भविष्याची दिशा काय आहे, हे इतिहासातल्या अनेक दाखल्यांतून वर्तमानात दिसत असतं. वर्तमान घडत असताना काळाचे हे ठिपके इतिहासातल्या अशाच प्रसंगांशी जोडून भविष्यातल्या रांगोळीचं शब्दचित्र रेखाटायचं, हेच तर खरं वर्तमानपत्रांचं काम. आपल्याकडे आता आपण हे सगळंच विसरत चाललोय, हा भाग सोडून द्यायचा. पण आपलं हे नियत कर्तव्य चोखपणे करणारी वर्तमानपत्रं, त्यातले पत्रकार, संपादक.. आणि मुख्य म्हणजे कोणत्याही भक्तियात्रेत सहभागी न होता हे सगळं समजून घ्यायची इच्छा असलेले सज्ञान वाचक अजूनही अनेक ठिकाणी आहेत.

अमेरिका हे त्याचं धगधगतं उदाहरण.

nazi battle of normandy the great battle for normandy german defeat in normandy
भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार

२० जानेवारी २०१७ या दिवशी अमेरिकेत दोन घटना घडल्या. अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचं राज्यारोहण झालं. ‘अमेरिकेच्या इतिहासातला सर्वात भव्य, सर्वाधिक गर्दी खेचणारा समारंभ!’ असं त्याचं वर्णन त्यांनी स्वत:च केलं होतं. जे पूर्णपणे खोटं होतं! पण ते खोटं आहे हे ट्रम्प यांना मान्य नव्हतं. ‘सत्योत्तर सत्य’ नावाचा एक नवीनच प्रकार जसा यानिमित्तानं जन्माला आला, तसाच एका चित्रपटाच्या कल्पनेचाही यातून जन्म झाला. हे जे काही घडलं ते पाहून स्टिव्हन स्पिलबर्ग याला त्यात एका चित्रपटाची बीजं दिसली. राजकारणाला हात घातल्याखेरीज कोणत्याही कलाकारास पूर्णत्व येऊ शकत नाही. ‘जॉज’, ‘ज्युरासिक पार्क’सारखे चित्रपट काढणाऱ्या स्पिलबर्ग याला ही जाणीव कधीच झाली. त्याचमुळे ‘म्युनिक’, ‘शिंडलर्स लिस्ट’, ‘लिंकन’ असे एकापेक्षा एक करकरीत राजकीय भाष्य करणारे चित्रपट त्याने काढले.

या सगळ्यांपेक्षा ‘द पोस्ट’ हा त्याचा ताजा चित्रपट अधिक भेदक ठरतो. त्याचे आधीचे राजकीय चित्रपट हे इतिहासाधारित होते. ‘द पोस्ट’ हादेखील इतिहासाधारित आहेच; पण तो त्या इतिहासाच्या छडीने वर्तमानावर कोरडे ओढतो. वर्तमानाविषयी एक शब्दही तो काढत नाही. पण तो काढला असता तर बरं, इतकं तो आपल्याला इतिहासाच्या आधारे वर्तमानावर सुनावून व्याकूळ करतो.

चित्रपटाचं कथानक म्हणायचं तर इतकंच, की व्हिएतनाम युद्धात अमेरिकेस माघार घ्यावी लागणार हे माहीत असताना अमेरिकेचे एकापाठोपाठ एक असे अध्यक्ष युद्ध रेटतात, त्याचा अहवाल प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला गेला, त्याची ही गोष्ट. पण ती इतकी सरळ नाही. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या वर्तमानपत्राचं संचालकपद कॅथरिन ग्रॅहम यांच्याकडे केवळ अपघातानं आलेलं. मुळात हे वर्तमानपत्र त्यांचे वडील युजिन मेयर यांनी लिलावात विकत घेतलेलं. ते वित्त व्यवसायातले. त्यांची आई हीदेखील पंडिता. अगदी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याशी तिचे वाद-संवाद होत. कॅथरिनचं फिल ग्रॅहम यांच्याशी लग्न झाल्यानंतर ती ‘ग्रॅहम’ झाली आणि युजिन मेयर यांनी हे वर्तमानपत्र चालवायला फिल यांच्याकडे सुपूर्द केलं. पुढे त्यांच्या निधनानंतर ते चालवायची जबाबदारी कॅथरिन यांच्यावर येऊन पडली.

