‘कोची बिएनाले’ या द्वैवार्षिक कलाप्रदर्शनाची यंदा तिसरी खेप.  तिथं अनेक कलाकृती पाहून त्यापैकी निवडक कलाकृतींच्या आधारे या प्रदर्शनाचं मर्म जाणून घेण्याचा हा प्रयत्न.. कलाप्रकारांतल्या भिंती विरळ होत आहेत आणि अभिव्यक्ती व वैचारिक भूमिका यांचा संबंध अभेद्य आहे, याची खात्री देणारा..

येशू, बुद्ध यांच्या चित्रांपाशी इसवी सनाची पहिली एक-दोन शतकं रेंगाळत राहिलेला दृश्यकलेचा इतिहास पुढल्या काही शतकांमध्ये तैलरंगानं कॅनव्हासवर रंगवलेल्या चित्रांपर्यंत गेला. शिल्पं केवळ लेणी किंवा मंदिरं यांच्यापुरती न उरता चौकाचौकांत आली. आणि कलादालनातल्या शिल्पांना तर पिकासोच्या ‘सायकलची सीट भिंतीवर उभी आणि त्यावर सायकलचंच हँडल- झाला बैल!’ अशा शिल्पांचीही जोड मिळाली. पिकासोच्याही आधी- १८७२ सालापासून चित्रं रंगवण्याच्याच नव्हे, तर जगाकडे पाहण्याच्या नवनव्या पद्धतींचा (इम्प्रेशनिझम, एक्स्प्रेशनिझम, फॉविझम, क्युबिझम, फ्यूचरिझम) ध्यासच युरोपनं घेतला आणि जगानंही आजतागायत तो स्वीकारला. १९१३ ते १९१७ सालादरम्यान ‘डाडाइझम’चं मिसरूड कलेला फुटलं आणि टगेगिरी जगाकडे सरळ गोष्ट न सांगता दृश्यातून विचार करायला लावणारी व्हीडिओकला अर्धशतकापूर्वी स्थिरावली. त्याच सुमारास मांडणशिल्पांनीही जगभरच्या दृश्यकलावंतांना जणू अभिव्यक्तीची नवी वाट दाखवली.  भूमिकला, कृतिकला, संकल्पनात्मक कला अशा विविध चळवळी होत राहिल्या. मग फ्रान्स, अमेरिका, जपान, इटली अशा सर्वच देशांत १९६० चं अस्वस्थ दशक उजाडलं आणि नुसत्या कलाशैलींवर समाधान मानण्यापेक्षा पुढे गेलं पाहिजे, असा जोम त्यावेळच्या (आता सत्तरीपार असलेल्या) तरुणाईत येऊ लागला.. तेव्हापासून भारतात रुजलेले ‘सामाजिक जाणिवेची कला’, ‘कलावंताची सामाजिक बांधिलकी’ आदी शब्दप्रयोग एकतर हेटाळणी किंवा अज्ञान, किंवा दोन्ही अशाच प्रकारच्या प्रतिक्रियांचे धनी ठरले असले, तरी तेव्हापासून आजतागायत कलेतली सामाजिक जाणीव ताजीच राहिली आहे. कलेचा इतिहास घडतच राहिला आहे.. या घडत्या इतिहासाचे काही नवे कोंब भारतात पाहायला मिळण्याचं ठिकाण म्हणजे केरळमध्ये दर दोन वर्षांनी होणारं ‘कोची बिएनाले’ हे महाप्रदर्शन. या प्रदर्शनाची तिसरी खेप (म्हणजे ‘बिएनाले’चे वर्ष सहावे) यंदा सुरू आहे. आणि कोची शहरभर कुठे ना कुठे, एकंदर ५० हजार चौरस फूट जागेत ठेवलेल्या किंवा सादर होणाऱ्या ३१ देशांमधल्या ९७ कलावंतांच्या कलाकृती येत्या २९ मार्चपर्यंत सर्वासाठी एकाच शुल्कात खुल्या आहेत. तुम्ही नाही गेलात तरी देश-विदेशातले किमान चार लाख जण (जसे गेल्या वर्षी तिकीट काढून आले होते, तसे- आणि कदाचित यंदा त्यापेक्षा जास्त!) यंदाही तिथं जातीलच असा अंदाज आहे. त्यामुळेच ‘कोची बिएनाले’मध्ये यंदा ‘कलेचा घडता इतिहास’ कसा दिसला, याची दखल घेणं महत्त्वाचं आहे.

Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

कलेच्या इतिहासात एक खूपच छान असतं.. इथं भाजपची सत्ता आली म्हणून काँग्रेस फक्त वाईटच, ट्रम्प शिरजोर म्हणून हिलरी भ्रष्टच- असला एककल्ली प्रकार नसतो. मांडणशिल्पं किंवा व्हीडिओकला, त्याहीनंतर दृश्यकलेचा भाग म्हणून रुळलेली ‘परफॉर्मन्स आर्ट’ हे नवे प्रकार आहेत; पण म्हणून जुनी लघुचित्रं टाकाऊच.. असं डोकं ताळ्यावर असलेलं कोणीही मानत नाही. ही मूलभूत समता गृहीत असते, तेव्हाच गुणवत्तेवर विभागण्या शक्य होतात. कलेचा बाजार भले ‘टिपिकल’ चित्रांना किंमत देणार नाही. चित्रं पाहण्याची सवय असलेले प्रेक्षकदेखील अशा ‘नेहमीसारख्या’ चित्रांकडे पाहणार नाहीत. पण कलेचा इतिहास मात्र एखाद्या चित्राची कलात्म महत्ता कमी असली तरी त्या उणेपणामागची सामाजिक-सांस्कृतिक कारणं शोधेल. पाश्चात्त्य कलाच खरी आणि आशियाई लोकांनी पाश्चात्त्य पद्धतीचं कलाशिक्षण घेऊन केलेल्या कलाकृती कमअस्सल, असंही कलेचा इतिहास मानत नसल्याची उदाहरणं गेल्या दशकभरात भरपूर दिसली आहेत. कोची बिएनालेचं मुख्य प्रदर्शनस्थळ असलेल्या ‘अस्पिनवॉल हाउस’मध्ये मागल्या दरवाजानं आत गेल्या गेल्या उजव्या हाताला जे पहिलंच दालन लागेल, त्यात डॅनिएल गॅलिआनो या चित्रकारानं एक खेळ मांडला आहे : रद्दीत, कचऱ्यात किंवा कुणाच्यातरी स्टुडिओत धूळ खात पडलेल्या साध्यासुध्या निसर्गचित्रांवर तो माणसं रंगवतो! म्हटलं तर हेही साधंच. पण ‘फोटोशॉप’ आदी तंत्रांच्या जमान्यात डॅनिएलची ही कृती कुणाच्यातरी (नुसत्याच) कौशल्याला स्वतच्या कारागिरीनंच उत्तर देणारी ठरते. याच प्रकारची, पण आणखी जटिल कलाकृती म्हणजे जोनाथन ओवेन या शिल्पकारानं एकोणिसाव्या शतकातल्या एका संगमरवरी अर्धपुतळ्यावर केलेलं ‘कोरीवकाम’! हा सुंदर म्हणावासा संगमरवरी अर्धपुतळा एका तरुणीचा होता. उमराव घराण्यातली असेल. तिचा अख्खा चेहरा बादच करून त्या जागी एक साखळीसारखा, एकमेकांत गुंतलेल्या कडय़ा असलेला आकार जोनाथन यांनी कोरून काढला आहे. इतिहासात या प्रकारचं काम आधी झालंय- पण ते दोस्तीखात्यात.. १९५१ साली रॉबर्ट रॉशेनबर्ग या ‘असेम्ब्लाज’कर्त्यां दृश्यकलावंतानं त्याचा आवडता चित्रकार विल्हेम डीकूनिंग याच्याकडून एक ड्रॉइंग खास ‘खोडून टाकण्यासाठी’ मागून घेतलं.. आणि डीकूनिंगनंही ते दिलं! मग १९५३ साली रॉशेनबर्गची कलाकृती तयार झाली. पण १९६३ पर्यंत ती बाहेर कुठ्ठेही दिसली नव्हती; असा तो इतिहास. त्यापेक्षा जोनाथनचं काम निराळं आहे. त्यानं अगदी लिलावांतनं वगैरे अर्धपुतळे विकत घेऊन मुद्दाम त्यांचं विरूपीकरण केलं आहे. उमराव मुलीच्या जागी जड साखळदंड त्यानं आजच्या प्रेक्षकांना पाहायला लावलाय. या कृतीचं फलित म्हणून दिसणारं दृश्य सुंदर की असुंदर, हे ज्याचं त्यानं ठरवलं तरी काहीच बिघडत नाही. इतिहासकार पाहतील- ते या कृतीमागच्या निर्णयाकडे. कलेशी कलेनंच केलेल्या विद्रोहाकडे.

