विष्णू खरे यांची अगदी आरंभीच्या काळातली एक कविता- ‘नींद में’ खूप गाजली होती. त्यांनी लिहिलेल्या मृत्यूविषयक कवितांमध्ये निव्वळ भावनोत्कटता वा खोटी काव्यात्मकता नव्हती, तर एक प्रकारचं बौद्धिक कुतूहल होतं. त्या कवितेचा भावानुवाद..

कसं कळावं की जो गेला

त्याला झोपेत मरण आलं

सांगितलं जातं

की तो झोपेतच शांतपणे गेला

काय आहे पुरावा?

त्यावेळी होतं का कुणी त्याच्याजवळ

ज्यानं त्याच्या प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवलं होतं?

कोण सांगू शकतं की आपल्या जाण्याच्या त्या क्षणी

तो जागा झाला नव्हता

तरीही त्याला

ठेवणंच योग्य वाटलं

आता अजून काय बघायची इच्छा होती त्याची?

त्यानं विचार केला असावा की कुणाला तरी हाक मारून

किंवा सांगून तरी आता काय होणारय?

 

किंवा त्याच्या आसपास कुणीच नसावं

कदाचित त्यानं उठायचा प्रयत्न केला असावा

किंवा तो काहीतरी बोलला असावा

कुणाचं तरी नाव उच्चारलं असावं त्यानं

 

मला कधीतरी असं वाटलं होतं

की ज्यांना झोपेतच गेले असं सांगण्यात येतं

ते नंतरही एक प्रयत्न करीत असतील उठण्याचा

पुन्हा एकदा उठून तयार होण्याचा

पण त्यांना कुणी पाहू शकत नसेल

 

माहीत नाही, मला अशी शंका का येतेय

की कमीत कमी माझ्या बाबतीत असं घडलं

तर मी एक अखेरचा प्रयत्न करून पाहिलेला असेल

श्वास थांबल्यानंतरही

नखं काही काळ वाढतच राहतात

तर तसंही का शक्य होत नसेल?

ज्या गोष्टी पाहिल्या जाऊ शकत नाहीत

त्या नसतातच का?

सबब मी असे सुचवू इच्छितो

की पुन्हा जर असं काही घडलं

सांगावं लागलं की झोपेतच कुणीतरी मरण पावलं

तर असं सांगण्यात यावं

की तो कसा गेला माहीत नाही

जेव्हा तो गेला असावा

तेव्हा आम्ही सगळे झोपेत असू

काय माहीत की ते जास्त खरंही असावं!

(अनुवाद : चंद्रकांत पाटील)