|| नीलिमा बोरवणकर

‘समतेवर आधारित शोषणविरहित समाजाची स्वप्नं पाहणाऱ्या सर्वाना..’  अरुणा देशपांडे लिखित ‘.. के हर ख्वाहिश पे’ या मनात उत्सुकता निर्माण करणाऱ्या कादंबरीची ही अर्पणपत्रिका.. साधारणपणे कुठल्या दिशेनं जाणारी ही कादंबरी असेल याची कल्पना देणारी! एक साधंसं लाकडी बाक व त्याखाली असलेले चार ग्लास- एवढं साधं, पण बोलकं मुखपृष्ठ. मुखपृष्ठावरून आतील लेखनाचा अंदाज येण्याचे दिवस आता गेले. उलट, चकाकतं ते सोनं नव्हे, हाच अनुभव अनेकदा येतो. ही कादंबरी मात्र खरंच वाचनानंद देते.

तरुण वयात प्रत्येकाच्या मनात भविष्याविषयी अनेक स्वप्नं असतात. बहुतेकांची स्वप्नं वैयक्तिक आयुष्याशी निगडित असतात. काहीजण मात्र त्यापलीकडे जातात. समाजात परिवर्तन घडवून आदर्श मानवी समाज निर्माण करण्याचं स्वप्न ते बघतात. प्रदीर्घ काळ हा ध्यास घेऊन धावत असताना प्रसंगी त्यांची दमछाकही होते. मग जरा थांबून आपल्याच आयुष्याकडे एकदा मागे वळून बघावं; या प्रवासात काय हरवलं, काय गवसलं याचा हिशोब मांडावा असं वाटू लागतं असा हिशोब मांडणाऱ्या हेमंत-वर्षां, शिशिर-ग्रीष्मा आणि शरद-वासंती अशा तीन जोडप्यांचा संसार, कुटुंब आणि त्यांचं काम यांचा धांडोळा घेणारी ही कादंबरी.

इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली तेव्हा ही सगळी मंडळी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. यापकी कुणाच्याही घरात रूढार्थानं सामाजिक, राजकीय पाश्र्वभूमी नसली तरी आणीबाणीमुळे ही तरुण मुलं विचार करायला लागली. आणि पुढे आपण प्रत्यक्ष काहीतरी करायला हवं, या विचारानं भारावली गेली.

हेमंत आयआयटीसारख्या संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेता घेता सामाजिक कामात जायचं असं विचारपूर्वक ठरवून पत्रकार झालेला. पुढे यशस्वी संपादक. त्याची बायको वर्षां ही बँकेत नोकरी करून घराला आधार देत खंबीरपणे उभी असलेली. घराचा डोलारा अनेक वर्षे ती एकटीनं सांभाळतेय. स्वत:च्या मुलानंतर सामाजिक बांधिलकी म्हणून एक मुलगी दत्तक घ्यायचा विचार ती नवऱ्यापुढे मांडते. त्याला दुसऱ्या मुलाची गरज वाटत नसताना तिच्या हट्टामुळे एक मुलगी ते दत्तक घेतात. त्यामुळे होतं असं की, वर्षां संसारात अधिकाधिक गुरफटत जाते व हेमंत त्याच्या पत्रकारितेत. साहजिकच मुलं व आई असं एक विश्व तयार होतं.

कादंबरीची सुरुवात हेमंत-वर्षांचा मुलगा आशय परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याने होते. हेमंत म्हणतो, ‘जाताना तो माझ्यासमोर अनेक प्रश्नांची भेंडोळी टाकून गेला.’ मुलगा वडिलांवर आरोप करतो, की स्वत:च्या लेखन-वाचन-पत्रकारितेच्या नादात मुलांशी एक बाप म्हणून नातं जोडण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. अशा वैयक्तिक तक्रारींशिवाय त्याचा महत्त्वाचा मुद्दा होता की, ‘तू नेहमी भांडवलदारांच्या विरोधात कष्टकऱ्यांची बाजू घेऊन बोलत असतोस. पण तू स्वत: त्यांच्यासाठी काही केलं आहेस? त्यांच्यावरील अन्यायाबद्दल वर्तमानपत्रात नुसते लेखच लिहिले आहेस नं? स्वत: कधी कष्टकऱ्यांच्या हातात हात घालून रस्त्यावर उतरला आहेस? तू आज कितीही विद्वान संपादक म्हणून ओळखला जात असलास तरी तूही कुठल्यातरी भांडवलदाराचीच नोकरी करतो आहेस नं?’ भांडय़ात कोंडून ठेवलेली वाफ संधी मिळताच वेडय़ावाकडय़ा पद्धतीनं झाकणातून बाहेर पडावी तसा मुलगा बोलत होता. या क्षणी काहीही बोलण्यात अर्थ नाही हे हेमंतला कळतं. तो शांतपणे त्याचा उद्वेग ऐकून घेतो. नंतर त्याच्या मनात प्रश्न उभा राहतो, की या मधल्या दोन तपांच्या काळात आपण नेमका कुठून कुठे प्रवास केला?

