News Flash

क्रिमियातले राजप्रासाद अन् साहित्य-सृजन

क्रिमियात आज पंधरा हजार वास्तुशिल्पे आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक स्मारके आहेत.

निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केलेल्या क्रिमियात आज पंधरा हजार वास्तुशिल्पे आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक स्मारके आहेत. इथली स्वच्छ, आरोग्यदायी हवा आणि प्रसन्न निसर्गाचा रशियातील झार राजवटीपासून ते जागतिक पातळीवर गाजलेल्या अनेक रशियन लेखक-कवींनीही मनसोक्त आस्वाद घेतलेला आहे..
क्रिमियाचे एक वैशिष्टय़ म्हणजे वेगवेगळ्या शतकांत त्यावेळच्या राजांनी उभारलेले राजमहाल. ते कायमच देशी-विदेशी पर्यटकांचे (आज युरोपियन युनियनने रशियावर बहिष्कार घातला असला तरीही!) खास आकर्षण ठरले आहेत. रशियातल्या कडाक्याच्या थंडीत, तसेच उन्हाळ्यातील आल्हाददायक हवेसाठी रशियातून या द्वीपकल्पावर वास्तव्यार्थ येणाऱ्यांसाठी निर्माण केले गेलेले हे राजमहाल आजही उत्तम स्थितीत आहेत. सोव्हिएत संघ अस्तित्वात असताना या वास्तूंची विशेष काळजी घेण्यात येत असे. मध्यंतरीच्या काळात क्रिमिया युक्रेनमध्ये समाविष्ट असताना या वास्तूंकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या वास्तूंच्या जतनासाठी आता रशियन सरकारने भरीव मदत जाहीर केली आहे. वास्तविक पाहता हे सर्व महाल युनेस्कोच्या ऐतिहासिक वारसा वास्तूंच्या यादीत अद्याप का समाविष्ट झाले नाहीत, असा प्रश्न पडतो.
आजची क्रिमियाची राजधानी सिम्फेरापोलपासून तीस कि. मी. अंतरावरील दक्षिण-पश्चिमेला बख्चिसराय ही तत्कालीन खानाची (तातार खान) १५ व्या शतकातील राजधानी होती. या ठिकाणी खानाने बांधलेला महाल आजही पर्यटक आणि वास्तुविशारदांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हा महाल १५ व्या शतकाच्या शेवटी आणि १६ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, आजही इतिहास संशोधकांमध्ये याबाबत दुमत आहे. या राजवाडय़ातील २० दालने अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्यातली काही वस्तुसंग्रहालयात रूपांतरित करण्यात आली आहेत. या संग्रहालयात त्याकाळची हत्यारे, पेंटिंग्ज्, चिनी मातीच्या वस्तू, लाकडी भांडी आदींचे जतन करण्यात आले आहे.
खान आपला राज्यकारभार बख्चिसरायमधून चालवीत असे. या महालात त्याच्या राण्या राहत. एकेकाळचा हा भव्यदिव्य राजवाडा आज भूतकाळाची केवळ सावली उरली आहे. त्याकाळी असलेल्या सुंदर झुलत्या बागांचे- विशेषत: गुलाबांच्या बागांचे, तसेच अन्य झाडांचे गाईड रसभरीत वर्णन करतात. इथले दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास, खानाचे स्वत:चे दालन, पट्टराण्यांच्या खोल्या, सोन्याचे पाणी चढवलेले सिंहासन, जिथून सर्व गावाचे निरीक्षण करता येईल असा सोकल टॉवर आजही होते त्या अवस्थेत जपण्यात आले आहेत. या राजवाडय़ाचे वैशिष्टय़ म्हणजे ठिकठिकाणी नैसर्गिक स्रोतांपासून निर्माण केलेली कारंजी! दिवाण-ए-खासमधील नैसर्गिक कारंजे, भिंतीवरील नक्षीकाम, पडवीच्या वर असलेल्या लाकडावरील अतिशय बारीक अप्रतिम नक्षीकाम बघून मन हरखून जाते. १७३३ मध्ये तत्कालीन खानाने आपल्या पत्नीच्या निधनानंतर तिच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी बांधलेला ‘अश्रूंचा कारंजा’ अप्रतिम आहे. या कारंजाचे वैशिष्टय़ म्हणजे संगमरवरी दगड वापरून त्यातून डोळ्यांतून अश्रू टपकावे तसे या कारंजातून थेंब थेंब पाणी टपकते. त्यासाठी उभ्या दगडावर विशिष्ट रचना करण्यात आली आहे. याच कारंजावर कालांतराने आधुनिक रशियन कवी आलेक्झंदार पुश्किन यांनी कविता लिहून रशियन साहित्यात हे कारंजे अजरामर केले आहे. त्यामुळे सोव्हिएत युनियनच्या काळात या कारंजाजवळ पुश्किनचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.
