27 February 2021

News Flash

किनाऱ्यावरून दूर दूर..

हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे  प्रसिद्ध होत आहे. त्यातील एका प्रकरणातला  संपादित अंश..

पर्यावरण चळवळीतील संघटक आणि पर्यावरणतज्ज्ञ दिवंगत जगदीश गोडबोले यांच्याबरोबरच्या आपल्या अनवट नात्याचा वेध घेणारे त्यांच्या पत्नी अर्चना जगदीश यांनी लिहिलेले ‘नात्यास नाव आपुल्या..’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे  प्रसिद्ध होत आहे. त्यातील एका प्रकरणातला  संपादित अंश..

प्रत्येक नातं म्हणजे एक गोष्ट असते- स्वतला समजून घेण्याची. जर नात्यातले दोघेही आनंदी असतील, तेव्हा नातं सुंदर असतं.. ते जगणाऱ्यांसाठी आणि आजूबाजूच्या प्रत्येकासाठी. शिवाय मग हातात हात घालून पुढे जाता येतं, कुरघोडी करण्याऐवजी.

पण असं सुंदर, दीर्घकाळ टिकणारं नातं असतं का? आणि असलं तरी उत्कट माणसांच्या नशिबी ते येतं का? नात्यात जसजसा वेळ आणि काळ जातो तसतसे एकमेकांच्या मनाचे, अस्तित्वाचे सगळे कंगोरे समजत जातात. मनाच्या तळाचा थांग लागतो कधीतरी. एकमेकांच्या मनातलं न सांगताच समजायला लागतं सगळं. पण मला नाहीच लागला कधी जगदीशच्या मनाचा थांग. अधूनमधून आम्ही एकमेकांच्या खूप जवळ असायचो आणि मी सवयीने पुन्हा स्वप्नं बघायला लागते – न लागते, तोच पुन्हा आम्ही हजारो योजनं लांब जायचो.

दारू पिणं, भ्रम, खिन्नता येणं आणि अगतिक होऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा दारूचा आधार, भयगंड आणि अहंगंड या सगळ्या चक्रात- मानसिक रुग्ण नसूनसुद्धा मीही जगदीशइतकीच भरडली जात होते. मी मानसिक आजारांवर, विशेषत: स्किझोफ्रेनिया आणि दुभंग व्यक्तिमत्त्व यावर खूप वाचायला सुरुवात केली. बरोबरच्या व्यक्तींना, विशेषत: साथीदाराला आजाराचं स्वरूप कळायला वेळ लागतो. आणि मानसिक आजारी रुग्ण आपलं चुकीचं, दुसऱ्याला त्रास देणारं वागणंसुद्धा मानसिक रोगात बेमालूम मिसळत असतो. जगभरात अनेक मानसिक रुग्णांच्या बायका माझ्यासारख्याच परिस्थितीला सामोऱ्या गेल्या होत्या आणि जातही होत्या.

