हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांनी परीकथेचं अद्भुत विश्व मुलांसाठी खुलं केलं. ते इतकं रंजक आहे, की लहान-थोर या परीकथांच्या विश्वात रमून जातो, बुडून जातो. डायमंड पब्लिकेशनने हॅन्स यांच्या या परीकथांचं दालन मराठी वाचकांसाठी खुलं करून दिलं आहे.. ‘हॅन्स अँडरसनच्या परीकथा’ या पुस्तकाच्या रूपात. मुखपृष्ठ पाहूनच हे पुस्तक हाताळावंसं वाटतं. नंतर जसजसे तुम्ही त्यातल्या गोष्टी वाचत जाता, तसतशा त्यातल्या गोष्टींना साजेशा चित्रांनी या कथा अधिकच मनमोहक वाटत जातात. चित्रांनी कथा अधिकाधिक खुलत जाते आणि सहजी उलगडत जाते. अर्थात याचं श्रेय चित्रकार आभा भागवत यांचं. चैताली भागेले यांनी केलेला अनुवादही सहजसुंदर झाला आहे. ओघवती भाषाशैली आणि शब्दांची सहजता वाचकाला खिळवून ठेवते.

या पुस्तकात एकूण १५ परीकथांचा समावेश आहे. परीकथांमधलं जग नेहमीप्रमाणे अद्भुत म्हणावं असंच आहे. या परीकथांमध्ये तुम्हाला स्वप्नांच्या दुनियेत रमणारी छोटी मरमेड भेटेल, काळ्या-करडय़ा रूपामुळे दु:खी झालेलं छोटुसं बदकाचं पिल्लू भेटेल, आपल्या भावांना शापातून सोडवणारी शूर राजकन्या सापडेल.. स्नोमॅन, वेंधळा जॅक अशी अनेक अद्भुत मंडळी तुम्हाला भेटतील. या परीकथांचं जग तुम्हाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाईल, हे नक्की.

  • हॅन्स अँडरसनच्या परीकथा, अनु.- चैताली भोगले, चित्रे- आभा भागवत,
  • पृष्ठे- १३६, किंमत- २०० रुपये.

 

मस्त फिरू रे मस्त फिरू..

लहानग्यांसाठीचा ‘मस्त फिरू रे मस्त फिरू’ हा अरुण देशपांडे यांचा कवितासंग्रह. यातल्या कविता छोटय़ांचे निरागस भावविश्व रेखाटतात. आई-बाबा, ताई, शाळा, खेळ, बालसंस्कार, पुस्तके, निसर्ग अशा अनेक गोष्टी या कवितांमधून डोकावतात.

वाचन करावे। तसेच लिहावे।

वळण लावावे। मनासी या।।

असा सल्ला कवितेतून कवी देतो. तर कधी पुस्तकांची महतीही कथन करतो..

खूप सारे ज्ञान देती

ग्रंथ गुरुजन असती

अक्षरओळख होते

हे जग ओळखू येते।।

  • ‘मस्त फिरू रे मस्त फिरू’- अरुण देशपांडे, नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे,
  • पृष्ठे- ३२, किंमत- ४० रुपये.

 

केकतीची फुले

‘केकतीची फुले’ हा ल. सि. जाधव यांचा लहान मुलांसाठीचा कवितासंग्रह. या संग्रहाचा विशेष म्हणजे यातल्या कवितांमधून दलित समाजातील लहानग्यांचे आयुष्य प्रकर्षांने त्यांतून प्रकट झालेले आहे. या कवितांमध्ये ग्रामीण भाषेची वेगळी लकब आहे. तिथला निसर्ग आहे. प्राणी-पक्षी आहेत. आणि मुख्य म्हणजे तिथलं ग्रामीण समाजजीवन चितारलेलं आहे. या मुलांचं भावविश्व शहरी मुलांपेक्षा खूप वेगळं आहे.

‘गिरा टळे श्रीमंताचा

पडे मांगाच्या झोळीत

पहा मान किती मोठा

हलाहल ते झोळीत..’

ही वेदना मांडताना कवी पुढे म्हणतो-

‘बंद करा हे मागणे

भिकेपरिस वाईट

मी सांगेन त्यांना

सोडा जिणे हे वाईट!’

‘शाळेतुन आलु’ ही कविता या मुलांची वेदना मांडते-

‘बा! ये आये!

म्या शाळेतुन आलु आता

गुर्जीनं माझा

फोकानं हात

सडकून काढला..’

दलित समाजातील मुलांचं खडतर आयुष्य, जीवनसंघर्ष अशा अनेक अंगांना ही कविता स्पर्श करते.

  • ‘केकतीची फुले’ -ल. सि. जाधव, शब्दालय वितरण,
  • पृष्ठे- ८० , मूल्य- १०० रुपये.

 

स्मरणीय चरित्रे

थोरामोठय़ांच्या जीवनचरित्रातील नेमके प्रसंग निवडून लालित्यपूर्ण भाषेत तो घटनाक्रम वाचकांसमोर मांडणारी पुस्तके रा. वा. शेवडे गुरुजी यांनी लिहिली आहेत. या थोर व्यक्तींचे नेमके गुण हेरून मुलांची मने संस्कारीत करणारी रा. वा. शेवडे गुरुजी यांची कुमारांसाठीची ही खास पुस्तके आहेत. भीष्म, संत एकनाथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन,  मदर तेरेसा, दयानंद सरस्वती, मीराबाई, महाराणी ताराबाई, पं. जवाहरलाल नेहरू, करुणासागर ईश्वरचंद्र यांची मुलांसाठी संक्षिप्त चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. या छोटेखानी चरित्रांमधून महनीय व्यक्तींचे थोरपण, त्यांच्या विचारांची धार, वर्तणुकीतले मोठेपण अशा अनेक गुणविशेषांची नोंद लेखकाने या पुस्तकांतून केली आहे. देवीदास पेशवे यांची चित्रे या पुस्तकांतील घटना-प्रसंग उत्तमरीत्या अधोरेखित करतात.