कौशल्यापेक्षा अभिव्यक्तीकडे पाहणं महत्त्वाचं, हे कलेच्या जगभर विखुरलेल्या इतिहासकारांना साधारण १९६० च्या दशकात आपापलं कळू लागलं. त्याच सुमारास मराठीत मौज प्रकाशन आणि इस्थेटिक्स सोसायटी- मुंबई यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘सौंदर्यविचार’ हे पुस्तक निघालं. त्यात सर्व कलांचा मिळून विचार करता येईल का, यादृष्टीनं एक सामूहिक (अनेक तज्ज्ञांचा सहभाग असलेलं) पाऊल पडलं होतं. पण हा विचार मराठीत समीक्षेपुरताच राहिला. तो कलेत किंवा कलेच्या सं-घटनात उतरला नाही. कलाक्षेत्रातले मराठी किंवा देशी संघटक ‘उत्सव’ भरवण्यातच धन्यता मानू लागले. दरम्यानच्या काळात जगभर दृश्यकलेच्या क्षेत्रात ठिकठिकाणची द्वैवार्षिक प्रदर्शनं- बिएनाले- हा एक सशक्त उद्गार ठरू लागला. दरवेळच्या बिएनाले प्रदर्शनाला एक संकल्पना असणं, त्यामागे काही विचार असणं आणि मुख्य म्हणजे व्हेनिस बिएनाले या पहिल्या बिएनालेचा अपवाद वगळता अन्य द्वैवार्षिक दृश्यकला प्रदर्शनांमध्ये हळूहळू अन्य कलांचाही सक्रिय समावेश होत जाणं, ही सारी वैशिष्टय़ं यंदाच्या कोची बिएनालेत उतरली आहेत. यंदा कोचीमध्ये फक्त दृश्यकला नाहीच. इथं सर्जिओ चेफॅक या अर्जेटिनातल्या स्पॅनिश लेखकाची कादंबरी (इंग्रजीत) आहे, तिची ८८ प्रकरणं ८८ भिंतींवर रंगवली गेली आहेत! ती आपण समोर उभं राहून जिथल्या तिथं वाचायची. हे जरा जास्तच वाटेल. पण कवितांचा समावेश इथं ज्या प्रकारे आहे, त्यात केवळ ‘वाचणं’ अपेक्षित नाही. कविता अनुभवणं महत्त्वाचं. कवी रॉल झुरिता (पुन्हा स्पॅनिश- दक्षिण अमेरिकेतल्या चिली या देशातले.) यांनी कोचीतल्याच समुद्राचं पाणी प्रचंड मोठय़ा गोदामवजा गॅलरीत आणवून, लोकांचे पाय घोटय़ाच्याही वपर्यंत भिजतील इतक्या खोलीचा खाडा अख्ख्या गोदामभर करून, त्या गोदामाच्या अफाट भिंतींवर तितकेच अचाट आकाराचे आठ कॅनव्हास लावून त्यावर प्रत्येकी फार तर दोन-तीन ओळी लिहिलेली एक कविता मांडली होती.. ती वाचण्यासाठी सुमारे ३० मीटर पाणी तुडवत चालावं लागेल, अशी! या पाणी तुडवण्याचा कवितेच्या आशयाशी खूप जवळचा संबंध आहे.. कविता ऐलान कुर्दी या समुद्रातून चालत जमिनीवर येता येताच मृत्युमुखी पडलेल्या लहानग्या निर्वासित मुलाबद्दलची आहे. कुर्दीच्या आई-वडिलांप्रमाणेच प्रेक्षकही पाणी तुडवत चालतात.

