09 August 2020

News Flash

आगळावेगळा भूतान!

बघितलेल्या चांगल्या गोष्टींची अधूनमधून आठवण येते आणि मन भूतानला पोहोचतं.

बघितलेल्या चांगल्या गोष्टींची अधूनमधून आठवण येते आणि मन भूतानला पोहोचतं.

आपण कुठल्याही सहलीला जाऊन आलो की तिथलं मनाला भावलेलं आगळे-वेगळेपण बरेच दिवस आपल्या मनात घर करून राहतं. मनात रेंगाळत राहतं. आमच्या भूतान सहलीनंतर असंच झालं. बघितलेल्या चांगल्या गोष्टींची अधूनमधून आठवण येते आणि मन भूतानला पोहोचतं.

परवा रात्री मी सहजच वरच्या गच्चीत गेलो होतो. इकडून तिकडे पळणारे ढग आणि चंद्राची कोर बघायला मजा येत होती. पावसाळी हवा असल्यामुळे खूपच उल्हसित वाटत होतं. श्वास घेताना हवेतला गारवा चांगलाच जाणवत होता. एकदम भूतानची आठवण झाली.

तिकडे तर कुठेही आणि कायमच अशी उल्हासपूर्ण हवा असते. अगदी नाममात्र प्रदूषण आणि हवेतले प्राणवायूचे जास्त प्रमाण हेच तिथल्या कायम उल्हसित हवेचे गमक असावे. भूतानमध्ये जमिनीचा ६० टक्के भाग जंगलांनी व्यापलेला आहे. आणि तो तसा ठेवणे लोकांना बंधनकारक आहे. आणि म्हणूनच भूतानला ‘कार्बन निगेटिव्ह’ देश म्हणतात. तिथे इस्पितळातल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची बहुधा जरूर पडत नसावी!

भूतानमध्ये आपल्यासारखीच लोकशाही आहे. पण कुठल्याच रस्त्यावर कुणाच्याही वाढदिवसाचे, कुठल्याशा पदावर नियुक्ती झाल्याचे एकही होर्डिग बघायला मिळाले नाही. कदाचित तिथे तसा कायदा असावा. आणि कायदा म्हणजे तो पाळलाच पाहिजे असे तिथले लोक मानत असावेत. कायदे आपल्याकडेही आहेत, पण ते केवळ आर. के. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’करता! आपले सगळे रस्ते कायम होर्डिगनी गजबजलेले असतात.

भूतानमध्ये लोक राजाला मनापासून मानतात. त्यामुळे बहुतेक दुकानांमध्ये, हॉटेलांमध्ये राजाचा छोटा-मोठा फोटो हमखास लावलेला दिसतो. आम्ही ज्या ज्या भागात फिरलो तिथे कुठेही रस्त्यावर आम्हाला खड्डे किंवा खड्डे भरलेले उंचवटे लागले नाहीत. तिथे दुचाकी भाडय़ाने मिळत असती तर कंबरेला, पाठीला व शरीराला हादरे न देणारा रस्ता ही काय चीज असते, याचा अनुभव घेण्यासाठी तिथल्या रस्त्यावर राइड घ्यायला नक्कीच आवडले असते. आपल्याकडे कुठेही दुचाकीवरून एक कि. मी. अंतर जरी गेलो तरी कंबरेला ५०० हादरे नक्कीच बसतात. ५०० म्हणजे जरा कमीच होताहेत असं कुणाला तरी वाटलं असणार, म्हणून आपल्या रस्त्यांवर ‘रम्बलर’ हा नवीन प्रकार जन्माला आला. रम्बलरचा पट्टा आला की साधारण १५ हादरे नक्कीच बसतात. स्कूटर हळू असली तरी हादरे आणि वेगात असली तरी हादरे. दुचाकीवाल्यांचं कमनशीब असं की रम्बलरचे उंचवटे लवकर झिजतही  नाहीत. असं म्हणतात, की रम्बलरवरून दुचाकी जोरात नेली तर एल-४ मणक्याला हानी पोहोचते आणि हळू नेली तर एल-६ मणक्याला! कुठेच हानी नको असेल तर तेवढय़ा भागात खाली उतरून गाडी ढकलत नेणे हाच एक पर्याय उरतो.

भूतानमधल्या प्रवासात दोन ठिकाणी नद्यांजवळून जाण्याचा योग आला. आपल्याकडे नदीचे अस्वच्छ पाणी बघून पाण्यात पाय बुडवायची कुणालाच इच्छा होणार नाही. तिथेही पाण्याजवळ गेल्यावर पाण्यात पाय बुडवण्याची इच्छा होत नव्हती; पण खाली वाकून ओंजळीने पाणी पिण्याची मात्र जोरदार इच्छा होत होती, इतके ते पाणी स्वच्छ होते.

तिथे पाकीट मारणे, चोरी असले प्रकार आढळले नाहीत. स्त्रियांची छेडछाड, अत्याचार हा प्रकार तिथे नाहीच. बऱ्याच ठिकाणी घाटाच्या रस्त्यावर, अगदी सुनसान जागी एकटय़ा बायका छोटे-मोठे सामान घेऊन विकायला बसलेल्या दिसतात.

रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तिथे एकदम कडक आहेत. झेब्रा क्रॉसिंग असेल तर तिथे समोरच्या गाडीला ओव्हरटेक करता येत नाही. वेगमर्यादेचे पालन बंधनकारक आहे. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगवरूनच चालावे लागते, नाहीतर दंड होतो.

तिथे रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कुठेही कचरा फेकलेला दिसला नाही. पण एका रस्त्यावर कचरा बघून आश्चर्य वाटले. ‘टायगर नेस्ट’ बघायला १७०० मीटर उंच ठिकाणी चढून जायला डोंगरातून रस्ता आहे. या रस्त्यावर फक्त पर्यटकांचीच ये-जा असते. बहुतेक पर्यटक आपल्याकडील निरनिराळ्या राज्यांमधले होते. रस्त्यावर मधे मधे कचराकुंडय़ा ठेवलेल्या होत्या. तरीही रस्त्यावर कचरा बघून आश्चर्य वाटलं. दोन मिनिटं थांबून बघितल्यावर लक्षात आलं, की खालून वर येणारे लोक आपल्याकडचेच होते आणि वरून खाली उतरणारे लोकही आपल्याकडचेच होते. म्हणजेच ‘ये तो होना ही था!’ इथे शिक्षण मोफत आहे. औषधोपचार मोफत आहे. जगात राष्ट्रांची प्रगती जीडीपीच्या आधारे मोजली जाते. भूतान हा एकमेव देश आहे, जिथे राष्ट्राची प्रगती ‘जीएनएच – ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’द्वारे मोजली जाते. आहे की नाही आगळावेगळा हा देश?

सुधीर करंदीकर srkarandikar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2017 2:29 am

Web Title: interesting facts about bhutan
Next Stories
1 समकालीन सामाजिक समस्यांचा वेध
2 अपूर्णतेच्या अस्वस्थ जाणिवेच्या कथा
3 स्त्रीवादाची समानतेची दिशा
Just Now!
X