अमेरिकेत प्युरिंटन नावाच्या माथेफिरूने दोन भारतीय तरुणांवर वंशद्वेषातून केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत पेरलेल्या या वंशद्वेषाच्या विखारी बिया रुजून त्याची फळे आता दिसू लागली आहेत की काय, असा प्रश्न त्यातून उद्भवतो. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेत प्रत्यक्ष स्थायिक असलेल्या भारतीयांच्या या सगळ्या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया आहेत, हे  जाणून घेण्याचा प्रयत्न..

अमेरिकेत राहणाऱ्या आम्हा भारतीयांची झोप नुकत्याच आलेल्या एका बातमीमुळे अगदी उडून गेली. बातमी कॅन्सस राज्यातल्या एका गावातली होती. दोन तरुण भारतीय इंजिनीअर एका बारमध्ये ड्रिंक्स घेत बसले होते. एका माथेफिरूने येऊन त्यांच्यावर व्हिसासंबंधित काही आरोप करून पिस्तुलाने एकाला जीवे मारलं. दुसऱ्या एकाला तसेच त्यांना मदत करायला गेलेल्या एका अमेरिकन तरुणालाही त्याने जखमी केलं. ते मध्यपूर्वेतल्या देशांमधील मुस्लीम नागरिक असावेत असा मारेकऱ्याचा ग्रह झाला होता. हा मारेकरी आहे- ५१ वर्षांचा अ‍ॅडम प्युरिंटन नावाचा मद्यपि. अमेरिकेचं हार्टलँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅन्सस, मिसूरी, आयोवा या प्रांतातला. नेव्हीमधून बाहेर पडल्यावर रोजगार मिळवायचा आणि टिकवायचा थोडा प्रयत्न त्याने केला; पण काही जमलं नाही. आई-वडिलांच्या घरी राहून आजारी वडिलांची जमेल तशी सेवा त्याने केली. वडील वारल्यावर आयुष्यात करायलाच काही उरलं नाही. त्यातून सकाळपासून दारूच्या नशेत तो स्वत:ला बुडवू लागला.

प्युरिंटन असं नीरस आयुष्य जगत असतानाच अमेरिकेतअध्यक्षीय निवडणुकांचे वारे वाहू लागले, तेव्हा प्युरिंटनच्या दृष्टीने आशेचा किरण दिसू लागला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्पना अमेरिकेच्या हार्टलँडमधल्या राज्यांनी निवडणुकीत मजबूत पाठिंबा दिला. ट्रम्प यांचं ‘अमेरिका फर्स्ट’ हे स्वप्न प्युरिंटनला आणि त्याच्यासारख्या इतरांनाही फारच भावलं. मुस्लीम राष्ट्रांमधून अमेरिकेत स्थायिक व्हायला येणाऱ्या लोकांवर बंदी घालण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेचं रिपब्लिकन पक्षाच्या लोकांनी स्वागत केलं. जगाचा इतिहास व भूगोलही न शिकलेल्या प्युरिंटनसारख्या लोकांची मग गल्लत होऊ  लागली. त्यांना डोक्याला पगडी घातलेले, दाढी-मिशीवाले सरदारजी आणि मुसलमान सगळे सारखेच वाटायला लागले. भारतीय, पाकिस्तानी, मिडल-ईस्टर्न, इराणी, अरबी सगळे प्युरिंटनसारख्यांच्या लेखी एकच!

त्या दिवशी श्रीनिवास कुचिभोतला आणि त्याचा मित्र अलोक मदसानी ऑस्टिन बार अ‍ॅण्ड ग्रिलमध्ये ड्रिंक घेत बसले असताना प्युरिंटन त्यांना भेटला. त्याने त्या दोघांना त्यांच्या व्हिसाबद्दल विचारलं. बेकायदेशीरपणे राहात आहात का, असंही विचारलं. (हे दोघेही अमेरिकेचे कायदेशीर रहिवाशी होते.) त्यांनी त्याला काहीच उत्तर दिलं नाही. बहुधा दारूची नशा, उत्तरं न  देऊन त्याचा केला गेलेला अपमान यानेही प्युरिंटनचं पित्त खवळलं असावं.

जवळ कायम बंदूक बाळगण्याची मुभा, चालू जागतिक राजकारणाबद्दलचं व भूगोलाचं अर्धवट ज्ञान, दारूची नशा, नैराश्य.. अशात जवळ काही हत्यार नसलेले दोन सावळे तरुण त्याला दिसले. असं सगळं ‘डेडली कॉम्बिनेशन’ एकत्र आलं आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडली. मात्र, या दु:खद घटनेलाही एक जरीची किनार आहे. बारमध्ये कुचिभोतला आणि मदसानी या दोघांच्या मदतीला जवळच बसलेला इआन ग्रिलोट नावाचा २४ वर्षांचा गोरा अमेरिकन तरुण धावून गेला. काही लोकांनी त्याचा ‘हीरो’ म्हणून केलेला उल्लेख त्याला पटला नाही. तो म्हणतो, ‘मी वेगळं काही केलं नाही. माझ्या जागी दुसऱ्या कुठल्याही माणसानं हेच केलं असतं.’ एकाच गावच्या या बोरी अन् बाभळीही. जखमी इआन अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे.

