लोकांना काय हवे, काय आवडेल आणि टाळ्या मिळतील म्हणून किशोरीताई कधी गायल्याच नाहीत. त्यांना जे पटले, भावले आणि आवडले तेच संगीत त्यांनी प्रकर्षांने रसिकांसमोर मांडले.

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
loksatta editorial international labour organisation report youth unemployment In india
अग्रलेख: लाभांश लटकला!

प्रखर बुद्धिवादी असलेल्या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे गाणे म्हणजे सौंदर्याने भरलेला जणू परिपोषच असायचे. स्वर लगाव, स्वर उच्चारणाचा वेग म्हणजेच ‘कहन’ या गुणांमुळे त्यांचे गाणे श्रवणीय झाले. कलाकाराने तानपुरे लावले आणि षड्ज लागला की त्याच्या स्वराची खोली समजते, तसेच किशोरीताईंचे होते. तानपुरे जुळल्यानंतर त्यांनी पहिला स्वर लावला की रसिकांना श्रवणानंदाची अनुभूती येत असे. प्रत्येक स्वराचा गुंजनात्मक जाण्याचा प्रवाह जणू आनंदाची अनुभूती देणारा असाच होता. प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा आग्रह धरणाऱ्या आणि ती गोष्ट परिपूर्ण करण्याचा कटाक्ष सातत्याने जीवनातही यशस्वीपणे बाळगणाऱ्या किशोरीताई यांनी मला सर्वागसुंदर ‘नजर’ दिली.

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर या माझ्या गुरू. त्या नात्याने गानसरस्वती किशोरीताई आमोणकर या माझ्या गुरुभगिनी. पण मी त्यांच्याकडूनही बरेच काही शिकले असल्याने किशोरीताईंना मी गुरुस्थानीच मानते. त्यांची स्वरांवरील भक्ती मी पाहिली आहे. रियाझ करताना त्या अडीच-तीन तास झाले तरी गंधार-पंचमापर्यंतच असायच्या. त्यांचे स्वरांवरील प्रभुत्व अफाट होते. प्रत्येक स्वराचे प्रकटीकरण करण्याची किशोरीताईंची एक खास शैली होती आणि त्या प्रकटीकरणातून प्रत्येक वेळी वेगळे काही सांगितले जायचे; इतका त्यांचा स्वरांचा सूक्ष्म अभ्यास होता. गाण्यामध्ये स्वराला धक्का न लावता दुसऱ्या स्वरापर्यंत कसे जायचे हे शिकायचे तर किशोरीताईंकडूनच! धक्का कोठे वापरायचा हे त्यांना नेमकेपणाने ठाऊक होते. त्यामुळे त्या गाताना धक्का द्यायच्या तेव्हा तो खणखणीतच असायचा.

माईंकडे माझी तालीम १९६९ मध्ये सुरू झाली. दररोज सकाळी नऊ ते अकरा त्या तालीम द्यायच्या. माईंच्या करडय़ा शिस्तीमध्येच मी घडले. मी तानुपरा घेऊन बसायचे त्यावेळी किशोरीताईसुद्धा तालीम घ्यायला असायच्या. किंबहुना आमचे शिक्षण एकाच वेळी सुरू होते. आवर्तन भरणे म्हणजे काय हे त्यांनी मला शिकविले. अस्थायी आणि अंतऱ्यापासून ते समेपर्यंत आवर्तन करून पुन्हा समेवर येणे, तेही लयीला आणि तालाला धरून हे सगळे आखीव-रेखीव असायचे. ताईंचा आणि माझा हा शिक्षणाचा प्रवास आनंददायी असाच होता. तालीम झाल्यावर रियाझ सुरू असताना ‘तू माझ्याबरोबर बसू शकतेस’, असे किशोरीताईंनी मला सांगितले. मग मी त्यांच्याबरोबर गायला बसायचे. एकाही स्वराला धक्का न देताही दुसऱ्या स्वरापर्यंत स्वच्छ आकारात गायलेली लय हे त्यांच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. हा प्रवास होत असताना गळ्यात वेगवेगळी प्रतिकूलता असते की जी आपल्याला कळत नाही. पण त्यावर कशी मात करायची याचा किशोरीताई हा आदर्श वस्तुपाठच होत्या. त्यांचा कलात्मक आणि स्वरांवर असणारा गुंजनात्मक विचार आणि स्वरांच्या उच्चारणातील सौंदर्य अनुभवता येत असे. त्यामध्ये त्यांनी कधी पुनरावृत्ती केली नाही. स्वरांचा तो पाठलाग विलोभनीय आणि आकर्षक असाच होता.