तो काळ अमेरिकेतील प्रचंड उलथापालथीचा. व्हिएतनाम युद्ध, त्यात मोठय़ा प्रमाणावर झालेले अमेरिकी तरुणांचे मृत्यू, जे जायबंदी होऊन परत आले त्यांचं व्हेटरन होणं, या अस्थिर परिस्थितीत असंख्य कुटुंबांचं उद्ध्वस्त होणं, आणि या अस्थिर, क्षणभंगुरतेच्या वातावरणात हिप्पी चळवळ, बीटल्स जन्माला येणं.. हे सगळं त्या काळाचं उत्पादन. अशा काळात जेफ केनेडी, त्यांची रूपवती पत्नी जॅकी ओनॅसिस, रॉबर्ट मॅक्नामारा, रिचर्ड निक्सन अशा बडय़ा नेत्यांत ऊठबस असलेल्या कॅथरिन यांच्याकडे ‘द पोस्ट’ची मालकी येते. वातावरणातल्या या खदखदीला एक बातमी छापून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ हे वर्तमानपत्र वाट फोडून देतं. ती बातमी असते मॅक्नामारा यांच्या अहवालाची! हा जवळपास सात हजार पानांचा अहवाल असतो. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेला कसा मारच खावा लागणार आहे याचं भविष्य वर्तवणारा आणि त्याची कारणमीमांसा करणारा. परंतु तो स्वीकारणं कोणत्याही अमेरिकी अध्यक्षास शक्य होत नाही. कारण तो स्वीकारणं म्हणजे कमीपणा मान्य करणं. राष्ट्रप्रमुखपद हे पौरुषतेशी जोडण्याची चूक अमेरिकी अध्यक्ष करत असतात.  पौरुषत्वाला आव्हान कोणत्याच पुरुषाला आवडत नाही. आणि त्यात जर तो अमेरिका नावाच्या अजस्र महासत्तेचा प्रमुख असेल तर अजिबातच नाही. अनेक अश्रापांच्या जिवांचं मोलसुद्धा या पौरुषत्वासमोर मग राहत नाही. त्यामुळे हे अध्यक्ष व्हिएतनाममध्ये अमेरिकी फौजांची नुसती भर करत राहतात. अमेरिकी तरुणांचे जत्थेच्या जत्थे राष्ट्राभिमान राखण्याच्या नावाखाली व्हिएतनाममध्ये पाठवणं सुरूच राहतं. पाठवणाऱ्यांना हे माहीत असतं, की यातले बरेचसे मायदेशी परत येणार नाहीत. तरीही त्यात खंड पडत नाही.

मॅक्नामारा यांचा अहवाल हे सगळं सांगतो. या अहवालाचा काही भाग ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं प्रकाशित केल्यावर साहजिकच खळबळ उडते. अध्यक्ष निक्सन तर हादरतातच. पण हे हादरलेपण दाबण्यासाठी ते आपला हुकमी एक्का काढतात.. राष्ट्रहित! या राष्ट्रहिताच्या गोंडस नावाखाली या कागदपत्रांचा पुढचा हप्ता छापायला टाइम्सला ते न्यायालयीन मनाई करतात. दरम्यान, ही कागदपत्रं मिळावीत यासाठी ‘पोस्ट’चीदेखील धडपड सुरू असते. तिला यश येतं. पण प्रश्न असा उभा राहतो, की ही कागदपत्रं छापावीत का?

‘पोस्ट’च्या संचालकांचा सरसकट निर्णय होतो.. छापू नयेत. त्यासाठी राष्ट्रहितापासून  ते कायदेशीर अडचणींपर्यंत वाटेल ती कारणं उभी केली जातात. तशात ‘पोस्ट’ने भांडवली बाजारात पाऊल टाकलेलं असतं. ही कागदपत्रं छापली तर गुंतवणूकदार काढता पाय घेतील अशी भीतीदेखील घातली जाते. पण कॅथरिन ग्रॅहम कोणत्याही दडपणाला बळी पडत नाहीत. सगळ्या शहाण्या पुरुष सल्लागारांना दूर करत ही वृद्धा कातरल्या आवाजात निर्णय घेते : आपण ही कागदपत्रं छापायची!

पुढे प्रकरण न्यायालयात जातं आणि न्यायसंस्था वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुद्दा ग्राह्य़ धरत सरकारच्या विरोधात आणि ‘पोस्ट’च्या बाजूनं उभी राहते. ‘पोस्ट’चा विजय होतो. सर्वशक्तिमान अध्यक्ष निक्सन यांच्या पराभवाची ती सुरुवात ठरते..