हाच विचार कादंबरीतल्या इतर व्यक्तिरेखाही करतात. साधारण पंचवीस-तीस वर्षांचा काळ यात रंगवला असल्यानं आणीबाणी आणि पुढच्या इतक्या वर्षांचा सामाजिक-राजकीय पट, जागतिकीकरणाच्या रेटय़ानं झालेले बदल, सामाजिक कार्यकर्त्यांचं कौटुंबिक आयुष्य, त्यातले चढउतार अशा असंख्य कंगोऱ्यांवर लेखिकेनं प्रकाश टाकला आहे. सामाजिक काम करणाऱ्या नवऱ्याला आर्थिक स्वास्थ्य देण्यासाठी बायकोनं नोकरी करून पसे कमवायचे व त्यानं आपल्या कामात झोकून द्यायचं, असे अनेक कार्यकत्रे त्या काळात आपण पाहिले. त्यातली स्त्री अर्थातच कमावती आणि म्हणून अधिक स्वतंत्र विचाराची असेल असं सर्वसाधारणपणे गृहीत धरलं जातं. यातला हेमंत एकदा म्हणतो, ‘वर्षां, तुला तुझं स्वत:चं असं वेगळं जग असणं हे आपल्या दोघांच्याही भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या दोघांनाही स्वत:च्या मनाप्रमाणे स्वत:चा विकास करून घेण्यासाठी आवश्यक ती स्पेस मिळेल.’ विचार म्हणून हा कितीही उच्च असला तरी प्रत्यक्षात असं घडतं? दोघा जोडीदारांना स्वत:चा विकास करता येतो का? मग कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं काय होत असेल? असे प्रश्न सामान्यपणे पडतात. या प्रश्नांना लेखिकेनं वर्षांच्या व्यक्तिरेखेतून उत्तर दिलंय. वर्षां एका प्रसंगात म्हणते, ‘घराबाहेर जाऊन सामाजिक प्रश्नांवर किंवा स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्दय़ावर भाषणं करणं, चर्चा करणं वेगळं; पण घर, मुलं ही आपलीही जबाबदारी आहे असं पुरुषांना मनापासून कधीच वाटत नाही. मग ते पुरोगामी असोत वा प्रतिगामी. हा आमचा सर्व मत्रिणींचा अनुभव आहे.’

‘सामाजिक प्रश्नांना भिडताना पत्रकारितेची वाट शोधली. त्यात स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी सतत परिश्रम केले. एका सहकारी स्त्रीमध्ये मनानं गुंतणं झालं. पण त्यातून भानावरही आलो. कष्टाचं फळ मिळालं. नाव झालं. असंख्य सेमिनार्समध्ये भाग घेता आला. संपादक होता आलं. या समाधानात असताना अचानक मुलानं विचारलेल्या प्रश्नामुळे स्वत:कडे तटस्थपणे बघता आलं..’ ही झाली हेमंतची भूमिका. कादंबरी त्याच पद्धतीनं लिहिलीय. हेमंत, वर्षां, शिशिर, ग्रीष्मा, शरद आणि वासंती यांच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ती उकलत जाते.

