एकेकाळी कोकणची अमीट छाप असलेल्या मुंबईतील लालबाग परिसराचे आणि त्याकाळच्या लोकजीवनाचे चित्रण करणारे ‘सलाम लालबाग’ हे सुरेश सातपुते लिखित पुस्तक डिम्पल प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील काही अंश..

त्या काळचे लालबाग म्हणजे दुसरे कोकण असे म्हटले तर मुळीच अतिशयोक्ती होणार नाही. कोकणातील प्रत्येकजण त्याकाळी कामधंद्यास लागायचे असे ठरवले की पुणे अथवा अन्य शहरांत न जाता थेट मुंबई- विशेषत: लालबाग गाठत असे. त्याकाळी व नंतर बरीच वष्रे लालबागवर कोकणी संस्कृतीचाच प्रभाव पडला होता. या परिस्थितीचे विश्लेषण केले तर असे दिसून येते की- दळणवळण साधनांअभावी खुंटलेला कोकणाचा विकास. कोकणातील डोंगराळ जमिनीमुळे दळणवळणाचे विकासकार्य मोठे खíचक व दीर्घकाळ चालणार, कोकण रेल्वे होणे अशक्य अशी असलेली समजूत, इत्यादी मतप्रवाहांचे अडथळे त्याकाळी कोकणच्या विकासाआड येत होते. कोकणात जायचे-यायचे असेल तर पुणे, सातारा, कोल्हापूरमाग्रे किंवा आगबोटीने. मुंबई-गोवा रोड हा थेट कोकणातून गोव्यापर्यंत जाणारा रस्तादेखील ५०-६० च्या दशकात अस्तित्वात आला नव्हता. अशा अडचणींमुळे कोकणचा फारसा विकास त्याकाळी झाला नव्हता.
शेतीबाबत बोलायचे तर तीदेखील डोंगराळ भागांत तुकडय़ा-तुकडय़ांनी विखुरलेली. त्यामुळे शेती करताना ट्रॅक्टरसारखी आधुनिक अवजारे वापरणे कठीण. त्यातून शेतीचे भवितव्य पावसाच्या लहरीवर अवलंबून. आणि या सर्वावर कडी म्हणून की काय, कोकणी माणसात असलेला कष्टाळू वृत्तीचा अभाव. अशा परिस्थितीमुळे निदान गोवा रोड होईपर्यंत तरी कोकणच्या विकासास गती मिळाली नव्हती.
मुंबई-गोवा रोड झाल्यानंतर कोकणच्या विकासास थोडीफार सुरुवात झाली, तरी त्याची गती फार मंद होती. मात्र, पूर्वी अशक्य वाटणारी कोकण रेल्वे मधु दंडवते यांच्या चिकाटीमुळे सुरू झाली आणि कोकणच्या विकासाने गती पकडली. पर्यटन क्षेत्र म्हणूनही कोकणचा विकास आता सुरू झाला असून, यापुढील काळात कोकणचा भविष्यकाळ निश्चितपणे उज्ज्वल आहे. तथापि ५०-६० च्या दशकात व त्यापूर्वी कोकण निराशेच्या अंध:कारातच खितपत पडले होते. जरी कोकणात दर्जेदार आंब्याचे पीक येत असले तरी त्या मालाला बाजारात पाठविण्यासाठी लागणारी दळणवळणाची सोय नव्हती. त्यामुळे उत्तम माल असूनही योग्य मार्केटिंग नसल्याने कोकणची आíथक बाजू मागासच राहिली. काजू, कोकम, मासळी याबाबतही तेच म्हणता येईल. आíथक बाजू हलाखीची, शिक्षणाचीही फारशी सोय नाही.
अशा परिस्थितीत सापडलेल्या कोकणी तरुणास मुंबई गाठण्याशिवाय निदान त्याकाळी तरी पर्याय नसायचा. मुंबईदेखील अशासाठी, की मुंबईत गिरण्या होत्या व गिरणीत नोकरीदेखील सहज मिळत होती. कारण गिरणीतील नोकरीसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असायची जरुरी नसायची. फक्त आठ तास साच्यासमोर उभे राहून काम करण्याची क्षमता असली म्हणजे पुरेसे असायचे. त्यामुळे मुंबईला भाऊच्या धक्क्यावर उतरलेला कोकणी माणूस थेट लालबागच गाठायचा. का, तर मुंबईतील बहुसंख्य गिरण्याच मुळी लालबागच्या परिसरात एकवटल्या होत्या. दुसरे म्हणजे त्याच्याचप्रमाणे पूर्वी मुंबईत येऊन गिरणीत कामाला राहिलेला त्याचा मित्र, नातेवाईक, गाववाला लालबागमध्येच राहत असायचा. त्याच्याकडेच तात्पुरती का होईना, राहायची तरी सोय व्हायची. इतकेच नव्हे तर त्याच्याच ओळखीपाळखीने गिरणीत नोकरीदेखील लागायची. या दोन कारणांमुळेच एकेक करून लालबागमधील कोकणवासीयांची वस्ती वाढतच राहिली आणि लालबाग म्हणजे प्रति-कोकणच बनत राहिले. त्या काळात आणि नंतरही गिरण्यांचा संप होईपर्यंतच्या काळात लालबागमध्ये कोकणी माणसे येत होती. गिरण्या बंद पडल्या तेव्हा लालबागमधील कोकणवासीयांची वस्ती ८०-८५ टक्के असावी. यापकी ९० टक्के लोक गिरणी कामगारच होते. फार तर दहा टक्के लोक चाकरमानी असतील. पुढे चाकरमान्यांचे प्रमाणही वाढत राहिले. कारण खटपटय़ा वृत्तीचे व महत्त्वाकांक्षा असलेले तरुण रात्रशाळांतून शिकून एस. एस. सी. पास झाले की सरकारी किंवा अधिक चांगली नोकरी शोधून तेथे रुजू होत.
