मुलांच्या भावनांना योग्य ते वळण लावून त्यांच्या अतिरेकी प्रकटनाला प्रतिबंध करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी भावनांक आणि त्याचं बीजारोपण कसं करायचं याचे धडे मुलांना पालक आणि शिक्षकांकडून मिळणं गरजेचं आहे.

नावीन्याचा ध्यास घेणाऱ्या आणि सर्जनशीलता जोपासणाऱ्या एका शाळेत भावनांचा तास सुरू असतो. नववीच्या एका वर्गात ‘भावनांचा थर्मामीटर’ हा कृतिप्रयोग सुरू होतो. भावनांच्या तासामध्ये नेहमीच्या पद्धतीने मुलांची हजेरी घेणे अपेक्षित नसते. नाव पुकारल्यावर एकेका मुलाला/ मुलीला आपल्याला कसं वाटतं, हे मनातील भावनांचे वर्णन आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल (एक ते दहापर्यंतच्या आकडय़ांमध्ये) सांगून स्वत:च्या भावनांचा थर्मामीटर तपासायला सांगितलं जातं. एक जण ‘आनंद- ८, राग- ४’ असं म्हणतो, तर दुसरा ‘घालमेल- ८’ असं म्हणतो. प्रत्येकाची भावना आणि भावनांची तीव्रता भिन्न असते. पण या तासाची सुरुवात अशी करण्याचे कारण- मुलांचं भावनिक आत्मभान वाढवणं हा असतो. भावनेच्या तासाची अशी सुरुवात झाल्याने शिक्षकाला काही मिनिटांतच वर्गातील सर्व मुलांचं सर्वसाधारण ‘भावनांचं तापमान’ (emotional climate) कळू शकतं. पुढे हा भावनांचा तास तसाच सुरू राहतो..

प्रत्येकाच्या भावनांची एक ‘स्टोरी’.. अर्थात ‘गोष्ट’ असते. बोलताना प्रत्येक जण आपापली गोष्ट सांगत असतो. म्हणजे ‘राग ४’ का? किंवा ‘घालमेल ८’ का? मग प्रत्येक जण आपापली गोष्ट सांगतो. इथे कुठंही कारणमीमांसा केली जात नाही. कुठल्याही प्रकारची टीका, तुलना, प्रश्न विचारले जात नाहीत. ही भावना का निर्माण झाली आणि पुढे त्याचे काय परिणाम होऊ शकतात, किंवा त्यांना कसं सामोरं जायचं, याबद्दल मोकळेपणाने संवाद साधला जातो. यामध्ये पुढे मुलांबरोबर ‘ट्राफिक लाइट’ हा कृतिप्रयोग केला जातो. या कृतिप्रयोगात लाल, पिवळा आणि हिरवा हे ट्राफिक लाइट ते स्वत: मनाशी आखतात. लाल रंग म्हणजे थांब, पिवळा म्हणजे पर्यायांचा विचार कर किंवा कुठला पर्याय योग्य आहे; आणि हिरवा रंग म्हणजे कृती कर, त्याप्रमाणे वाग.. या कृतिप्रयोगातून विविध भावना मनात असताना त्यांना तात्काळ प्रतिसाद न देता योग्य आणि विवेकी प्रतिसाद द्यायला या अनुभवसिद्ध खेळातून शिकवले जाते. भावनांच्या मदतीने विवेकी विचारांचा प्रतिसाद कसा द्यायचा हे त्यातून मुलांना कळतं. तिथे शिक्षक ‘सहयोगी’ भूमिकेत असतात. मुलं त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधतात आणि त्यातूनच स्वत:च्या भावनांबद्दल साक्षर होतात. त्याचप्रमाणे यातून मुलांमध्ये काही भावनिक कौशल्येही निर्माण होतात.

मध्यंतरी ‘परीक्षेबद्दल घालमेल’ या भावनेच्या अतिरेकामुळे ११ वीच्या एका विद्यार्थ्यांने प्रद्युम्न ठाकूर या कोवळ्या मुलाची निर्घृण हत्या केली. इथे ‘तीव्र घालमेल’ ही या कृतीसाठी कारणीभूत ठरली. भावनांमुळे मनात प्रश्न निर्माण होतो असं आपल्याला वाटू शकतं. पण खरं तर संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की, भावनांमुळे प्रश्न निर्माण होत नाहीत, तर भावनिक कौशल्याच्या कमतरतेमुळे प्रश्न निर्माण होतात. जर मुलांमध्ये भावनिक आत्मभान असेल आणि त्यांच्याकडे भावनांना सामोरे जाण्याचे पर्याय उपलब्ध असतील तर ते आयुष्यात नक्कीच योग्य पर्याय निवडण्यासाठी सक्षम होतील.

