२५ डिसेंबर २००४ ची रात्र. ९ रिश्टरचा प्रचंड विनाशकारी भूकंप आणि त्यापाठोपाठ आलेल्या सुनामीच्या प्रलयंकारी लाटांनी भारताच्या अंदमान-निकोबार बेटांना, त्यांच्या किनारपट्टीच्या भागाला अक्षरश: गिळंकृत करून टाकले. अपरिमित जीवितहानी व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या संकटकाळात महाराष्ट्र सरकारने अंदमान-निकोबारला वैद्यकीय मदत पथक पाठवले. या पथकाचे एक सदस्य डॉ. चंद्रशेखर साठय़े यांनी कथन केलेल्या त्यावेळच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी..

२५ डिसेंबर २००४ ची रात्र भारतीय उपखंडातील सुमारे २,३०,००० लोकांसाठी काळरात्र ठरली. इंडोनेशियातील सुमात्रा बेटाजवळ समुद्रतळाशी ९ रिश्टर इतका प्रचंड मोठा भूकंप झाला. त्याने भूमंडळ तर हादरलेच, पण समुद्रात सुमारे ३ ते ३० मीटर- १० ते  १०० फूट इतक्या उंच राक्षसी लाटा- सुनामी तयार होऊन १४ देशांच्या किनाऱ्याजवळच्या भागात अक्षरश: ‘न भूतो न भविष्यति’ असा विध्वंस झाला. याचा सर्वात जास्त तडाखा इंडोनेशियाला बसला, पण भारताच्या अंदमान-निकोबार बेटांचे व पूर्व किनारपट्टीच्या गावांचेही यात मोठे नुकसान झाले. महाराष्ट्र शासनाने अंदमान निकोबारला वैद्यकीय मदत पथक पाठवण्याचे ठरवले, त्यात १२ जण होते. विशेष म्हणजे यात आम्ही पाचजण अलिबागच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणारे होतो. आम्ही सर्वजण यासाठी आपणहून तयार झालो होतो.

घरच्यांना मी अंदमान-निकोबारला भूकंप- सुनामीच्या परिस्थितीत जाणार म्हटल्यावर काळजी वाटणे स्वाभाविकच होते. टीव्ही, वर्तमानपत्रांतून तेथील परिस्थिती बिकट आहे याचा अंदाज सर्वाना आला होता. मुंबईत आरोग्य संचालनालयात आम्हाला सकाळी बोलावले आणि सांगितले की आता निघा. त्यामुळे तयारीला फारसा वेळ मिळाला नाही, पण तरी आमच्या अंदाजाप्रमाणे थोडे कपडे आणि ड्राय स्नॅक्स, फळे मुंबईत आरोग्य संचालनालयाच्या समोरील दुकानांतून विकत घेतले. अंगाला लावायला ओडोमॉस, आणि क्लोरोक्विीनच्या-मलेरियाच्या गोळ्याही घेतल्या. मी त्यावेळी कोडय़ाकचा डिजिटल कॅमेरा नुकताच विकत घेतला होता, तोही सोबत घेतला. शासकीय गाडी आम्हाला मुंबई विमानतळापर्यंत सोडायला आली होती.

Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Gadchiroli, Police, Foil, Naxal Plot, near chattisgarh border, Seized Arms, Materials, maharashtra, marathi news,
गडचिरोली : नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; छत्तीसगड सीमेवरील तळ उध्वस्त
issue of redevelopment of old chawls buildings in colaba
समुद्रालगतच्या वस्त्या, इमारतींना विकासाची प्रतीक्षा
Drug, Drug factory in Uttar Pradesh
उत्तरप्रदेशातील अमली पदार्थांचा कारखाना ठाणे पोलिसांकडून उद्ध्वस्त, सुमारे दीड महिने पोलिसांची मजूर बनून रेकी

३० डिसेंबरला एअर इंडियाच्या विमानाने महाराष्ट्र शासनाच्या पूर्ण टीमला प्रथम मुंबईहून चेन्नईला आणि त्यानंतर भारतीय वायुदलाच्या (सशस्त्र सेना) कागरे विमानाने चेन्नईहून पोर्ट ब्लेअरला नेण्यात आले. या टीममध्ये वैद्यकीय पथकासोबत अग्निशमन दलाचे जवान होते, तसेच मुंबई महापालिकेचे मलेरियाविरोधी धूरफवारणी पथकही होते. एअर इंडियाच्या विमानात वैमानिकाने उद्घोषणा करून महाराष्ट्र सरकारच्या सुनामी मदतकार्य पथकास शुभेच्छा दिल्या, तेव्हा सर्व प्रवाशांनी विमानात उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. चेन्नईला आम्ही रात्री उशिरा पोहोचलो. पुढच्या प्रवासाची आखणी करण्यात मदतकार्य प्रशासनाचा बराच वेळ गेला. ती रात्र आम्ही अक्षरश: चेन्नई विमानतळावर धावपट्टीच्या कडेला बसून काढली. १० -१५ फूट अंतरावरून विमाने चालत-उडत होती-वेगळाच अनुभव! (गेट , एरोब्रिज, लाऊंज हे काय नेहमीचेच आहे- धावपट्टीच्या कडेला-बाजूने विमाने चालत असतांना त्यांची हवा खात-जमिनीवर आडवे पडून काढलेले चार तास चांगलेच लक्षात राहिलेत.)

