News Flash

मौनातील हृदयसंवाद

अनुराधा पाटील यांची कविता ही सत्तरीच्या दशकानंतरची महत्त्वाची कविता आहे.

|| रणधीर शिंदे

अनुराधा पाटील यांची कविता ही सत्तरीच्या दशकानंतरची महत्त्वाची कविता आहे. ‘कदाचित अजूनही’ हा त्यांचा पाचवा संग्रह. समकालीन मराठी कवितेच्या संवेदनस्वभावाची चित्रलिपी नवा काळ घडवीत आहे. या काळात आंतरिकीकरणाच्या स्वरूपाची कविता क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे अनुराधा पाटील यांची कविता वेगळी ठरते. दुखाचा सखोल संयत आविष्कार, बाईपणाची प्रगाढ अनुभवविण, अपत्यविहिनांचे दुख, समाजनिर्मित काचाचे शल्य, निबोलका अपराधभाव, स्त्री-दुखाच्या अनंत तऱ्हा, करुणाभाव, निसटणाऱ्या दिवसांविषयीची भावव्याकूळता आणि निर्वाणाचे सूत्र ही जाणीवसूत्रे या संग्रहातील कवितेतून व्यक्त झाली आहेत. या साऱ्या जाणीवसूत्रांना बांधून ठेवले आहे, ते परात्मतेच्या जाणीवबंधाने!

अनुराधा पाटील यांच्या कवितेत एक प्रदीर्घ स्वरूपाचा संवाद आहे. तो जसा स्वतविषयी आहे, तसाच तो भवतालाशीही आहे. त्यामुळे या कवितेतील ‘मी-तू’ संवाद-संभाषिताला कमालीचे महत्त्व प्राप्त होते. गतविस्मृत भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या द्वैती ताणातून ही कविता निर्माण झाली आहे. कधीकाळच्या संचितापासून आपण तुटलो आहोत. सावलीच्या प्रदेशातून उजाड, उन्हाच्या भगभगीत प्रदेशात आल्याची संवेदना या कवितेत केंद्रीय स्वरूपात आहे. त्यामुळे खेडी आणि नगरे, भूत आणि वर्तमान, स्त्री आणि पुरुष, निर्ममता आणि हिंस्रता यांच्यातील परस्परविरुद्ध ताण या कवितेत आहेत. भूतकाळातील सृष्टी सजीव, चतन्यशील आणि चल स्वरूपाची आहे, तर वर्तमानकाळ हा निमूट, उदास, हिंस्र आणि उजाड स्वरूपाचा आहे. भूतकाळ हा अर्थपूर्ण, सुरचित आणि विमुक्ततेचा होता, तर वर्तमान ‘बांधलेला’, ‘निर्थक’, ‘असर्जक’ आहे. या तऱ्हेच्या परस्परविरोधी द्वंद्व-ताणांनी ही कविता आकाराला आली आहे.

वर्तमानाच्या नकारस्वराला या कवितेत परात्मतेचा घनदाट स्वर प्राप्त झाला आहे. ही परात्मता आधुनिकतावादी नाही. तर या परात्मपेचाचे नाते भारतीय जीवनदृष्टीशी आहे. इथल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाने आणि सृष्टीविषयीच्या ‘स्व’ आणि ‘पर’ संबंधामुळे येणाऱ्या परात्म जाणिवेचा चित्रफलक या कवितेतून साकारला आहे. करपलेल्या, कोमेजलेल्या, आक्रसलेल्या जगाविषयीच्या भावसंवेदना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे परात्म जाणिवेशी संबंधित अर्थकक्षांना बहुमितीपण प्राप्त झाले आहे. त्यामुळे या कविता जाणिवेतील ‘मी’ला नित्य उदास करतो. मनात ‘नुसतेच खिन्न सूर्यास्त आणि मलूल सूर्योदय, इच्छांच्या काठावर संकोचलेले’ असा भाव व्यक्त झाला आहे. हा परात्मभाव दोन काळांमधला, दोन प्रदेशांमधला, मानवी परस्परसंबंधांबद्दलचा आणि त्यातल्या अभावाबद्दलचा आहे. सार्वत्रिक अभावाने कवितेला वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. या परात्मतेची सूत्रे व्यक्तिदुख, भोवतालची पडझड ते स्त्रीदुखापासून मरणभानापर्यंत पसरलेली आहेत. हुंडाबळी गेलेल्या पोरींपासून, विहिरीचा तळ गाठणाऱ्या अनाम मुलींचे भावविश्व त्यामध्ये आहे.