शिशिर प्रत्यक्ष कामगारांसाठी काम करणारा पूर्णवेळ कार्यकर्ता. ग्रीष्मा ही नोकरी करून प्रपंचाचा भार वाहणारी. ती एका ठिकाणी नवऱ्याला ठणकावून सांगते, ‘जगात जगण्यासाठी पसे मिळवावेच लागतात. ज्यांच्या बायका माझ्यासारखा संसाराचा आर्थिक भार उचलू शकत नाहीत, त्यांना कितीही सामाजिक कार्य करायचं असेल तरी पसे मिळवावे लागतात. त्यासाठी नोकऱ्या, व्यवसाय, प्रसंगी मनाविरुद्ध तडजोडीही कराव्या लागतात, ही वस्तुस्थिती आहे.’ नवरा-बायकोत लग्न करताना ‘नवऱ्यानं सामाजिक कार्य करायचं आणि बायकोनं कमवायचं’ हे जरी ठरलं असलं तरी प्रत्यक्ष संसारात पडल्यावर त्या भूमिका नेमक्या कशा निभावल्या जातात, यावर लेखिकेनं अतिशय महत्त्वाचं भाष्य केल्याचं आढळतं. पुरुष कितीही समानतेच्या विचारांचा असला तरी त्याच्यावरचे पुरुषी संस्कार खोलवर रुजलेले असतात. शिशिर एकदा मनातल्या मनात म्हणतो, ‘ग्रीष्मा, माझ्या हेतूबद्दल शंका घेते असं म्हणता येणार नाही. पण ती ज्या चिकित्सक पद्धतीनं माझ्या बोलण्याची, वागण्याची उलटतपासणी करते ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे माझी नाराजी आणि चिडचिड वाढते. तिचा हेतू चांगला असेल, पण मीच तिच्याकडे वाकडय़ा नजरेनं बघत असेन.’ म्हणजे कळतं, पण वळत नाही.. ही पुरुषाची मानसिकता अनेकदा समोर येते.

शरद आणि वासंती हे यातलं वेगळं जोडपं. दोघं सख्खे आते-मामे भावंडं. शरद अतिशय बुद्धिमान, उच्चशिक्षित, सामाजिक विचारांनी भारावलेला मुंबईतील तरुण प्राध्यापक. तर वासंती रूपवान, शांत, गृहकृत्यदक्ष बेळगावची साधी मुलगी. तारुण्यात तिची बायको म्हणून निवड करताना त्याला वाटलं होतं, की मुंबईत हिला पुढचं शिक्षण घ्यायला लावून आधुनिक विचारांची बनवता येईल. परंतु तिचा पिंड मुळातच तो नाही. त्याच्या इतर मित्रांच्या बायका तिला मंगळसूत्र घालण्यावरून टोकतात तेव्हा ती ठामपणे सांगते, ‘केवळ मंगळसूत्र घातल्यामुळे कुणी कुणाचं गुलाम होतं आणि ते न घातल्यामुळे आपली स्वतंत्र ओळख, स्वातंत्र्य कायम राहतं असं मला वाटत नाही. गुलामीची भावना भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या मनातच निर्माण होत असते. ती होऊ द्यायची की नाही, हेही आपल्या मनात असतं. तुमच्यासाठी जी गुलामी आहे ती माझ्यासाठी माझ्या आई, आजीनं दिलेली प्रेमाची भेट आहे.’ एका वरवर साध्या वाटणाऱ्या स्त्रीच्या विचारसरणीतले बारकावे फार सुरेख मांडले आहेत. पुढे शरदला त्याच्या सहकारी मत्रिणीबरोबर लग्न करावंसं वाटतं. वासंती कुठलाही आक्रस्ताळा विरोध न करता ते स्वीकारते आणि लग्नानंतर पंचवीसेक वर्षांनी त्यांचा घटस्फोट होतो. ही घटना त्यांच्या समविचारी मित्रांना मुळीच पटत नाही. त्यांना मित्राचा राग आणि वासंतीविषयी सहानुभूती वाटते. पण ती अतिशय खंबीर राहते. ती कविता लिहीते याचा शोध त्यांना आता लागतो. ते तिचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. वासंतीनं लिहिलेल्या अनेक अप्रतिम कविता यात आहेत. ते भावनांचं प्रकटीकरण असलं तरी काव्य म्हणूनही त्याला दाद द्यायला हवी.

