News Flash

ये हृदयीचे ते हृदयी..

भागवतापासून भारुडापर्यंत नानापरींच्या गीतांचा तो जसा एक जनक होता तसेच माडगूळकर.

(संग्रहित छायाचित्र)

पु. ल. देशपांडे

सुभद्रेच्या लग्नाची कथा अण्णा किलरेस्करांनी ‘सौभद्र’ नाटकात सांगितली. अण्णा माडगूळकरांनी त्यांतल्या गद्याचीही गीते केली आणि सौभद्राचे ‘गीतसौभद्र’ केले. ‘ललितकलादर्श’ नाटक मंडळीने ते रंगभूमीवरही आणले. आता ते ग्रंथातून वाचकांपुढे येत आहे. माझी  भूमिका वास्तविक पाहता गर्दीतल्या प्रेक्षकाची. पण कार्य शुभ आहे. नव्हे, घरचे आहे या भावनेने हात लावीत आहे. एरवी किलरेस्कर, माडगूळकर आणि ‘सौभद्र’ हे तिन्ही चमत्कार प्रस्तावनेच्या उपचारापलीकडले आहेत. गीतकार माडगूळकर हा मला ‘सौभद्र’ नाटकासारखाच एक चमत्कार वाटतो. ‘सहज बोलणे तरी उपदेश’ असे संतांविषयी म्हणतात. माडगूळकरांची गीतरचना सहजपणाची ती उंची गाठते. सोपेपणाइतके जगात अवघड काहीही नाही.

एकनाथाप्रमाणे माडगूळकर हा सर्व पेठांचा कवी. भागवतापासून भारुडापर्यंत नानापरींच्या गीतांचा तो जसा एक जनक होता तसेच माडगूळकर. तमाशाच्या बोर्डावर माडगूळकरांची लावणी छुमछुमत असते. देवळातल्या कीर्तनात त्यांचा अभंग रंगलेला असतो. एखादी नात आजीला ‘गीत रामायण’ ऐकवीत असते. एखाद्या विजनात तरुतळी कवितेची वही घेऊन प्रियकराच्या कानी गाणे गुणगुणणारी एक युवती माडगूळकरांचे गीत गात असते. आणि सीमेवरचे जवान त्यांच्या समरगीताच्या धुंदीत पावले टाकीत असतात. कवीच्या हयातीतच या गीतांपैकी अनेक गीतांना अपौरुषेयत्व लाभले. माडगूळकरांच्या कढत लावणीचा चटका बसलेले एक गृहस्थ चिडून मला म्हणाले होते की, ‘‘माडगूळकरांनी असल्या फक्त लावण्याच लिहाव्यात! मी सांगतो- ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’सारखी एक ओळ माडगूळकरांना लिहिता येणार नाही. असल्या तेजस्वी कवीकडे जाऊन शिका म्हणावं!’’

‘‘ते शक्य नाही.’’ मी म्हणालो.

‘‘का?’’

‘‘कारण ‘वेदमंत्राहून आम्हा’ हे गीतसुद्धा ग. दि. माडगूळकरांचंच आहे.’’

संत-शाहिरांनंतर असले नामातीत होण्याचे भाग्य एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लाभलेला कवी माझ्या पाहण्यात नाही. सामान्य आणि असामान्य दोन्ही प्रतीच्या रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळालेला हा कवी आहे. क्वचित एखादा केवळ शब्दज्ञानी समीक्षक त्यांच्या या असामान्य प्रतिभेची कुचेष्टा करतो. अवहेलना करतो. त्यांचा जाणूनबुजून अपमानही करतो. त्यातून माडगूळकर हे सिनेमाची गाणी लिहिणारे! बरं, पुन्हा अत्यंत यशस्वी. ‘धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभम्’ हा ऋषींचा आशीर्वाद ज्यांच्या जीवनात खरा ठरला आणि ज्यांच्या कवितेने माणसे तृप्त होऊन ‘शतं जीव’ असे आपण होऊन म्हणतात असे कलावंत. कवी तर खरेच. शिवाय उत्तम- म्हणजे अतिशय उत्तम नट! कथालेखक. वक्ते. मानाची अनेक पाने मिळविलेले. बोद्धारांना मत्सरग्रस्त व्हायला दुसऱ्याच्या यशाचा एवढासा दाणा पुरतो. इथे तर यशाच्या भरघोस कणसांचा मळा फुलला आहे. त्याला असले कुत्सित टीकेचे एखादे गालबोट लावणारा त्या यशाची शोभा वाढवीत असतो. पण ज्यांच्या जीवनात माडगूळकरांची गीते जाऊन मिसळली, त्यांच्या प्रासादिक वाणीतून ज्यांना जीवनात शहाणपण लाभल्यासारखे वाटले, धीर आला, मौज वाटली, आनंदाचे उमाळे आले, त्यांच्या लेखी महाराष्ट्रात आज ‘कवी म्हणजे माडगूळकर’ हेच समीकरण आहे. इतकी संगीत नाटके झाली आणि होताहेत, पण सौभद्राचा ताजेपणा कमी होत नाही. तीच गोष्ट माडगूळकरांच्या गीतांची आहे. त्यांचे ‘गीत रामायण’ ऐकणाऱ्या श्रोत्यांना तर या कवीला आणि गायक सुधीर फडक्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले आहे.

