24 November 2017

News Flash

साहित्यपर्वताचा उत्तुंग सन्मान!

कादंबरीलेखन ही एक तपश्चर्या असते. या तपासाठी बैठक मारून एका जागी आसनस्थ व्हावे लागते.

दिलीप बोरकर | Updated: March 19, 2017 1:55 AM

ज्येष्ठ कोंकणी लेखक महाबळेश्वर सैल यांना त्यांच्या ‘हावठण’ या कादंबरीसाठी नुकताच के. के. बिर्ला फाऊंडेशनचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सुहृदाने चितारलेले त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व..

कोंकणीत ‘सैल’ म्हणजे पर्वत. कोंकणी आणि मराठी साहित्यात, खासकरून कथा-कादंबरीत पर्वतासारखे जबरदस्त बैठक मारून बसलेले आणि पर्वतासारखेच इतर समस्त साहित्यिकांत उठून दिसणारे महाबळेश्वर सैल यांना नुकताच के. के. बिर्ला फाऊंडेशनचा ‘सरस्वती सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या सन्मानाने फक्त महाबळेश्वर सैल यांचाच नव्हे, तर कोंकणी भाषा आणि आमच्यासारख्या त्यांच्या साहित्यिक मित्रांचाही सन्मान झाला आहे.

कादंबरीलेखन ही एक तपश्चर्या असते. या तपासाठी बैठक मारून एका जागी आसनस्थ व्हावे लागते. महाबळेश्वर सैल यांना ते जमून गेलेलं आहे. त्यांच्या कादंबऱ्यांची कथानके ही चाकोरीबाहेरची असतात. त्या कथाविषयांच्या विस्तारासाठी समाजजीवनाच्या, रूढी-परंपरांच्या, भूगोल-इतिहासाच्या प्रचंड अभ्यासाची आवश्यकता असते. ते येरागबाळ्याचे काम नसते. ज्यांना ही तपश्चर्या साध्य होते त्यांच्यापाशी मग पुरस्कार आणि सन्मान स्वत:हून वाट चालत येतात.

सैल स्वभावाने मितभाषी. प्रसिद्धीच्या झोतापासून ते कटाक्षाने स्वत:ला दूर ठेवतात. आणि कोंकणी साहित्यात कथा आणि कादंबरीच्या रूपात नित्य नूतन विषय आणण्यासाठी ते स्वत:स विजनवासात घेऊन जातात. गेली कित्येक वर्षे ते कोंकणी आणि मराठीतून सातत्याने लेखन करत आहेत. त्यांच्या साहित्याची दखल राज्यपातळीवरूनच नव्हे, तर अगदी राष्ट्रीय पातळीवरूनदेखील घेण्यात आलेली आहे. त्यांच्या ‘तरंगा’ या लघुकथासंग्रहास १९९३ साली केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता. त्यांच्या ‘काळी गंगा’, ‘युगसांवार’ आणि ‘हावठण’ या गाजलेल्या आणि लोकप्रिय कादंबऱ्या होत. यातील ‘हावठण’ कादंबरीस याअगोदर कर्नाटकातील विमला पै फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीचा एक लाखाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांची ही कादंबरी कन्नड, इंग्रजी आणि मल्याळम् भाषेतून अनुवादित झालेली आहे. आणि आता याच ‘हावठण’ कादंबरीस के. के. बिर्ला फाऊंडेशनच्या सरस्वती सन्मानाने पुरस्कृत करून जणू आम्हा समस्त सरस्वतीच्या उपासकांचा.. सारस्वतांचा सन्मान करण्यात आला आहे.