कलंदरपणे जगणारा, आयुष्याला सामोरा जाणारा जगदीश सगळ्यांना हवाहवासा होता. पण पुढे सगळंच बदलून गेलं. हा बदल हळूहळू होत होता आणि ते नक्की काय आहे, हे लक्षात यायलादेखील त्याच्या जवळच्या सगळ्यांना खूप वेळ लागला. याच मस्तमौला माणसाने पुढे सगळ्या सुहृदांना भरपूर त्रास दिला. मानसिक स्थिती बिघडत गेली आणि त्यावर उपाय करण्यासाठी अधूनमधून तो तयार व्हायचा; पण मध्येच सगळं विस्कटून जायचं. त्याचं विचित्र वागणं म्हणजे मानसिक आजार होता, की फक्त दारूचा तात्पुरता परिणाम म्हणून तो असं वागत होता? त्याची मानसिक परिस्थिती कशी असेल, याचाच सतत विचार करण्यात मी आमच्या लग्नानंतरचा भरपूर वेळ घालवला आहे. पण मानसिक रुग्णाला समजून घेण्याएवढी अवघड गोष्ट कोणतीच नसते. दारू पिणं खरं तर अमर्याद नाही, पण तो सकाळीच चहाऐवजी रम प्यायला लागला होता. तो हाच माणूस- जो आनंदाचा झरा होता, त्याच्याबरोबरच्या लोकांना कधीही त्याचा कंटाळा यायचा नाही, तो तासन् तास विमनस्क बसून राहायला लागला. जगाचा, प्रेम करणाऱ्या माणसांचा त्याला प्रचंड राग यायला लागला. मावळातलं संस्थेचं काम तो दुसऱ्यांना द्यायला लागला. लिहिणं विसरून गेला. प्रवास नकोसा व्हायला लागला. मजेचं दारू पिणं हाताबाहेर गेलं. पँक्रिअ‍ॅॅटायटिस झाला, पण तरीही दारूची भीती नाहीच बसली त्याला.

आमची भेट झाली तेव्हा तो व्यवस्थित होता. कदाचित त्याच्या आधीच्या संसाराचे बारा वाजले होते आणि त्याला नंतरही त्या नात्यातून धक्के बसत होते; म्हणून त्याच्या मनात बदल होत असतील आणि या गोष्टीसाठी जबाबदार असणारे जीन्स व्यक्त व्हायला लागण्याची परिस्थिती तयार करत असतील. पण त्या वेळी- म्हणजे १९८६ ते १९९३ पर्यंत जगदीश बऱ्यापकी सामान्य मानसिक परिस्थितीत होता.

आपल्यापेक्षा जवळजवळ एक पिढीने तरुण असलेली बायको आपल्याच मार्गदर्शनाखाली कायम राहील, या भ्रमातून तो माझ्या पीएच.डी.नंतर बाहेर आला आणि त्याला त्रास होऊ लागला. पण हेही सामान्यच आहे, पुरुषी अहंगंडाच्या दृष्टीने विचार केला तर. त्याच्या स्वतच्या कामाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर जास्तच पटतं ते. त्याला कामामध्ये मदत करणारी, त्याच्या तालावर चालणारी गृहिणी – सचिव – सखी हवी होती. मात्र तिने स्वत: काही निर्णय घेणं त्याला पटत नव्हतं. विशेषत: बदलणाऱ्या जगातले वारे समजून घेऊन समाजकारणात व्यावसायिकता आणली पाहिजे, हा माझा आग्रह त्याला खपत नसे.

समाजासाठी काम आणि समाजात बदल घडविणं हेच आपलं ध्येय ठरवलं तर त्यासाठी अपार, अविरत कष्ट घेतल्यानंतरच तिथपर्यंत पोहोचता येतं. अन्यथा अनेक गोष्टी प्रासंगिक म्हणून केल्या जातात आणि दूरवर, खोलवर विचार न केल्यामुळे त्या सामाजिक बदलाच्या प्रक्रियेसाठी तकलादू ठरतात.

कार्यकर्त्यांच्या बाबतीतली आणखी एक गोष्ट म्हणजे समाजात कुणीतरी चाकोरीबाहेरचं काम करतो आहे म्हणून त्याच्या छोटय़ा कामाचंसुद्धा कौतुक होतं. अनेकदा या अपेक्षांचं आणि कौतुकाचं ओझं होतं. त्यातून जगदीशसारखं प्रभावी व्यक्तिमत्त्व असेल तर समाज डोक्यावरच घेतो अशा लोकांना! अशा वेळी त्यात वाहून गेलं, ध्येयापासून दूर गेलं तर मात्र त्यांची घसरण होणार हे ठरून जातं.

