मिलिंद बोकील हे समाजशास्त्रज्ञ आहेत. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्टय़ा मागास अशा काही जमातींचा क्षेत्रीय अभ्यास करून त्यांच्या जीवनपद्धतीचं चित्रण त्यांनी केलं आहे. लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी या सृजनशील वाङ्मयप्रकारातही त्यांनी दर्जेदार सकस लेखन करून साहित्यक्षेत्रातील आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. त्यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारलेला त्याच नावाचा चित्रपटही एक-दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘साहित्य, भाषा आणि समाज’ या लेखसंग्रहाने समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी स्वागतार्ह पदार्पण केलं आहे. या पुस्तकात त्यांचे साहित्य, भाषा आणि समाज याच विषयांवरील पंधरा लेख समाविष्ट झालेले आहेत.

समीक्षा म्हटलं, की आपल्यासमोर एखादं पुस्तक, ग्रंथकार अथवा त्या क्षेत्रातील एखादा मतप्रवाह यांच्या गुणदोषांची चर्चा करणारं लेखन अशी आपली समजूत होते. पण या पुस्तकात अशी चर्चा नाही. त्यात साहित्य, भाषा आणि समाज या विषयांना धरून मिलिंद बोकील यांनी केलेलं मुक्त चिंतनात्मक वैचारिक लेखन आहे. कोठेही समीक्षा क्षेत्रातील किचकट पारिभाषिक संज्ञांचा वापर न करता केलेलं हे प्रासादिक लेखन आहे.

या पंधरा लेखांपैकी नऊ लेख साहित्याविषयीचे आहेत. तीन लेख भाषेसंबंधी आहेत आणि दोन लेख वाचनसंस्कृती जोपासण्यासंबंधीचे आहेत. एक लेख नव्या भारताच्या निर्मितीसंबंधीचा आहे.

साहित्याचा विचार करताना त्यांनी चांगलं साहित्य म्हणजे काय याबद्दल आपले विचार मांडले आहेत. साहित्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. त्यामध्ये कलात्मक सौंदर्याचा प्रत्यय आला पाहिजे, त्याच्या वाचनाने वाचकाची समज वाढली पाहिजे. लेखन करताना लेखकाची एक भावावस्था असते, त्या लेखनाने वाचकाचीही त्याच प्रकारची भावावस्था झाली पाहिजे. चांगल्या साहित्यात वास्तवाचं दर्शन झालं पाहिजे. चांगल्या साहित्यातून वाचकाला एक नवीन जीवनदृष्टी मिळाली पाहिजे. या प्रकारच्या अपेक्षा त्यांनी साहित्याकडून केलेल्या आहेत.

साहित्याला समृद्धी कशामुळे येते, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी जीवनदर्शन, नवीन जीवनदृष्टी, मूल्याधारित संदेश, सौंदर्यनिर्मिती या घटकांचा निर्देश केला आहे. समृद्ध साहित्याच्या निर्मितीप्रक्रियेत लेखकाच्या कल्पनाशक्तीचा, म्हणजेच प्रतिभेचा कस लागतो, असं ते म्हणतात. चांगलं साहित्य प्रतिभेशिवाय निर्माणच होत नाही. केवळ झालेल्या घटना सांगण्याने चांगलं साहित्य निर्माण होत नाही म्हणून केवळ इतिहास सांगणाऱ्या आठवणी, आत्मचरित्र इ. तथ्याधारित लेखनाला समृद्ध साहित्य म्हणता येत नाही. कल्पनाशक्तीच्या, म्हणजेच प्रतिभेच्या रसायनात चिंब भिजवून लेखनात प्रकट होणाऱ्या तथ्याधारित घटनांचं लेखन चांगलं साहित्य या पदवीला पात्र ठरतं, असं ते म्हणतात.

साहित्याचा जीवनाशी अतूट संबंध आहे. जीवनदर्शन हे साहित्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून साहित्याची जीवनाशी बांधिलकी आहे. म्हणून साहित्याने जीवनाची आदर्श मूल्ये सांभाळली पाहिजेत. मानवता, जातिभेद निर्मूलन, स्वातंत्र्य इ. साहित्याची मूल्ये ठरतात. अशी मूल्ये जपणे हीच लेखकाची भूमिका असली पाहिजे. त्याबरोबरच कलाभानही त्याने दुर्लक्षित करू नये. ही मूल्ये जपताना लेखकाने अहिंसक वृत्ती सोडता कामा नये. लेखकाला हे करण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे, पण राजसत्ता, धर्मसत्ता लेखकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दबाव आणून त्याच्या स्वातंत्र्यावर बंधन आणतात. लेखकाने त्या दबावापासून अलिप्त राहिले पाहिजे.

