News Flash

स्त्रीच्या अंतर्मनातला कोलाहल

भारतात स्त्रीमुक्तीचे वारे वाहून आता अर्धशतक उलटायला आलं

|| वर्षां गजेंद्रगडकर

मराठी कथा, कविता आणि ललित लेखनाच्या क्षेत्रात ठळक स्थान असणाऱ्या नीरजा यांचा ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ हा कथासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एकूण १२ कथा या संग्रहात समाविष्ट आहेत.   ‘अस्वस्थ मी, अशांत मी’ हे या संग्रहाचं शीर्षक असलं तरी या शीर्षकाची कथा या संग्रहात नाही. याचं कारण संग्रहातल्या सगळ्या कथांना असलेलं अस्वस्थतेचं, अशांततेचं अस्तर या शीर्षकानं सूचित केलं आहे. या अस्वस्थतेचा प्रत्येक कथेतला रंग मात्र निराळा आहे.

आतली हाक दाबून टाकत प्रवाहपतिताप्रमाणे नवऱ्याच्या दडपणाखाली जगताना आपला चेहरा, आपला आवाज गमावून बसलेली स्त्री; तिला आपल्या ताब्यात ठेवू बघणारी, तिच्यावर वर्चस्व गाजविणारी पुरुषी मानसिकता; स्त्रीनं आपल्या संसाराची चौकट मोडू नये, वाटय़ाला येईल ते निमूटपणे भोगावं असे संस्कार करणारी पारंपरिक भारतीय कुटुंबव्यवस्था; संकुचित कुटुंबव्यवस्थेत आपलं स्वतंत्र अस्तित्व, आपलं स्वत्त्व टिकवू बघणारी स्त्री; जोडीदार हा केवळ नवरा असण्यापेक्षा समजूतदार मित्र असावा, अशी अपेक्षा करणारी स्त्री; ही अपेक्षा फोल ठरल्यावर प्रस्थापित कुटुंबव्यवस्था झुगारून घराबाहेर पडणारी स्त्री; अशा करारी व संवेदनशील स्त्रीच्या वाटय़ाला येणारं एकटेपण, शारीरिक-मानसिक पातळीवर तिला सोसावं लागणारं एकाकीपण; अतृप्त, असमाधानी वैवाहिक नात्यामुळे झालेला कोंडमारा व ते संबंध तोडल्यानंतर शारीर आवेगांना आवर न घालता हव्याशा वाटणाऱ्या पुरुषाकडून शरीर-मनाचे दाह शमविण्यासाठी तिनं घेतलेला पुढाकार; स्वत:चे निर्णय स्वत:च्या मर्जीनं घेतल्यावरही अनेकदा मनावर दाटून येणारं मळभ.. अशा अस्वस्थतेच्या, झाकोळलेपणाच्या व अशांततेच्या अनेक छटा या कथांमधून ठळक झाल्या आहेत. याखेरीज आधुनिक जगातले पुरुषांवरचेही ताण, प्रत्येक गोष्टीला चिकटलेलं अर्थकारण, सरळ माणसाला जगणं नकोसं करणारे सहकारी, अधिकाधिक भ्रष्ट होत चाललेलं समाजजीवन, आणि अशा व्यवस्थेत राहताना येणारं नराश्य असे अशांततेचे इतरही पदर या संग्रहातल्या कथांना आहेत. मात्र स्त्रीच्या अंतर्मनातला कोलाहल या कथांनी अधिक स्पष्ट केला आहे.