प्युरिंटन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर लवकरच खटला सुरू होईल. जर त्याचा गुन्हा हा ‘हेट क्राइम’ म्हणून सिद्ध झाला तर त्याला दुप्पट शिक्षा होईल.

श्रीनिवाससारख्या तरुण, हुशार आणि होतकरू तरुणाचा अशा तऱ्हेने अंत व्हावा, हे दुर्दैवी आहे. मात्र, ‘हेट क्राइम्स’ अमेरिकेत (भारतात आणि जगात इतरत्रसुद्धा!) नवीन नाहीत. २० व्या शतकात स्थापन केली गेलेली ‘कू क्लस क्लॅन’ ही कुप्रसिद्ध संस्था फक्त गोऱ्या लोकांचा वंश अमेरिकेत राहावा म्हणून हिरीरीने काम करते. अजूनही या संस्थेचे पाच हजार सभासद आहेत. वर्णविद्वेष हा क्लॅनचा पाया आहे.

सर्वसाधारण अमेरिकन जनतेचं भूगोलाचं ज्ञान खूपच मर्यादित आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्यांनंतर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी जेव्हा इराकमधील सद्दाम हुसेनची राजवट उलथून टाकण्यासाठी आणि त्याला मारण्याच्या कारवाया सुरू केल्या तेव्हा कुठे सर्वसामान्य अमेरिकनांना अरब राष्ट्रे, तिथे राहणारे लोक, त्यांचा धर्म, त्यांचा पेहराव याची थोडी थोडी माहिती व्हायला लागली. अजूनही सामान्य अमेरिकींच्या मनात भारताबद्दलही कितीतरी गैरसमजुती आहेत. त्यातून मध्यपूर्व, पाकिस्तान वगैरे देशांमधले लोक जेव्हा पाश्चिमात्य पेहराव करतात, तेव्हा त्यांना केवळ बघून भारतीयांनाही आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक सांगता येणार नाही. अमेरिकन लोकांना भारतीय काय किंवा अरबी काय- सगळ्या भाषाही सारख्याच अनोळखी.

अध्यक्ष ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यावर पहिल्या प्रथम सोमालिया, दक्षिण सुदान, सीरिया, येमेन, इराक, इराण आणि लिबिया या राष्ट्रांमधून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना व्हिसा देण्यास बंदी केली. या देशांमधले लोक- जे आधीपासून कायदेशीररीत्या अमेरिकेत राहत आहेत, त्यांना काळजीचं काही कारण नाही. प्युरिंटनसारख्या अमेरिकेतल्या  मिड-वेस्टमधल्या लहान गावांतून राहणाऱ्या लोकांची, या देशांतले लोक अमेरिकेचं भलं करणारे नाहीत, अशी धारणा झालेली आहे. अर्थात त्यांची तशी धारणा असली, तरीही या स्थलांतरित लोकांना मारण्याचा किंवा त्यांची कागदपत्रे तपासायचा अधिकार सामान्य अमेरिकन नागरिकांना कोणीही दिलेला नाहीये.

बारमध्ये शिरल्यावर  प्युरिंटनने कुचिभोतला आणि मदसानीला  व्हिसा दाखवायला सांगितलं. त्या दोघांना व्हिसा, पासपोर्ट डॉक्युमेंट्स सतत जवळ बाळगायची आणि ती प्युरिंटनसारख्या ऐऱ्यागैऱ्याला दाखवायची काहीही गरज नव्हती. त्यांच्या टेबलाजवळ काहीतरी बोलाचाली चाललेली बघून हॉटेलच्या व्यवस्थापनाने प्युरिंटनला समज देऊन हॉटेलमधून बाहेर जायला सांगितलं. तो बाहेर गेला तो स्वत:च्या गाडीत ठेवलेली बंदूक आणायलाच. नंतर पुढची दुर्घटना झाली. सुरुवातीला चटकन् कारवाई करणाऱ्या हॉटेल व्यवस्थापनाने नंतर मात्र  प्युरिंटनला अडवण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा केला.

या सर्व प्रकरणात प्युरिंटनने केलेल्या कृत्याचं कुठल्याच बाबतीत समर्थन करता येणे शक्य नाही. पण भारतीयांबद्दल त्याला (तसेच ट्रम्पच्या अमेरिकेला) तिरस्कार आहे असाही या घटनेतून अर्थ काढणे उचित नाही.