मध्यंतरी राष्ट्रपतींनी एक ट्वीट केलं होतं- मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं त्यांनी आत्मीयतेनं म्हटलं होतं. गेल्या दशकामध्ये मानसिक आरोग्याच्या संवर्धनासाठी जगभर काही शाळांमध्ये भावनांचे तास (emotional lessons) सुरू करण्यात आले आहेत. भावनांच्या तासांमध्ये विविध भावनिक कौशल्यांचे प्रशिक्षण अनुभवसिद्ध खेळांतून, कृतिप्रयोगातून आणि दृक्श्राव्य माध्यमातून

दिले जाते.

मुळात मानसिक आरोग्य का धोक्यात आलेलं आहे? आधुनिक जगात तीन गोष्टींचं प्रमाण वाढताना दिसत आहे. एक म्हणजे ताणतणावांचं प्रमाण ३० टक्क्यांनी वाढलं आहे. दुसरं म्हणजे पालक आणि मुलांमधला संवाद कमी झाला आहे. आणि तिसरं- मुलांमध्ये एकाकीपणा, नैराश्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. गॅझेट्समुळे व्हर्च्युअली कनेक्ट होणारी मुलं भावनांच्या बाबतीत मात्र निरक्षर आहेत. मग भावनिक आत्मभान नसल्यामुळे भावनांच्या भरात काहीतरी हिंसक कृत्य ती करताना दिसतात. जगभरात गेल्या दोन दशकांत आत्महत्यांचं प्रमाण १२५  टक्क्यांनी वाढलं आहे. किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढत आहे. ते जवळजवळ ‘दहा मुलांमागे एक’ असं आहे. सर्वानुमते, ज्या प्रमाणात बुद्धय़ांक वाढतो आहे, त्या तुलनेत भावनिक कौशल्य अर्थात् भावनांक कमी होत आहे. हे चित्र सर्वानाच विचार करायला लावणारे आहे.

मानसिक आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी घरामध्ये, शाळेमध्ये आणि कॉलेजपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहेत. यात शिक्षक आणि पालकांनी ‘रोल मॉडेल’ बनून ही कौशल्ये स्वत:च्या वर्तणुकीतून दाखवून मुलांमध्ये भावनिक कौशल्ये जोपासण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मुलामुलींना याबाबतीत प्रशिक्षित करू शकतात. कालानुरूप हे गरजेचे होऊन बसले आहे. जगभरात सुमारे ६०० शाळांमध्ये अशा प्रकारचे अद्भुत भावनांचे तास सुरू झाले आहेत. यातून मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचे संवर्धन होत असल्याचे दिसून येत आहे.

भावनिक असणं कमकुवतपणाचं लक्षण नाही,

भावनिक असणं म्हणजे कमकुवत असणं, हा गैरसमज समाजात दृढ आहे. मुलींपेक्षा मुलांच्या बाबतीत तर हे ठळकपणे जाणवतं. त्यातून एक प्रकारे आपण मुलांची नैसर्गिक भावना दडपत आहोत. तिचं दमन करीत आहोत. यातूनच भावनांचा विस्फोट होण्याची शक्यता अधिक असते. भावनांचा अतिरेक आणि त्याच्याशी निगडित समस्या या अचानक एक दिवसात निर्माण होत नाहीत. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण त्याला ‘बंडल ऑफ जॉय’ म्हणतो. पुढे जाऊन तेच मूल ‘बंडल ऑफ प्रॉब्लेम्स’ का होतं, याकडे सर्वानीच सजगतेनं पाहणं आवश्यक होऊन बसलं आहे. दुसरं म्हणजे संवेदनशील असणं आणि भावनिक असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. संवेदनशीलता जोपासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण भावनांच्या भरात वाहवत जाण्याच्या वर्तणुकीला मात्र आपण विविध कौशल्ये शिकून प्रतिबंध करू शकतो.

भावनांविषयीच्या अनेक मिथस् आहेत. भावनिक बुद्धिमत्ता हे एक नवं फॅड आहे असं काहींना वाटतं. पण संशोधनातून असं दिसतं की, भावना या शरीराला आणि मनाला ऊर्जा, माहिती देण्यासाठी निर्माण होतात. त्याबद्दल आपण साक्षर असल्यास ती कौशल्ये आपल्यात असतील तर त्या भावनांचा उपयोग यश, आनंद आणि उत्तम आरोग्य निर्माण करण्यासाठी आपण करू शकतो. एका अर्थाने आपण निरोगी आयुष्याच्या दिशेने       वाटचाल करू शकतो. शाळा, कॉलेज आणि घरात या संकल्पनेचा वापर आता क्रमप्राप्त झाला आहे.

