प्रिय तातूस,
मी बऱ्याच दिवसांनी तुला पत्र लिहिले याचा तुला आनंद झाला, ऐकून बरे वाटले. अरे, हल्ली लोक पोस्टाने जे काय येईल त्याची थप्पी मारून ठेवतात आणि रद्दी घालायच्या वेळेला फोडून उघडून बघतात. तू इतक्या तत्परतेने मला क ळवलेस म्हणून बरे वाटले. आमच्या इथे परवा एक ग्रंथोत्सव झाला. त्यात पुस्तकांचे स्टॉल लावले होते. मी त्यात जी. ए. कुलकण्र्याच्या पत्रांचे चांगले एक नाही, दोन नाही, चार खंड बघितले. त्यामुळे मला आता जास्तच स्फूर्ती मिळालीय. जीएंसारख्या माणसाची पत्रे जर लोक विकत घेऊन वाचतात, तर आपली का नाही वाचणार, असे मला उगाचच वाटत राहिले. नशिबाची दारे केव्हा कुणाची उघडतील काही सांगता येत नाही. ते धीरूभाई पेट्रोल पंपावर काम करायचे.. ते कुठेच्या कुठे गेले! तेव्हा भविष्यात एखादे वेळेस ‘तातूस पत्रे’ या ग्रंथाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघतील. काही सांगता येत नाही. मोदींच्या लाटेत निवडून आलेल्यांना तर अजूनही आपण कसे काय निवडून आलो असे वाटते. तेव्हा नशिबाचे काही सांगता येत नाही. न्यूटनने एवढे नियमांचे शोध लावले, हासुद्धा नशिबाचाच भाग! त्यामुळे मी तुला पाठवलेल्या पत्रांच्या झेरॉक्स काढून ठेवल्यात आणि कॉम्प्युटरमध्ये सेव्ह का काय करतात ते करायला पण सांगितल्यात.
तुला आश्चर्य वाटतं- की मला हे सुचतं कसं! खरं तर इकडे तिकडे बघत चालत राहिलं की ज्या सगळ्या गोष्टी आपलं मन टिपून घेतं, तेच कागदावर उतरवायचं. मी कुठलीही गोष्ट करायची तर आधी यादी करून घेतो. पूर्वी लग्नात बघ- याद्या व्हायच्या. मुलगी किंवा मुलगा किती शिकलाय, यात तेव्हा कुणाला रस नसायचा. पण ‘याद्या झाल्या का?’ हा प्रश्न मात्र सतत विचारला जायचा.
हल्ली माझे कुणी कौतुक केले की आमच्या इथल्या लोकांना खूप त्रास होतो. घरातल्यांना माझ्या या छंदाचा कंटाळा आलाय. मी काहीही बोललं तरी सर्वाचा सूर विरोधातच असतो.
अरे, परवा वारा सुटला आणि गार वाटायला लागलं तर मी आपलं ‘काय थंडी पडलीय!’ म्हणालो; तर घरातून लगेचच ‘थंडीच्या दिवसात थंडीच पडणार!’ असं उत्तर आलं. परवा मी गाण्याच्या मैफिलीला गेलो होतो. खरंचच छान गाणं रंगलं होतं. परत आल्यावर मी नानाला ‘गाण्याचा कार्यक्रम छान झाला!’ म्हणालो. त्यावर तो ‘आता गायक म्हटल्यावर त्यानं चांगलं गायलंच पाहिजे!’ म्हणाला. म्हणजे एखादा माणूस पायलट आहे म्हणताना त्याला विमान चालवायला यायलाच पाहिजे! आपल्या अवतीभवती अशी माणसं असली की नुसता रागच येतो असं नाही, तर अक्रोड फोडतो तसं फोडून काढावंसं वाटतं. अरे, परवा मी दिवाळी अंकातली छान कविता नानाला वाचून दाखवली. त्यावर ‘आम्हाला कवितेची आवड असती तर आम्ही पण कविता लिहिल्या असत्या..’ म्हणाला! आपण खरं तर डोकंच आपटावंसं वाटतं. पण इतकं छान डोकं दिलंय परमेश्वरानं- तर ते आपटा कशाला, असंही वाटत राहतं. उगाच नाही सरकार हेल्मेट वापरायला सांगत! पण हेल्मेट घेतलं की आपल्याला उगाचच टू-व्हीलर घ्यायला लागणार. हल्ली हेल्मेटवर काय काय वाद आणि मोर्चे वगैरे निघतायत. मला तर गंमतच वाटते. आमच्या हिचं म्हणणं तर- ज्यांना डोकं आहे त्यांनी हेल्मेट घालावं, नाहीयाय त्यांनी सोडून द्यावं. अरे, रात्री आपण झोपतो तेव्हा उशीलासुद्धा डोकं लागतंच की नाही!
