|| डॉ. शमसुद्दिन तांबोळी

मुस्लीम समाजाच्या संरचनेबद्दल भारतीय समाजात अनेक समज-अपसमज आहेत. हा समाज एकसंघ असून श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचे आज्ञाधारकपणे आचरण करणारा आहे असे एक मिथक प्रचलित आहे. या मिथकाला धक्का देणारे आणि समाजवास्तवाची सखोल माहिती देणारे ‘मुस्लीम बलुतेदार’ हे तमन्ना इनामदार लिखित पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. भारतीय समाजाचे, विशेषत: मुस्लीम समाजाचे समाजशास्त्र समजून घेणाऱ्या विद्यार्थी, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक म्हणजे अनोखा दस्तावेजच आहे.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
JNU The fight for democracy Elections in JNU left organizationIndian politics
जेएनयू : लोकशाहीसाठीचा लढा!

भारतीय समाजाचे बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता हे जसे वैशिष्टय़ आहे, तसेच मुस्लीम समाजातील बहुसांस्कृतिकता काय आहे, हे समजून घेणाऱ्यांनी ‘मुस्लीम बलुतेदार’ नजरेखालून जरूर घातलेच पाहिजे. या पुस्तकाच्या वाचनामुळे मुस्लीम समाजाचे अंतरंग उलगडण्यास आणि समजून घेण्यास नक्कीच मदत होईल. भारतातील मूठभर ‘आश्रफी’ (उच्चवर्गीय, उच्चवंशीय) सोडल्यास बहुसंख्य मुस्लीम हे भारतातील मूलनिवासी होते. इस्लामच्या आगमनानंतर अनेक कारणांनी या जाती-जमातींनी इस्लामचा स्वीकार केला. परंतु आपले पारंपरिक व्यवसाय आणि जातीयता कायम ठेवली. या जमातींवर इस्लामच्या प्रभावाबरोबरच भारतीय संस्कृतीचा मोठा पगडा आहे, हे वास्तव ‘मुस्लीम बलुतेदार’ या पुस्तकातून स्पष्ट होते.

भारतीय समाजाचे एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे ‘परस्परावलंबन’! एकमेकांच्या सहभागातून आणि सहकार्यातून उभी राहिलेली समाजव्यवस्था ‘बलुतेदारी’ पद्धतीने आपल्यासमोर आणली आहे. याला आपण ‘बारा बलुतेदार’ म्हणून संबोधित राहिलो. परंतु या बलुतेदारांमध्ये मुस्लीम बलुतेदारसुद्धा आहेत, या वास्तवतेकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. मुस्लीम समाजात अनेक जाती आहेत, हे १९५५ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने स्पष्ट केले होते. त्यानंतर १९८४ मध्ये मंडल आयोगाने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. या मागास जातींचा ‘इतर मागासवर्गीय’ या प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षणाचा लाभही देण्यात आला. इथपर्यंतचा इतिहास सर्वपरिचित आहे. मात्र, मुस्लीम समाज समजून घेण्यासाठी हा इतिहासाभ्यास अपुरा आहे, हे या पुस्तकामुळे समजून येते.

जातीयता भारतीय समाजात अद्याप टिकून आहे. एकसंघ समाजासाठी जातीय विषमता अडथळा ठरते. जातीयता कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न आणि प्रयोगही करण्यात आले. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मास जातीव्यवस्था मान्य नाही. परंतु भारतात हे धर्म अवतीर्ण झाले तरीही इथल्या जातीभेदाचा नायनाट ते करू शकले नाहीत. इस्लाम व ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्यात आला, परंतु या जातीसमूहांनी आपल्या गळ्यातील जातीभेदाचे लोढणे सोडलेले नाही. आत्तार, मण्यार, कंजार, मोमिन, कसई, मदारी, दरवेशी, धोबी अशा कनिष्ठ समजल्या गेलेल्या समुदायांना वरिष्ठ समुदायांनी कधीच जवळ केले नाही. त्यांच्याशी बेटी व्यवहार केले नाहीत. प्रत्येक जातींनी आपापल्या मशिदी निर्माण केल्या. ख्रिश्चन समुदायातही साळी ख्रिस्ती, महार ख्रिस्ती, ब्राह्मण ख्रिस्ती असे प्रकार भारतात दिसून येतात. या जातींमध्ये रोटी व्यवहार होतात. अस्पृश्यता नसते. मात्र तरीही उच्च-नीच प्रकारची भावना आणि तदनुषंगिक मानसिकतेतून या जाती बाहेर पडलेल्या नाहीत. आज छप्परबंद, घोडेवाले, पिंजारी, रंगारी असे व्यवसाय नामशेष झाले आहेत. मात्र, या व्यवसायांवर आधारित जातीव्यवस्था कायम राहिली आहे. नव्हे, काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी ती अधिक गडद होताना दिसते आहे. यासंदर्भात या पुस्तकातील विवेचन मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