१९८४ सालानंतर गिरणी संपाचे परिणाम तीव्र होत गेले. गिरणीत किंवा अन्यत्र कामाला असणारी सर्व माणसे मराठीच- विशेषत: कोकणीच होती. गिरणी संपानंतर त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानं त्यांची गळती सुरू झाली व ते भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, कल्याण इत्यादी ठिकाणी स्थलांतरित होऊ लागले.
कोकणच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती घाटावरील लोकांची होती. काळ्या कसदार जमिनी, ऊस, गळिताची धान्ये, हरभरा, भाजीपाला यासारखी नगदी पिके व काबाडकष्ट उपसण्याची तयारी यामुळे तिथल्या लोकांना स्वत:च्या जमिनी नसल्या तरी रोजगार संधीची फारशी उणीव नव्हती. त्यातून दळणवळणाची साधनेही पुरेशी असल्याने साखर कारखाने भराभर उभे राहत होते. त्यामुळे घाटावरचे लोक कमी संख्येने मुंबईला येत. गिरणी कामगारांमध्ये तर त्यांचे प्रमाण १०-१५ टक्क्यांच्या वर नसावे. अर्थात लालबागमध्येही घाटावरच्या लोकांची संख्या अल्प प्रमाणात होती. घोडपदेव, काळाचौकी, डोंगरी वगरे हार्बर लाइननजीकच्या भागात ते राहत. कारण तेथून गोदी जवळ पडत असे. हे लोक गिरणीतल्या नोकरीपेक्षा माथाडी कामगार म्हणून लागणे अधिक पसंत करीत. त्याखेरीज कार्यालयांतील, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे पोहोचविण्याचा व्यवसाय ते करीत. या दोन्ही क्षेत्रांत केवळ त्यांचीच मक्तेदारी होती. ती आजदेखील तशीच आहे.
नोकरी किंवा रोजगारासाठी जी मंडळी मुंबईला येत, त्यापकी ९०-९५ टक्के लोकांना मुंबईत बिऱ्हाड करणे शक्य नसायचे. काही मंडळी जुनी झाल्यावरदेखील मुंबईत सहकुटुंब राहण्याचा खर्च परवडणार नाही, या सबबीखाली किंवा सयुक्तिक कारणामुळे शेवटपर्यंत मुंबईत बिऱ्हाड करीत नसत. परंतु अशा लोकांची सोयदेखील लालबागमध्ये त्याकाळी होत होती. लालबागमधील जवळजवळ प्रत्येक चाळीत किमान एक-दोन खोल्या तरी अशा असायच्या, की तेथे एकाच खोलीत पंधरा-वीस माणसे राहत असत.
हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला तरी त्याकाळी ते शक्य असायचे. कारण अशा खोलीत राहणारी माणसे सडी व शक्यतो गिरणी कामगार असायची. त्यांना अंथरुणाची वळकटी व एक ट्रंकपेटी ठेवण्यापुरती जागा मिळायची. पेटीमध्ये स्वत:चे कपडे व अन्य खासगी वस्तू ठेवून त्यास कुलूप लावण्याची पद्धत असायची. अशा खोलीतील माणसांना प्रातर्वधिी व अंघोळ चाळीच्या सार्वजनिक नळावरच उरकावी लागे. मात्र त्याकाळी मुंबईत पाणी २४ तास असायचे. खोलीत १५-२० माणसे राहत असली तरी ती एकाच वेळी खोलीत सहसा एकत्र येत नसत. कारण अशा खोल्यांतून राहणारे बहुसंख्य गिरणी कामगार असल्याने गिरणीतील दिवसपाळी, रात्रपाळी किंवा तिसरी पाळीनुसार कामाला जात. खोलीत राहणारे आपापल्या पाळीप्रमाणे कामाला जात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सुट्टीच्या दिवशी पाळी बदलत असे. प्रत्येकाला या तिन्ही पाळ्यांतून आलटून-पालटून काम करावे लागायचे. त्यामुळे दिवसपाळी करणारे रात्री झोपत असत, तर रात्रपाळी करणारा त्यावेळी कामावर असायचा. रात्री ते येण्यापूर्वी तिसऱ्या पाळीवाले बाहेर पडत. त्यामुळे एका खोलीत एवढी माणसे राहत असली तरी फारशी गर्दी कधी होत नसे. त्यातून खोलीत विद्युत् जोडणी नसल्याने पंखे वगरेंची सोय असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे अशा खोल्यांतून वातावरण उष्ण असल्याने काही लोक झोपण्यासाठी बाहेर जात. गॅलरीत, गच्चीवर, तेही जमले नाही तर वळकटी घेऊन फुटपाथवर धाव घेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बरीचशी मंडळी बाहेरची कामे उरकण्यासाठी किंवा मित्र, नातेवाईकांना भेटण्यास बाहेर पडत. त्यामुळे तशा दिवशीदेखील खोलीत गर्दी नसायची. अशा खोलीला त्या काळात ‘बठकीची खोली’ असे म्हणत. अशा बठकीच्या खोलीत राहणाऱ्या प्रत्येकास दर महिना २ ते ५ रु. भाडे खोलीमालकास द्यावे लागायचे. आपल्या खोलीत किती माणसे ठेवायची, ते अर्थातच खोलीमालक ठरवीत असे. अशा खोल्यांतून खोलीमालकाचे स्वत:चे बिऱ्हाड कधीच नसायचे. ते एक तर गावाला तरी असे किंवा वेगळ्या खोलीत तरी असायचे. आमच्या खोलीशेजारीच अशी एक बठकीची खोली होती. त्यात दोन चाकरमानी, तर अन्य दहा-बाराजण गिरणी कामगार होते. कोकणवासी व घाटावरचे कामगार एका खोलीतून एकत्र कधीच आढळत नसत. कोकणवासीयांच्या खोलीत सारेच आसपासच्या गावातले अथवा एकमेकांच्या ओळखीने आलेले असत. तोच प्रकार घाटावरच्या लोकांचाही होता. त्यांच्या खोल्यांतून घाटावरची मंडळीच आढळायची. घोडपदेव, काळाचौकी, डोंगरी, म्हातारपाखाडी, माझगाव इत्यादी ठिकाणी अशा खोल्यांची संख्या आधिक्याने होती. हे भाग गोदीनजीक असल्याने त्यांना कामावर जाणे-येणे सोयीचे होई. बठकीची खोली हे सडय़ा कामगारांचे लॉजिंग होते, तर त्यांचे बोìडग मात्र बाहेरच्या खाणावळीत असायचे. त्याकाळी लालबागमधील प्रत्येक चाळीतून अशा एक-दोन तरी खाणावळी असायच्या. सहसा गतधवा, एकाकी पडलेल्या किंवा घरचे कोणी कमावते नसणाऱ्या स्त्रिया हा व्यवसाय करीत. अशा खाणावळींचा फलक कुठेच लावलेला नसायचा. ओळखीपाळखीतूनच काही मेंबर्स मिळत. त्यांची संख्या पाच-दहा किंवा जास्त असे. या लोकांना दोन्ही वेळी पोटभर व दर्जेदार घरगुती जेवण मिळे. हवा तो पदार्थ पाहिजे तेवढा वाढला जाई. त्याखेरीज एखाद्या दिवशी एखादा मित्र सहभोजनास घेऊन गेल्यास त्याचा वेगळा आकार खाणावळवाली घेत नसे. अशा खाणावळीत रोज चांगले शाकाहारी अन्न वाढले जाईच; परंतु आठवडय़ातून एक दिवस म्हणजे सहसा रविवारी किंवा बुधवारी मांसाहारी जेवण मिळे आणि त्याचा वेगळा आकार खाणावळवाली घेत नसे. कायम ग्राहकास खाणावळवाली कामावर असल्यास डबेही पाठवीत असे. परंतु त्याचा मोबदला ग्राहकास डबे आणणाऱ्यास वेगळा द्यावा लागे.
अशा या सुग्रास, सकस, स्वच्छ व पोटभर मिळणाऱ्या जेवणाचा मासिक आकार १९५६ ते ६० च्या काळात ३० रुपये होता. तर ६० सालानंतर ४० रुपये आणि ६५-६७ सालात तो ५० रुपये असायचा.
त्याकाळी हॉटेलमधून मिळणाऱ्या राइसप्लेटचे दरदेखील याच रांगेत बसणारे होते. साधी राइसप्लेट ८ आणे (५० पसे), तर स्पेशल राइसप्लेटचा दर १० आणे (६२ पसे) असायचा. हे दर दर्शविणाऱ्या मोठय़ाथोरल्या पाटय़ा हॉटेलच्या दर्शनी भागी झळकताना दिसत. राइसप्लेट अर्थातच मर्यादित भोजनाची असे. त्यात दोन चपात्या, एक मूद भात, भाजी, आमटी, िलबू, पापड इतके सगळे एक अधेली (आठ आणे) टाकली की मिळत असे. स्पेशल राइसप्लेटमध्ये एखादी भाजी अथवा पदार्थ जास्त असायचा, इतकेच.