कथा या वाङ्मयप्रकाराच्या विरुद्ध महाराष्ट्रात अकारण वादळ उठवलं जात आहे. कथा निकृष्ट वाङ्मयप्रकार आहे, अशी बिनबुडाची टीका करणारे लेखक आहेत. मिलिंद बोकील यांचा या मताला विरोध आहे. केवळ तिचा आकार लहान आहे म्हणून ती त्याज्य ठरत नाही. साहित्यात लहानमोठे प्रकार असणारच. पण त्यावरून त्या प्रकाराचे श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व ठरत नाही. स्वत: बोकील लहान-मोठय़ा सर्वच प्रकारांचं स्वागत करतात. त्यांनी या वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात, गरजेनुसार त्या त्या वाङ्मयप्रकाराची उपयुक्तता ठरते, हे सांगण्यासाठी रस्त्यावरील वाहनांचे एक छान रूपक बसवले आहे. त्यांच्या मते, लघुकथा म्हणजे छोटीशी दुचाकी मोपेड, दीर्घकथा, लघु कादंबरी म्हणजे चारचाकी मोटार, कादंबरी म्हणजे बसगाडी आणि कविता म्हणजे सायकल. या सर्वाचाच उपयोग होतो. त्याप्रमाणे जीवनानुभव तोकडा असेल तर लघुकथा, व्यामिश्र असेल तर दीर्घकथा, जीवनानुभव सखोल असेल तर कादंबरी व तो जर वैयक्तिक असेल तर कविता. अशा प्रकारची आवश्यकतेनुसार निवड लेखक करत असतात. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचा भाग नसतो.

कथा हा वाङ्मयप्रकार नष्ट होत चालला आहे, अशी एक हाकाटी होताना दिसत आहे. बोकील यांनी तिलाही उत्तर दिलं आहे. जोपर्यंत मराठी आहे तोपर्यंत कथेला मरण नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा आशय आहे आणि कथेला नवीन ऊर्जा द्यायची झाल्यास लेखकांनी आपल्या शैलीत जरा बदल करावा, नवनवीन विषय निवडावेत, असं त्यांचं सांगणं आहे.

मराठी कथेप्रमाणेच मराठी भाषेचंही भवितव्य संकटात आहे, असं एक मत मांडलं जातंय. ते थोडं सकारण असलं तरी ते संकट दूर करता येणारं आहे. वास्तविक पाहता मराठी भाषकांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे. आता ८-१० कोटी असलेली संख्या ५० वर्षांनी १४ कोटीच्या वर जाईल, अशी चिन्हं आहेत. ही चिन्हं मराठी भाषेला धोका नसल्याची आहेत. पण मराठी भाषा नष्ट होणार नसली तरी ती भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण जागतिकीकरणामुळे सर्व जगाचं जीवन ‘स्टँडर्डाईज’ होत चाललेलं आहे.  त्यामुळे आपल्याकडे लोक मराठीचा आश्रय सोडून इंग्रजीसारखी भाषा वापरतील अशी शक्यता आहे. अशा वेळी आपण मराठीला संरक्षण दिलंच पाहिजे. या संकटाला जिने तोंड द्यायला पाहिजे, ती आपली शिक्षणव्यवस्थाही फार निकृष्ट दर्जाची झाली आहे. एकतर गळतीचं प्रमाण फार मोठं आहे. त्यातून मुलींची गळती अधिक आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वेड आहे. त्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यावर परिणामकारक उपाययोजना केली पाहिजे. मराठीचं विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण निर्माण करायचं असेल तर मराठी साहित्याने रोमँटिक झालं पाहिजे. रोमँटिक म्हणजे प्रेमकेंद्रित झालं पाहिजे, असा उपायही बोकील सुचवतात.

मिलिंद बोकील यांचा आणखी एक आवडीचा विषय म्हणजे वाचनसंस्कृतीचा. तिचा विकास झाला पाहिजे, असं त्यांना वाटतं. गावोगावी वाचनालयं असावीत. गावातील लोकांनी वाचनालयांचं सदस्यत्व स्वीकारलं पाहिजे. त्या सदस्यांचे वाचक गट निर्माण होऊन त्यांच्याद्वारे साहित्यावर चर्चा होईल, इतर लेखनावरही चर्चा होईल आणि एक सुशिक्षित वातावरण निर्माण होईल, असं त्यांना वाटतं. अशा सुविद्य, सुसंस्कारित वाचकांकडून सभोवतालच्या भ्रष्ट वातावरणाला आळा बसेल. त्या भ्रष्ट यंत्रणांवर नियंत्रण बसेल आणि त्यातून समंजस पण प्रभावी नागरिक घडतील व त्यातून नव्या भारताची जडणघडण होईल, असं त्यांना वाटतं. मिलिंद बोकील यांनी प्रामाणिकपणे आपले विचार मांडले आहेत. ते मुळातूनच वाचले पाहिजेत.

‘साहित्य, भाषा आणि समाज’

– मिलिंद बोकील,

मौज प्रकाशन गृह,

पृष्ठे – ११६ , मूल्य – १५० रुपये

 

कल्याण काळे