त्यानंतरचे भारतीय वायुदलाचे (सशस्त्र सेना) कागरे विमान तर आणखीनच मजेदार. विमानाच्या पोटाचे झाकण शेपटाकडील भागात खाली अर्धवट घसरगुंडीसारखे उघडते. त्यातून सर्वशक्तीनिशी उडी मारून विमानात चढायचे. (वायुदलाच्या दोन जवानांनी आम्हाला उचलून विमानात अक्षरश: कोंबले) विमानात समोरासमोर दोन बाकडी. त्यावर २५-३० जणांनी ओळीने बसायचे. बाकडय़ांसमोर हातांच्या उंचीवर एक जाड लोखंडी तार- तिला घट्ट धरून ठेवायचे. विमान खूपच हलते, त्यामुळे तारेला धरले नाहीत तर तुम्ही इकडे तिकडे पडण्याची शक्यता (माझ्या मनात आले की, अशा वेळी ते विमानाच्या पोटाचे झाकण उघडले तर..) मध्यभागी असलेल्या जागेत सर्वाचे सामान आणि मदतकार्यासाठी विविध ठिकाणांहून आलेले- पोर्ट ब्लेअरला पोहोचवायचे-सामान, त्यात तंबू बांधायचे सामान, कपडे, ब्लँकेट्सपासून ते बिस्कीट पुडे, पाण्याच्या बाटल्या अशा अनेक वस्तू. या सर्व सामानावर वायुसेनेच्या जवानांनी भली मोठी ताडपत्री टाकून नायलॉनच्या जाड दोरीने ते घट्ट बांधले. वैमानिकाने सुरक्षा सूचना देताना सांगितले – ‘‘चेन्नई ते पोर्ट ब्लेअर एक ते दीड तासांचा उड्डाणप्रवास आहे. विमानात टॉयलेट नाही, तेव्हा कोणाला जायचे असेल तर आत्ताच (उडी मारून) खाली जाऊन करून या. पोर्ट ब्लेअरला उतरल्यावर विमानाच्या पोटाचे झाकण जमिनीकडे उघडेल, तेव्हा उडी मारून उतरा आणि धावत सरळ रेषेत १०० फूट जा. कारण विमानाला लगेच परत उड्डाण करायचे असल्यामुळे आम्ही विमानाचे इंजिन, पंखे बंद करणार नाही- तुम्ही जर उजवीकडे किंवा डावीकडे गेलात तर विमानाच्या पंख्याच्या हवेने इकडेतिकडे भेलकंडाल. सामानाची काळजी करू नका, आमचे जवान सर्व सामान घेऊन येतील.’’

विमानातील भोजन म्हणून जवानांनी आम्हाला शेंगदाणे आणि केळी दिली, याचे मला खरंच कौतुक वाटले.

पोर्ट ब्लेअर विमानतळावर विमानातून सामान उतरवल्यावर आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो तेव्हा सकाळचे १० वाजले होते. विमानतळावरून आम्हाला हवाईदलाच्या बराकीत नेण्यात आले. पोर्ट ब्लेअर विमानतळ अगदीच छोटासा- घरगुतीच म्हणा ना-आहे. विमानतळावरून बराकीत जाताना धावपट्टी ओलांडून जावे लागते. आमची बस रेल्वे फाटकासारख्या दिसणाऱ्या फाटकापाशी थांबली. समोर पाहिले तर धावपट्टीवरून जेट एअरवेजचे विमान उडत होते. ते विमान उडाल्यावर फाटक उघडले आणि आमची बस धावपट्टी ओलांडून पलीकडे गेली, म्हणजे थोडक्यात हे रेल्वे क्रॉसिंगसारखे एअरवे क्रॉसिंग होते.

बराकीत आम्हाला जेवण देण्यात आले. खानसामा म्हणत होता, ‘आज अच्छेसे खा लो. कल तुम्हे जहा भेजेंगे वहा क्या मिलेगा क्या पता.’