अशी ही कथा.

ती जवळपास तारीखवार लक्षात राहील इतक्यांदा वाचली गेली आहे. कॅथरिन ग्रॅहम यांच्या ‘पर्सनल हिस्टरी’ या पुस्तकाची तर माझ्याकडून तीनेक तरी पारायणं झाली असतील. पुन्हा बॉब वुडवर्ड, हॅरिसन सॅलिस्बरी, बेन ब्रॅडली अशांचं लिखाण, ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ पुस्तक आणि नंतर याच नावाचा थोर चित्रपट असा हा काळ शब्दबद्ध करणारा प्रचंड ऐवज  बारमाही वाचनानंद देणारा ठेवा आहे. तो कायमच हाताशी असतो. पण तरीही हा चित्रपट पाहायची ओढ होती.

तीन कारणं त्याची. निर्माता स्पिलबर्ग असणं, मेरिल स्ट्रिप यांनी कॅथरिन साकारणं आणि बेन ब्रॅडली या ‘पोस्ट’च्या संपादकाच्या भूमिकेत टॉम हँक्स याचं असणं. ‘त्रिवेणी संगम’ वगैरे म्हणणं अगदीच बुळबुळीत वाटतं या तिघांचं एकत्र असणं वर्णन करायला. हे त्यापेक्षा वरचं काहीतरी आहे. परत यात आणखी एक योगायोग आहे. ट्रम्प यांनी जेव्हा वाह्य़ात वंशवादी भूमिका आणि वक्तव्यं करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना जाब विचारायचं पहिलं पुण्यकर्म हे मेरिल स्ट्रिप यांनी केलं होतं. त्यांच्या ‘द डेव्हिल विअर्स प्रादा’ ते मार्गारेट थॅचर यांच्यावरच्या ‘द आयर्न लेडी’ या प्रवासाचा साक्षीदार असल्यानं स्ट्रिप यांच्याविषयी आदर होताच; पण थेट ट्रम्प यांना आवाज देण्याची हिंमत दाखवल्यानंतर तर स्ट्रिप आणखीनच मोठय़ा वाटू लागल्या. बिनकण्याचे महानायक आणि कंबरलचक्या महानायिकांना पाहायची सवय असल्यानं आपल्या बुबुळांवरही तसं शेवाळं चढलंय. त्यामुळे मदांध राजकीय व्यवस्थेला आव्हान देणारे हे असे कलाकार पाहिले की धन्यच वाटतं.

‘द पोस्ट’ हा असा धन्य करणारा अनुभव आहे. स्पिलबर्ग असल्यानं संवादांना, दृश्यांना धार आहे. पण ती नाटकी नाहीत. काही प्रसंग तर उदात्तच आहेत. ‘मॅक्नामारा किंवा अन्य उच्चपदस्थ तुमच्याशी दोस्ती करतात, कारण तुमच्या हाती वर्तमानपत्र आहे..’ असं संपादक बेन आपल्या नवख्या मालकाला सुनावतो तेव्हा वर्तमानपत्राच्या मालकीवर खासदारकी वगैरेसाठी लाचार झालेल्या आपल्याकडच्या अशा मालकांची नावं डोळ्यापुढे लोंबायला लागतात. या संपादकाची बायको एका प्रसंगात संपादकाला कॅथरिनचं महत्त्व अधोरेखित करते, तो प्रसंगही उल्लेखनीय असा. संपादक बेन राजकारण्यांचा उल्लेख करत आपल्या सहकाऱ्यांना सांगतो.. ‘यांचं खोटं चालतं, कारण आपण ते चालवून घेतो.’ आणि संपादक बेन आणि मालक कॅथरिन यांच्यातला ‘पोस्ट’चं प्रयोजन सांगणारा संवाद तर आपल्याकडे पत्रकारितेचं प्रशिक्षण वगैरे देणाऱ्यांनी अभ्यासक्रमात लावावा असाच! अर्थातच अभ्यास करायची आणि करवून घ्यायची इच्छा अजूनही शाबूत असेल तर! या संवादांच्या यशाचं रहस्य म्हणजे ते जोश सिंगर यांनी लिहिलेत. जोश म्हणजे तोच.. गेल्याच्या गेल्या वर्षी ‘स्पॉटलाइट’ या अशाच वर्तमानपत्राधारित अप्रतिम चित्रपटाचे संवाद लिहिणारा! ‘स्पॉटलाइट’ ऑस्कर घेऊन गेला. यंदा ‘द पोस्ट’ या स्पर्धेत असणार हे उघड आहे.

