|| अरुणा ढेरे

अगदी दोन-तीन महिन्यांपूर्वीच वाईला गेले होते. बरोबर गिरीश ओक आणि अनुराधा मराठे असे दोघे होते. अनुराधा म्हणाली, ‘‘यमुनाबाई शंभरी ओलांडून गेल्या आहेत. त्यांना भेटू या का?’’ आम्ही गेलो ते जरा दबकतच. बाई अगदी अंथरुणाला खिळून असतील का? बोलू शकतील का? असे प्रश्न मनात घेऊनच गेलो; पण आश्चर्य म्हणजे, बाई अगदी छान होत्या. जरा ऐकू कमी येत होतं, पण आनंदात होत्या. त्यांच्या कुटुंबानं त्यांची काळजीही चांगली घेतलेली दिसत होती. बाईंचे फोटो, वर्तमानपत्रातली त्यांच्या सन्मानाच्या बातम्यांची कात्रणं.. सगळं जपून ठेवलं होतं घरात. बरं वाटलं.

बाई पलंगावर बसल्या होत्या. थोडय़ा बारीक झाल्या होत्या. चष्मा तसाच- जाड भिंगांचा. आम्ही आमची ओळख दिली. मी त्यांच्या शेजारी बसत त्यांच्याशी पूर्वी केलेल्या गप्पांच्या आठवणी सांगू लागले तर बाई उचंबळून आल्या. दोन्ही हातांनी माझं तोंड कुरवाळत, मला जवळ घेत राहिल्या. मी त्यांच्या जुन्या लावण्यांच्या ओळी म्हणून दाखवू लागले तसेच त्यांचे डोळे चमकले. ‘‘म्हणता का ती लावणी? पतंगाची?’’ असं गमतीने विचारलं तर ‘होऽऽऽ’ म्हणाल्या आणि चक्क हावभाव करून म्हणायलाही लागल्या.

आता तो पूर्वीचा आवाज नव्हता. स्वच्छ, उंच स्वर लावता येत नव्हता. पूर्वीचा अदेचा नखरा नव्हता की ठसका नव्हता; पण तरी त्या सुंदर दिसत होत्या. कोणत्याही उत्तम कलावंताला त्याचा कलेचा आविष्कार घडवताना पाहावं. त्याचं सगळं चैतन्य त्याच्या अवघ्या दिसण्यातून झळकतं. चक्क सुंदर दिसतो तो. एरवी तो रूढार्थानं सुंदर असो वा नसो; मला यमुनाबाई तशाच दिसल्या.

त्यांची वीसेक वर्षांपूर्वीची एक मैफल आणि नंतर झालेल्या गप्पा यांची आठवण त्या दिवशी ताजी झाली. तेव्हाही त्या तरुण नव्हत्या. ऐंशीच्या घरात होत्या, पण उत्साहानं मैफल करण्याच्या तयारीनं आल्या होत्या. ‘‘मास्तर, काळी पाचमध्ये पुरी मैफल नाही गाता येणार. आता काळी चारच घ्या,’’ असं पेटीमास्तरांना म्हणाल्या आणि सरळ आवाज लावला त्यांनी. अगदी दमदार आवाज. झर्रकन जाणवलं की, हा आवाज म्हणजे अस्सल कलेचा आवाज आहे. जिला जात नाही, धर्म नाही, शिक्षण-पैसा-प्रतिष्ठा कशाचाही जिच्याशी संबंध नाही अशा कलेचा आवाज. पिढीजात वारशानं लोककलावंतांनी जपलेली- वाढवलेली कलाच बाईंच्या आवाजातून स्वत:च्या सामर्थ्यांचं आणि सौंदर्याचं दर्शन घडवत होती.

