21 October 2018

News Flash

व्रतस्थ आणि वृत्तस्थ

महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर हे अभिजनवादी होते की नव्हते,

महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतले व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर

राजा मरण पावल्यावर इंग्लंडमध्ये ‘द किंग इज डेड, लाँग लिव्ह द किंग’ असा जाहीर पुकारा करण्याची एकेकाळी पद्धत होती. राजा मरण पावलाय आणि नव्या राजाला उदंड आयुष्य लाभो, असा या एका ओळीचा दुहेरी अर्थ. गोिवदराव तळवलकर यांची जागा घेणारा कुणी आसपास दिसत नाही. तेव्हा, ‘तळवलकर इज डेड, लाँग लिव्ह तळवलकर,’ असं म्हटलं पाहिजे.

संपादक हा रुबाबदार असतो हे तळवलकरांमुळे महाराष्ट्राला समजलं. त्यांच्यामुळे न्यूज-रूमला व्यावसायिक शिस्त लागली. पेपरवाले गबाळे, पेपरची दुनिया गचाळ, डोकेफिरू संपादक, विसरभोळा उपसंपादक आणि बिलंदर रिपोर्टर राजू हे बातमीदारीचं stereotype चित्र तळवलकरांमुळे पालटलं. त्यांनी मराठी पत्रसृष्टीला दर्जा मिळवून दिला. गिरीश कुबेर, प्रकाश अकोलकर, प्रताप आसबे, नितीन वैद्य ही त्या काळातली तरुण पिढी तळवलकरांचा आदर्श समोर ठेवूनच वृत्तसृष्टीत आली असेल.

तळवलकर धिप्पाड होते. सर्वार्थानं. पलवानच होते ते. त्यांच्यात पीळ, लिखाणात पीळ. एका मोठय़ा काळावर त्यांचा शिक्का. देशाच्या पातळीवर मान होता. तळवलकर, शामलाल, गिरीलाल जैन आणि आर. के. लक्ष्मण असं ‘टाइम्स’चं एक चतुष्टय़ होतं. आपण अशा दिग्गजांबरोबर काम करतो म्हणून आम्हा नव्या भिडूंची कॉलर नेहमी टाइट असायची. माझ्या दोन बातम्यांवर तळवलकरांनी अग्रलेख लिहिले म्हटल्यावर मी काही दिवस बोर्डात पहिला आल्याप्रमाणे हवेत तरंगत होतो. तेव्हा पगार फार नसायचा. परंतु कामाचं समाधान मिळायचं.

तळवलकरांनी स्वकष्टानं प्रतिष्ठा मिळवली अन् अखेपर्यंत ती टिकवली. त्यासाठी योग्य ती पथ्यं पाळली. सभा-संमेलनांपासून दूर राहिले. झगमगाट, माणसांची गर्दी टाळली. वाचनाचं, लिखाणाचं व्रत पाळलं. सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांची मत्री. परंतु राज्यसभेसाठी कधी डाव टाकला नाही. तळवलकर आपल्या मानात जगले. स्वत:भोवती एक संरक्षक िभत बांधून जगले. टीकाकारांची फारशी पर्वा केली नाही. बातमीदारीला व्यासंगाची जोड दिली. व्रतस्थ होते आणि वृत्तस्थही.

आपलं वर्तमानपत्र मराठी आहे, मराठी माणसांसाठी आहे याचं एक सजग भान त्यांना अखेपर्यंत होतं. विनाकारण त्यांनी इंग्रजीची झूल मराठीवर चढवली नाही. ‘टाइम्स’कडे पाहून पेपर काढला नाही. म्हणूनच यशवंतराव चव्हाणांवर अधम आणि खोडसाळ बातमी छापल्याबद्दल तळवलकर ‘इण्डिपेंडेंटचा बेशरमपणा’ असा सणसणीत अग्रलेख लिहू शकले. त्यातली गोम अशी की, ‘द इण्डिपेंडेंट’ हा ‘टाइम्स’ समूहाचा पेपर होता. मालक मंडळीही तेव्हा बरी होती म्हणायची.