शेवटी पिंडावर जे संस्कार नियतीने आणि कधी कधी स्वत:च्या बुद्धीने होतात त्यातून माणूस प्रकटत असतो. माडगूळकरांचे बालपण जात्यावरच्या ओव्यांत आणि कथा-कीर्तनांच्या रंगात रंगले. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या भारतीय संस्कृतीच्या गंगा-यमुनांच्या काठी खेळण्याचे भाग्य त्यांना बालपणापासून लाभले. आमची देवळे हीच मुख्य सांस्कृतिक केंद्रे होती. आमची संस्कृती देवळांशी फटकून बाहेर पडली नव्हती. माडगूळकरांचे सांस्कृतिक शिक्षण या देवळातूनच टाळ- मृदंग- वीणेच्या घणघणाटाने सुरू होणाऱ्या शाळेत झाले. ज्या मातीतून पोषणाची द्रव्ये घेऊन रोपे वर येतात त्या मातीचे नाते कृत्रिम रीतीने तोडता येत नाही. नाते तोडण्याच्या घोषणा केल्या म्हणून नाते तुटले म्हणता येत नाही. आधुनिक मराठी साहित्यात हा असा नाते तोडण्याचा विचार सुरू झाला आहे.

स्वरलहरी आणि शब्द यांचा घटस्फोट झालेल्या या आधुनिक काळात सनातन युगुलाला एकत्र नांदवणारे अण्णा किलरेस्कर आणि अण्णा माडगूळकर वास्तविक उपेक्षेच्या अंधारात

पडायला हवेत. लोकांना सुदृढ प्रकृती मार्गापेक्षा रोगट विकृती मार्गाची ओढ अधिक लागलेली दिसायला हवी. पण चमत्कार असा की मरून पन्नास वर्षे ओलांडलेले किलरेस्कर अण्णाही आज तितकेच लोकप्रिय आणि जन्माला येऊन ज्यांना अजून पुरती पन्नास वर्षे झाली नाहीत असे त्याच कविवंशातले प्रपौत्रसदृश माडगूळकर अण्णाही तितकेच लोकप्रिय. काव्यात गेयतेचे कूळ सोडायला माझा देश तयार नाही. ते कूळ का सोडावे, हे त्याला कळत नाही. इंग्रजी कविता आम्ही गद्यासारख्या वाचायला लागलो. एरवी गायनाचा दर्जा कसलाही असो, आमचा कवी कविता वेडय़ावाकुडय़ा का होईना, पण गातच असे.

रामायण-महाभारतातल्या कथांची गीते करून आपण भारतीय देशभर गातच आलो. नाटकदेखील गाणारे होते. आमचा महान नाटककार हा नाटय़-कुलगुरू नव्हे, ‘कवी’- कुलगुरू. रामायण-महाभारतातल्या प्रसंगांवरची शेकडो नाटके आमच्या जानपद जीवनात गात गात काळावर मात करीत आली आहेत. अण्णा किलरेस्करांचे ‘सौभद्र’ असेच गात आले. त्यातल्या गद्य संवादांना माडगूळकरांनी पद्यस्वरूप दिले. जादूगाराने आपली जादूची कांडी लावावी तसा माडगूळकरांच्या प्रतिभेचा स्पर्श त्या गद्य शब्दांना झाल्यावर त्यांतून गीतांची फुलपाखरे उडाली. माडगूळकरांचे घराणे किलरेस्कर-देवलांचेच. त्यांनी आपला ‘चैत्रबन’ हा गीतसंग्रह याच दोन कवींच्या प्रतिभेला अर्पण केला आहे. माडगूळकरांची प्रतिभा त्या दोघींची तिसरी बहीण म्हणून उभे राहण्याच्या योग्यतेचीच नव्हे, तर धाकटी असूनही काहीशी अधिक चतुर आणि गोमटी आहे.

