स्टीफन मला भेटला ते वर्ष होतं १९६१. ब्रिटनमध्ये उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी म्हणून मी रॉयल ग्रीनिच ऑब्झव्‍‌र्हेटरीत शिकायला गेलो होतो. तिथं स्टीफनची आणि माझी पहिली भेट झाल्याचं आठवतं. त्यावेळी विद्यार्थ्यांना अशा नामांकित संस्थेत प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळत असे आणि आम्हीही त्याचा भरपूर लाभ उठवला. तेथील दुर्बीण वापरण्याचा आम्हाला खूप आनंद होता. त्यावेळी स्टीफन ऑक्सफर्डमधून, तर मी केंब्रिजमधून तिथे आलो होतो. तेथील अधिकाऱ्यांनीही आम्हाला हव्या त्या विषयावर संशोधन करण्याची मुभा दिली होती. कारण विश्वरचनाशास्त्रात अनेक उपशाखाही आहेत. त्यावेळी तो आणि मी काही वेळा एकाच खोलीत अभ्यास केल्याचंही मला आठवतंय.

आमची राहण्याची सोय एका पुरातन किल्ल्यात केलेली होती. आम्ही ब्रिटनच्या त्या उन्हाळ्यात मौजमजाही करीत असू. ब्रायटनच्या किनाऱ्यावर आम्ही सहलीला जात असू. स्टीफनही त्यात सहभागी होत असे. एक टेनिस स्पर्धा त्यावेळी आयोजित करण्यात आली होती. त्यात अंतिम फेरीमध्ये स्टीफनला मी पराभूत केले होतं, हेही चांगलं आठवतंय. तेव्हा आम्ही किल्ल्याभोवतीच्या हिरवळीवर अनेक खेळ  खेळायचो. पुढे त्याला मोटर न्यूरॉन डिसीजसारखा दुर्धर आजार होईल अशी पुसटशीही कल्पना कुणाच्या मनात आली नसेल. कारण तो चांगला धडधाकट होता. माझ्याशी छान खेळला होता. आम्ही ते दिवस खूप आनंदात घालवले. नंतर तो ऑक्सफर्डची पदवी घेऊन  पीएच. डी.साठी मी जिथे शिकत होतो त्या केंब्रिजमध्ये आला. त्याला माझे गुरू फ्रेड हॉयल हेच मार्गदर्शक हवे होते. तो काळ  होता १९६२ चा. हॉयल हे तेव्हा अध्यापन आदी कामांत फारच व्यग्र होते. त्यांच्याकडे मुळातच पीएच. डी.चे विद्यार्थी जास्त होते. त्यामुळे स्टीफनला मार्गदर्शनासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही, या कारणास्तव त्यांनी त्याला दुसरे मार्गदर्शक निवडण्यास सांगितले. त्यामुळे स्टीफनने डेनिस शियामा यांना मार्गदर्शक म्हणून  निवडले. त्याच काळात एकदा शियामा हे परदेशी जाणार होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दोन विद्यार्थ्यांच्या कामावर टय़ूटर म्हणून देखरेख करण्याची कामगिरी माझ्यावर सोपवली. त्या दोन विद्यार्थ्यांत एक होता जॉर्ज एलिस आणि दुसरा स्टीफन हॉकिंग.

स्टीफन माझ्यानंतर दोन-तीन वर्षांनी केंब्रिजमध्ये आला होता. त्या दोघांना काही काळ मी मार्गदर्शन केले. त्यामुळे पुढे स्टीफन माझ्या प्रेरणेने या विषयाकडे वळल्याचे श्रेय मला देत असे. त्यातूनच गुरुत्वाकर्षण आणि कृष्णविवर हे त्याचे संशोधनाचे विषय पक्के झाले.  पीएच. डी. करत असतानाच त्याची पावले अडखळू लागली होती आणि या आजाराची लक्षणे दिसू लागली होती. त्याचे मज्जातंतू शिथिल होऊ लागले होते. परंतु तरीही त्याने जिद्दीने पीएच. डी. पूर्ण केली. तेव्हा त्याच्या रोगाचे निदान झालेले नव्हते. स्टीफनचा पीएच. डी.चा शोधनिबंध फारसा प्रभावी नव्हता.  त्यानंतर मात्र दोन-तीन वर्षांनी त्याच्या बुद्धीची चमक माझ्या प्रत्ययाला आली. त्याचे कृष्णविवरांवरचे संशोधन गाजू लागले. त्याने पुंज सिद्धान्ताच्या माध्यमातून कृष्णविवरांचे संशोधन केले. कृष्णविवरांतून ऊर्जा बाहेर पडू शकते, हे कुणाला खरे वाटत नसताना त्याने ते सांगण्याचे धाडस केले. थोडक्यात, कृष्णविवरांतून काहीच बाहेर पडू शकत नाही, हे सर्वानीच मान्य केलेले असताना त्याने त्यातून काही किरणे बाहेर पडतात असे सांगितले. त्याला ‘हॉकिंग रेडिएशन’ असे म्हणतात. हे सगळे सुरू असतानाच एकदा त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती मला भेटली आणि तिने स्टीफनला मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य आजार झाल्याचे सांगितले, तेव्हा मला धक्काच बसला. त्या रोगावर कोणतेही उपाय नाहीत. डॉक्टरांनी तो दोन-तीन वर्षेही जगू शकणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे मला आणखीनच वाईट वाटले. परंतु तो मात्र हार मानणाऱ्यांतला नव्हता. नंतर असे कळले की त्याला जन्मापासूनच ही व्याधी होती. पण तोपर्यंत त्याची लक्षणे दिसत नव्हती. तो केंब्रिजमध्ये भेटत असे तेव्हा त्याचे शब्द जिभेवरून घसरतात असे वाटत असे. पण त्यावरून अशी कुठलीच भयशंका येण्याचे कारण नव्हते. कारण ते काहीतरी किरकोळ वैगुण्य असेल असे आम्हाला वाटत होते.