अनुराधा पाटील यांच्या एकूण कवितेत स्त्रीविषयक जगाचा वेगळा असा दर्शनबिंदू आहे. अनागर लोकपरंपरेतल्या स्त्री संवेदना इथे दिसतात. या संग्रहातील कवितेत ‘बाईविषयी’च्या जीवनानुभवाला नव्या मिती प्राप्त झाल्या आहेत. स्त्री-दुखाचे तळकोपरे संयतपणे शोधणाऱ्या अनुराधा पाटील यांच्या या स्त्रीभानाला समकाळाच्या दाबातून नवी परिमाणे लाभली आहेत. ‘स्त्रीत्व’ हे संस्कृतीरचित आहे. ‘बाईपण’ समाज ‘घडवितो’ या समाजरचित ‘डोळ्यां’तील स्त्रीत्वाचे संवेदन कवितेत आहे. ‘पुरुषाच्या कल्पनेत असते’ व ‘प्रयोग संपल्यावर’ या वैशिष्टय़पूर्ण कवितांतून ती जाणीव व्यक्त झाली आहे. पुरुषरचित संस्कृतीत बाईपणदेखील एक परात्मभाव आहे. तो संवादी नाही, तर विसंवादी स्वरूपाचा आहे. या बाईमनातील ‘पर’ जगाविषयीची विसंवादरूपांची शृंखला या कवितेतून साकारली आहे. स्त्रीवादी कवितेप्रमाणे अधिक चढा, आक्रमक स्वर न आळवता बाईपणाच्या एकाकी दुखाचा सनातन पसारा ही कविता मांडते. वाळूचा महादेव पुजण्यातील वैयर्थता आता तिच्या लक्षात आली आहे. त्यावेळी परंपरेचं फाटकं पान शिणलेल्या मनानं ती उलटवते. चुलीच्या जाळाच्या उजेडात जेवढा उजेड दिसेल तेवढा बाईचा अवकाश असतो. बाईलाही आता भयमुक्त जगाची स्वप्नं पडतात. मात्र त्याचवेळी समाजाच्या बांधलेपणाचीही अदृश्य सावली तिच्यावर असते. बाईच्या असतेपणाच्या ‘दाराखिडक्यांना इथल्या साळसूद कडीकोयंडय़ाच्या आणि बतावणीच्या अदृश्य चौकटीची बोचणी’ असते. एका अर्थाने धर्म, परंपरा, कुटुंब चौकटींबद्दलची संशयाची जाण या कवितेत आहे. ‘प्रयोग संपल्यावर’ या कवितेतही बाईला मुखवटय़ाचे जग आणि वास्तव यातल्या अंतरायाची जाणीव झाली आहे. रंगमंचीय परिभाषेच्या प्रतीकांमधून स्त्रीत्वाचे भान प्रकटले आहे. वास्तव आणि भूमिका, सत्य आणि नाटक, मुखवटा आणि मूळपण यातल्या विरोधभावाची जाण त्यातून अधोरेखित झाली आहे. जीवनातल्या अटीतटीच्या या परात्मसंघर्षांची जाणीव प्रार्थनारूपाने अभिव्यक्त झाली. ती अशी-

‘मला नुसतं

कवितांत राहू दे

निदान तळटीप बनून

एवढी तरी भुई

माझ्या वाटय़ाला येऊ दे’

