News Flash

हिंसेच्या आजाराला औषध शोधताना..

अवघ्या दीड वर्षांत त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे आणि पुढे सहा महिन्यांनी प्रा. कलबुर्गी यांचा खून झाला.

समाजजीवनात आज छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांची उत्तरेदेखील हिंसेच्या माध्यमातून सोडवण्याकडे आपला समाज म्हणून कल वाढतो आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती का ओढवली आहे हेही सर्वज्ञात आहे. परंतु हिंसेने प्रश्न सुटत नाहीत. उलट, त्यातून हिंसाच जन्म घेते, हे गांधीजींचे तत्त्वज्ञान आपण विसरत चाललो आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची स्मृती जागवताना याचे भान जागवणे म्हणूनच गरजेचे वाटते.
काल, २० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला तीन वर्षे पूर्ण झाली. अजून त्यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यांच्यानंतर अवघ्या दीड वर्षांत त्याच पद्धतीने कॉ. गोविंद पानसरे आणि पुढे सहा महिन्यांनी प्रा. कलबुर्गी यांचा खून झाला. त्यांचेही मारेकरी अजून सापडलेले नाहीत. एकाच प्रकारचे विचार मांडणारे विचारवंत आणि कार्यकर्ते एकाच पद्धतीने मारले जातात आणि त्यांचे मारेकरी शासन पकडू शकत नाही, हे खूप अस्वस्थ करणारे वास्तव आहे. आम्हा कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना रोज एक तरी अशी व्यक्ती भेटते, की जी म्हणते, ‘आता खूप झाले. आपण हे किती दिवस सहन करायचे? आपण काहीतरी ‘आक्रमक’ आणि ‘ठोस’ करायला पाहिजे.’ ‘आक्रमक’ आणि ‘ठोस’ म्हणजे बहुतांश लोकांना हिंसक कृती करणे अभिप्रेत असते. आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून होतो- तोदेखील सामाजिक कामाच्या संदर्भात.. मात्र त्याचे मारेकरी पकडले जात नाहीत, खूनसत्र थांबत नाही.. अशा पाश्र्वभूमीवर आपण हिंसेचा मार्ग अवलंबला तर ते योग्यच आहे अशी यातील बहुतांश लोकांची भावना असते. यंत्रणा जर आपल्याला म्हणावी त्या वेगाने दाद देत नसेल ‘तर मग काय हरकत आहे हिंसेचा मार्ग वापरायला?’ अशी या लोकांची धारणा असते. समाजजीवनात छोटय़ा-मोठय़ा प्रश्नांची उत्तरेदेखील हिंसेच्या माध्यमातून सोडवण्याकडे आपला समाज म्हणून कल वाढतो आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आजूबाजूला अनुभवायला येते आहे. अगदी ट्रॅफिकमध्ये होणाऱ्या भांडणापासून ते कोपर्डीच्या प्रकरणापर्यंत हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर देणे ही बाब आपल्याकडे सहज प्रतिक्रिया होऊ लागली आहे. त्यामधूनच मग ‘या देशात शरियत कायदा लागू करा’ किंवा ‘बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जाहीर चौकात दगडाने ठेचून मारावे’ अशा प्रतिक्रिया समाजमनात मोठय़ा प्रमाणात उमटताना दिसतात.
हा प्रश्न केवळ आपल्या राज्यापुरता वा देशापुरताच मर्यादित नाही, तर जगभरात सगळीकडे स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी हिंसेचा वापर करण्याची पद्धत मोठय़ा प्रमाणात वापरली जाताना दिसते आहे. दरवर्षी जगभरात १५ लाख लोक निरनिराळ्या हिंसाचारामुळे मृत्युमुखी पडतात. हिंसाचारातून झालेला एक अकाली मृत्यू त्या व्यक्तीच्या अख्ख्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकतो. हिंसेमुळे आरोग्य,अर्थकारण, मानसिकता, मानवी जीवनाचा स्तर यांवर होणारे परिणाम तर आणखीनच वेगळे आहेत. अशा परिस्थितीत हिंसेला हिंसेने उत्तर देणे म्हणजे या दुष्परिणामांमध्ये आपण भरच घालणे, असादेखील याचा अर्थ होऊ शकतो. हे सगळे असले तरी हिंसेला हिंसेने प्रतिकार करायची मानवी ऊर्मी ही मानवी मनाला आकर्षित करीत राहतेच. या पाश्र्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्रात एकदेखील हिंसक प्रतिक्रिया गेल्या तीन वर्षांत उमटलेली नाही. गेल्या तीन वर्षांत जवळच्या व्यक्तीच्या खुनामुळे आयुष्यात आलेली हिंसा आणि त्या अनुषंगाने समाजात दिसणारी हिंसा याविषयी मनात येणारे काही मुद्दे चर्चेसाठी आणि त्यास अनुसरून होणाऱ्या कृतीसाठी मांडणे महत्त्वाचे वाटते.
‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवकांसाठी सुरू केलेल्या मोहिमेतला एक अनुभव या अनुषंगाने सांगितला पाहिजे. हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार ही भूमिका ऐकून एका कार्यक्रमात एका तरुणाने मला चिडून विचारले की, ‘हिंसा करायची नाही अशी तुमची भूमिका आहे; तर मग नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना काय प्रेमपत्रे लिहायची का?’ त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. ही आपल्या समाजातील प्रातिनिधिक भावना व विचार करायची पद्धत असल्याची ती ग्वाही होती. समोरच्या व्यक्तीला गोळ्या घालणे किंवा प्रेमपत्र लिहिणे यामध्ये असलेल्या असंख्य पर्यायांचा समाज म्हणून आपण का विचार करीत नाही, हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र अंनिसचे उदाहरण द्यायचे, तर आम्ही कायदा हातात घेऊन हिंसा केली नाही याचा अर्थ आम्ही गप्प राहून अन्याय सहन केला असेदेखील नाही.
लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीतले असंख्य मार्ग आम्ही वापरले आहेत. धरणे, निवेदने, मोर्चे हे निषेधाचे नेहमीचे मार्ग तर आहेतच; पण प्रत्येक २० तारखेला ज्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालण्यात आल्या, तेथे जमून निदर्शने करणे, मॉर्निंग वॉकला जाताना दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करणे अशा गोष्टी त्यात आहेत. रिंगणनाटय़ासारख्या कलेच्या माध्यमातून एका बाजूला आपला निषेध व्यक्त करणे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या वेदनेची अभिव्यक्ती करणे हेही मार्ग आम्ही अवलंबले आहेत.
ज्या विचारांचा प्रसार थांबावा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि संघटन हेदेखील या हिंसेला दिलेले एक सकारात्मक उत्तरच आहे. जादूटोणाविरोधी कायदा पारित होऊन त्याअंतर्गत तीनशेच्या आसपास बाबा-बुवांवर झालेली कारवाई, त्याचबरोबर जातपंचायत आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा पारित करण्यासाठीची लढाई ही त्याची दोन ठळक उदाहरणे आहेत. दहशत निर्माण करणे हे बहुतांश हिंसेमागचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. ते साध्य न होता उलटपक्षी लोकांमधील निर्भयता वाढीला लागली तर हिंसेचा वापर फोल ठरू शकतो. माध्यमे, न्यायव्यवस्था आणि पोलीस दल या संविधानाने आपल्याला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणा आहेत. त्यांची मदत घेणे हेही या लढाईत खूप महत्त्वाचे आहे. उच्च न्यायालयाची देखरेख चालू झाल्यावर डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला थोडीफार गती येते आहे, हे त्याचेच फलित आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला तीन वर्षे पूर्ण होत असताना तपासातील दिरंगाईबद्दल निषेध म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या सर्व शाखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळ्या कागदावर लिहिलेली निषेध पत्रे पाठवणार आहेत आणि अशी पत्रे सामान्य नागरिकांनीदेखील पाठवावी असे आवाहनही करणार आहेत.
दलित समाजावरील शतकानुशतके झालेल्या अन्यायाला हिंसेऐवजी संविधाननिर्मितीने लढा देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा आणि ‘अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी माझी मरण्याची तयारी आहे; पण कितीही गंभीर कारणासाठी माझी दुसऱ्याला ठार मारण्याची तयारी नाही,’ असे सांगणाऱ्या गांधींचा आपल्याला वारसा आहे. ज्या कालखंडात परकीय राज्य होते, आपली राज्यघटना अस्तित्वात नव्हती, तेव्हादेखील आपण अहिंसेने यशस्वी लढा दिला आहे. त्यामुळे स्वकीयांच्या मनातील अपप्रवृत्तींविरोधातला आपला लढा हादेखील संविधानाच्या चौकटीतच लढला पाहिजे. कदाचित वेळ लागेल; कदाचित आपल्या हयातीत पूर्ण न्याय मिळणारही नाही, पण लोकशाही व्यवस्थेमध्ये ही लढाई अटळ आहे. ‘मी ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे त्या क्षेत्रातील लढाई ही काही दशकांची नाही, तर काही शतकांची आहे,’ असे डॉ. दाभोलकर म्हणत असत. तशीच हीदेखील लढाई शतकांची आहे याचे आपल्याला सतत भान ठेवावे लागेल.
डॉ. दाभोलकर हिंसेच्या प्रतिकाराविषयी बोलताना कायम महात्मा गांधींची एक गोष्ट सांगायचे, ती आज परत परत आठवते आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या आसपासची गोष्ट आहे. सारा देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असताना बापू नोआखली भागात फाळणीमुळे झालेली दंगल शमवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ज्याचा तरुण मुलगा दंगलीमध्ये मारला गेला होता असा एक हिंदू बाप बापूंकडे आला आणि त्यांना आत्यंतिक रागाने म्हणाला, ‘माझा तरुण मुलगा माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी कापला. आणि तुम्ही कसली ही अहिंसेची भाषा करता? त्याच्या समाजाचा एक तरुण मुलगा कापल्याशिवाय काही माझे समाधान होणार नाही.’ त्यावर बापू त्याला म्हणाले, ‘मित्रा, तुझे दुख: मला कळते. पण दुसऱ्या धर्माचा एक मुलगा कापूनदेखील तुझे खरे समाधान होणार नाही. तुला जर खरे समाधान हवे असेल तर या दंगलीत अनाथ झालेला तुझ्या मुलाच्या वयाचा दुसऱ्या धर्माचा एक मुलगा तू दत्तक घे आणि त्याचा धर्म न बदलता त्याला स्वत:च्या मुलासारखा वाढव, तरच तुला थोडे तरी समाधान मिळेल.’ बापूंचे नाव केवळ स्वच्छता अभियानापुरते वापरण्याच्या आणि हिंसेला सर्वागाने बढावा मिळत असलेल्या या कालखंडात बापूंच्या या दिशादिग्दर्शनासारखे हिंसेच्या आजाराला वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देण्याचे अनेक मार्ग आपल्याला शोधावे लागतील. आणि तीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची कृतिशील आठवण काढणे होईल असे वाटते.
डॉ. हमीद दाभोलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 2:14 am

Web Title: lokrang article on 3rd death anniversary of dr narendra dabholkar
Next Stories
1 प्रचारक्रीडा ! (निमित्त : अ‍ॅम्नेस्टी) :
2 वाळूचा देश
3 मराठीने नुक्ता स्वीकारावा का?
Just Now!
X