क्रिमियन खान म्हणजे तातार खानाचा हा राजवाडा. तातार वास्तुशिल्पकलेतली ही जगातील महत्त्वपूर्ण वास्तू. बख्चिसरायमध्ये आजही ती जतन करण्यात आलेली आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेली ही क्रिमियाची पूर्वीची राजधानी स्वच्छ, थंड हवा व पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांनी परिपूर्ण आहे.
lr15 या राजवाडय़ाबाहेर आल्यानंतर एका तातार महिलेने मला हेरले. भारतीय वाटले म्हणून ती पुढे आली. मी तिला रशियन भाषेत ‘हो’ म्हणताच तिने जवळजवळ मला मिठीच मारली. ‘आम्हा तातारांचे हे सौंदर्य पाहण्यासाठी इतक्या लांबून तू आलीस,’ असे म्हणत ती माझे वारंवार आभार मानत होती. मला तिच्या भूत व वर्तमानकाळाविषयी जास्त उत्सुकता होती. म्हणून मी तिला काही प्रश्न विचारले. त्यावर तिने सांगितले की, ‘‘दुसऱ्या महायुद्धानंतर आमच्या कुटुंबास सैबेरियात पाठवण्यात आले. सोव्हिएत युनियन असेतो आम्ही इथे यायचो कधीही. पण गेली २० वर्षे आम्ही आमच्या मातृभूमीला पारखे झालो होतो. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यामुळे आज इथे पुन्हा येणे शक्य झाले. नाहीतर युक्रेनचा व्हिसा घ्या आणि नंतर इथे या अशी स्थिती होती. सर्व परके झाले होते. आता मुलगी आणि जावयासह इथेच आलो आहोत कायमचे. आता वर्ष झाले. पेन्शन आहे. व्यवस्थित चालले आहे. उरलेले आयुष्य इथेच आपल्या मातृभूमीत छान घालवायचं आहे.’’ तिचा निरोप घेताना ती म्हणाली, ‘परत ये गं माझ्या एकमेवाद्वितीय बख्चिसरायला.’ ‘नक्की येते’ असे सांगून मी तिचा निरोप घेतला.
विविध ठिकाणचे समुद्रकिनाऱ्यावरील हे राजमहाल म्हणजे जणू क्रिमियाच्या गळ्यातील मोत्याच्या माळेतील मोती आहेत. क्रिमियाच्या निसर्गसौंदर्यात त्यामुळे भर पडली आहे. हे राजप्रासाद आज क्रिमियाचे पर्यटन आणि सांस्कृतिक ब्रँड झाले आहेत. त्यातला एक म्हणजे ‘स्वॅलोज नेस्ट’! जगातील अद्भुत महालांत त्याची गणना होते. खाली पसरलेला अफाट काळा समुद्र, त्यात ४० मीटर वर निर्माण झालेल्या डोंगराच्या सुळक्यावर उभा असलेला हा ‘स्वॅलोज नेस्ट’! मागच्या बाजूला उंचच उंच डोंगरांच्या रांगा. त्यावर एका बाजूला धुके, तर दुसरीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश. अशा विलोभनीय देखाव्यात ‘स्वॅलोज नेस्ट’चे मूळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. डोळ्यांत काय साठवू आणि काय नको अशी आपली अवस्था होते. लहानपणी वाचलेल्या पऱ्यांच्या राज्यात आलोय की काय असा आभास झाला.