कित्येकदा किशोरीताई तानपुरा घेऊन गायला बसायच्या तेव्हा गाण्याचा ओघ सुरू आहे, पण तीन तास झाले तरी अजून पंचमापर्यंतच पोहोचले आहे असे वाटण्याजोगे त्यांचे गायन होते. मध्य लय तीनताल असेल तर समेपासून ते खाली येईपर्यंत अध्र्या आवर्तनामध्ये समेवर येऊन समतोल साधण्यासाठी त्यांच्या गळ्याची फिरत अफाट होती. अध्र्या आवर्तनामध्ये लय पकडून त्या समेवर येत. लय आणि आवर्तनाची बांधणी ही सहज सोपी. ताल आणि मात्रांना धक्का न देता सहजगत्या येण्यासाठी मला फायदा झाला. किशोरीताई या ‘ग्रेट परफॉर्मर’ होत्या. कोणत्याही गाण्याच्या मैफलीमध्ये कलाकाराची पेशकारीची ताकद आणि ‘सिलेक्शन’ महत्त्वाचे असते. तोच राग, पण सादरीकरणातील वैविध्य वेगळे असायचे. ‘भूप’ राग घेतला तरी किशोरीताईंचा प्रत्येक ‘भूप’ अगदी प्रत्येक वेळी वेगळा असायचा. बैठकीतल्या किशोरीताई वेगळ्याच असायच्या. राग खुलविताना स्वरांची बढत कशी असते हे मला अगदी जवळून पाहता आणि अनुभवता आले.

भारतीय अभिजात संगीतातील परंपरेने आलेले संगीत, घराण्याची गायकी केवळ शिकून नव्हे तर आत्मसात करून आपल्या गाण्यामध्ये नवता आणण्यामध्ये किशोरीताईंचा मोठा वाटा आहे. परंपरेची मूल्ये सांभाळून हे सारे करण्यासाठी परंपरेचे संस्कार अंगामध्ये घट्ट मुरावे लागतात. ते जपावे लागतात. त्यासाठी मेहनत असावी लागते. मग त्यातून दिसलेली नवता किशोरीताई यांनी संस्काराला धक्का न लावता प्रयोगशीलतेने सादर केली. नवता निर्माण करण्याची, प्रयोगशील नवनिर्मितीची ताकद सर्वामध्ये नसते. परंतु परंपरेचे संचित पक्के असल्यानेच या परंपरेला सर्जनशील छेद देत निर्माण होणारी कल्पना आणि नवता मांडण्याची ताकद किशोरीताईंमध्ये होती. त्याच आधाराने त्यांनी स्वतंत्र गायकी निर्माण केली. अशी गायकी निर्माण करून ती सर्वमान्य आणि सर्वश्रुत करण्याचे श्रेय सर्वस्वी किशोरीताई यांचेच आहे. किशोरीताई यांच्यासारखे गाता आले पाहिजे असे वाटणाऱ्या अनेक गायिका आहेत. सौंदर्यशास्त्राचा सूक्ष्म विचार हा तर किशोरीताईंच्या गाण्याचा कळसाध्याय. त्यांचे विचार आणि गाणे यात कधी तफावत झाली नाही. स्वरमंचावर बसल्यानंतर मनात येणारे विचार आणि गळ्यातून निघणारे सूर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याची सिद्धीही त्यांनी साधनेने प्राप्त केली होती. असे आपल्याला उस्ताद झाकिर हुसेन यांच्याबाबतही म्हणता येईल. त्यांच्या मनातील विचार त्यांच्या हातातून आणि तबल्याच्या बोलातून तंतोतंत निघतात याची प्रचीती अनेकदा घेतली आहे.