lr02या गोदामाच्या साधारण समोरच उघडय़ावर एक मोठी पिरॅमिडसारखी कलाकृती होती. वर मातीचं लिंपण आणि आत तट्टय़ाच्या स्वच्छ भिंती. स्लोव्हेनियन कवी अलेस स्टेंजर यांनी बांधवून घेतलेला हा पिरॅमिड. त्याच्या आत जाता येतं. आतल्या भिंतींच्या तट्टय़ांमागून अगदी अंधुकसा प्रकाश आणि मुख्य म्हणजे आवाज येतो आहे, हे काही पावलांतच कळतं. हे आवाज शांतपणे काहीतरी वाचणारे आहेत. आपापल्या भाषेत- बहुधा कविता वाचताहेत.. होय! कविताच आहेत त्या. दहा कविता. विविध देशांतल्या दहा कवींच्या. हे दहाही कवी आपापल्या देशांतून परागंदा व्हावं लागलेले आहेत. स्वतच्याच देशात देशद्रोही ठरलेले कवीसुद्धा आहेत. ते सारे आज जिवंत असले तरी त्यांचं मायदेशांतलं आयुष्य संपलंय.. त्या गतजीवनाचं हे पिरॅमिडरूपी स्मारक, असं अलेस स्टेंजर सांगतात.

स्मृतींना.. आठवणींना गोठवून ठेवण्याचा प्रयत्न ही कलाकृतींची एक प्रेरणा असते. त्या स्मृती कटू असू शकतात, स्वतपुरत्या मर्यादित नसूही शकतात. चीनच्या ‘विकासा’च्या स्मृती या अशाच सामूहिक आणि कटू आहेत. दाइ शियांग यांनी त्या विस्थापनाच्या, अधिकाऱ्यांनी केलेल्या जुलूम- जबरदस्तीच्या आठवणी तब्बल २५ मीटर लांबीच्या एका भेंडोळ्यावर (‘स्क्रोल’वर) साकारल्या आहेत. त्यामागची त्यांची पद्धत निराळीच आहे.. स्वतच्या स्टुडिओत एका वेळी एकाच अभिनेत्याला वेशभूषेसह ‘पोज’ देऊन त्यांनी छायाचित्रं टिपली. मग काही ठिकाणची दृश्यं टिपली. तिसरा टप्पा याच ठिकाण- दृश्यांमध्ये योग्य जागी ती मानवी पात्रांची छायाचित्रं बरोब्बर बसवण्याचा. चौथा टप्पा ही निरनिराळी सिद्ध छायाचित्रं एकमेकांशी नीट जोडून ‘स्क्रोल’ तयार करण्याचा. या मेहनतीमुळे काय झालं? छायाचित्रातला प्रत्येक जण चिनी अधिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीतून सुटू शकला! ‘मी तर स्टुडिओत एकटय़ानं पोज दिली’ हा बचाव सर्वाकडे तयारच होता. त्यातून तयार झालेला स्फोटक, चीनवर कठोर टीका करणारा आणि त्याहीपेक्षा ‘हे असंच चालतं’ असं शांतपणे सांगणारा ऐवज त्या छायाचित्रातल्या माणसांनी पाहिलाही नसेल कदाचित.. पण न पाहता त्यांना तो अनुभव माहीत आहे. जगालाही हे सारं ऐकून माहीत आहे. आता काही देश चीनसारखेच होत आहेत.

