News Flash

शांततेचा दिलासादायक सूर

मराठी कवितेचं विश्व अनेक प्रतिमा-प्रतीकांनी समृद्ध आहे.

|| दीपक घारे

मराठी कवितेचं विश्व अनेक प्रतिमा-प्रतीकांनी समृद्ध आहे. त्यांपैकी वर्तमान जीवनसंघर्षांला वैश्विक जीवनमूल्यांची चौकट पुरविणारी कोणती प्रतिमा वारंवार येत असेल तर ती येशू ख्रिस्ताची आहे. दया, क्षमा, शांती, बलिदान अशा अमूर्त मूल्यांना मूर्त रूपात बांधून टाकणारी प्रतिमा म्हणजे येशू ख्रिस्त आणि त्याचा क्रूस! नारायण लाळे यांनी ‘शालोम’ या कवितासंग्रहात येशू ख्रिस्ताशी संबंधित अशा मराठीतील निवडक कविता एकत्रित केल्या आहेत. फादर स्टीफन्सने ‘क्रिस्तपुराण’ १६०८ साली लिहिले. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास चारशे वर्षे मराठी कवींना येशूच्या प्रेरणादायी जीवनमूल्यांचे आकर्षण राहिलेले आहे. धर्मप्रसार, मानवतावाद, राजकीय आणि सामाजिक चळवळी असे संदर्भ बदलत गेले तरी येशूचे संदर्भमूल्य कवींना सारखेच खुणावत राहिले. या संग्रहात समाविष्ट असलेल्या कवींची यादी पाहिली तरी त्यात काळ, वैचारिकता, प्रकृतीधर्म आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने किती विविधता आहे, ते कळून येते. फादर स्टीफन्स, पंडिता रमाबाई, नारायण वामन टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक ही झाली येशूकडे धार्मिक श्रद्धेने पाहणारी नावं. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, सुरेश भट ही आहेत येशूच्या जीवनाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून, पण भावपूर्ण नातं जोडणाऱ्या कवींची नावं. तर गुरुनाथ धुरी, अरुण कोलटकर, सायमन मार्टिन यांच्यासारखे बेगडी वास्तवाचा पर्दाफाश करणारे आणि थेट रांगडेपणाने वेदनेला हात घालणारे बंडखोर कवीही यात आहेत. काही अपरिचित पण चांगल्या रचना असलेले ना. वा. गोखले,  सखूबाई भिकू गायकवाड, वीरा राठोड असे कवी-कवयित्रीदेखील या संग्रहात आपली वेगळी उपस्थिती जाणवून देतात.

या संग्रहाला संपादक नारायण लाळे यांनीच प्रस्तावना लिहिलेली आहे, तीदेखील महत्त्वाची आहे. प्रस्तावनेत सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं आहे की, आधीच्या काळात असलेला धार्मिक प्रभाव नंतरच्या काळात ओसरला आणि प्रभूस्तुतीपेक्षा दया, क्षमा, शांती, करुणा या मानवी मूल्यांना जोपासणारी कविता प्रकर्षांने समोर आली. धर्मप्रसाराच्या कक्षा ओलांडणारी ही कविता लाळे यांना विशेष भावली आणि त्याचंच रूपांतर येशूविषयक कविता जमवण्याच्या ध्यासात आणि त्याचा संग्रह करण्यात झालं. लाळे यांचा उद्देश ‘एकूण मराठी काव्यविभागात पडलेली समृद्ध भर आणि साहित्यातून (कवितेतून) होणारी संस्कृतीची, भाषेची जपणूक’ ख्रिस्ती मराठी कवितेने कशी केलेली आहे, ते दाखवण्याचा आहे. त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेले आहेत.