लोकांना काय हवे, काय आवडेल आणि टाळ्या मिळतील म्हणून किशोरीताई कधी गायल्याच नाहीत. त्यांना जे पटले, भावले आणि आवडले तेच संगीत त्यांनी प्रकर्षांने रसिकांसमोर मांडले. नेहमीचे राग असोत किंवा अनवट राग; त्या ठुमरी आणि गझल उत्तम गात असत. संवादिनीवरून बोटे फिरवीत गालिबचे पुस्तक घेऊन त्या स्वररचना बांधायच्या. भजनांना स्वरसाज देत असत. शब्द, त्याचे अर्थ आणि या शब्दांचे अर्थासकट उच्चारण हा त्यांचा कटाक्षच असायचा. योग्य अर्थ साधण्यासाठी भाव प्रकटीकरण महत्त्वाचा होता. बंदिश बसली तरी गात असताना ती कशी मांडली गेली पाहिजे हा त्यांचा मोठा व्यासंगाचा विषय होता. गळ्यावर प्रचंड हुकूमत. गळा जितका फिरायचा तितकाच तो स्थिर होता. किशोरीताईंच्या गळ्याची महती मी काय वर्णावी? हा गळा केवळ ऐकावाच. जोडरागामध्ये एकात दुसरा राग गुंफण्याची त्यांची झेप ही अनेकांच्या बुद्धीला झेपायची नाही. अतिशय सुंदर पद्धतीने त्या समेवर येत असत. ‘बसंत केदार’, ‘बसंत बहार’, ‘ललितागौरी’, ‘सावनी नट’ हे राग सादर करताना मी त्यांच्या गायनाची साक्षीदार झाले आहे.

मोगुबाईंच्या शिष्यांमध्ये कमल तांबे, कौसल्या मांजरेकर, किशोरीताई आणि मी अशा आम्ही चौघी नियमितपणे माईंबरोबर गायला बसायचो. गुरू या नात्याने त्यांच्याकडून प्रत्येकीला वेगळे शिकायला मिळायचेच. पण या शिक्षणामध्ये आपल्या प्रतिभेची भर घालून ती गायकी समृद्ध करणाऱ्या किशोरीताई यांच्यासारखी बुद्धिवान गायिका होणे कठीणच. त्या सर्व कलांनी युक्त होत्या. त्या वीणकाम आणि भरतकाम सुंदर करायच्या. कोणतीही गोष्ट त्या सुंदर करायच्या. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य भरलेले असल्याने त्यांचे रंगसंगतीवर विलक्षण प्रभुत्व होते.

किशोरीताईंनी माझ्यावर मनापासून प्रेम केले. त्याकाळी माझे केस छान लांबसडक होते. किशोरीताई यांनी अनेकदा माझी छान वेणी घालून दिली होती. ‘अशी वेणी घालत जा. छान दिसतेस’, असे त्या मला नेहमी वेणी घातल्यानंतर सांगत. वेणी घालण्याच्या निमित्ताने त्यांचा जो स्पर्श व्हायचा त्याने मीच मोहरून जायचे. प्रवासात असताना संगीतातील स्वरांचे नातेबंध म्हणजेच रिलेशनशिप यावर त्या भरभरून बोलत असायच्या. रिषभ आणि गंधार यांचे नाते कसे असते, ते कसे असले पाहिजे, रागानुरूप कोणता सूर कधी लावायचा, कोणता सूर कधी जवळ घ्यायचा आणि कधी लांब ठेवायचा असे त्यांचे विवेचन ऐकताना मला वेगळाच अनुभव यायचा.

माझा मुलगा सत्यजित याचा पहिला वाढदिवस होता. त्यावेळी किशोरीताई गोरेगाव येथील आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी गायनाची मैफल करूनच सत्यजित याला स्वरमयी शुभेच्छा दिल्या. ‘हा मुलगा सुरांमध्येच राहील’, असा आशीर्वाद त्यांनी दिला. खरे तर हीच माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी त्यांनी दिलेली मोठी भेट होती. सर्वाग परिपूर्ण असलेल्या किशोरीताई अशा अचानक निघून गेल्याने मला मोठा धक्का बसला आहे.

पद्मा तळवलकर