स्वप्नं, अ-शक्यता यांच्या अभिव्यक्तीचा मार्ग म्हणजे कला. पण या स्वप्नांच्या आत कुठेतरी खोलवर आणखीही काहीतरी असू शकतं. ओरिसाच्या एका गावातून आलेल्या, बडोदे इथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या मुद्राचित्रण विभागात शिकलेल्या सुब्रत बेहेरा या तरुण आणि गुणी मुद्राचित्रकारानं ‘लिथोग्राफी’ या प्रकारात केलेली ५० हून अधिक मुद्राचित्रं एका दालनात आहेत, ती वरवर पाहिल्यास अमर चित्रकथेतल्या चित्रांसारखी वाटतील. पण त्यांच्यामागे कदाचित दमनाचा अनुभवही असू शकेल. सुब्रत काहीच बोलत नाही. पण यंदाच्या बिएनालेतल्या अन्य कुणाही चित्रकारापेक्षा तो अबोल आहे.. दबूनच वागतोय असं वाटतं.

अभिव्यक्तीच्या निरनिराळ्या रूपांमध्ये हेतूंचं, प्रेरणांचं, कलाप्रकारांचं वैविध्य आहे. कोची बिएनालेचा यंदाचा विचार-नियोजक सुदर्शन शेट्टी याच्या बोलण्यात ‘अभिव्यक्ती’ हा शब्द नव्हता. पण तो वैविध्यावर भर देत होता. बिएनालेतल्या कलाकारांचं जसं आपापलं पॉलिटिक्स होतं; तसंच सुदर्शनचं हे ‘वैविध्या’चं पॉलिटिक्स. सुदर्शन स्वत अतिशय संवेदनशील दृश्यकलावंत आहे. किंबहुना, म्हणूनच तर ‘कलावंतानंच विचार-नियोजित केलेली बिएनाले’ असं वैशिष्टय़ असलेल्या कोचीपर्यंत तो पोहोचू शकला. त्याच्या स्वतच्या कलाकृतींमध्ये नाटय़, चित्रपट, संगीत यांचे दुवे असतात. त्यानं यंदाच्या कोची बिएनालेची संकल्पना प्रेक्षककेंद्री ठेवली.. ‘फॉर्मिग द प्युपिल ऑफ अ‍ॅन आय’ ही शर्मिष्ठा मोहन्ती यांच्या कवितेतली ओळ म्हणजे सुदर्शनची बिएनाले-संकल्पना. ‘नजर असणं- तयार होत राहणं महत्त्वाचं!’ असं तो अनेकांना सांगत होता.

कलेचा इतिहास जर ‘समृद्ध परंपरां’पाशीच थांबून राहिला, तर नजर एकदा तयार झाली तरी चालेलच.

ती तयार होत राहणं, अशी जर अपेक्षा असेल तर इतिहास सतत घडतच असायला हवा. म्हणजे त्यासाठी ‘अमुक म्हणजेच सुंदर, तमुक म्हणजे सुंदर नाही’ अशा कल्पनांचा त्याग, विद्रोह, वैविध्याचा आदर, स्मृतीला कुंपणं न घालता कटू अनुभवही युक्तीनं मांडणं, स्वप्नं, अस्फुट का होईना, पण दमनाबद्दलचा निषेध.. हेही सगळं असायला हवं.

ते आहेच इथं.. म्हणून तो घडता इतिहास इथं दिसू शकतोय.

दाइ शियांग यांच्या चीनमधील ‘विकासाची प्रक्रिया’ दाखविणाऱ्या २५ मीटर लांब डिजिटल फोटोकोलाज कलाकृतीचा अंश (शेजारी),  शिल्पकार जोनाथन ओवेन यांनी १९ व्या शतकातील अर्धपुतळय़ाचं केलेलं विरूपीकरण (खाली) आणि कवी रॉल झुरिता यांची प्रचंड कॅनव्हासवर लिहिलेली कविता वाचण्यासाठी ओलांडावा लागणारा पाण्याचा पट्टा (अगदी तळाला)

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com