लाळे यांनी प्रस्तावनेत काही महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श केलेला आहे. त्याच्या आधारेच या संग्रहातल्या काही कविता पाहता येतील. येशूच्या शिकवणीचा प्रभाव साहित्याबरोबरच चित्रकला-शिल्पकला यांवरही पडला आणि मराठी संतपरंपरेचा, अभंगरचनेचा प्रभाव ख्रिस्ती कवितेवर पडला, असं ते म्हणतात. खरं तर आजची मराठी कवितेतली येशूची जी प्रतिमा आहे, त्याच्या आयुष्यातील घटनांना जो काही प्रतीकात्मक भावपूर्ण आशय प्राप्त झालेला आहे, त्याला धर्मनिरपेक्ष- सेक्युलर मानवतावादाची जी किनार लाभलेली आहे, ती देणगी आहे युरोपातल्या रेनेसान्सकाळाची! अरुण कोलटकरांच्या ‘माऊली’ कवितेत मेरी म्हणते-

‘तुझा छिन्नविच्छिन्न देह

क्रुसावरून उतरवण्यात

आल्यानंतर

वाट पाहावी लागली मला

पंधराशे र्वष

तेव्हा कुठं डोळाभर पाहू शकले मी तुला

दु:ख मोकळं करू शकले

तुला माझ्या संगमरवरी मांडीवर घेऊन

मायकल एंजेलोच्या सौजन्यानं’

या ओळींमधून नकळतपणे, मेरीसारख्या मातेच्या वात्सल्यपूर्ण वेदनांना रेनेसान्स- काळापर्यंत वाट पाहावी लागली, हेच सत्य अधोरेखित होतं. (आणि पुरुषप्रधान समाजरचनेत मेरीसारख्या स्त्रीची होणारी उपेक्षा आणि कोंडमारा कळायला कोलटकरांपर्यंत आणखी चारशे वर्षे जावी लागतात!) रेनेसान्सकाळाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे- येशूच्या बालरूपाचं चित्रणं!

मंगेश पाडगावकरांच्या ‘जन्म’ कवितेत गोठय़ात जन्मलेल्या येशूचा प्रसंग आहे. ‘गव्हाणीला फूल आले दिव्य प्रकाशाचे’ हे पालुपद असलेल्या कवितेत आकाश, अंधकार, प्रकाश, निराकर, आकार अशा शब्दप्रधान प्रतिमा आल्या असल्या आणि गोठय़ाचे गव्हाणीपलीकडे दृश्य तपशील त्यात नसले तरी ही कविता ‘अ‍ॅडोरेशन ऑफ द मागी’ या ख्रिस्त जन्माच्या रेनेसान्सकालीन चित्रांकडे आपल्याला घेऊन जाते.

चित्रकलेतल्या दृश्यात्मकतेशी नातं सांगणाऱ्या काही कविता यात आहेत. उदा. जॉर्ज लोपीस यांची अतिवास्तववादी निसर्गचित्राचा भव्य अवकाश साकारणारी ‘आगमन’ ही कविता किंवा स्वत: नारायण लाळे यांची ‘दोन रेषा’ ही मित रेषा आणि मित भाषा यांचा तोल साधणारी, ‘मिनिमॅलिझम’ साधणाऱ्या चित्रासारखी कविता.

संतकाव्य आणि ख्रिस्ती कवितेकडे येतानाही रेनेसान्सकाळातला मानवकेंद्रित मानवतावाद आणि येशूचं बालपण यांचा धागा पकडूनच यावं लागतं. लक्ष्मीबाई टिळक आणि इंदिरा त्रिभुवन यांचा ‘पाळणा’, रे. ना. वा. टिळकांची ‘जग गोड करणे’, देवदत्त टिळकांची  ‘या गं या, चला, पाहू देवाला’ ही बालोद्यान गाणी- यांत येशूचं बालरूप आलेलं आहे. विठोबाशी भावनात्मक नातं साधणारी मराठी संतांची परंपरा आणि ख्रिस्ती कवितांमधून येशूबद्दलचा येणारा भक्तिभाव यांच्यातलं साम्य काही कवितांमधून प्रकर्षांने आढळतं.