तिसरं म्हणजे भावना या विचाराच्या आड येतात, त्यांना हद्दपार केलं पाहिजे.. त्यामुळे भीती, राग वाटताच कामा नये.. या भावना असणं चुकीचं आहे अशी धारणा लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वामध्येच असते. आपणही पालक म्हणून कधी कधी मुलांच्या तीव्र भावना या कशा चुकीच्या आहेत आणि त्यांना कसं वाटायला हवं याबद्दल सांगतो किंवा मग त्यांना लेक्चर देतो. खरं तर यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात. लहानपणापासून अनाहूतपणे संदेश दिल्यामुळे मुलं स्वत:च्या भावनांबद्दल निरक्षर राहतात आणि स्वत:च्या भावना झिडकारण्यासाठी त्यांच्यापासून विलग होण्याचा प्रयत्न करतात. योग्य प्रकारे त्यांना सामोरं न गेल्यामुळे अशा भावनांचा विस्फोट होऊन त्यांच्या हातून अघोरी कृत्ये घडतात.

ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असं आपल्याला वाटतं. पण तो एक गोड गैरसमज आहे. आपल्यामधील ‘इमोशनल सिस्टीम’ अर्थात भावनांची प्रणाली सक्षम न झाल्याने ताण निर्माण होतो असं संशोधन सांगतं. २१ व्या शतकात सर्वामध्येच- लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत- ताणतणावांचं प्रमाण वाढतं आहे. एका जागतिक पाहणीनुसार, ताणतणावामुळे ५० टक्क्यांहून अधिक व्यक्तींमध्ये शरीर आणि मनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे दिसते की, पालकशैली तसंच शाळेत मुलांसमोर अपेक्षांचा बागुलबोवा निर्माण करण्याने  ताणतणाव वाढतात. अपेक्षा आणि मागणी यांमध्ये पालक पुरते गोंधळून गेले आहेत. अपेक्षा करणं आवश्यक असतं, पण तिचं मागणीत रूपांतर होताना- म्हणजे मागणी करताना ‘च’ लावला जातो तेव्हा मुलांसमोर बागुलबोवा निर्माण होतो. परिणामी मुलांमध्ये अस्वस्थ घालमेल निर्माण होते. त्यातून ताणतणाव निर्माण होतो. अशा वेळी पालकांनी तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. मुलांवर तुमच्या अतिरेकी अपेक्षांचा बोजा टाकू नये. त्यांच्याशी योग्य संवाद साधून स्वत:बद्दल मुलांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी त्यांना बोलते करायला हवे. त्यांची स्वत:बद्दलची ध्येयं काय आहेत, मतं, विचार काय आहेत, हे जाणून घेऊन त्यादृष्टीने काय पर्याय उपलब्ध आहेत, हे समजून घ्यायला हवं. पालक आणि पाल्य यांच्यात निरोगी संवाद होणं आवश्यक आहे. ज्यात पालकांची फक्त लक्ष देऊन ऐकण्याची भूमिका असेल आणि मुलांना बोलण्याची संधी दिली जाईल. मुलांवर लगेचच टीका-टिप्पणी न करता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करता येऊ शकेल. मुलं पर्यायांचे परिणाम स्वत: शोधतील आणि त्यातूनच योग्य पर्याय निवडतील आणि स्वत:च्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं याबाबतीत ते अधिक सक्षम होतील.