सैल हे गोव्याजवळच्या कारवार जिल्ह्यतील माजाळी गावचे. या भागातील बहुतेक तरुण हे परिस्थितीमुळे सैन्यात भरती होत असतात. सैल यांनीसुद्धा सेनादलात सेवा बजावलेली आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला आहे. हाती बंदूक घेऊन शत्रूसैन्यावर गोळीबार केलेला आहे. निवृत्तीनंतर त्याच हातात लेखणी घेऊन त्याच सहजतेने त्यांनी सकस साहित्यही निर्माण केले आहे. ‘युगसांवार’ ही त्यांची पोर्तुगीजकालीन धर्मातरावर बेतलेली ऐतिहासिक कादंबरी. कोंकणी वाचकांनी या कादंबरीचे स्वागत केलेच; परंतु त्याचबरोबर या कादंबरीच्या ‘तांडव’ या मराठी अनुवादाचेही मराठी वाचकांनी मोठय़ा जोशात स्वागत केले. मराठीभाषकानी या कादंबरीस विविध पुरस्कार देऊन उत्कृष्टतेची पावतीही दिली. मानवी मूल्यांचा ऱ्हास, परिस्थितीशरण माणसांची अगतिकता हा सैल यांच्या कथा-कादंबऱ्यांचा आस्थेचा विषय असतो. सैल यांनी स्वत:सुद्धा ही परिस्थिती अनुभवलेली आहे. त्यामुळेच त्यांचे साहित्य हे दीनदुबळ्यांचे प्रश्न, त्यांची दु:खं, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती अगदी जिवंत रूपात घेऊन येत असते. ज्या ‘हावठण’ कादंबरीला आज सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त झालेला आहे तिच्यातही हाच विषय प्रकर्षांने मांडण्यात आलेला आहे. धरणाच्या उभारणीमुळे कुंभार समाजातील एका परिवाराचे उद्ध्वस्त झालेले जीवन या कादंबरीत त्यांनी चित्रित केले आहे. कुंभाराचा हा  कलात्मक व्यवसाय हजारो वर्षांच्या आदिम काळापासून चालत आलेला. मात्र, शहरीकरणाच्या आणि औद्योगिकीकरणाच्या रेटय़ात या व्यवयायाचा ऱ्हास सुरू झाला. त्यातून त्यांची ससेहोलपट सुरू झाली. या कादंबरीत कुंभारांचे कष्ट, भूक व त्यागाचे बारकावे अत्यंत सूक्ष्मरीत्या आणि कलात्मकतेने चितारले गेले आहेत. ही कादंबरी सैल यांच्या माजाळी या गावात घडते. त्यांच्या गावाशेजारीच कुंभारवाडा आहे. लहानपणापासून कुंभारांचे कुंभारकाम पाहत आलेल्या सैल यांनी त्यांच्या कलेतील बारकावे अचूक टिपले आहेत.

सैल यांचे साहित्य स्थल-कालाच्या सीमा उल्लंघणारे असल्याने नेहमीच त्याची चर्चा राष्ट्रीय स्तरावर होत आलेली आहे. ‘पलतडचो मनीस’ (पलीकडचा माणूस) या त्यांच्या कथेवर बेतलेल्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली नाममुद्रा उमटविली आहे.

सैल हे निसर्गलेखक आहेत. त्यांनी साहित्यासाठी प्रचंड साधना केली. वनस्पतीसृष्टी, मानवसृष्टी आणि प्राणीसृष्टी यांचा समन्वय त्यांनी आपल्या साहित्यात साधला आहे. त्यांच्या साहित्यातून मनुष्यजीवनाच्या अस्तित्वाच्या संघर्षांचे चित्रण आढळते. त्यांच्या साहित्यात स्त्रीचेही प्रभावी चित्रण केलेले दिसते.

‘‘देवावर माझा विश्वास आहे. मात्र, देवाला धर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याची कृती मला मान्य नाही. संघटित धर्माच्या भिंतीत देव बंदिस्त झाला की असहिष्णुता वाढते. प्रेषितांच्या उक्तींचा अर्थ आपल्याला हवा तसा लावत आम्ही तांडवालाच निमंत्रण देत असतो..’’ असे म्हणत आजच्या सहिष्णुता हरवत चाललेल्या समाजात होऊ  घातलेल्या तांडवाची धोक्याची घंटा सैल आपल्या साहित्यातून सतत देत असतात. आज या जातकुळीतील साहित्यिकांची देशाला आणि समाजाला आवश्यकता आहे. म्हणूनच सैल यांचे याप्रसंगी अभिनंदन करताना त्यांच्या या जातकुळीलाही सलाम करावासा वाटतो.

दिलीप बोरकर bimbkonkani@yahoo.co.in

First Published on March 19, 2017 1:10 am

Web Title: konkani writer mahabaleshwar sail saraswati samman novel hawthan