तळवलकरांच्यात एक vanity होती. ती त्यांना शोभून दिसली. ग्रेटा गाबरेत ती होती. गाबरे तळवलकरांच्या आवडीची. आणि इन्ग्रिड बर्गमन. आणि दुर्गा खोटे. जीवनसन्मुख होते तळवलकर. उत्तम खाण्यापिण्याची आवड. टापटिपीनं राहायचे. टर्टल-नेक जर्सीत छान दिसायचे. ऑफिसातल्या एका गबाळचंद वार्ताहराला एकदा त्यांनी चांगलंच फैलावर घेतलं होतं. ‘नीटनेटकं राहायला फार पसे नाही पडत. तशी वृत्ती पाहिजे,’ असं त्याला सुनावलं. त्या वार्ताहरानंच मला हा किस्सा सांगितला.

तळवलकरांना मी १९८२-८३ च्या सुमारास भेटू लागलो. तेव्हा मी रुसी करंजिया यांच्या ‘द डेली’ या इंग्रजी दैनिकात कामाला होतो. नंतर काही काळ मी एनसीपीएत काम केलं. तिथं तळवलकर नियमित यायचे. पु. ल. आणि डॉ. कुमुद मेहतांना भेटायला किंवा कार्यक्रमांना. ते पु. लं.चा ‘पी. एल.’ असा उल्लेख करायचे.

गंभीर चेहऱ्यानं टाटा सभागृहात बसलेले तळवलकर डोळ्यांसमोर दिसतात. स्टेजवर पु. लं.ची दंगामस्ती चाललेली असायची. अगदीच राहवलं नाही तर तळवलकर  ‘ह.. ह.. ह..’ (ह्यॅ.. ह्यॅ.. ह्यॅ..’ असं अजिबात नाही.) असं तुटक तुटक हसायचे. त्यांच्या पत्नी मात्र दिलखुलास हसायच्या अन् योग्य ठिकाणी दादही द्यायच्या. तळवलकर निर्वकिार.

आस्ते आस्ते समजलं, की तळवलकरांचा सेन्स ऑफ ूमर जबरदस्त आहे. गप्पांत रमले तर छान बोलायचे. खुलायचे. चेहऱ्यावरची एक रेषही न हलवता विनोद सांगण्याचं त्यांचं कसब भारी होतं. ते उत्तम स्टोरी-टेलर होते.

योग्य तो मान राखून थोडीबहुत थट्टा केलेली तळवलकरांना चालते, असं हलके हलके माझ्या लक्षात आलं. एकदा एका जुन्या, दुर्मीळ ग्रंथांच्या दुकानात अचानक भेटले. एकटेच होते. मी पुस्तकं चाळत होतो तिथं आले अन् म्हणाले, ‘‘दुकानाच्या मालकाचं नाव एका पक्ष्यावरून आहे  हे  ठाऊक आहे. पण नेमकं नाव आठवत नाहीए.’’ मालक तळवलकरांच्या भोवती भोवती करत होता.

मालकाचं नाव होतं- कोकीळ. ‘‘घुबड आहे वाटतं त्याचं नाव,’’ असं मी गमतीनं म्हणालो.

‘‘इथं रात्री घुबडं येतात काय दुर्मीळ ग्रंथ वाचायला?’’ तळवलकरांनी प्रश्न केला. मी मालकाचं खरं नाव सांगितल्यावर ते ‘ह..ह..ह..’ असं रॅपिड फायर हसले. ‘‘गोड आहे नाव.’’ चेहरा मात्र गंभीर.