अमेरिकेत राहणाऱ्या बहुसंख्य भारतीयांनी ट्रम्प यांना मते दिली आहेत. इस्लामिक राष्ट्रांविरुद्धचं त्यांचं कडक धोरण इकडे राहणाऱ्या भारतीयांना आवडून गेलं होतं. ट्रम्पना भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवायचे आहेत. भारतीयांना दुसरी बोचलेली गोष्ट म्हणजे ट्रम्पनी एच- वन बी व्हिसावर  आणलेलं बंधन! अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या भारतातील युवावर्गाला त्यामुळे जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा पर्याय गंभीरपणे विचारात घ्यायची वेळ आता आली आहे असं त्यांना वाटू लागलं असेल तर ते नक्कीच समजण्यासारखं आहे. याबाबतीतही ट्रम्पनी अमेरिकी मतदारांना दिलेल्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ (अमेरिकेत बनवलेल्या वस्तू वापरा, नोकऱ्या देताना अमेरिकन लोकांना प्राधान्य द्या!) या सल्ल्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांचं हे ‘स्वदेशी’चं धोरण भारतीयांना आकळायला अवघड जाऊ  नये. त्यातून भारतातल्या युवापिढीची झालेली निराशा समजण्यासारखी असली तरीही ट्रम्पनी आपल्या लोकांकरता काही कडक निर्णय घेतले तर तेही चुकीचे ठरवता येत नाहीत.

देशांची धोरणं वेळोवेळी बदलत असतात. अमेरिकेचीही तशी ती बदलत आहेत. पण ही ‘पासिंग फेज’ असावी असं वाटतं. हेही दिवस जातील. मुळात अमेरिका हा देशच मुळी स्थलांतरितांचा बनलेला आहे. आणि तीच त्याची ओळख व खासियत आहे.

मतं देण्याचा हक्क असलेले इथले बरेच भारतीय हे अमेरिकेचे नागरिक आहेत. तरुण वयात इकडे येऊन अमेरिकेला त्यांनी आपलं घर म्हटलेलं आहे. कष्ट करून जगाच्या नकाशावर अमेरिकेला मानाचं स्थान मिळवून देण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. अमेरिकी नागरिकांसारखे सर्व हक्क आणि कर्तव्यंही या भारतीयांना लागू पडतात. इथल्या शांत आणि समृद्ध जीवनशैलीत भारतीयांनी स्वत:च्या क्षमतेने, शिक्षणाने आणि कष्टांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. अमेरिकेच्या लोकसंखेत अगदी कमी संख्येने असलेले भारतीय आर्थिक परिस्थितीने मात्र अमेरिकेच्या समृद्ध लोकांच्या यादीत आहेत.

व्हिएतनामचं युद्ध सोडलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन लोकांचा युद्ध, लढाईशी थेट संबंध आलेला नाही. युद्धांच्या, घातपातांच्या नुसत्याच बातम्या ऐकत आलेल्या अमेरिकी नागरिकांची वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ओसामा बिन लादेन आणि त्याच्या दहशतवादी सहकाऱ्यांनी केलेल्या विमानहल्ल्यांनी आधुनिक इस्लामिक हिंसेशी ओळख करून दिली. इथे सामान्य जनजीवन जरी वरकरणी शांत दिसत असलं तरी सरकारी खर्चाच्या बाबी बदलल्या. सैन्यभरती, सरकारी खर्चाचे बदललेले अंदाज, रस्त्यांवर, विमानतळांवर सुरक्षिततेचे नवीन नियम या सर्वाचं अस्तित्व रोजच्या व्यवहारात लोकांना जाणवू लागलं. अमेरिकेने नव्या असुरक्षित जगात प्रवेश केला. देशभक्तीची भावना, सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी स्वेच्छेने केलेली मदत, सरकारला दिलेला पाठिंबा या सगळ्या गोष्टींत इथले भारतीय नेहमीच सक्रिय राहिले. आजही इथल्या भारतीयांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालू आहे.  कायदेशीररीत्या अमेरिकेत आलेल्या, इथल्या कायद्याचं पालन करणाऱ्या सुशिक्षित भारतीयांनी अमेरिकन समाजात आपलं स्थान व्यवस्थित जपलं आहे. यापुढच्या काळातही अनेक अध्यक्ष येतील, जातील; परंतु इथले अभ्यासू, कष्टाळू, यशस्वी भारतीय लोक हे अमेरिकन समाजाचा अविभाज्य भाग बनून राहतील यात कुणाचंही दुमत असू नये.

शशिकला लेले फ्लोरिडा naupada@yahoo.com