लाळे यांनी प्रस्तावनेत ‘भाषा’ या घटकाचीही चर्चा केलेली आहे. मिशनरी लोक भारतात आल्यावर प्रथम ते भारतीय भाषा शिकले. स्थानिक भाषांमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा विचार मांडला. यामागे धर्मप्रसाराचा उद्देश असला तरी भारतीय भाषांचा त्यामुळे फायदा झाला. त्याला जोड मिळाली ती मुद्रण तंत्रज्ञानाची. ‘फादर स्टीफन्से रचिला पाया, टिळक झालासे कळस’ असं एक विधान लाळे यांनी केलेलं आहे. मिशनरी मराठी भाषेचं अवघडलेपण टिळकांच्या प्रासादिकतेपर्यंत विकसित झालं हे खरं आहे. पण हा विकास तिथेच थांबला नाही. कुसुमाग्रज, पाडगावकर, कोलटकर यांच्यासारख्या कवींनी आपल्या प्रतिभेने भाषेला अर्थच्छटांचं एक वेगळं परिप्रेक्ष्य दिलं आणि त्यातून खऱ्या अर्थाने ख्रिस्तविषयक कविता अधिक वैश्विक झाली. भाषा आणि आशयाच्या या परिवर्तनाला बळ दिलं ते ‘इंडियन रेनेसान्स’च्या एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या उदारमतवादी विचार प्रवाहांनी!

भाषेचं मूळ जो शब्द, त्यालाही ख्रिस्त विचारामध्ये एक व्यापक अर्थ आहे. बायबलमधील नव्या करारातील संत जॉनच्या कथेची सुरुवातच अशी आहे : ‘प्रारंभी शब्द होता. शब्द देवासांगाती होता. शब्द देव होता.’ शब्द हे मानवी अस्तित्वाचं आदिरूप आहे. शब्दांना विशाल प्रतिमा बनवणाऱ्या काही खुणा या संग्रहात आहेत आणि एकूण ख्रिस्ती साहित्यातही कोकरू, गुहा, क्रूस अशा शब्दांभोवती ख्रिस्ती कवितेत खूप मोठा प्रतिमेचा पैस आहे. सदानंद रेगे यांची ‘कोकरू’ ही कविता किंवा कोलटकरांच्या कवितांमधली ‘गुहा’ ही अशी काही उदाहरणं. क्रुसाबद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही इतकी ती प्रतिमा शब्दाच्या आदिरूपाशी एकरूप आहे.

या संग्रहाला दिलेलं ‘शालोम’ हे नाव समर्पक आहे. मूळच्या हिब्रू भाषेतील या शब्दाचा अर्थ आहे- परिपूर्ण शांतता व समाधान! बायबलच्या संदर्भात शालोम म्हणजे अंतर्यामी उमलून घेणारी समग्र परिपूर्णतेची भावना. धर्माच्या नावाखाली अनेकदा रक्तरंजित इतिहास घडला. पण येशू ख्रिस्त किंवा गौतम बुद्ध यांसारख्या संतांनी समृद्ध जीवनाचा मूल्याधिष्ठित मार्ग दाखवला. आज राजकीय शक्तींची धार्मिक आणि जातीय पातळीवर तेढ वाढवण्याची चढाओढ लागली आहे. अशा अस्वस्थ वर्तमानात ‘शालोम’चा सूर दिलासा देणारा ठरेल.

  • ‘शालोम’, संपादन- नारायण लाळे,
  • साहित्य अकादमी, नवी दिल्ली,
  • पृष्ठे- २०६, मूल्य- २७५ रुपये.

gharedeepak@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:14 am

Web Title: loksatta book review 11
Next Stories
1 किमयागार
2 शांतिशोधाची आत्मकथा
3 तरल वळणाची गज़ल
Just Now!
X