एकदा मी नि नितीन वैद्य मोहम्मद अली रोडला जायचं म्हणून ‘टाइम्स’च्या मुख्य दारापाशी भेटलो. रमझानचा महिना सुरू होता. मोहम्मद अली रोडला जाऊन मुसलमानांची मिठाई हादडायची असा आमचा गुप्त बेत होता. शनिवार असल्यामुळे फारसं काम नव्हतं. नेमके दारापाशी तळवलकर भेटले. ‘कुठं चाललात?’ वगरे झालं. आम्ही खरं काय ते सांगून टाकलं. ‘गाडीत बसा,’ तळवलकर म्हणाले. अन् आमच्याबरोबर सुलेमान-उस्मानच्या विख्यात दुकानात आले. अफलातून मिठाईवर ताव मारून झाला. शिवाय पाव-पाव किलोचा पुडा आम्हा दोघांना भेट म्हणून मिळाला. तळवलकर तरुण मंडळींत बसतात नि गप्पा मारतात म्हणून बुजुर्ग लोक अधूनमधून कुरकुर करायचे. तळवलकर तिकडं लक्ष देत नसत.

‘न्यू थिएटर्स’चे बंगाली सिनेमे हा तळवलकरांचा सॉफ्ट स्पॉट होता. सगल, काननबाला, बरूआ, के. सी. डे आणि विशेष म्हणजे मन्ना डे त्यांना फार प्रिय. मन्नाबाबूंची एक खाजगी मफल करावी असं त्यांच्या मनात होतं. ते राहून गेलं. जुन्या फोटोतले तळवलकर शरदबाबूंच्या नायकासारखे दिसतात. हे एकदा त्यांना (भीत भीतच) सांगितलं, तर पुन्हा ‘ह..ह..ह..’ असं हसले.

बुद्धिवैभव तर होतंच त्यांच्यापाशी; पण व्यवहारज्ञानही भरपूर होतं. जगण्याची रग होती. वैचारिक शिस्त होती. अखेपर्यंत नेहरूवियन विचारांशी प्रामाणिक राहिले. अखेपर्यंत लिहिते राहिले. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. ते खऱ्या अर्थानं भारतीय गणराज्याचे राखणदार होते.

तळवलकर अभिजनवादी आहेत अशी कुरकुर अधूनमधून व्हायची. असे आरोप करणं सोपं असतं. तळवलकर व्यासंगी (erudite-scholar) परंपरेतले, महाराष्ट्रातल्या प्रबोधन परंपरेतले होते. या परंपरेनं मातीची ओल धरून ठेवली. म्हणून इथं लोकशाही रुजली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

संपादकानं चौकात उभं राहून नि वडा-पाव खात खात सामान्यांचे अश्रू पुसण्याचं काम करावं, असं बहुधा तळवलकरांच्या टीकाकारांचं म्हणणं असावं. याला सवंग लोकानुनय म्हणतात. तो लोकशाहीला किती मारक आहे हे परवाच्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीवरून आपल्या लक्षात आलं पाहिजे. व्यासंगी परंपरेला दूर लोटल्यामुळे बातमीदारीचं अतोनात नुकसान झालंय, हे एकदा आपण मालकांना ठणकावून सांगायला हवं. जमेल आपल्याला?

येणारा काळ सगळ्याच बाबतीत खडतर असणार आहे याचा अंदाज तळवलकरांना होता. वीस वर्षांपूर्वी ‘मौजे’साठी त्यांची विस्तृत मुलाखत घेण्याचा योग आला. इलेक्ट्रॉनिक मीडिया, जाहिरातींचं बातमीवर होणारं अतिक्रमण, बातमीदारीचं झपाटय़ानं बदलणारं स्वरूप आणि घिसाडघाईत काही चिरंतन मूल्यांची होत असलेली पडझड.. असं दोनेक तास ते बोलत होते.

नंतर अमेरिकेला मुलींकडे निघून गेले ते कायमचे.