स्थानिक मदतकार्य प्रशासनाच्या मते, अंदमान -पोर्ट ब्लेअरमध्ये आवश्यक तेवढे डॉक्टर्स होते. डॉक्टरांची गरज होती ती कार- निकोबार आणि कॅम्पबेल बेमध्ये. तिथे सुनामी व भूकंपामुळे खूप नुकसान झाले होते. पण तिथले सर्व दळणवळण- फोन, मोबाइल, वायरलेस टॉवर्स – बंद पडल्याने तिथे नेमकी काय परिस्थिती आहे याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. कार निकोबारमधल्या एकमेव धावपट्टी व एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचे भूकंपामुळे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे वायुदलाचे वैमानिकही तेथे विमान उतरवण्याचा धोका पत्करू इच्छित नव्हते. वायुदलाच्या विमानांनी  air drop केलेल्या जवान इंजिनीअर्सनी धावपट्टीची थोडीबहुत दुरुस्ती केल्यामुळे तेथे छोटी विमाने गेले काही दिवस उतरू लागली होती. त्यामुळे थोडा धोका पत्करूनच वायुदलाचे वैमानिक आम्हाला कार-निकोबारमध्ये उतरवायला तयार झाले.

भारताच्या नकाशात उजव्या बाजूला बंगालच्या उपसागरात दाखवलेले एक ठिपक्याएवढे बेट. क्षेत्रफळ १२७ चौ.किमी. म्हणजे अलिबाग तालुक्यापेक्षाही लहान. लोकसंख्या सुमारे १७०००. कार निकोबारचे क्षेत्रफळ जरी निकोबार द्वीपसमूहाच्या क्षेत्रफळाच्या सात टक्के असले तरी त्याची लोकसंख्या निकोबार द्वीपसमूहाच्या ९० टक्के इतकी आहे. पोर्ट ब्लेअरहून कार निकोबार हे २६० किमी. अंतरावर आहे. तेथे पोहोचण्यासाठी आठवडय़ातून २ वेळा येणारी बोट हेच काय ते वाहतुकीचे साधन. भारतीय वायुसेनेचा एअर फोर्स बेस तिथे आहे, पण व्यावसायिक विमान कंपन्यांची विमाने तेथे उतरत नाहीत. सर्व बाजूंनी समुद्राने वेढलेले असल्याने आणि भूकंपकेंद्र असलेल्या सुमात्रा बेटांपासून जवळ असल्याने कार-निकोबारला २५ डिसेंबर २००४ च्या भूकंप आणि सुनामीचा जोरदार तडाखा बसला.

वायुसेनेच्या दुसऱ्या- छोटय़ा विमानाने आम्हाला पोर्ट ब्लेअरहून कार- निकोबार एअर फोर्स बेसवर नेण्यात आले. शाबूत असलेल्या निम्म्या धावपट्टीवर वैमानिकाने मोठय़ा कौशल्याने विमान उतरवले. आम्ही तेव्हा अगदी श्वास रोखून बसलो होतो. उतरल्यावर सर्वत्र विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या.

रुग्णवाहिकेतून आम्हाला बिशप जॉन रिचर्डसन हॉस्पिटल येथे नेण्यात आले. हे इस्पितळ बेटाच्या मध्यभागी असल्यामुळे सुनामीचा येथे काही दृश्य परिणाम नव्हता, मात्र भूकंपामुळे झालेली पडझड दिसत होती. छोटय़ा छोटय़ा कौलारू बराकींचे ते इस्पितळ होते. त्यापैकी एका बराकीत आमची सोय करण्यात आली. एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले होते. कार- निकोबार आपल्या बऱ्याच पूर्वेला असल्यामुळे येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्योदय- सूर्यास्त साधारणत: पाच वाजता होतात. त्यामुळे अंधार पडला होता. वीज अर्थातच नव्हतीच. बराकीत एक मोठे जाजम अंथरून त्यावर बसून आम्ही सोबत आणलेल्या बिस्कीट, शेव चिवडय़ावर भूक भागवली. इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, ‘‘सध्या इस्पितळाचे स्वयंपाकघर अन्न बनवण्यासाठीच्या साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे दिवसा उजेड असताना एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी पेशंट्स, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज आणि आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वयंपाकासाठी वापरतात. आता अंधार पडला आहे, आता तेथे काही दिसणार नाही; त्यामुळे सध्या आहे त्यावरच भागवा, उद्या तुमच्या जेवणाचे बघू.’’

जाजमावर आडवे झालो. काही वेळात वरच्या कौलांवर काहीतरी आवाज झाला आणि मग जमीन हलल्याचे जाणवले. उठून बाहेर आलो. तेव्हा लक्षात आले, बराकींसमोरच्या अंगणात बरेचजण झोपलेले होते. स्थानिक वॉर्डबॉय म्हणाला, ‘‘भूकंपाचे  धक्के (aftershocks) रोजच बसताहेत. त्यामुळे आम्ही खुल्या अंगणातच झोपतोय. घरात झोपलो आणि छत अंगावर पडलं तर काय करणार..’’