बाई कोल्हाटी समाजातल्या. १९१५-१६ च्या आसपास कधी तरी जन्म झालेला. गाव सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरचं मेढे गाव. गावोगाव भटकत पोट भरणारे ते कोल्हाटी लोक होते. कसरती करणं आणि नाचणं-गाणं त्यांच्या रक्तात होतं. लहानशा धातू्च्या कडीतून शरीर बाहेर काढणं, दोरीवरून चालणं, अवघड रीतीनं उडय़ा मारणं.. अशा प्रकारच्या पुष्कळ कसरती करणारे ते लोक. यमुनाबाईही लहानपणी तशा कसरती करायच्या. अंग चांगलं वळायचं. पुढे मग संगीतबारीत नाचून लावणी करायला लागल्या, तेव्हा तीच कला नाचाचा भाग झाली. तेव्हा त्या पतंगाची लावणी म्हणायच्या आणि म्हणताना डोक्यावर तबला ठेवून तोल राखत खाली वाकायच्या आणि दातांनी जमिनीवरचा रुमाल उचलायच्या. तबला जराही न डगमगता डोक्यावर तसाच! लोक टाळ्यांचा कडकडाट करायचे. यमुनाबाई मजेत गात राहायच्या- वर उंच माडीवर, चौथ्या मजल्यावर..

खरोखर पतंग उडवायच्या त्या. खाली झोपल्याइतक्या आडव्या होऊन दोरी खेचायच्या, हसायच्या, उत्कंठित व्हायच्या. थक्क करणारी अदाकारी होती त्यांची.

ही अदाकारी पाचव्या-सहाव्या वर्षांपासूनच सुरू झाली. त्यांची आई गाणी म्हणत भिक्षा मागायची. पायात बाभळीच्या खुळखुळणाऱ्या शेंगा बांधून यमुनाही आईमागून जायची, गायची, नाचायची..

हलवीत झोका गेला लांब

लांब लांब लांब,

अरे कृष्णा जरा थांब..

गाणं त्यांनी पहिल्यांदा आईकडूनच घेतलं. त्यांचे वडील तबला वाजवायचे. एक चुलतभाऊ रंगू-गंगूच्या तमाशा फडात होता. त्यानं चार-सहा महिने त्यांना बरोबर नेलं होतं. वय होतं दहा-अकरा वर्षांचं. त्या वयात फडावरची गाणी ऐकूनच पाठ झाली. भावानं अक्षरओळख करून दिली आणि नाचकामाचीही दीक्षा दिली.

कान्हा मुखसे ना बोले

बाजूबंद खोले..

घरी परतलेली यमुना स्वत:मधल्या गाण्यानं भारलेली होती. पाणी भरताना, घरकाम करताना ती आपली सारखी गात राहायची. वडिलांनी लेकीचे गुण हेरले आणि स्वत:चीच एक पार्टी उभी करायचं ठरवलं. रंगू-गंगूला सोडून घरी परतलेला यमुनेचा चुलतभाऊ, तिची अठ्ठावीस-तीस वर्षांची तरुण आत्या आणि ती लहानगी! यमुना! वडिलांनी या तिघांच्या बळावर तमाशा काढला.

महाड, खेड, दापोली, सातारा पाच-सात वर्षे ते पायी फिरत तमाशा करत राहिले. दुपारी गावात पोचायचं. पाणी पिऊन, दम खाऊन चारच्या सुमाराला चावडीवर जायचं. पाटील, तलाठय़ांची भेट घ्यायची, गावात खेळ करू द्या म्हणून विनंती करायची. रात्री आठला खेळ करायचा. मग दुसऱ्या दिवशी दुसरं गाव.

मधेच आत्या गेली फड सोडून, पण तोवर यमुना मोठी झाली होती. दुसरी एक नात्यातली बहीण तिच्या जागी आली. मग गेले सगळे मुंबईला. काळ १९३० च्या आसपासचा! यमुनाबाईंना अडीच-तीन रुपये प्रत्येक खेळाला मिळत. त्या जत्रेत नाचत, उरसात नाचत, जमेल तिथे नाचत. भुलेश्वरला राहणाऱ्या एका भल्या माणसानं ठरवलं की त्यांना थिएटरला उभं करायचं. त्यानं तबला आणि पायपेटी घेऊन दिली. मग यमुनाबाई कधीमधी थिएटरला नाचू लागल्या.