या प्रकारेच्या मर्यादित मागण्यात तिच्या परात्मतेचा विलय होतो. या चहुमुखी परात्मतेच्या पाश्र्वभूमीवर अटळतेच्या स्वीकाराचाही भाग त्यात आहे. अपरिहार्य अशा नकाराची दिशा समजून घेण्याचीही भावना आहे. ‘प्रत्येक गोष्टीतून समूळ हद्दपार होण्याचे हे दिवस स्वीकारतेय..’ किंवा ‘प्रत्येक गोष्ट / हातातून सुटत जाण्याच्या कठीण काळात / वेढली जाते पुन्हा / नव्या कहाणीच्या / एक अटळ प्रदेशात..’ अशी जाण व्यक्त झाली आहे. या संग्रहातील कवितेत निर्वाणाचे सूत्र प्रभावीरीत्या आविष्कृत झाले आहे. सभोवतालच्या आणि ‘स्व’ संघर्षांतील परात्मभावाची परिणती आधिभौतिक जाणिवेच्या अंगाने व्यक्त झाली आहे. परात्मतेच्या आणि नकाराच्या पाश्र्वभूमीवर विरामाची, विलयाची, मृत्यूसमीप सान्निध्याची जाण पकटते. त्यामुळे या संग्रहात मरणभानाची सखोल अशी व्याप्ती आहे. चराचराशी अलिप्त होऊन, निर्वाणाच्या वाटेची जाण प्रकटली आहे. अनिवार थकव्याच्या विळख्यातून डोळे मिटवून ती स्वतला सोडवते आहे. किंवा ती ‘गुंत्यांमधला पाय सोडवत आवराआवर करत आणते / मावळतीच्या दिशेनं सांज उतरू लागते / आणि इथल्या हवेलाही अशाश्वताचा मरणगंध’ येतो. ‘तेल संपत आलेल्या वातीच्या तडतडीमुळे आता मी परतणार नाही या भूमीवर’ या अतीताच्या, पारलौकिक जगाची सादपालवी या कवितेतून प्रकटली आहे. ती कधी बुद्धाच्या निर्वाणाच्या ठाम लयीत व्यक्त झाली आहे.

अनुराधा पाटील यांची कविता मराठी भावकवितेला समृद्ध करणारी कविता आहे. आंतरिकतेला आणि आत्मनिष्ठेला केंद्रीय स्थान त्यामध्ये आहे. ध्वनी, शब्दकळा, वाक्यसरणीच्या संयोग जुळणीतून वाहत्या कल्पक अशा लयींचा वापर या काव्यरूपात आहे. ‘मी ना उतले/ ना मातले / ना टाकून दिला घेतलेला वसा’ किंवा ‘नखाएवढं किडूक मिडूक/ पिकू दे साळमाळ / फुटू दे कोंडी’ या लोकबोलीतील रूपांनी नादलयींच्या भू-परिमाणांची इयत्ता वृद्धिंगत झाली आहे. ‘हे’, ‘हे खरंच’, ‘तसं तर’, ‘मी-तू’ या प्रकारच्या शब्दरूपांनी एकाच वेळी संबोधरूप आणि काळपरिमाण फार सूचकपणे साधला आहे. रूपक, प्रतीकांच्या सर्जक वापरातून अर्थाचे अनेकपदरीपण अभिव्यक्त झाले आहे. तसेच भूत आणि वर्तमान सांधणाऱ्या कालदर्शक शब्दरूपांच्या विपुल आणि सर्जक अशा उपस्थितीही तीमध्ये मोठय़ा प्रमाणात आहे.

एकंदरीत अनुराधा पाटील यांची कविता एकूण मराठी कवितेत अपवादभूत ठरावी अशी आहे. मराठी भावकवितेला समृद्ध करणारी, स्त्रीदुखाचे अनंत पदर आविष्कृत करणारी आणि त्याला स्वतच्या आंतरिक परात्म नीतीचा बृहृद फलक प्राप्त करून देणारी या काळातील स्वयंमेव कविता आहे. जीवनाविषयी खोलवर दडविलेल्या संपृक्त भानाचा सखोल आविष्कार करणारी ही कविता आहे. एका अर्थाने ‘मौनात उमटणारा प्रदीर्घ स्वरूपाचा हृदयसंवाद’ या कवितेतून साक्षात झाला आहे.

  • ‘कदाचित अजूनही’ – अनुराधा पाटील
  • शब्द पब्लिकेशन,
  • पृष्ठे-१२८ , मूल्य- २०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:16 am

Web Title: loksatta book review 13
Next Stories
1 स्त्रीच्या अंतर्मनातला कोलाहल
2 शांततेचा दिलासादायक सूर
3 किमयागार
Just Now!
X