मुलगी म्हणजे परक्याचं धन. मुलगी म्हणजे गळय़ातली धोंड. मुलगा म्हणजेच खरा वंशाचा दिवा, खरा वारस! या आणि अशा कितीतरी गोष्टी ऐकत आजही मुली लहानाच्या मोठय़ा होतात. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून चाललेला प्रचंड आटापिटा. या दिव्यातून जाणाऱ्या स्त्रियांच्या अवस्थेबद्दल काय बोलावं? ज्या मुलींच्या वाटय़ाला असा भेदभाव येतो, त्यांचं सगळं आयुष्य त्या एका आसाभोवती फिरत राहतं. काही असहाय मुली परिस्थितीचा स्वीकार करतात. काही बंड करतात. तर काही ते ओझं मनात बाळगत दुविधेत आयुष्य जगत राहतात. नेमका हाच पेच आणि त्याचे अनेक पलू तमिळ लेखिका वासंती यांनी ‘जन्मसिद्ध हक्क’ या लघुकादंबरीत उलगडले आहेत. स्त्री-भ्रूणहत्येवर मोठय़ा प्रमाणावर लेख प्रसिद्ध होतात. परंतु लेखाचा परिणाम वेगळा आणि तेच वास्तव कादंबरीतून मांडलं तर त्याचा कितीतरी वेगळय़ा पातळीवरचा परिणाम वाचकांवर होत असतो.

या कादंबरीची नायिका मनो ही एकुलती एक मुलगी आहे आणि ती स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. तमिळनाडूमधल्या आपल्या खेडय़ात वडिलांजवळ राहूनच डॉक्टरी व्यवसाय करायचं तिनं ठरवलेलं आहे. मुलगी म्हणून कळत-नकळत अनेक अपमान मनोच्या वाटय़ाला आलेले आहेत. ती वंशाचा दिवा नाही, वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याचा हक्क तिला नाही, वडिलांचा व्यवसाय ती पाहू शकणार नाही. मुलगा हवा म्हणून वडिलांनी घातलेला दुसऱ्या लग्नाचा घाट तिच्या कानावर आलेला असतो. ती डॉक्टर असल्यामुळे तिला गावात मान आहे. स्वतंत्र ओळख आहे. पण तरी एखाद्या पुरुषाला मिळतो तसा आदर व हक्क तिला मिळू शकत नाहीत. लग्न करायचं की नाही याबद्दलही तिच्या मनात गोंधळ आहे. वडिलांसमोर तिला सतत स्वत:ला सिद्ध करावंसं वाटतं. त्यांच्याकडून ‘स्वीकृती’ मिळण्यासाठी तिची धडपड चालू असते.

मनोकडे पेशंट म्हणून येणाऱ्या गरोदर तसंच इतर तरुण बायका म्हणजे एक भयंकर जग आहे. या बायकांच्या दारुण, अगतिक कथा तिच्या पोतडीत आहेत. मुलीचा गर्भ पोटात बाळगणाऱ्या अनेकींचे गर्भपात करून तिनं त्यांना ‘नामुष्की’तून वाचवलं आहे. आपण कायद्याचं उल्लंघन करत नसून हाच खरा मानवतावाद आहे असं तिला वाटतं. या बायकांची आणि जन्माला येणाऱ्या मुलींची एक प्रकारे आपण सुटकाच करतो आहोत अशी तिची भावना आहे. पुढे कादंबरी कोणत्या वळणानं जाते हे सांगण्यात मतलब नाही. ती प्रत्यक्षच वाचायला हवी.

या विषयावर कादंबरी लिहिणं व ती भडक होऊ न देणं हे आव्हानात्मक होतं. नायिकेच्या कोणत्याही कृत्याचं समर्थन लेखिका करत नाही. तिच्या मनातली दुविधा दाखवते. बायकांबद्दल नायिकेला कणव, सहानुभूती वाटते आणि त्याचवेळी स्वत:च्या कृत्याबद्दल तिरस्कारही. अशा व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध हे या कादंबरीचं वैशिष्टय़. तिची आई, आजी आणि गावातल्या बायकांच्या कहाण्यांचा वापर लेखिका करते. लोकसंस्कृती आणि त्यातल्या प्रतीकांचा वापरही लेखिकेनं चपखल केला आहे.

सामाजिक समस्या आणि तिचा सर्वागीण वेध, ती सोडवण्यासाठी प्रयत्न अशा पारंपरिक वाटेनं ही कादंबरी जात नाही. एका उच्चशिक्षित आणि बालपणापासून पुरुषसत्ताक व्यवस्थेचा बळी ठरलेल्या स्त्रीच्या मानसिक दुविधेचं ती चित्रण करते. म्हणूनच ती वेगळी ठरते. लेखिका वासंती या पत्रकारही आहेत. पत्रकार म्हणून स्त्री-भ्रूणहत्येचे वास्तव, आकडेवारी, त्यावरचे उपाय हे सगळं त्यांच्या नजरेखालून सतत जात असणार. त्याचा कथात्म लेखनासाठी विचार करणं हे आव्हानात्मक होतं. लिंगनिरपेक्ष न्याय आणि समतेची बिनतोड मागणी हा आशय कादंबरीतून व्यक्त करताना तो बटबटीत होऊ न देणं हे लेखिकेला जमलं आहे. सुनंदा भोसेकर हे नाव कवयित्री म्हणून आपल्या परिचयाचं आहे. त्यांनी या कादंबरीचा अनुवाद केला असून तो प्रवाही आणि रसाळ झाला आहे.

‘जन्मसिद्ध हक्क’ – वासंती

अनुवाद- सुनंदा भोसेकर

मनोविकास प्रकाशन,

पृष्ठे- १४६, मूल्य- २४० रुपये.

संध्या टाकसाळे