‘आचार्य गांगेय भीष्म’, ‘अनाथांचा नाथ श्री एकनाथ’, ‘बुद्धभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘मानवतेचा महान सेवक अब्राहम लिंकन’, ‘करुणासागर ईश्वरचंद्र’, ‘पंडितजी’, ‘कृष्णसखी राजराणी मीराबाई’, ‘महर्षी दयानंद सरस्वती’, ‘ममतेची मूर्ती मदर तेरेसा’, ‘जाणती राणी महाराणी ताराबाई’, सर्व पुस्तकांचे लेखक : रा. वा. शेवडे गुरुजी, मेहता पब्लिशिंग हाऊस, किंमत- प्रत्येकी ९५ रुपये.

 

कोडी आणि नाटुकली

कोडी सोडवणं आणि चित्रं रंगवणं हा सगळ्याच मुलांचा तसा आवडता छंद. त्याचप्रमाणे नाटुकली सादर करणं हाही एक आनंदाचा खेळ. लेखिका ज्योती कपिले यांची ‘पैचान कौन?’ आणि ‘कोडी झाली नाटुकली’ ही पुस्तकं लहानग्यांसाठी प्रसिद्ध झाली आहेत. ‘पैचान कौन?’ या पुस्तकात शाब्दिक कोडी आहेत. त्याचबरोबर चित्रे रंगवायची आहेत. यातली शब्दिक कोडी मुलांच्या ज्ञानात नक्कीच भर घालतात आणि त्याद्वारे मनोरंजनही करतात. ‘कोडी झाली नाटुकली’ हे बालनाटिकांचं पुस्तक आहे.  इतिहास, भूगोल, विज्ञानपर कल्पक कोडी आणि त्यातून गुंफलेल्या नाटिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. नाटुकली वाचता वाचता त्यातील चित्रं रंगवता येतील असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.

‘पैचान कौन?’, ‘कोडी झाली नाटुकली’, लेखिका- ज्योती कपिले, जे. के. मीडिया प्रकाशन, किंमत- प्रत्येकी ६० रुपये.

 

छोटू बदक आणि इतर कथा

‘छोटू बदक आणि इतर कथा’ या गोष्टी वाचताना बालवाचकांना जी मज्जा येईल, ती सांगायलाच नको. त्याशिवाय त्यांना अमेय, राहुल आणि आरोही असे मित्र-मैत्रिणीही यात भेटतील. त्यांनी केलेल्या करामती, योजलेल्या कल्पना आणि प्रसंगी संकटावर केलेली मात हे सारे वाचताना बालवाचकांना त्यातून काही गोष्टी सहज जाता जाता शिकता येतील. याशिवाय यात मुलांच्या आवडीचे वडाचे झाड, मधमाश्या, पेरू, बदक, कुत्रा असे वेगवेगळे प्राणी-पक्षी-झाडेही भेटतात.

यातील पहिली कथा आहे- ‘झाडाचे स्वप्न’! या कथेमध्ये दरीत असलेले वडाचे झाड आपण हमरस्त्यावर नसल्यामुळे इतरांना सावली देऊ शकत नाही, कुणाला मदत करू शकत नाही म्हणून दु:खीकष्टी झालेले आहे. पण एके दिवशी काही छोटय़ा दोस्तांवर एक संकट येते आणि त्यांना त्या संकटातून बाहेर काढताना हे झाड जीवाची कशी बाजी लावते, हे या कथेत वाचायला मिळते.

दुसरी कथा आहे- ‘मधमाश्यांनी शिकवला धडा’! या कथेमध्ये अमेय या खोडकर बालमित्राच्या खोडय़ांमुळे त्याला कशी शिक्षा होते आणि कोणता धडा शिकायला मिळतो, हे वाचून खोडकरपणा कसा त्रासदायक असू शकतो, हे कळते.

‘पेरू झाला गोड’ या कथेमध्ये पेरू खाण्याच्या नादात राहुलवर एक संकट येते. पण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शांतपणे आणि धाडसाने केलेल्या विचारामुळे राहुलला मार्ग सापडतो आणि मग त्याला पेरूदेखील गोड  लागतो.

एका खारूताईचा द्वाडपणा दूर करण्यासाठी आरोही काय युक्ती योजते आणि कशामुळे आजोबांना फुले मिळतात, हे सांगते ‘खारूताईला मिळाला खाऊ’ ही कथा. दुसऱ्या एका कथेत आरोही छोटू बदकाला मदत करते. तर ‘दादुरामाचा भुग्या’ या कथेत दादुराम गावाला गेल्यामुळे त्याचे कुत्रे दु:खी होते, खाणेपिणे सोडते. पण तिथेदेखील आरोहीचीच युक्ती कामी येते. हे सारे या कथेत वाचायला मिळते. या कथा वाचताना बालवाचक नक्कीच रंगून जातील.  तेव्हा ‘छोटू बदक आणि इतर कथा’ हे पुस्तक लहानांनी आवर्जून वाचावेच. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सुरेख चित्रे काढली आहेत कल्पना मनोज तांबोळी यांनी.

  • ‘छोटू बदक आणि इतर कथा’,
  • विद्या तेरदाळकर, पृष्ठे- ३८.