दुसरं म्हणजे पालकांनी मुलांच्या भावनिक विश्वाशी संपर्कात असणं गरजेचं आहे. शाळेत काय घडलं, मुलांच्या मित्रमंडळींमध्ये काय चाललंय, तिथे कुठल्या प्रकारचे वर्तन अनुभवले जात आहे, हे जाणून घेत मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावनांबद्दल मनमोकळा संवाद साधणं आवश्यक आहे. त्यासाठी घरात एक अनोखा कृतिप्रयोग पालक करू शकतात. गेल्या आठवडय़ातील भावनांचा डोंगर आणि दऱ्या- अर्थात चढउतार- म्हणजे एखाद्या प्रसंगात खूप निराश वाटणं किंवा खूप छान वाटणं.. असे प्रसंग कुटुंबातील प्रत्येकाने एकेक करून सांगायला सुरुवात करायची. जेव्हा निराश वाटलं होतं तेव्हा कुठले विचार मनात होते, इतरांना कसं वाटलं होतं आणि कुठली कृती केली गेली, कसा प्रतिसाद दिला गेला, याबद्दल पालक आणि मुलांनी परस्परांत संवाद साधायला हवा. त्या कृतीमध्ये वेगवेगळे पर्याय होते, ते योग्य की अयोग्य होते? या प्रकारे मनातील भावनांविषयीची मोकळी चर्चा आणि निरोगी संवाद झाल्यामुळे मुलं आई-वडिलांपाशी मोकळेपणाने संवाद साधायला लागतात. त्यातून दोन संदेश मिळतात. एक- आपण आपल्या कुटुंबामध्ये भावनांबद्दल उघडपणे चर्चा करू  शकतो. आपल्या भावनांना समजून घेतलं जातं. त्यावर टीका-टिप्पणी किंवा लेक्चर दिलं जात नाही. दुसरं म्हणजे सर्वानाच विविध प्रकारच्या भावना असतात. त्या सर्वसामान्य असू शकतात आणि त्याला विविध प्रकारे सामोरं जाता येऊ शकतं. या कृतिप्रयोगातून मुलांना भावनिक विश्वाशी निगडित महत्त्वाची माहिती मिळू शकते. अबोल असणारी, बुजणारी, भावना न व्यक्त करणारी मुलं सुरुवातीला कदाचित बोलणार नाहीत. पण काही आठवडय़ांनंतर ती बोलायला लागतात. सुरुवातीला त्यांना न बोलण्याची मोकळीक द्यावी. पण हळूहळू ती मुलं बोलायला लागतात. तिसरं म्हणजे लहानपणापासून भावनांची शब्दसंपदा अर्थात ‘इमोशनल व्होकॅब्युलरी’ वाढवणं गरजेचं आहे. आपण बाकीचे शब्द शिकतो, त्याचबरोबर भावनांचे शब्द आणि शब्दसंपदा वाढवू शकतो. यासाठी दोन कृतिप्रयोग आहेत. एक म्हणजे टीव्हीवरील भावना. मुलं एखादं कार्टून बघत असतील तर त्यामधल्या विविध कॅरॅक्टरच्या भावना, त्या भावनांना असलेला शब्द विचारणं आणि त्याला शब्दस्वरूप देता आले नाही तर त्यासाठी मुलांना मदत करणं आवश्यक आहे. त्या वेळेस त्या जागी तू असतास तर काय केलं असतंस, ते कॅरॅक्टर ती भावना व्यक्त करण्यासाठी काय करेल? असा मोकळा संवाद साधून मुलांना आपण भावनिक साक्षर करू शकतो. यातून वेगवेगळ्या भावनांची माहिती मुलांना मिळेल आणि ती योग्य तो पर्याय निवडतील. हे सर्व आपण घरात आणि शाळांमध्ये लक्षपूर्वक करू शकतो.

२१ व्या शतकातील जी प्रचंड आव्हाने समोर उभी ठाकलेली आहेत ती असताना, बाह्य़ वातावरण नकारात्मक असतानाही आपण आपल्या मुलांना  सक्षम करू शकतो. प्रद्युम्नची निर्घृण हत्या, आईचा क्रूरपणे केलेला खून, आत्महत्या करणं.. किशोरवयीन मुलांनी केलेल्या कृत्यांची अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण पाहतो आहोत. या घटनांमुळे पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं साहजिकच आहे. समाजमनाची नेमकी नस ओळखून आपण यामागची कारणं शोधायला हवीत. त्यासाठी शाळा आणि घरामध्ये ‘भावनिक साक्षरता’ अर्थात ‘इमोशनल लिटरसी’ला सुरुवात करून या समस्या सोडवू शकतो. त्यामुळे मुलांमधील वाढती हिंसक वृत्ती, नैराश्य यांना आळा घालू शकतो.

शेवटी लेखाच्या सुरुवातीचा धागा पकडून आपण म्हणू.. शाळेत भावनांचा तास भावनांच्या थर्मामीटरने तपासण्यास सुरुवात झाली आणि शाळेत भावनिक साक्षरता रुजविण्याचा नवा संकल्प सुरू झाला तर मुलांना भावनिक लसीकरण दिल्यासारखं होईल. या भावनिक लसीकरणातून बऱ्याचशा अविवेकी विचारांचा विस्फोट होण्याला लगाम घालू शकू याची खात्री वाटते.

डॉ. संदीप केळकर equipkids@yahoo.co.in

(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ आहेत.)