१८९५ मध्ये या महालाची रशियन जनरल सिरका यांनी निर्मिती केली. सुरुवातीला तो लाकडात बांधण्यात आला होता. मात्र, १७ वर्षांनी जर्मन लेखक वोन स्टींगल यांनी लाकडाचे साचे काढून १९११-१२ मध्ये आजच्या या दगडी ‘स्वॅलोज नेस्ट’ची पुनर्निर्मिती केली. हा महाल पाहण्यासाठी जगभरातून क्रिमियात पर्यटक येत असतात. १९२७ मध्ये क्रिमियात झालेल्या प्रचंड भूकंपाचाही या महालाने सामना केला. त्यानंतर तो बंद करण्यात आला होता. नंतर ४० वर्षांनी- १९६८ मध्ये त्याचे नूतनीकरण करून लोकांसाठी तो खुला करण्यात आला.
इतिहासात आपण सर्वानी अभ्यासलेली याल्टा परिषद दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर फेब्रुवारी १९४५ मध्ये ज्या महालात झाली तो लिवाडिया पॅलेसही इथलाच! या परिषदेत अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत युनियन या तीन देशांचे प्रमुख- फ्रँकलीन रूझवेल्ट, विन्स्टन चर्चिल आणि जोसेफ स्टॅलिन सहभागी झाले होते. महायुद्धोत्तर जगाच्या भविष्यावर त्यांनी चर्चा केली. त्यावेळी रूझवेल्ट आजारी होते. त्यांची राहण्याची व्यवस्था तत्कालीन झारच्या या लिवाडिया पॅलेसमध्ये करण्यात आली होती. याच ठिकाणी सर्व बैठका पार पडल्या. वास्तविक पाहता या ठिकाणी पहिला प्रासाद झारने १८५६ च्या क्रिमियन युद्धानंतर उन्हाळ्यात इथे येऊन राहण्यासाठी बांधला. त्याच जागी आज अस्तित्वात असलेल्या या प्रासादाची झार निकोलाय द्वितीय याने पुनर्बाधणी केली. भव्य प्रासाद, सुंदर बगीचे, दूपर्यंत दिसणारा काळा समुद्र अशा प्रसन्न वातावरणात अनेकदा झारचे कुटुंब या ठिकाणी येऊन राहत असे. त्या काळातील लाकडी फर्निचर, पियानो आदी वस्तूंचे इथे जतन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शंभर वर्षांपूर्वीची लिफ्ट आजही उत्तमरीत्या कार्यरत आहे. रशियन क्रांतीनंतर-१९१७ साली हा राजप्रासाद रशियन प्रशासनाने ताब्यात घेतला.
lr16याल्टा परिषदेदरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान विल्स्टन चर्चिल हे वारान्त्सोव पॅलेसमध्ये वास्तव्यास होते. या राजवाडय़ाच्या मागील बाजूस समुद्राच्या साक्षीने चार भव्य संगमरवरी सिंह आहेत. त्यापैकी एक झोपलेला आहे. त्याला ‘सर्वात सुंदर’ (मोस्ट ब्युटीफुल ऑफ द फोर) असे म्हणतात. कारण तो झोपला आहे आणि त्याच्यापासून कोणाला त्रास नाही. या सिंहाच्या प्रेमात चर्चिल पडले आणि म्हणाले, ‘हा सिंह अगदी माझ्यासारखा आहे. फक्त त्याच्या तोंडात चिरूट नाही!’