एक-दोनदा मुंबईला आले तेव्हा भेट झाली. यशवंतराव चव्हाण पुरस्कार समारंभाला स्वत: हजर होते. त्या दिवशी शरद पवार सुरेख बोलले. कार्यक्रम संपल्यावर ‘आता तुम्ही कुठं जाणार?’ असं तळवलकरांनी मला विचारलं.

‘‘ ‘टाइम्स’ला,’’ मी म्हणालो.

‘‘मी सोडतो तुम्हाला,’’ म्हणाले.

गाडी ‘टाइम्स’च्या दारात उभी राहिली. तळवलकर त्या दगडी आणि अनेक संपादक सोसलेल्या इमारतीकडे एकटक पाहत होते.

‘‘टाइम्सची आठवण येते?’’ मी विचारलं.

काही बोलले नाहीत. डोळ्यांत मात्र कोमल भाव होता.

नंतरचा पेपराच्या दुनियेत धकाधकीचा काळ सुरू झाला. सगळेच एकदम वर्दळीवर आले. ज्यांना जमलं त्यांनी नव्या व्यवस्थेशी छान जमवून घेतलं. काही कण्हत, कुंथत राहिले. ‘सारेच दीप कसे मंदावले आता’ असे थंडगार उसासे टाकत राहिले. अन् तिथं दूर अमेरिकेतल्या ूस्टन गावी एक नव्वदीचा राजिबडा गडी गांधी-नेहरूंच्या विचारांची चूड पेटवत होता. ‘वन्हि तो पेटवावा..’ तुमच्या-माझ्याशी सतत बोलत होता. शांत, परंतु ठाम स्वरात. पण आपण ऐकण्याच्या तब्येतीत नव्हतो.

तळवलकरांनी असं एकदम अमेरिकेला जायला नको होतं, he let us down असं आपल्याला वाटू लागलं होतं की काय.. विजय तेंडुलकर आणि सुजाण मराठी नाटकवाले यांच्यात एक आतडय़ाचं नातं आहे. त्याचप्रमाणे सुजाण मराठी पत्रकार आणि तळवलकर असं एक गुफ्तगू सुरू असायचं.

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांची एक आठवण सांगतात. बुवा खूप आजारी होते तेव्हाची. एक गायक त्यांना भेटायला आला. तब्येतीची विचारपूस झाली, इकडचं तिकडचं बोलून झालं अन् तो गडी एकदम ‘बुवा, मी तुमचा शिष्य..’ असं म्हणू लागला. अगदी गळ्यातच पडला. तशा मरणासन्न अवस्थेतही बुवा ताडकन् म्हणाले, ‘गाऊन दाखव, मग सांगतो.’ तर, आपण तळवलकरांच्या तालमीत तयार झालो असं नुसतं सांगून भागणार नाहीये. त्यांच्यातलं आपण काय स्वीकारलं? त्यांची सचोटी, त्यांचा व्यासंग, त्यांची लेखनशिस्त, डोळसपणे स्वीकारलेल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहण्याचा कणखरपणा.. यातलं काय आहे आज आपल्यापाशी?

अन् मुख्य म्हणजे त्यांचं कसदार, दाणेदार, रसरशीत मराठी. यांपकी आपल्याकडे काय आहे? की आपल्याला काहीच नको आहे? ‘तळवलकरांच्या तालमीत तयार झालो..’ हे चारचौघांत सांगण्यापुरतेच आपल्याला तळवलकर हवे होते की काय? असं मिरवणं म्हणजे खोटंच की. आभासी.

दुष्यंतकुमारचा एक शेर आहे :

‘एक बाज़ू उखडम् गया जब से

और ़ज्यादा वजन उठाता हूं.’

तळवलकर गेले. आपला उजवा हात गेला. आता डाव्या हातानं जास्त ओझं उचलायचंय हे लक्षात ठेवलं पाहिजे.

ambarishmishra03@gmail.com

First Published on March 26, 2017 2:40 am

Web Title: govindrao talwalkar editor govindrao talwalkar govindrao talwalkar personality editor introduction