जातीव्यवस्थेचा अविभाज्य समजला जाणारा एक हिस्सा म्हणजे ‘जातपंचायत’! प्रत्येक जातीची जातपंचायत असते. या जातपंचायतीच्या सदस्यांना प्रतिष्ठा होती. बहुतांशी त्यांची आपल्या जातीवर हुकूमत चालत असे. आजही जातपंचायत हा प्रकार अस्तित्वात आहे. मात्र, त्याचे स्वरूप बदलले आहे. पुस्तकात उल्लेख केलेल्या जातींतील अनेक जातींनी जातपंचायती रद्द केल्याचे म्हटले आहे. आधुनिकतेचा प्रभाव आजच्या जातीव्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे शिक्षण घेण्याच्या, व्यवसाय बदलण्याच्या व मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रेरणा या समाजांत निर्माण झाल्या आहेत. मात्र, मुख्य प्रवाहात येत असताना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्याही पुस्तकात अधोरेखित केल्या गेल्या आहेत. ‘भारतीय समाज हा जातींच्या पुंजक्यांनी बनलेला आहे,’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाला मुस्लीम समाजही अपवाद नाही. या विधानाला ‘मुस्लीम बलुतेदार’च्या निमित्ताने पुष्टीच मिळते.

समाजाचा गावगाडा व्यवस्थित चालावा यासाठी बलुतेदार, आलुतेदार, कारू-नारू अस्तित्वात आले. आज बलुतेदारांची बरीचशी माहिती उपलब्ध आहे. परंतु या व्यवस्थेत आलुतेदार आणि कारू-नारू असणाऱ्या मुस्लीम जातीसुद्धा आहते. यासंदर्भातील तपशील पुरेशा प्रमाणात आला नसला तरी मुस्लीम समाजातील कनिष्ठ जातींच्या वेदना लेखिकेने या पुस्तकात मांडल्या आहेत. उदा. लेखिका ‘छप्परबंद समाजा’बद्दल म्हणतात की, ‘जातीव्यवस्थेच्या गर्तेत सापडलेली आणि आजपर्यंत त्याच अवस्थेत गरगरत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकून राहिलेली ही जमात. सवतीच्या अनौरस मुलासारखी वागणूक सहन करत करत पिढय़ान् पिढय़ा संपत आहेत तरी याची सरकारला किंवा मुस्लीम समाजाला ना खंत, ना दु:ख. कारण त्यांच्या लेखी, ही गुन्हेगार जमात. त्यामुळे माणूस म्हणून असणाऱ्या गरजा आणि हक्क त्यांना नाकारण्यात आले.’

‘शिकलगार’ हा समाज स्वत:ला ‘लोहारा’पेक्षा श्रेष्ठ समजतो. धातू तयार करण्यापेक्षा धातूच्या हत्यारांना धार लावण्याचे, त्यांना तेज व उजाळा आणण्याचे काम हे लोक करतात. या समाजाचे वैशिष्टय़ हे, की यांनी महिलांना गोशा, बुरखा, हिजाब यांची सक्ती केली नाही. गरजेनुसार ‘पाल’ टाकून राहणे आणि कामासाठी पुढच्या गावी जाताना पाल हलवणे या समाजाच्या नशिबी आलेले आहे.

मुस्लीम बलुतेदारांची येथील समाजाशी अभेद्य अशी नाळ जोडली गेली आहे. आज या समाजाचे पारंपरिक धंदे नामशेष झाले आहेत. या समाजाकडे अद्ययावत व्यवसायांचे कौशल्य नाही, भांडवल नाही आणि शिक्षणसुद्धा नाही. त्यांच्या व्यथा नेमक्या काय आहेत, त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल. आजच्या खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळात या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इच्छाशक्ती असणाऱ्या धुरिणांना या पुस्तकाच्या अवलोकनातून काही मार्ग निश्चित सापडेल.

शिकलगार, मिसगर, मदारी, कुरेशी, पिंजारी, तांबोळी, मन्यार, आत्तार, मोमिन, बागवान, छप्परबंद आणि फकीर समाजांची कौटुंबिक जीवनशैली, व्यवसाय, जातपंचायती, सामाजिक स्थिती, राजकीय सहभाग, जाती संघटना, इतिहास या मुद्दय़ांना समोर ठेवून या बारा मुस्लीम जातींचा तुलनात्मक अभ्यास ‘मुस्लीम बलुतेदारा’मध्ये आढळून येतो. या समाजाची विदारकता लेखिकेने समर्थपणे मांडली आहे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासाचा हा विषय आहे. या संशोधनासाठी मुलाखती, सर्वेक्षण, प्राथमिक साधनांचा वापर केला गेला आहे. निष्कर्ष काढताना काही निष्कर्षांबाबतीत वैज्ञानिक प्रणालीचा आधार घेतला आहे का, अशी शंका मात्र येते. तथापि मुस्लीम समाजातील इतर जातींच्या समाजशास्त्रीय अभ्यासासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणा देणारे आहे.

 

  • ‘मुस्लीम बलुतेदार’- तमन्ना इनामदार,
  • संस्कृती प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे- १६०, मूल्य- १६० रुपये.