हले चालताना बाळीचा झुबा झुबा

पुढे रस्त्यात मैतर उभा उभा

हजार तऱ्हेचे हावभाव करत त्या गाऊ लागल्या. भाऊ बापू मांग, काळूबाळू, रामा कुंभार यांच्या कनातीत त्या नाचत. मातीचं स्टेज. दोनच बत्त्या. एक पुढे गाणारी आणि एक मागे गाणारी अशा दोनच बाया. एक सोंगाडय़ा आणि पेटी-तबला. बस्स!

पण गाणं काय होतं! बंदा रुपया! काळी पाचमध्ये गाणारी यमुना तरुण होती. गळ्यात बिजलीसारखी हरकत होती. दोन-दोन हजार माणसं असायची. लोक ऐकताना बेभान होत, पण बाईंची ‘पब्लिक’वरची पकड सुटत नसे. ‘तुम्ही लोक आता वेडे होता. तेव्हा तर मरून पडायचे आमच्यापुढे!’ त्या हसत म्हणाल्या होत्या.

बाईंकडे तेव्हा जवानी होती आणि लावणीची खाणीही होती.

शहर बडोदे सोडून दिधले, वर्षे झाली बारा

माझा सखा कुणीकडे गेला गं, बाई गंऽऽऽ बाई गंऽऽऽ

ऐंशीच्या घरातल्या यमुनाबाई पंचविशीतल्या विवाहितेची अवस्था डोळ्यांसमोर नेमकी उभी करताना मी पाहिल्या आहेत. ‘दुल्लडी गळा पाचूची लडी, चोळीवर खडी, चमके ऐना अक्षी कोणी सावकाराची मैना’ असो की, ‘मध्यरात्र लोटली, सोडा मजला, जाऊ द्या’ अशी विनवणी करणारी गृहिणी असो, गाताना यमुनाबाई वयाचं बंधन दूरच फेकायच्या.

तराणा, गौळण, छक्कड, एखादी बालेघाटी लावणी, ठुमरी आणि भैरवी, असं साधारण बैठकीच्या लावणीचं स्वरूप. यमुनाबाईंची बैठक गायकी अंगाची. तबला-पेटीच्या साथीची, ढोलकीची नव्हे; पण तरी त्या लावणी ‘खेळायच्या!’ त्यांची अदाकारी तर थक्क करणारी. ‘‘कुठं शिकलात ही?’’ असा भाबडा प्रश्न त्यांना कुणी केला, तर ‘‘आईकडून शिकले, पाहून पाहून शिकले,’’ असं उत्तर त्या द्यायच्या, पण खरं सांगायचं तर कलेचा वारसा आणि परंपरेनं शिक्षण हे लोकसंस्कृतीत आहेच.

यमुनाबाई आपल्या अदाकारीला ‘भाव करणं’ असा शब्द वापरायच्या. ‘आवाज आणि अभिनय’ यातून लावणीचा अर्थ ‘साक्षात’ करणं म्हणजे भाव करणं. हा भाव करताना मधूनमधून एखाददुसऱ्या वाक्यानं चाललेली गद्य संपादणीही मोठी मार्मिक आणि खटय़ाळपणानं भरलेली. एखादा मुरका, एखादा कटाक्ष, हाताचा एखादा नखरेल वळसा आणि जोडीला एखादंच धीट, चतुर आणि सूचक वाक्य – मैफलीत नुसता कल्लोळ उठायचा. ‘वाहवा’ची लाट आणि टाळ्यांचा कडकडाट स्वीकारत बाई डौलानं गात राहायच्या- जितका नकाब शबाब था, आहा रे दौर-ए-जिंदगी..

सौंदर्य हाच ज्याचा पडदा होता, अशा चेहऱ्याचा तो जिंदगीचा दौर आठवताना श्रोत्यांना नुसतं हाय हाय होऊन जायचं. ती झिणझिणती व्याकूळता बाईंच्या आवाजात नेमकी असायची.

साची कहो मोसे बतिया पिया

कहाँ गवायी सारी रतियाऽऽऽ

बाईंची ठुमकी सुरेख रंगायची. प्रेयसीच्या घरी रात्र घालवून आलेल्या नवऱ्याला पत्नी जाब विचारते आहे. त्यामध्ये राग आहे, दु:ख आहे, एक प्रकारची हताशा आहे. प्रेमातल्या पराभवाचा सल आहे. नवऱ्याला आतून गमावल्याचा खेदही आहे. कृष्ण-रुक्मिणी- राधेपासूनचा हा तसा सांकेतिकच बंध; पण यमुनाबाई आपले स्वत:चे रंग त्यात असे भरायच्या की चहूबाजूंनी भरभरून दाद यायची.