‘‘ऑपेरा’ या पाश्चात्त्य संगीत नाटकावरून आपण आपल्या संगीत नाटकाची उभारणी केली..’ असे विधान चांगल्या चांगल्या विद्वानांनी केले आहे. हे म्हणजे आमच्या भारतीय स्त्रियांनी कपाळावरचे कुंकू मडमांच्या ओठांवरच्या लिपस्टिकवरून घेतले आहे असे म्हणण्याइतके शहाणपणाचे आहे. आमच्या देशात नाटक हे काव्यच होते आणि काव्य हे गेयच होते. जानपद भारतापासून तुटलेल्या आंग्ल भारतीयांना आपल्या सुंदर परंपरांचा विसर पडल्याच्या अनेक उदाहरणांतले हे एक उदाहरण. आमच्या देशात संघगायन नाही म्हणणाऱ्या आंग्ल भारतीयांना टाळ- मृदंग- वीणेच्या नादात तहानभूक हरपून शेकडो मैलांची वाट तुडविणारे वारकऱ्यांचे आणि वैष्णवांचे मेळे दिसत नाहीत. आमच्या स्त्रियांनी पुरुषांच्या जोडीने काम करायला हवे म्हणणाऱ्यांना आमच्या शेतमळ्यांतून राबणारे लाखो स्त्रियांचे श्रमिक हात दिसत नाहीत. आमच्या साऱ्या जीवनाची ही परवड आहे. आमच्या जीवनातील सत्ये आम्ही पश्चिमेकडून परावर्तित होणाऱ्या उजेडातच पाहू शकतो. आज आमच्या देशात उत्तरेला नवटंकी आहे, पूर्वेला जात्रा आहे, पश्चिमेला भवई आहे, दक्षिणेला यक्षगान आहे. संगीत नाटकांचे हे प्रयोग शतकानुशतके चालू आहेत. ‘गीतसौभद्र’ हा त्या परंपरेत बसणारा नाटय़प्रकार आहे. आज युक्त प्रांतात महाभारत, रामायण किंवा इतिहासातल्या वीरगाथांवर आधारलेल्या नवटंकीचे प्रयोग खेडोपाडी चालू आहेत. या कलावंतांचे गायन आणि अभिनय यांचे दर्शन मला घडले आहे. रात्री नवाला उभी राहणारी नवटंकी पहाटे एखादी चोंबडी कोंबडी आरवते तेव्हा संपते. आठ-आठ रात्री माणसे राम-कृष्ण किंवा पृथ्वीराज-अमरसिंग यांच्या जीवननाटय़ात रंगलेली असतात. नाटक आठवडाभर रंगते. या नाटकातल्या गीतांची रचना करणे अतिशय बिकट असते. कारण ती गीते सोपी असावी लागतात. आधुनिक कवितेप्रमाणे अर्थाच्या प्रसूतीसाठी तिथे समीक्षक नामक सुईण नसते. या हृदयीचे त्या हृदयी सरळ ओतावे लागते. मोकळ्या मैदानात जमणाऱ्या श्रोत्यांच्या कानी तीरासारखे सूर नेऊन पोहोचवणारे आवाजदार नट आणि नटी आजही या देशात आहेत.

