02 March 2021

News Flash

ऐतिहासिक चरित्रग्रंथ

हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने अफाट परिश्रम घेतल्याचे जाणवते.

‘महाराणा प्रताप- एक ऐतिहासिक अध्ययन’ हे डॉ. नरसिंह परदेशी-बघेल यांचे पुस्तक राजपुतांच्या आणि विशेषत: महाराणा प्रताप यांच्या कारकिर्दीविषयी सविस्तर माहिती देते. इतिहासाविषयी ज्यांना जिज्ञासा आहे अशा सगळ्यांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने अफाट परिश्रम घेतल्याचे जाणवते. महाराणा प्रताप यांची समकालीन कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट लेखकाने अभ्यासले आहेत. अभ्यासात आणि लेखनात त्रुटी राहायला नको म्हणून महाराणा प्रताप यांच्याशी संबंधित किल्ले, अरवलीचा दुर्गम प्रदेश, जेथे जेथे मुघल-राजपूत युद्धे झाली तो प्रदेश, त्याच्या चोरवाटा, राणांची जंगलातील आश्रयस्थाने, गुहा या सगळ्या स्थळांना भेटी देऊन लेखकाने मांडणी केलेली आहे. समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांची जोड या अभ्यासाला दिल्यामुळे हे लेखन अधिक विश्वासार्ह झाले आहे.

२० प्रकरणे, सहा परिशिष्टे, रंगीत छायाचित्रे यांमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचकाचे लक्ष वेधून घेते. राणा प्रतापांबरोबर कायम राहिलेल्या आणि स्वत:चे जीवन राजस्थानसाठी अर्पण केलेल्या राजा रामशाह तंवर यांना पुस्तक अर्पण करून लेखकाने एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे. ‘राणा प्रताप- ऐतिहासिक संदर्भ साधने’ या प्रकरणात लेखकाने फारसी साधने, संस्कृत साधने, राजस्थानी साहित्य, शिलालेख, ख्यात आणि वंशावळी, भजन, देवालय आणि चित्रे, ग्रंथसंपदा यांचा सविस्तर आढावा घेतला आहे. पहिल्या प्रकरणात मराठी वाचकांना अपरिचित असणारा ‘डय़ोढी’ शब्द आला आहे. त्याचा अर्थ ‘राजदरबारात उपस्थित राहण्यास बंदी’  असा आहे, तो पुस्तकात द्यायला हवा होता. ख्यात, वंशावळी आणि चारण गीत अशा राजस्थानी भाषेतील साहित्याचा आढावा घेतला आहे. ख्यातला आपल्याकडे बखरी म्हणतात. या संदर्भ साहित्याचा लेखकाने त्यांच्या मर्यादांसकट आढावा घेतला आहे.

महाराणा प्रताप यांची कारकीर्द समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या पूर्वजांचा पराक्रम समजून घेण्यासाठी ‘भौगोलिक व ऐतिहासिक पाश्र्वभूमी’ हे प्रकरण महत्त्वाचे आहे. सम्राट अकबराच्या कारकीर्दीवर डाग लावणारी चितोडगडावरील कत्तलीची घटना यात सविस्तरपणे दिली आहे. ‘राणा प्रताप : प्रारंभिक कालखंड’ या प्रकरणात महाराणा प्रताप कायम दोन तलवारी का बाळगत होते, याचे उत्तर मिळते. ते असे : ‘त्यांच्या आईने त्यांना शत्रूची तलवार तुटल्यास त्याला स्वत:कडील दुसरी तलवार देण्यास सांगितले होते.’ या माहितीने महाराणांच्या व्यक्तिमत्त्वावर एक वेगळाच प्रकाश पडतो. ‘राजपुतानाच्या परंपरेनुसार राजाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्या युवराजाने उपस्थित राहू नये’ अशी प्रथा असल्याचा उल्लेख याच भागात आला आहे. अशा प्रथा का पडल्या असतील, याचा शोध घेणे आवश्यक आहे.