भारतात स्त्रीमुक्तीचे वारे वाहून आता अर्धशतक उलटायला आलं असलं तरी स्त्रियांना त्यांचं स्वतंत्र अवकाश पूर्णाशानं मिळालेलं नाही. अजूनही तिनं घराच्या चौकटीत राहावं अशी अपेक्षा केली जाते. अजूनही अपत्यहीनतेसाठी केवळ स्त्रीलाच दोषी धरलं जातं. स्त्रीच्या गरजा, भावना, तिच्या क्षमता यांची किंमत आजही अनेक कुटुंबांमध्ये ओळखली जात नाही. थोडक्यात, भारतीय स्त्रीला- निदान शहरी स्त्रीला- शिक्षण मिळालं, पसा मिळाला, पण स्वत:साठी, स्वत:च्या मर्जीनुसार जगण्याची मुभा अजूनही नाही मिळालेली तिला. अखंड आकाशाचा उजेड तिला मिळतच नाही. या सगळ्यामुळे घेरून येणारं तीव्र उदासपण, सतत जाणवणारी खंत या कथांमधून व्यक्त झाली आहे.

‘नवरेशाही म्हणजेच खरा पुरुषार्थ’ अशी ठाम समजूत असणाऱ्या नवऱ्याला घटस्फोट देऊन घराबाहेर पडलेली वंदना आणि निर्धारानं स्वतंत्र राहताना तिला जाणवणारं एकटेपण ‘पाच महिने तेवीस दिवस’ या कथेतून समोर येतं. संवेदनशून्य आणि चारित्र्यहीन नवऱ्यासोबत जगताना अनेक र्वष स्वत:चा चेहरा हरवून बसलेली व प्रयत्नपूर्वक स्वत:मध्ये परतणारी रंजना ‘चेहरा’ या कथेनं रंगवली आहे. नवऱ्याची नपुंसकता, त्यावर उपाय करण्यातली त्याची निष्क्रियता आणि स्वत:ची आई होण्याची इच्छा अशा कात्रीत सापडल्यावर वैद्यकीय मार्गाने अनोळखी पुरुषाचं वीर्य स्वीकारण्याचा निर्णय घेणारी अनुजा ‘नियोग’मध्ये भेटते. आपल्या आयुष्याचं वाळवंट करणाऱ्या घरच्या लोकांना धडा शिकविण्यासाठी अंगात देवीचा संचार झाल्याचं नाटक करून तात्कालिक दिलासा मिळविणारी बाई ‘मनात माझ्या’मध्ये रेखाटलेली दिसते. स्पेस हवी म्हणून आई-वडिलांना सोडून राहणारी, लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अपयशी ठरलेली आणि स्वत:ला नेमकं काय हवंय हे शोधताना सॅमच्या समजूतदारपणाचा अनुभव घेणारी राही ‘हॅपी मॅन’ या कथेत शब्दबद्ध झाली आहे. ‘नवी कथा’ ही कथेतली कथा आहे. कथालेखनाचा वेगळा प्रयोग म्हणूनही या कथेकडे पाहायला हवं.

या सगळ्या कथांमध्ये प्रामुख्याने स्त्रीचा आत्मशोध आहे. पण हा शोध केवळ स्त्रीत्वाचा नाही. तो स्त्री-पुरुष भेदापलीकडच्या माणूसपणाचा आहे, व्यक्ती म्हणून असलेल्या स्वातंत्र्याचा व आशाआकांक्षांचा आहे, तिच्या साध्यासुध्या स्वप्नांचा व शांत-स्वस्थ जगण्याचा आहे आणि सध्याच्या अस्वस्थ-असुरक्षित भवतालातून वाटचाल करताना स्वत:ला भक्कम उभं ठेवणाऱ्या तिच्या अंतस्थ ताकदीचाही आहे. आपल्या आतल्या व बाहेरच्या जगाचं स्पष्ट प्रतिबिंब पकडणाऱ्या या कथा संवेदनशील वाचकांना निश्चित आवडाव्यात.

  • ‘अस्वस्थ मी, अशांत मी’- नीरजा
  • पॉप्युलर प्रकाशन,
  • पृष्ठे- २०८, मूल्य- ३५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:15 am

Web Title: loksatta book review 12
Next Stories
1 शांततेचा दिलासादायक सूर
2 किमयागार
3 शांतिशोधाची आत्मकथा
Just Now!
X