स्पिलबर्ग यानं तसाच तर तो बेतलाय. अवघ्या दहा महिन्यांत त्यानं चित्रपटाची निर्मिती केली. कलाकार, संवादलेखक वगैरे बाबी या चित्रपटाच्या यशात आहेतच; पण ‘द पोस्ट’चं खरं यश आहे ते त्याच्या वर्तमानाच्या पाश्र्वभूमीत!

हा ट्रम्पोत्तर काळाचा चित्रपट आहे. सत्याचा आवाज दाबण्याचे सर्वोच्च पातळीवरून होणारे प्रयत्न, ‘सरकारी सत्य’ या नव्या सत्याची निर्मिती, आपल्यामागे झुंडी उभ्या करण्याची सरकारची क्षमता आणि या झुंडीचा वापर विरोधी स्वर चेपण्यासाठी करण्याची नवी कला.. अशी अनेक कारणंही या चित्रपटाला आपोआप उंचीवर नेतात. प्रत्यक्षात हा काळ ही काही स्पिलबर्ग यांची निर्मिती नाही. परंतु काळाचा पट हाच पडदा वापरण्याचं चातुर्य आणि धैर्य हे निश्चितच स्पिलबर्ग यांचं होय. डोळे उघडे असले तर आपल्याकडच्या मनोरंजनखान आणि टाइमपासकुमारांना अक्षय शहाणपणा शिकवेल इतकं ते समर्थ आहे. ‘पोस्ट’नं हे सगळं छापल्यानंतर अध्यक्ष निक्सन आपल्या अधिकाऱ्यांना बजावतात : यापुढे ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वार्ताहरांना व्हाइट हाऊसचे दरवाजे बंद. तो किंवा ‘पोस्ट’मध्ये बातमी छापली गेली तर राष्ट्रद्रोही ठरवलं जाण्याची शक्यता..

हे प्रसंग तर चित्रपटातले की आजचे.. कुठेही घडणारे.. असा प्रश्न पडेल.

‘पोस्ट’च्या छापखान्यात या चित्रपटाचं मर्म आहे. ज्या दिवशी ‘पोस्ट’ आपल्याच अध्यक्षांची कुकर्मकथा उघडी करणार असतो त्या रात्री कॅथरिन स्वत: छापखान्यात थांबतात. राक्षसी यंत्रांवर अंकाच्या प्रती चढवल्या जातात. शेकडो कर्मचारी, ती कागदाची रिळं आणि तो छापखान्याचा या क्षेत्रातल्या मंडळींच्या परिचयाचा, छातीतल्या ठोक्यांशी जुळलेला आवाज. स्पिलबर्ग यांचे कॅमेरे सर्व कोनांतून ती भव्यता टिपतात. आणि त्या भव्य पाश्र्वभूमीवर तळमजल्यावर दोन मानवी आकृती त्या पट्टय़ांतून अंक काढतात. त्यापैकी एक असतात कॅथरिन ग्रॅहम आणि दुसरी व्यक्ती संपादक बेन ब्रॅडली. कर्तव्यपूर्तीचा कृतार्थ आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर थबकलेला. आपल्या भावनेच्या कढाला जराही स्थान न देता कॅथरिन संपादक बेन याला सांगतात..‘‘ You know… Phil used to say: Newspapers are first rough draft of history.’’

वर्तमानपत्रं ही इतिहासाचा कच्चा खर्डा असतात..

अलीकडे ‘वर्तमानपत्रांचा उपयोगच काय? ती सारखीच टीका करत असतात..’ वगैरे किरकिर करणारा एक मोठा वाचकवर्ग तयार झालाय. एका विशिष्ट पक्षावर टीका केली की त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि अन्यांवर टीका झाली की तो त्यांना राष्ट्रद्रोह वाटतो. अशांनी; आणि ज्यांना असं वाटत नाही आणि वृत्तपत्रांचं महत्त्व ज्यांना पटतं अशा सर्वानी इतिहासाचा हा कच्चा खर्डा डोळ्यांखालून घालायला हवा. उद्याचा इतिहास आजच वाचल्याचा आनंद त्यांना निश्चितच मिळेल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या हातून एवढं पुण्य घडायला हवंच.

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

@girishkuber