सर्वजण बाहेर आलो. झोपच उडाली. बाजूला किर्र अंधार. कोणीतरी लाकडे जाळून शेकोटी पेटवली. निदान गप्पा मारताना एकमेकांचे चेहरे तरी दिसावेत. ३१ डिसेंबर २००४ ची ती रात्र. २००५ च्या नववर्षांचे स्वागत आम्ही भूमी शय्या, आकाशाचे पांघरूण अशा स्थितीत तारे मोजत- कॅम्प फायरने केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. बाथरूममध्ये भरून ठेवलेल्या पाण्यात आन्हिके उरकली. इस्पितळात जाऊन राऊंड घेतला. तिथे दिल्लीहून आलेली एक डॉक्टरांची टीमही होती. ते सुनामीच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे २७ डिसेंबरला तिथे पोहोचले होते. त्यांना हेलिकॉप्टरने आणले होते. स्थानिक, दिल्लीचे आणि आम्ही असे त्या ४० खाटांच्या इस्पितळामध्ये आता आम्ही २० डॉक्टर्स झालो होतो. आणि पेशंट्स  होते मोजून तीन. सकाळच्या ओपीडीतही दहाएक पेशंट्स आले. चौकशीत समजले, की सुनामीच्या लोंढय़ात बहुतांश लोक वाहून गेले, मरण पावले. भूकंपामुळे काही ठिकाणी लोकांना इजा- जखमा झाल्या, पण त्यांना इस्पितळात आणायला कोणीच नाही आणि मधले रस्ते वाहून गेल्याने, ठीकठिकाणी पाणी साचल्याने त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे पेशंट्सवर उपचार करण्यापेक्षा कुजणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावणे जास्त तातडीचे आहे, नाहीतर सर्वत्र दरुगध आणि रोगराई पसरेल.

दुपारी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरात जेवायला गेलो. सर्वासाठी भात केलेला होता. वरण, भाजी, पोळी काही नव्हते. थोडी बिस्किटे भातात चुरून घातली आणि वरून बिसलेरी पाणी (हे मात्र उदंड होते-अगदी बिसलेरी पाण्याने स्नानसंध्या करावी इतके उदंड) घालून कालवून भात खाल्ला. नुसता भात खाण्यापेक्षा हे चांगले लागते, असे लक्षात आले.

संध्याकाळी मदतकार्य व बचाव पथकाला (relief and rescue team) संदेश आला की, कोणी एकजण पायाला फ्रॅक्चर होऊन एका ठिकाणी अडकला आहे, तिथपर्यंत पोहोचता येत नाही. वाटेत पाणी आहे. पथकाने जिथपर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स जाईल तिथपर्यंत अ‍ॅम्ब्युलन्सने आणि पुढे चालत जाऊन त्याला इस्पितळात आणायचे ठरवले. इस्पितळात बरेच डॉक्टर्स असल्याने आम्ही काही जणांनी पथकासोबत घटनास्थळी जाण्याचे ठरवले. संदेशवाहक वाटाडय़ाला सोबत घेऊन आम्ही निघालो. एका पाणथळ जागेसमोर अ‍ॅम्ब्युलन्स थांबली. अ‍ॅम्ब्युलन्सचा चालक म्हणाला, भूकंपाआधी इथे रस्ता होता. वाटाडय़ाने सांगितले की, समोर साधारण एक किमीवर एका कच्च्या घरात तो फ्रॅक्चर झालेला माणूस अडकलेला आहे. आम्ही स्ट्रेचर, मलमपट्टीचे सामान सोबत घेऊन वाटाडय़ाच्या मागून जायचे ठरवले. पाणी किती खोल आहे याचा काही अंदाज येत नव्हता. पाणी आधी घोटय़ापर्यंत, मग गुडघ्यापर्यंत आणि शेवटी कंबरेपर्यंत आले. चिखलातही पाय फसत होते. झाडाच्या फांद्या, काटेकुटेही होतेच. एक पाय टाकला तर तो गर्रकन फिरला. पडता पडता वाचलो. ते पाण्यात आडव्या झालेल्या मोटरसायकलीचे चाक होते, हातभर अंतरावरून त्याचे हँडल वर आलेले दिसले. थोडे पुढे एक वर आलेले एक मनगट-हात आणि बोटे दिसली. बहुधा ती त्या दुर्दैवी मोटरसायकलस्वाराची असावीत. आम्ही आमची शोध आणि मदत मोहीम थांबवून परत फिरण्याचा निर्णय घेतला. प्रचंड थकवा आला होता. आता यापुढे कोणतेही भलते धाडस करायचे नाही हा निश्चय केला. आपण आजारी पडलो तर काम तर करता येणार नाहीच, उलट इतरांना आपली काळजी घ्यावी लागेल याची जाणीव झाली.

इस्पितळात परतल्यावर एक चांगली बातमी कळाली. इस्पितळाचा डिझेल जनरेटर दुरुस्त झाला होता आणि तीन दिवस रोज दोन तास चालवण्याइतके डिझेल स्टॉकमध्ये होते. त्यामुळे संध्याकाळी ७ ते ९ वीजपुरवठा चालू राहणार होता. त्यामुळे विहिरीवरचा पंप चालून नळाला पाणी आले. मोबाइल चार्ज करून घेतले. (अर्थात सर्व नेटवर्क बंद असल्याने त्याचा काही लगेच उपयोग नव्हता.) बिस्कीट भाताचे जेवण करून पडवीत पसरलेल्या जाजमावर झोपलो. थोडा पाऊस सुरू झाल्याने अंगणात झोपणे शक्य नव्हते. भूकंप-धक्क्यांचे प्रमाणही आता बरेच कमी झाले होते. तरी अजून खोलीत झोपायची हिंमत होत नव्हती.

तिसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधील ओपीडीत ‘पेशंट थोडे, डॉक्टर फार’ अशी परिस्थिती असल्याने आमच्यापैकी काही जण मोबाइल मेडिकल व्हॅनने जवळपासच्या खेडय़ांमध्ये फिरता दवाखाना चालवण्यासाठी गेले. मी काही हाडे मोडलेले – चेंगरलेले रुग्ण आल्याने इस्पितळात छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रिया करण्यासाठी थांबलो. आदल्या रात्री थोडा वेळ वीज आल्याने शस्त्रक्रियेसाठी उपकरणे र्निजतुक करता आली. कमीत कमी साधनसामग्रीत शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव मला बरेच शिकवून गेला.

दुपारी ‘इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस’( ITBP) चे लोक आले. त्यांना अतिशय खडतर परिस्थितीत पहाडी इलाख्यात पटापट रस्ते बनवण्याचा चांगला सराव आहे. त्या लोकांनी कार-निकोबारमधील वाहून गेलेले प्रमुख रस्ते-किनारी रस्ता व पूर्व-पश्चिम आणि उत्तर- दक्षिण जोडरस्ते हे अक्षरश: दिवसरात्र मेहनत करून ७२ तासांत बनवले. हे रस्ते यापूर्वी प्रथम जपानी लोकांनी १९४२-४३ मध्ये दुसऱ्या महायुद्धात अंदमान-निकोबार इंग्रजांकडून आझाद हिंद सेनेच्या साहाय्याने ताब्यात घेतले तेव्हा बनवले होते- ते इतकी वर्षे टिकून होते. कळइढ चे पोलीस म्हणाले, ‘‘ककाना व मलाका (कार-निकोबारमधील समुद्रकिनाऱ्यावरील महत्त्वाची गावे- येथे सर्वाधिक विध्वंस झाला व रस्ते वाहून गेल्याने या गावांचा प्रशासकीय मुख्यालयाशी व रुग्णालयाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता.) येथे आता रस्त्याने संपर्क पुन:प्रस्थापित झाला आहे. पण तिथे आम्हाला खूपच मोठय़ा प्रमाणात मृतदेह सापडताहेत. तर आमच्यासोबत चार-पाच डॉक्टर्स आले तर बरं होईल, म्हणजे तुम्ही death certify केलीत आणि मृत्यूचे कारण दिलेत तर विनाकारण शवविच्छेदन टाळता येईल आणि त्या कुजणाऱ्या मृतदेहांची आम्हाला विल्हेवाट लावता येईल; जेणेकरून सर्वत्र दरुगध आणि रोगराई पसरणे टळेल.’’

आम्ही पोलीस व्हॅनमध्ये बसून ककानाला निघालो. किनाऱ्यावरून चालताना लक्षात आले, समुद्रकिनाऱ्याची वाळू जिथे संपते तिथून जमिनीच्या बाजूला, सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत झाडे, घरे सारे भुईसपाट झालेले होते. रस्त्यावर फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर पडलेले दिसत होते. कुठे झाडाच्या बुंध्याला अडकून वाकलेली स्कूटर, तर कुठे भिंती वाहून जाऊन उरलेला इमारतीचा सांगाडा दिसत होता. त्या इमारतीच्या सांगाडय़ातली छतावरील पंख्यांची  पातीही वाकून एकत्र गोळा झालेली दिसत होती. एवढय़ा सगळ्या विनाशात मलाकाच्या गांधी चौकातील महात्मा गांधींचा अर्धपुतळा तेवढा शाबूत राहिला होता. १०० मीटरच्या पुढे उंच झाडे, त्यावर सर्व मलबा आणि त्या मलब्यात मृतदेह दिसत होते. काही मृतदेह जमिनीवर आडवे पडलेले होते, तर काही झाडाच्या बुंध्याला मिठी मारून घट्ट धरलेल्या अवस्थेत जमिनीपासून काही उंचीवर उभे होते. उंच लाट बघून झाडावर चढण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला असावा, की लाटेनेच त्यांना उंच झाडावर फेकले असेल? परंतु जास्त विचार न करता आम्ही ‘बुडल्यामुळे मृत्यू’ असे मृत्यूचे कारण देऊन मृत्यू प्रमाणपत्रे भरली. पोलिसांनी तिथेच मृतदेहांवर पालापाचोळा टाकून, डिझेल ओतून आग लावली.