एकूणच यमुनाबाईंची खासियत त्यांच्या स्वच्छ, उंच स्वराप्रमाणेच त्यांच्या ‘भाव करण्यात’ होती. ‘ऐका सख्या चातुरा’सारखी लावणी त्या गायच्या, तेव्हा ते लख्ख लक्षात यायचं. कारण बाई सुंदराबाई ती गात तेव्हा केवळ स्वराभिनयानं ती जिवंत करत. यमुनाबाई गात तेव्हा आंगिक अभिनयाची- अदाकारीची त्याला जोड देत गात. परंपरेतलं धनसंचित दोघी आपापल्या परीनं वाढवत होत्या.

यमुनाबाईंनी अस्सल पारंपरिक लावणीची जपणूक केली. वेषांतरित लावणी आपण पुष्कळ ऐकतो. तिचं भ्रष्ट स्वरूपही आपल्या चांगलंच परिचयाचं आहे; पण लावणीचा पारंपरिक बाज यमुनाबाईंजवळच्या गाठोडय़ात पुष्कळ होता आणि तरी त्यांनी चाळिशीच्या आसपासच संगीतबारीला रामराम केला होता. त्यांना तडजोड मान्य नव्हती. चित्रपटांमध्ये तमाशा गेला आणि तमाशाचं रूपच बदललं. यमुनाबाई म्हणायच्या, ‘‘ते लोक फार विद्वान. त्यांनी तमाशा सिनेमात नेला. सिनेमात त्यांनी चांगली भर घातली असेल, पण त्यामुळे आमच्या मूळ कलेला कुणी किंमत देईना. लोकांना सिनेमाच आवडायला लागला. त्यातल्याच लावणीची चटक लागली. आमच्या पोरींजवळ काय होतं? नुसते चाळ आणि गाणं! सिनेमासारखं म्युझिक नव्हतं की कपडे नव्हते फिल्मी बायकांसारखे. मग आम्हाला कोण विचारतं? मग नंतर तर आमच्या पोरींनाही तेच आवडायला लागलं. त्या लागल्या तेच करायला. लोकांना तेच हवं होतं.’’

यमुनाबाईंनी मात्र बारीतलं गाणंच थांबवलं. नंतर त्या साधेपणानं सांगायच्या, ‘‘अहो, एकेकदा माझ्या लावण्यांनी लोक वेडे व्हायचे. बेहोश व्हायचे अगदी; पण एवढं बदललं सगळं की शंभर शंभर लोक उठून जायला लागले. मग मी स्टेजवरून उतरायचं ठरवलं. वय असेल चाळीस-पंचेचाळीस. थांबले ती थांबलेच.’’

यमुनाबाईंजवळ साधेपणामागे असा एक पीळ होता. शहरी माणसाला थक्क करणारं अशिक्षितपटुत्व तर होतंच; शिवाय एक परंपरेतलं मुरलेपण होतं. त्यांचे पेटीमास्तर होते फकीर महंमद. गझल-ठुमरी थोडी त्यांच्याकडून शिकल्या त्या, पण बाकी म्हणाल तर सगळं स्वयंसिद्ध गाणं.

त्यांच्या देवीचं नाव सम्राज्ञी. घराचं नावही तेच. देवी तशी उग्र आहे. नवरात्रात नवमीचा बळी वर्षांनुवर्षे स्वीकारणारी. तो उग्र रुबाब यमुनाबाईंच्या लावणीत नाही. तो त्यांच्या बहिणीकडे- ताराबाईंकडे आहे. त्यांचा आणि यमुनाबाईंचा ‘झगडा’ छान रंगायचा. स्त्री-पुरुष झगडय़ाच्या पुष्कळ प्रकारच्या लावण्या या बहिणींकडे होत्या. ताराबाईंना अजूनही त्या पाठ असतील. त्यातल्या काही अश्लील आहेत आणि काही सौम्य. गाताना या बहिणी मधूनमधून पुरुषांच्या अरेरावीवर, ढोंगावर, बदचालीवर मार्मिक शेरे मारून गात. समकालीन संस्कृतीवरची आणि माणसांच्या वृत्ती-प्रवृत्तींवरची ती टीका अगदी भेदक असे. सगळे उत्तम लोककलावंत एक प्रकारे संस्कृतीचे भाष्यकारच म्हणायचे.