याच प्रसादाला आलुप्का प्रासादही संबोधतात. क्रिमियाच्या दक्षिणेला आलुप्का शहराजवळ हा प्रासाद पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे. एका बाजूला पर्वतांच्या रांगा, तर दुसऱ्या बाजूस खाली अथांग निळाशार समुद्र. मध्यभागी लाल दगडात आकर्षक कोरीवकाम केलेला हा प्रासाद आणि त्याच्या परिसरात असलेले अनेक नैसर्गिक पाण्याचे खळाळते झरे. कायम हिरव्यागार वनराईने नटलेला हा परिसर पाहून कुणी मंत्रमुग्ध झाला नाही तर नवलच. क्रिमियातील हा सर्वात जुना आणि भव्य प्रासाद. १८२८ ते १८४८ दरम्यान राजकुमार मिखाईल वारान्त्सोव यांनी स्वत:साठी उन्हाळ्यातील निवासस्थान म्हणून तो बांधला. या राजप्रासादाची वास्तुरचना इंग्लिश वास्तुरचनाकार एडवर्ड ब्लोअस यांनी विल्यम हंट या सहकाऱ्याबरोबर केली. त्यात त्यांनी स्कॉटिश, मुघल आणि गॉथिक शैलीचा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे.
इथले आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सुमारे ४० हेक्टर जमिनीवर जर्मन लँडस्केपनुसार त्याकाळी तयार करण्यात आलेली वनराई. सुप्रसिद्ध जर्मन रचनाकार कार्लोस किबाय यांनी या वनराईची रचना तयार केली आहे. हा परिसर पाहण्यासाठी बॅटरीवरील आठ-आसनी खुल्या रिक्षा या वनराईत आहेत. त्या काळात लावली गेलेली देश-विदेशातील असंख्य झाडे इथे सुखेनैव एकत्र नांदत आहेत. ती कोणत्या जातीची आहेत, कुठल्या देशातील आहेत, याची इत्थंभूत माहिती गाईड देतो. या परिसरात नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांमुळे झाडांची पाण्याची गरज भागवली जाते. स्वच्छ, शुद्ध हवा, ठिकठिकाणी तयार झालेले पाण्याचे छोटे छोटे तलाव आणि वाट तुडवायला बॅटरीवरची गाडी यामुळे न थकता मनमुराद भटकता येते. रशियन कवी इवान बुनीन यांनी १९०० साली या प्रासादास भेट दिली आणि एक सुंदर कविता त्याला समर्पित केली.
क्रिमियाचे रशियन साहित्यिकांशी अतूट नाते आहे. साहित्यिकांना क्रिमियातल्या वातावरणाने नेहमीच भुरळ घातली आहे. अनेक गाजलेल्या रशियन साहित्याचे मूळ त्या लेखकांच्या मनात रुजले ते क्रिमियात! सर्वात प्रथम बाख्चिसराय येथील खानाच्या पॅलेसला रशियन कवी आलेक्झंदार पुश्किन याने हद्दपारीच्या वेळी भेट दिली आणि आपल्या आठ-दहा दिवसांच्या क्रिमिया भेटीनंतर विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांनी लिहिलेली ‘बख्चिसरायचा कारंजा’ ही कविता अजरामर झाली. खानाने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मृत्यर्थ हा कारंजा बनवला आहे. त्याच्या हळुवार भावनांचे वर्णन पुश्किनने केले आहे. आजही रशियन साहित्याच्या अभ्यासकांच्या लेखी ही कविता अभ्यासाचा व कौतुकाचा विषय ठरते.