असल्या सोप्या शब्दांतून अर्थाची गहन बीजे फुलवणाऱ्या प्रतिभेची माडगूळकरांना तर देणगीच आहे. किलरेस्कर-देवलांची भाषाही अशीच लडिवाळपणे खेळणारी. ही देणगी दुर्दैवाने श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना नव्हती. त्यांच्या शब्दांचे वळण संतांच्या जातीचे नव्हते. पंडिती वळणाची त्यांची रचना. कोल्हटकरांच्या आमदानीत अभिजात संगीतकारांचा नाटक मंडळ्यांत राबता सुरू झाला. शब्दांप्रमाणे संगीतानेही चाल नागमोडी केली. काव्यरचनेतल्या प्रसादाप्रमाणे संगीतरचनेतलाही प्रसाद लोपला. खाडिलकरांच्या गाण्यांना बालगंधर्वाचा अलौकिक गळा लाभला. भास्करबुवा किंवा गोविंदराव टेंबे यांच्यासारख्यांची स्वरसिद्धी लाभली म्हणून ती सुस झाली. एरवी तुरळक अपवाद सोडले तर ही गाणी अभिनयानुकूल नव्हेत. ते शब्द पारदर्शक नव्हते. अर्थाला लिंपून टाकणारे ते शब्द! अगदीच ‘निसा गम पप गम पसा’ करणे गाण्यात बरे दिसायचे नाही म्हणून ‘मदविलसतनतगता’ केले, इतकेच! असल्या गाण्यांनी नाटकातल्या गाण्यांचे संवादस्वरूप नाहीसे केले. संवाद गेला म्हणून अभिनय गेला आणि नाटय़संगीत ही केवळ उभ्याने गायलेली मराठी चीजांची मैफल झाली. नाटक बिचारे ओशाळून उभे राहिले.

आज ‘गीतसौभद्र’च्या रूपाने गायक नट-नटींपुढे नवी संधी आली आहे. गायनावर विचारपूर्वक नियंत्रण आणले आणि स्वरशब्दांची ही फुले अभिनयाच्या सूत्रात नीट गुंफली तर रसिक ही कृती आनंदाने कंठी धारण करतील. बोलक्या शब्दांत गाणे लिहिणे ही माडगूळकरांच्या प्रतिभेची सहजलीला आहे. त्यांनी आजवर सहस्रावधी गीते लिहिली ती हितगुजाच्या भाषेत. हा कवी गाणे लिहीत नाही, गाणे बोलतो. नाटकही बोलके असावे लागते. मग ते गद्य असो की पद्य. गद्य संवाददेखील सूत्रबद्ध असावे लागतात. शब्द हलला तर संवादातला चिरा ढासळल्यासारखा वाटला पाहिजे. गीत तर असल्या चिरेबंदीशिवाय उभे राहूच शकत नाही. म्हणूनच गीत हे शिल्पाला अधिक जवळचे. प्राचीन शिल्पांचे भंगलेले अवयव सांधण्याचा प्रयत्न केलेला मी काही लेण्यांतून पाहिला आहे. लाखात एखादा बेजोड सांधा दिसतो. कितीही सफाई केली तरी तोल बिघडतोच. कारण तो प्राचीन शिल्पकार आणि आधुनिक शिल्पकार यांना झालेल्या मूळ दर्शनातच कुठेतरी फरक पडलेला असावा. कुठेतरी हातगुणात तफावत पडते. किलरेस्कर-माडगूळकरांच्या प्रतिभेचे कूळ एक असल्यामुळे इथे वडाची साल पिंपळाला लागली नाही. हे दोन प्रतिभांचे दोन ज्योतींसारखे मीलन आहे. या मीलनाचा आनंद पुस्तकाच्या आधारापेक्षा रंगमंचावरून अधिक मिळेल. जिद्दीच्या गायक कलावंतांनी हे प्रयोग केले तर अर्जुन-सुभद्रेच्या प्रणयपूर्तीची ही संपूर्ण गीतालंकारांनी नटलेली नाटय़कथा रसिकांना सदैव रंजवीत राहील. माडगूळकरांच्या प्रासादिक वाणीइतकी ज्यांची गायन आणि अभिनय कला निर्मळ आणि प्रासादिक आहे अशा नटांसाठी या तबकात ही फुले आहेत. माझे काम तबकावरचा जाळीदार रुमाल उचलणाऱ्या सेवकाचे होते. हे कार्य मी आनंदाने केले आहे. कारण कार्य किलरेस्कर-माडगूळकरांचे आहे; तेव्हा कार्य शुभ आहे आणि घरचे आहे.

(ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीतसौभद्र’ या पुस्तकाला पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील हा संपादित अंश! सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि.ने हे पुस्तक १९६८ साली प्रकाशित केले होते. त्यातून साभार!)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:32 am

Web Title: legendary writer pu la deshpande article on g d madgulkar
Next Stories
1 ‘कल्पना’तीत : चित्रपट आणि जीवनही!
2 व्यवस्थेचा प्रखर टीकाकार
3 झोपेत..
Just Now!
X