अर्थात, यमुनाबाईंची सामाजिक जाणीवही जागी होती. कोल्हाटय़ांना घर बांधून देणं, शाळेसाठी पैसा उभा करणं, देवस्थानांना मठ बांधणं अशी कामंही त्यांनी धडपडून केली. सुदैवाने त्या उपेक्षित राहिल्या नाहीत. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत लोककलांचा गांभीर्यानं अभ्यास सुरू झाला. लोककलांच्या जतन-संवर्धनाची गरज लक्षात आली आणि शासकीय पातळीवरही लोककलावंतांना जगवण्याचे, गौरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंपरागत कला सांभाळणाऱ्या यमुनाबाईंसारख्या कलावंतांकडे आपोआप लक्ष वेधलं गेलं.

राष्ट्रीय स्तरावर बाईंना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्या ‘पद्मश्री’ झाल्या. संगीत नाटक अकादमीनं सन्मान केला. राज्य पातळीवर तर पठ्ठे बापूराव पुरस्कार आणि विष्णुदास भावे पुरस्कारांपासून इतर अनेक सन्मानही मिळाले.

चाळीसेक वर्षांपूर्वी कोलकात्याला त्यांचा कार्यक्रम होता. बाई मंचावर आल्या आणि म्हणाल्या, ‘‘माझ्या दिसण्यावर आणि वयावर जाऊ नका. मी आता पंचवीस वर्षांची होऊन गाणार आहे.’’ आणि बाई गायल्या तेव्हा श्रोत्यांनी नुसता जल्लोष केला. ऐकणाऱ्यांमध्ये होते सत्यजित रे. ते उठून आले आणि त्यांनी बाईंची भरभरून तारीफ केली.

दिल्लीला एक कार्यक्रम होता. इतर फार मोठे कलावंतही त्याच कार्यक्रमासाठी आले होते. बाईंची लावणी ज्या दिवशी होती, त्याच दिवशी नंतर बिरजू महाराजांचं नृत्य सादर व्हायचं होतं. बाई मंचावर गेल्या, तेव्हा बिरजू महाराज पुढच्या कार्यक्रमासाठी तयार होत होते. बाईंनी सूर लावला तो मेकअप रूममधल्या स्पीकरमधून बिरजू महाराजांनी ऐकला. ते तसेच उठले आणि विंगेत धावले. बाईंचं गाणं संपेपर्यंत तिथेच थांबून राहिले. गाणं संपलं तेव्हा बाईंना म्हणाले, ‘‘तुम्हाला लय सापडली आहे. तुमचा मुलगा झालो असतो तर मलाही ती तुमच्याकडून मिळाली असती.’’

एका थोर अभिजात कलाकारानं लोककलाकाराला दिलेली ती दाद किती मोलाची! लोक आणि अभिजाताचं नातं जिवंत करणारी! बाईंना आणखी काय हवं होतं? शेवटपर्यंत त्या शांत आणि तृप्त जगल्या. ‘आली कोल्हाटीण खेळाया, सगुण गुणमाया’ असं म्हणत ज्या कोल्हाटिणीच्या खेळाचं वर्णन अध्यात्माच्या पातळीवर केलं जातं किंवा ‘जन्म जरा मरण हरले, कोल्हाटीण झाले, बाई मी कोल्हाटीण झाले’ अशा शब्दांत जी स्वत:च्या आयुष्याची ओळख देते, ती कोल्हाटीण यमुनाबाईंना माहीत नव्हती, पण परंपरागत गौळण गाता गाता कोल्हाटिणीची पुण्याई त्यांच्या मागे आपोआप येऊन उभी राहिली, यात शंका नाही.

aruna.dhere@gmail.com