‘बादशहा अकबराचे संधी प्रस्ताव’ या प्रकरणात अकबराला मेवाड भाग जिंकणे का आवश्यक होते, याची आर्थिक पाश्र्वभूमीसह माहिती दिली आहे. इतिहासाच्या पाठय़पुस्तकांत ही माहिती अनेकदा येत नाही. ऐतिहासिक घटनांच्या मागे आर्थिक प्रेरणा कारणीभूत असतात, हे या निमित्ताने समजते. ‘हळदीघाटी युद्ध’ या प्रकरणात या भागाला ‘हळदीघाटी’ का म्हणतात, याचे स्पष्टीकरण आहे. पहाडी घाटांमध्ये एका घाटीत पिवळसर माती निघत असल्याने त्याला ‘हळदीघाटी’ हे नाव पडले. इतिहासाच्या पाठय़पुस्तकांमध्ये ही माहिती यायला हरकत नाही. ज्या मार्गाने राणा प्रताप गेले त्याच मार्गाने लेखकसुद्धा गेला. हा अनुभव घेतल्यामुळे लेखकाला काही ऐतिहासिक प्रमाणे सिद्ध करता आली, काही खोडून काढता आली.

‘हळदीघाटीचे निर्णायक युद्ध’ या भागात मुघल आणि राजपूत सैन्याच्या संख्येसंबंधी सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे. अशा स्वरूपाचे विवेचन केल्याशिवाय लढायांचे खरे स्वरूप लक्षात येत नाही. राणा प्रताप यांनी हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना जाण्यात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेतली, हे वाचल्यावर आपल्या मनातील राणा प्रताप यांच्याविषयीचा आदर आणखी वाढतो. लेखकाने अशा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून राणा प्रताप यांचे व्यक्तिमत्त्व खुलवत नेले आहे. अब्दुल रहिम खान खाना या मुघल सरदाराने महाराणा प्रताप यांच्या सन्मानार्थ रचलेल्या दोह्य़ाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : ‘धर्म, धरती व आकाश आहे तोपर्यंत राणाची कीर्ती अमर आहे. ती चहू दिशांना पसरेल, पण खुरसान (खान खाना) मात्र निघून जाईल.’ हा दोहा रचण्याचे कारण म्हणजे राणा प्रताप यांच्या सैनिकांनी खान खाना यांच्या छावणीवर हल्ला करून त्यांचा खजिना ताब्यात घेतला व तिथल्या स्त्रियांना कैद केली. मात्र अत्यंत सन्मानपूर्वक राणा प्रताप यांनी त्यांना परत पाठविले.

वरील कथांच्या जोडीने राणा प्रताप यांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक भ्रमही लेखकाने दूर केले आहेत. ‘जोपर्यंत मी चितोड घेणार नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या ताटात जेवण्याऐवजी झाडाच्या पानांवर भोजन आणि पलंग किंवा गादीऐवजी गवताच्या गादीवर झोपेन’ या प्रतिज्ञेस कोणताही आधार नाही हे लेखकाने सिद्ध केले आहे. राणा प्रताप यांचे मोठेपण कशात आहे? ‘राणा प्रतापांनी हळदीघाटी युद्धानंतर जवळपास एकवीस वर्षांचा कालावधी अरवली पर्वतांच्या विजनवासात काढला होता. मात्र या काळात एकाही भिल्ल व्यक्तीने शत्रूला त्यांच्या वास्तव्याची माहिती देऊन त्यांच्याशी दगलबाजी केली नव्हती.’

लेखकाने राणा प्रताप यांचे विविध क्षेत्रांतील कार्य अनेक संदर्भ देऊन स्पष्ट केले आहे. मराठी भाषेत राणा प्रताप यांना न्याय देणारा हा ग्रंथ आहे, यात शंका नाही.

–  डॉ. गणेश राऊत

‘महाराणा प्रताप : एक ऐतिहासिक अध्ययन’- डॉ. नरसिंह परदेशी-बघेल

 मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,

 पृष्ठे- २३०, मूल्य- ३०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 1:46 am

Web Title: loksatta book review 3
Next Stories
1 पळस फुलला..
2 एप्रिल फूल गुगलताई!
3 सत्योत्तरी ‘विप्रलाप’..
Just Now!
X