संध्याकाळी घरी (आता बिशप जॉन रिचर्डसन हॉस्पिटलची बराक हे आमचे घर झाले होते.) आल्यावर दोन आनंदाच्या बातम्या कळाल्या. एक तर कार-निकोबार द्वीपावरील विद्युतनिर्मिती केंद्र अंशत: सुरू झाले होते, त्यामुळे आता बराच काळ वीज असणार होती. आणि दुसरी म्हणजे बीएसएनएलच्या टॉवरची डागडुजी करून इंजिनीअर्सना थोडीबहुत फोन सेवा सुरू करण्यात यश आले होते. गेले तीन-चार दिवस घरच्यांशी काहीच संपर्क नव्हता. त्यामुळे रोजच्याप्रमाणे बिस्कीट-भाताचे जेवण करून आम्ही घाईघाईने दूरध्वनी केंद्रापाशी गेलो. तिथे एकच फोन चालू होता आणि त्यांनी सांगितले की प्रत्येकाला एकच मिनीट बोलता येईल. रांगेत अर्धा तास उभे राहून घरच्यांशी साधलेल्या मिनिटभराच्या सुसंवादाने सर्वाची मने प्रसन्न झाली. रात्री बराकीत पंखा लावून शांत झोपलो.

चौथ्या दिवशी आमच्याबरोबरची दिल्लीची टीम दिल्लीला रवाना झाली. ते अगदी सुरुवातीपासून कार-निकोबारमध्ये होते. त्यामुळे त्यांनी आमच्यापेक्षा कठीण परिस्थितीत काम केले होते. त्यांना सोडायला आम्ही एअर फोर्स बेसवर गेलो होतो. तिथे एका तंबूत दवाखाना होता. मी अस्थिरोगतज्ज्ञ म्हटल्यावर बरेच जण आपापल्या आजारांसाठी दाखवायला आले. तिथे एक वैमानिक भेटला. तो म्हणाला मी पण साठेच आहे- कॅप्टन नितीन साठे. तिथला फार्मासिस्ट कदमही मराठा लाइट इन्फन्ट्रीतलाच होता. बरेचसे जवानही मराठीच होते. मला वाटते, सावरकरांमुळे महाराष्ट्राचे आणि अंदमान-निकोबारचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. मराठी माणसाला अंदमान-निकोबार परके वाटत नाही. तिथे काम करणाऱ्या निकोबारी डॉक्टर श्रीमती ग्रेसचीही ओळख झाली. निकोबारी आदिवासी जमातीत जन्मलेल्या आधुनिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या त्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. त्यांनी कोलकात्यात एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. निकोबारी आदिवासी जमातीत जन्मलेल्या मुलांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च भारत सरकारतर्फे केला जातो. कार-निकोबारचे साक्षरतेचे प्रमाण ९४ टक्के आहे.

रस्ते दुरुस्त होऊन कार-निकोबारची रस्त्याने संपर्कक्षमता वाढल्याने आणि पाणी ओसरू लागल्याने आता बिशप जॉन रिचर्डसन हॉस्पिटलमधील बा व आंतररुग्णांची संख्या वाढू लागली होती. फ्रॅक्चरचे रुग्णही बरेच येऊ  लागले होते, त्यामुळे आता आम्हाला बरेच काम होते. सरकारतर्फे गावात तंबू बांधून रिलीफ कॅम्पस् सुरू करण्यात आले होते. तिथे आमचे डॉक्टर्स फिरत्या दवाखान्यांमार्फत सेवा देत होते. पाण्यात क्लोरीन टॅबलेट टाकून पाणी शुद्ध-पिण्यायोग्य कसे करावे, कॉलरा टायफॉईड, मलेरिया आदींना प्रतिबंध व उपचार कसे करावेत याचे आरोग्य शिक्षणही आमचे डॉक्टर्स गावागावात जाऊन देत होते. निकोबारी लोकांना आमची कळकळ लक्षात येत होती. गावागावात आमचे उत्स्फूर्त स्वागत होत असे. गावातील मंडळींपैकी एक-दोघे झरझर नारळाच्या झाडावर चढून सर्वासाठी नारळ काढत व कमरेच्या कोयत्याने ते झपाझप सोलून आम्हाला नारळाचे पाणी प्यायला देत.

त्यावेळी अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल राम कापसे होते. अगदी साधे. भूकंप, सुनामी मदतकार्यावर देखरेख ठेवण्यासाठी ते स्वत: कार-निकोबारमध्ये चार दिवस राहिले होते. बिशप जॉन रिचर्डसन हॉस्पिटलमधील एका बराकीतच त्यांचा निवास व ऑफिस होते. हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरात आम्ही जे जेवण करायचो तेच ते खात असत. आमच्याशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. मदतकार्यात काही सूचना असल्यास सांगा, असे म्हणाले. आमचे काम त्यांनी जवळून बघितले आणि कौतुकही केले. पुढे आम्ही अलिबागला परतल्यावर त्यांनी आम्हाला एक ‘छएळळएफ डा अढढफएउकअळकडठ’ ही पाठवले.