सुप्रसिद्ध रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय वयाच्या २६ व्या वर्षी क्रिमियन वॉरमध्ये (रशियन, फ्रेंच, ब्रिटिश यांच्यात झालेले युद्ध) सहभागी झाले होते. युद्धाच्या सुरुवातीला त्यांची नेमणूक क्रिमियाच्या बाहेर असलेल्या आघाडीवर करण्यात आली होती. त्यानंतर सिवास्तोपोल या शहराच्या रक्षणार्थ प्रत्यक्ष युद्धभूमीवर लेफ्टनंट म्हणून ते लढले. युद्धभूमीवर आपल्या अनेक सहकाऱ्यांना आलेले वीरमरण त्यांना विषण्ण करून गेले. अनेक बिकट प्रसंग आले. इथूनच त्यांनी सेंट पीटर्सबर्गच्या काही मासिकांसाठी युद्धभूमीवरची प्रसंगवर्णने लिहिण्यास सुरुवात केली. ते रशियातील पहिले युद्ध-पत्रकार ठरले. युद्धभूमीवरची अनेक वर्णने टॉलस्टॉय यांनी १८५४ मध्ये ‘सिवास्तोपोलची रेखाचित्रे’ या आपल्या पुस्तकात रेखाटली आहेत. त्यानंतर हाच युद्धाचा अनुभव, इथे अनुभवलेले अन्य प्रसंग पुढे ‘वॉर अँड पीस’ या आपल्या गाजलेल्या कादंबरीत त्यांनी रेखाटले.
जगप्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेकॉव्ह यांनी तर क्रिमियातील याल्टात बराच काळ वास्तव्य केले. तिथे शहरालगत गुर्सुफ येथे स्वत:चा दाचा (फार्महाऊस) बांधला. चेकॉव्ह अवघे ४४ वर्षांचे आयुष्य जगला. ज्यावेळी कर्करोगाने त्यांना घेरले, त्यांची तब्येत खूपच ढासळली, तेव्हा ते क्रिमियाच्या शुद्ध हवेत येऊन राहिले. इथेच त्यांनी आपल्या साहित्याला कलाटणी देणाऱ्या ‘चेरी ऑर्चिड’, ‘तीन बहिणी’ ही लघुकथा, ‘द लेडी विथ द डॉग’ या अजरामर साहित्यकृतींची निर्मिती केली. याल्टाच्या समुद्रकिनाऱ्यावरून फिरताना अचानक दृष्टीस पडलेल्या चेकॉव्ह आणि त्याची गाजलेली कलाकृती ‘द लेडी विथ द डॉग’चे पुतळे पाहून चेकॉव्हची चाहती असणाऱ्या मला चक्क चेकॉव्ह भेटल्याचाच आनंद झाला. या काळात चेकॉव्हचा याल्टातला निवास अनेक रशियन लेखक, नाटककार, संगीतकार, कलाकारांना आकर्षून घेणारा ठरला. या वास्तव्यादरम्यान चेकॉव्हने रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय, मॅक्झिम गोर्की, आलेक्झांदर कुप्रीन, इवान बुनीन, संगीतकार सर्गेय राहेमानिनोव यांना आपल्याकडे राहायला बोलावले. त्यांच्या एकमेकांशी साहित्यावर खूप चर्चा होत. पत्रांतूनही त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत. त्यामुळेच नंतरही क्रिमियाचा परिसर रशियन कवी वोलोशीन, मारिया त्स्वेतायेवा, सर्गेय इफ्रोन, आन्ना आखमातोवा, ओसीप मन्देलश्ताम या साहित्यिकांसाठी कायम प्रेरणास्रोत ठरला आहे. निसर्गसौंदर्य आणि साहित्यनिर्मिती यांचे नाते तसे अगदी प्राचीन.. आदिम मानवाच्या संस्कृतीकरणाच्या वेळेपासूनचे. क्रिमियातील हे सृष्टीवैभव या सर्जनशीलतेच्या पुरातन ते नित्यनूतन वाटचालीचे साक्षीदार आहे.
विद्या स्वर्गे-मदाने -vedvidya07@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 1:08 am

Web Title: historical place in crimea
Next Stories
1 खाकी वर्दीची वेगळ्या जाणिवेची कविता
2 लालबागकरांचे राहणीमान व अर्थशास्त्र
3 ‘महामोह’- अहल्येची वेगळी ओळख
Just Now!
X