नंतर त्याच्या दुर्धर रोगाचे निदान होऊनही तो अजिबात खचला नाही. १९६६-६७ मध्ये त्याने सापेक्षतावाद आणि पुंज भौतिकी यांची सांगड घालून काही कूटप्रश्न सोडवले. त्यावेळी त्याचे हात लिहिण्याचे काम करेनासे झाले होते. त्यानंतरही त्याने १९६९-७० या काळात कृष्णविवरांचे संशोधन पुढे नेत अनेक नवीन सिद्धान्त मांडले- ज्याची जगाने कल्पनाही केली नव्हती. त्यानंतर त्याला घशाच्या संसर्गामुळे बोलताही येईनासे झाले. त्यामुळे तो संगणकाधारित ध्वनियंत्रणेच्या माध्यमातून बोलू लागला. मोटर न्यूरॉन डिसीजने त्याला ग्रासल्यानंतर त्याचे एकेक अवयव निकामी  होत गेले. मात्र, त्याची सगळी शक्ती त्याच्या मेंदूत जणू एकवटली असावी अशा पद्धतीने तो एकेक नवीन गोष्टी मांडू लागला. आपल्याकडे काय नाही, यापेक्षा काय आहे, याचा विचार करीत त्याने नियतीवर मात केली. अनेक विषयांबद्दल त्याला कुतूहल असे. त्या उत्सुकतेतूनच तो व्हीलचेअरवर वर्गात बसून ज्ञानकण गोळा करीत असे. त्याची जगण्यातील नवा अर्थ शोधण्याची असोशी असामान्य होती. या सगळ्या वाटचालीत त्याला त्याची पत्नी जेन वाइल्ड हिची मोलाची साथ होती. स्टीफनला दुर्धर आजार असतानाही तिने त्याला अंतर दिले नाही. त्याने आपल्या दुर्धर आजारामुळे जीवनातील आनंद कधीच गमावला नाही. काही वेळा तो गमतीदार वागायचा. पैजा मारायचा. आणि त्या हरायचासुद्धा. अनेकदा तो जी वक्तव्ये करीत असे त्यांना माध्यमांतूनही मोठी प्रसिद्धी मिळत असे. कारण त्याच्याभोवती तोवर सेलेब्रिटी वैज्ञानिकाचे वलय निर्माण झाले होते यात शंकाच नाही. शेवटी मला एकच सांगावेसे वाटते. ते हे, की स्टीफनसारखा माणूस दुर्धर आजार झाला म्हणून गप्प बसला नाही. त्याने मोठे काम उभे केले. त्यामुळेच त्याचे जीवन हे इतरांसाठी आदर्श होते. गंभीर आजार आहे म्हणून निराश होऊन केवळ कुढत न बसता जिद्दीच्या बळावर कसे पुढे जाता येते याचा स्टीफन म्हणजे वस्तुपाठ होता. शारीरिक व्याधीवर मनोधैर्याने मात करता येते, हा संदेश त्याच्या जीवनातून आपल्याला मिळतो. त्या अर्थाने तो दिव्यांग व्यक्तींसाठीच नव्हे, तर सर्वासाठीच आशेचा नंदादीप होता. तो आता निमाला आहे.

– डॉ. जयंत नारळीकर

शब्दांकन : राजेंद्र येवलेकर