बिशप जॉन रिचर्डसन हॉस्पिटलमधील एका बराकीत एक दिवस दुपारी हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडण्ट म्हणाले, ‘‘मूस जेट्टीवर पोर्ट ब्लेअरहून आलेले ‘सेंटीनेल’ जहाज लागले आहे. त्यात गॅस सििलडर, डाळ, भाज्या, मसाले, तेल आले असेल. गव्हर्नमेंट स्टोअरमध्ये ते जाऊन आपल्याला मिळेपर्यंत दोन-तीन दिवस जातील. आपण अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन गेलो तर ते आपल्याला आजच आणता येईल. फक्त जरा आपल्यालाच ते सर्व उचलून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये भरावे लागेल, जरा मदतीला येता का?’’

रोज बिस्कीट भात खाऊन कंटाळलेले आम्ही आता काहीतरी वेगळे खायला मिळणार या कल्पनेने जहाजावर जायला एका पायावर तयार झालो. मूस जेट्टी कार-निकोबारच्या उत्तर किनाऱ्यावर आहे. प्रवासी आणि मालवाहू जहाजे येथे थांबतात. आठवडय़ातून दोन वेळा पोर्ट ब्लेअरहून येणारे हे जहाज निकोबार द्वीपसमूहाची जीवनरेखाच आहे. पेट्रोल, अन्नधान्य, फळे, बांधकाम साहित्य, कपडे, पुस्तके, टपाल, दोन चाकी-चार चाकी वाहने, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग सारे सारे या जहाजानेच येथे येते. पोर्ट ब्लेअरहून सुटल्यावर कार-निकोबारला पोहोचायला या जहाजाला १२ ते १८ तास लागतात. पुढे ते दक्षिणेकडे निकोबार द्वीपसमूहातील नानकौरी व ग्रेट निकोबारमधील कॅम्पबेल बे येथे जाऊन थांबून परत पोर्ट ब्लेअरला जाते. जहाजावरून खाण्याचे सामान अम्ब्युलन्समध्ये भरले. जहाजावरही एक डॉक्टर भेटले. डॉ. पोम्पलवार- तेही मराठीच होते. ते त्या जहाजावर पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. त्यांनी त्यांची केबिन व जहाजावरील छोटेसे दोन खाटांचे रुग्णालयही आम्हाला दाखवले. आमच्यासाठी त्यांनी जहाजावरील कॅन्टीनमधून जेवणही मागवले. बऱ्याच दिवसांनी आमटी, भाजी, पोळी खायला मिळाल्याने आम्ही तृप्त झालो. जहाजावरील वैद्यकीय अनुभवांविषयी त्यांच्याशी चर्चा झाली. टेलिमेडिसिन, एअर अम्ब्युलन्स यांविषयीचे त्यांचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले.

रिचर्डसन हॉस्पिटलमध्ये टेलिमेडिसिन सुविधा होती. त्याद्वारे आम्ही पोर्ट ब्लेअरच्या गोविंद वल्लभ पंत रुग्णालयातील व कोचीच्या अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी उपग्रहाद्वारे संपर्क करू शकत होतो. एक दिवस एक झाडावरून पडलेल्या मुलाला पॅरामेडिक्स अम्ब्युलन्समधून घेऊन आले. त्याचे हात व पाय काम करत नव्हते. मला लक्षात आले, याला मणक्याला मार लागून हातापायाकडे जाणाऱ्या शीरा दबल्यात. याला एक्स रे -सिटी स्कॅन काढून त्यानुसार पुढील उपचार त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. टेलिमेडिसिनद्वारे मी या केसविषयी पोर्ट ब्लेअरच्या पंत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. या सुविधा  रिचर्डसन हॉस्पिटलमध्ये नसल्याने रुग्णाला पंत रुग्णालयात हलवण्याचे ठरवले. त्याला हलवताना फार काळजी घेणे आवश्यक होते, नाही तर त्याचा जीवही धोक्यात आला असता. त्यामुळे मी स्वत:च त्याच्यासोबत पोर्ट ब्लेअरला जायचे ठरवले. भूकंपात निखळलेला इस्पितळाचा एक दरवाजा होता, त्याचा स्पाईन बोर्डसारखा वापर करून रुग्णाला त्या दरवाजाला बांधले. कार-निकोबार एअर फोर्स बेसला कळवले व अम्ब्युलन्समध्ये रुग्णाला व त्याच्या एका नातेवाईकाला सोबत घेऊन आम्ही एअर फोर्स बेसला पोहोचलो. लगेच निघणाऱ्या कागरे विमानात वायुदलाच्या जवानांनी आम्हाला चढवले. यावेळी विमानात बाकडय़ांवर न बसता मधल्या सामानाच्या जागेत दरवाजाला बांधलेला आमचा रुग्ण ठेवून त्याच्या डोक्याकडे मी व पायाकडे त्याचा नातेवाईक असे खालीच बसलो. माझ्या पायांनी तो दरवाजा आणि हातांनी त्याची मान मी विमान हलताना सुरक्षित धरून ठेवली होती.