या साऱ्या व्यक्तिरेखा डोळय़ासमोर अक्षरश: उभ्या राहतात. घटना-प्रसंगांत आपण गुंतून जातो. सांसारिक पदर उलगडून दाखवणं अतिशय स्पष्ट आणि तरीही तरल. भाषा थेट पोचणारी. मात्र, काही ठिकाणची पुनरावृत्ती टाळता आली असती तर अधिक गोळीबंद परिणाम साधता आला असता असे वाटते. तरी एक उत्तम कादंबरी वाचल्याचं समाधान ही कादंबरी निश्चित देते.

  • ‘..के हर ख्वाहिश पे’- अरुणा देशपांडे,
  • राजहंस प्रकाशन, पृष्ठे- २८३,
  • मूल्य- ३५० रुपये.

 

 

वास्तवाचा स्पर्श असलेले विनोदी लेखन

‘विनोदी लेखक हा एक महान टवाळखोर असतो. जे टवाळी करण्यासारखे आहे ते नेमके हेरणे आणि त्याला आनंदस्वरूप देणे, हे तो करत असतो.’ – हे कवयित्री इंदिरा संत यांचे विनोदी लेखनासंबंधीचे अवतरण विश्वास वसेकर लिखित ‘गालातल्या गालात..’ या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठावर वाचायला मिळतेच; पण वसेकर यांच्या या पुस्तकातील लेख वाचले, की त्याचा प्रत्ययही येतो. कवितेबरोबरच ललित गद्यप्रकारात लेखन केलेल्या वसेकरांनी विनोदी लेखनप्रांतातही मनसोक्त मुशाफिरी केली आहे. या आधी त्यांची ‘बांडगुळे’, ‘विश्वासाचा वसा’, ‘कलमी कविता’ ही विनोदी लेखनप्रकारातील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

‘गालातल्या गालात..’मध्ये वसेकर यांच्या विनोदी स्फुटलेखनाचा समावेश आहे. पहिला लेख आहे ग्रेस यांच्या कवितेविषयी! खरे तर हा लेख नव्हे, तर वगनाटय़ आहे. ग्रेस यांच्या कवितेची दुबरेधता हा मराठी काव्य- रसिकांमधील चर्चेचा विषय. या चर्चेभोवतीच वसेकर यांनी ‘ग्रेसच्या कवितेचा अर्थ’ हा वग रचला आहे. समकालीन साहित्यचर्चेचे हे विडंबन प्रचंड वाचनानंद देणारे आहे. याशिवाय ‘नेमाडपंथी देवळे’, ‘बायकी कवी’, ‘तुच्छतावादी’, ‘कविता ऐकवण्याचा सोस’ हे पुस्तकातील इतर लेखही साहित्यजगताच्या विडंबनाचे उत्तम नमुने ठरावेत.

पुस्तकातील काही लेख हे विनोदी लेखन, भाषानिष्ठ विनोद यांच्याभोवती फिरणारे आहेत. ‘अदबशीर भाषा’, ‘नावात काय आहे?’, ‘पीजे’, ‘कोटय़ा’, ‘कोटय़ा आणि ब्रह्मानंद देशपांडे’, ‘घराची नावं’, ‘भावार्थथिपिका’ हे त्यापैकी काही लेख. भवतालातली उदाहरणे देत या लेखांत साधलेला विनोद वाचकाला खदाखदा हसायला लावणारा आहे. याशिवाय वादग्रस्त ठरलेला ‘ब्राह्मण’ हा लेख असो वा ‘आपण- विदेशी नजरेतून’, ‘मै भरके चली जाऊंगी’, ‘भिकाऱ्यांच्या तऱ्हा’, ‘हवा.. एकेका गाण्याची’ यांसारख्या लेखांतून लेखकाच्या विनोददृष्टीचा प्रत्यय येतो. थोरा-मोठय़ांचे किस्से, आठवणी सांगत वास्तवाचा स्पर्श असणारे विनोदी लेखन करण्याकडे वसेकरांचा कल आहे. त्याचा आस्वाद आवर्जून घ्यायलाच हवा.

  • ‘गालातल्या गालात..’- विश्वास वसेकर,
  • दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.,
  • पृष्ठे- १४४ , मूल्य- १८० रुपये.