जगदीशचा सामाजिक कार्याचा अनुभव, समाजासाठी पण स्वतला आवडतं म्हणून आपण काम करतो याबद्दलची सुरुवातीपासूनची स्पष्टता हे सगळं बघता त्याचा मानसिक आजार त्याच्यावर इतका स्वार होईल, असं कुणालाच कधी वाटलं नसेल. मला तर नाहीच नाही. जगदीशला अनेकदा उत्तम, वेगळ्या कल्पना स्फुरत. त्यातल्या काही त्याने प्रयत्न केला तर प्रत्यक्षात येत. पण त्या टिकवून ठेवण्यासाठी भरपूर आखणी करावी लागते, निवडलेले मार्ग पुन:पुन्हा तपासून बघावे लागतात; मात्र याचा त्याला कंटाळा होता.

आपणच एखादी गोष्ट निवडली असेल तर ती संपूर्ण यशस्वी होण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि जमेल ते सर्व काही करताना खूप मजा येते. नवीन समस्येच्या मुळापर्यंत जाणं, आपल्याला सुचलेल्या उपायांची योग्यता तपासून बघणं, यात कधीतरी आपल्याला स्वत:चाही शोध लागतो आणि आपण ध्येयापर्यंतही पोहोचतो असा माझा अनुभव आहे. पण मला हळूहळू जाणवत गेलं, की जगदीशने स्वत:साठी असं कुठलंच ध्येय ठरवलं नव्हतं आणि तरीही अनेक प्रासंगिक, पण उपयोगाच्या गोष्टी करत गेला तो. अर्निबध मुक्त वागणूक, कसलीही चौकट सतत नाकारणं, कशाचीही सक्ती नसणं अशा गोष्टींमुळे खरं सामाजिक काम कधीच उभं राहू शकत नाही. व्यक्तिगत आनंदासाठी मी सामाजिक काम करतो आहे, असं ठरवल्यामुळे पसे मिळवण्याची त्याच्यावर सक्ती नव्हती. पर्यायाने सांसारिक जबाबदाऱ्या, आर्थिक वाटा उचलणं यापासूनदेखील तो अलगद दूर राहिला. त्याच्यात गुण होते, आवाका होता. पण सुसूत्र विचार आणि सातत्य नसल्यामुळे तो कुठेही पोहोचू शकला नाही. सुरुवातीच्या काळातल्या यशामुळे, मोहिमांमुळे तो हुरळून गेला. चांगल्या लिखाणामुळं त्याचं नाव झालं. थोडय़ाशा प्रसिद्ध, किंचित यशस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या माणसाभोवती जसे हुजरे आणि भक्तगण, शिष्यगण तयार होतात तसे त्याच्याभोवती झाले. या लोकांच्या मदतीने सगळी कामं बसल्या जागेवरून, काहीही कष्ट न घेता होणार असा त्याचा ग्रह झाला. जमिनीवर काय चाललं आहे, याचं भान सुटलं. पश्चिम घाट मोहिमेत वाटेल तसं वागण्याचा अतिरेक व नंतरच्या काळात अनेक चांगल्या संधींकडे ढुंकूनही न बघणं हे त्याचंच द्योतक होतं.

आपण स्वान्त: सुखाय सामाजिक काम करतो आहोत, हे त्याचे सुरुवातीचे विचार बदलले. आपल्या कार्यपद्धतीबद्दल कुणीही प्रश्न विचारता कामा नयेत असा त्याचा दुराग्रह होता. कार्यकर्ता म्हणून तो १९९५-९६ मध्येही चांगलं काम करायचा प्रयत्न करत होता. मात्र आपण समाजासाठी काम करतो म्हणजे आपल्याला खासगी आयुष्यात वाटेल तसं वागायची मुभा आहे, असली पाहिजे असा त्याचा दृढ समज होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2018 12:15 am

Web Title: loksatta book review 19
Next Stories
1 ललितरम्य मुक्तचिंतन
2 वादे वादे न जायते..
3 वेगळ्या गावाचा रहिवासी
Just Now!
X