विमानात निकोबार द्वीपसमूहातील विविध बेटांवरून हेलिकॉप्टरने एअर लिफ्ट करून सुटका करून कार-निकोबारला आणलेले बरेच लोक होते. कागरे विमाने पोर्ट ब्लेअरहून येताना मदतकार्य सामानाने भरून येत, ती परत जाताना रिकामी नेण्याऐवजी त्यांत ज्या नागरिकांना कार-निकोबारहून पोर्ट ब्लेअरला जायचे आहे अशांना भरून घेऊन जात. त्यात कॅम्पबेल बे येथून आलेले व्हेटर्नरी डॉक्टर पालवे- हेही मराठीच-भेटले.

कॅम्पबेल बे- ग्रेट निकोबार द्वीपाचे आणि भारताचेही दक्षिण टोक. तांत्रिकदृष्टय़ा भारताचे दक्षिण टोक असलेला इंदिरा पॉइंट येथून २६ किमीवर आहे, तर इंडोनेशियातील सुमात्रा बेट दीडशे किमीवर आहे. सुमारे ५००० लोक येथे राहतात. भारतीय नौदलाचा ‘आय एन एस बाझ’ हा नाविक तळ येथे आहे. १९७१ च्या युद्धानंतर तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने निवृत्त सैनिकांना राहण्यासाठी येथे जमिनी दिल्या. त्यांना घरे बांधून दिली. शेतीची अवजारे-ट्रॅक्टर्स दिले, बियाणे, खते मोफत दिली. सुमारे ३३० निवृत्त सैनिक कुटुंबे या योजनेअंतर्गत येथे राहावयास आली. त्यात सुमारे १०० मराठी कुटुंबे होती. डॉ. पालवेंचे आजोबाही या योजनेअंतर्गत इथे स्थायिक झाले.

२४ डिसेंबरच्या रात्री भूकंपामुळे ते जागे झाले आणि घराबाहेर आले. काही वेळात समुद्राच्या दिशेने प्रचंड मोठा आवाज आल्याने ते घाबरून जंगलाच्या दिशेने दोन वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन, बायकोसोबत पळाले. रात्री ते जंगलातच थांबले. सकाळी उजाडल्यावर त्यांनी घराकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतल्या मलबा-चिखलामुळे ते शक्य झाले नाही. दोन दिवस त्यांनी जंगलात उपाशीच काढले. तिसऱ्या दिवशी त्यांना हवाई दलाने टाकलेली फूड पॅकेट्स, पाणी मिळाले. पाचव्या दिवशी त्यांना हेलिकॉप्टरने एअर लिफ्ट करून कार-निकोबारला आणले. कॅम्पबेल बेचे घर तर पूर्ण वाहून गेले, त्यांचे काही नातेवाईक जळगावला राहात असल्याने बायको-मुलीला तिथे सोडून काही दिवसांनी परत कॅम्पबेल बेला जाऊ , या विचाराने ते पोर्ट ब्लेअरला निघाले होते.

पोर्ट ब्लेअरला विमान उतरल्यावर हवाई दलाच्या अम्ब्युलन्सने रुग्णाला लगेच पंत रुग्णालयात नेले व तेथे त्यावर उपचारही चालू झाले. नंतरचे काही दिवस मी याच रुग्णालयात काम केले. तेथे डॉ. शंभू साहा हे संपूर्ण अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील एकमेव अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून गेली दहा वर्षे काम करत होते. त्यांच्यासोबत मी अनेक अस्थि-शस्त्रक्रिया केल्या. रिचर्डसन हॉस्पिटलच्या मानाने पंत रुग्णालयातील सुविधा पुष्कळच चांगल्या होत्या.

नऊ जानेवारीला कार-निकोबारमध्ये बंगलोरहून डॉक्टरांची दुसरी टीम आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय पथकास कार-निकोबारहून पोर्ट ब्लेअरला पाठवण्यात आले- तेथून चेन्नई-मुंबई-अलिबाग असे मजल दरमजल करीत आम्ही घरी पोहोचलो.

३० डिसेंबर ते ९ जानेवारी २००४ – असा ११ दिवसांचा अंदमान-निकोबार मुक्काम, त्यातही आठ दिवसांचा कार-निकोबार मुक्काम मला अनेक गोष्टी शिकवून गेला. निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. त्यातून मार्ग काढून पुन: उभे राहण्याची मानवाची जिद्द पाहायला मिळाली. रात्रंदिवस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत निरपेक्षपणे लोकांना मदत करणारे सशस्त्र सेनेतील सैनिकांची शिस्त, कर्तृत्व आणि चारित्र्य पाहायला मिळाले. कधी नावही न ऐकलेला भारताचा भाग बघायला मिळाला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी साधनसामग्रीत न कुरकुरता राहण्याचे, काम करण्याचे प्रशिक्षण मिळाले.

shekhar1971@gmail.com

(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)

डॉ. चंद्रशेखर साठय़े