईचा भगवान, पुरंदरचा अंबादास, सगळी सगळी लढताहेत. काठीण्य भंगते आहे. माती भुसभुशीत होते आहे अन् आत्मिक आनंदाचा डोह आनंदाचे तरंग उमटवीत भरतो आहे!

girishkulkarni1@gmail.com