पण अगदी मनातलं खरं सांगू? मला हल्ली इथे एकेका गोष्टीचा कंटाळाच येत चाललाय. थोडय़ा दिवसांसाठी आपणदेखील देश सोडून जावं असं वाटतंय. पण देश सोडून जायचं तर आधी पासपोर्ट काढावा लागणार. त्याची पण प्रोसिजर खूप मोठी असते म्हणे. खूपच मोठा फॉर्म कॉम्प्युटरवर भरावा लागतो. हे काय आपल्याला जमणार आहे होय? अरे, साधा रेशनकार्डावर नाव घालायचा फॉर्म भरायचा होता, तर तोही आम्हाला भरता आला नाही. मराठी भाषा आपलीच असूनदेखील किती अवघड होत चाललीय, बघ बरं. देश सोडून जायचं तर कुठल्या देशात जायचं, याची तरी काही माहिती असायला हवी! त्यात आपण पडलो शाकाहारी! श्रीमंत लोकांना देश सोडायचा तर काहीच प्रॉब्लेम नसणार. आपल्याला सगळी बांधाबांध करून निघावे लागणार. पुन्हा बरोबर जाताना खाण्याचे पदार्थ घ्यावे लागणार. मला कुणीतरी सांगितलं की, विमानातनं प्रवास करताना राजगिऱ्याचे लाडू घ्यावेत, म्हणजे ते हलके असल्याने वजनाचा प्रॉब्लेम नसतो. इथली बिले वगैरे भरण्याचे सगळे कुणावर तरी सोपवावे लागणार. आता या वयात देश सोडायचा म्हणजे अण्णांचे म्हणणे-‘एकदम डोक्यात राख घालून असा काही निर्णय अंतू घेऊ नकोस.’ पण हिला कोणीतरी परदेशगमनाचा योग आहे असे पत्रिका बघून सांगितले, त्यामुळे ती हवेत आहे. पूर्वीच्या काळी डोक्यात राख घालून नेसत्या वस्त्रानिशी लोक घर सोडून जात. आता वनवासाला जायचं तर वनदेखील कुठं राहिलंय? अरे तातू, पूर्वीच्या काळी दुपारी जेवणाच्या वेळी कुणी अनोळखी माणूस दिसला तरी त्याला जेवल्याशिवाय सोडत नसत. खरंच, किती सुखाचा काळ होता म्हणून सांगू! आपल्या लहानपणी ‘कालनिर्णय’ नव्हते तरी दिवस कसे निघून जायचे, ते कळायचे पण नाही. आता सगळीकडे विचित्र वातावरण झालेय. अशा वेळी कुणीतरी आपले म्हणणारे भेटावेसे वाटते. ते नाही, तर निदान पत्रातून तरी मन हलकं करावं असं वाटत राहतं. हल्ली फिरायला जाणे फारसे जमत नाही म्हणून शरीर नाही, निदान मन तरी हलकं करावं वाटतं.
तब्येतीची काळजी घे. मी देश सोडून जावेसे वाटते म्हणालो त्याचा भाजपशी काही संबंध नाही. नाहीतर उगीचच गैरसमज व्हायचा. चार दिवस हवापालट हवा म्हणून मी बोलून गेलो. असो.
तुझा-
अनंत अपराधी
अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com