डॉ. एस. एल. भरप्पा नावाच्या महावृक्षाची मुळं कर्नाटकाच्या मातीत रुजलेली असली तरी त्यानं संपूर्ण भारतीय भूमी व्यापली आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. भारतातल्या जवळपास सगळय़ा प्रादेशिक भाषांखेरीज संस्कृत आणि इंग्रजीमध्येही त्यांच्या लेखनाचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर पुरस्कारप्राप्त चित्रपट निघाले आहेत आणि त्यांच्या साहित्याविषयी उदंड समीक्षात्मक लेखनही झालं आहे. कन्नडसारख्या एका प्रादेशिक भाषेत लेखन करूनही देशातल्या आणि देशाबाहेरच्या वाङ्मयविश्वात खऱ्या अर्थानं अढळ स्थान मिळवणारे भरप्पांसारखे समकालीन साहित्यिक मोजकेच असतील. अर्थात, अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून भरप्पांनी कन्नड भाषा निवडली असली तरी त्यांच्या तत्त्वज्ञ लेखणीनं माणसाच्या जगण्याचा, जगण्याची वीण घट्ट करणाऱ्या मूल्यांचा, त्याच्या नेणीव आणि जाणिवेत उसळणाऱ्या अनेकानेक आवेगांचा, कला आणि मूल्यं यांच्यातल्या उत्कट नात्याचा आणि जगण्याची रीत म्हणून उदय पावलेल्या धर्मसंकल्पनेचा जो विशाल पस वाचकांसमोर उलगडला आहे, तो बघता भरप्पा ‘भारतीय लेखक’च ठरतात.

या भारतीय साहित्यकाराची ओळख मराठी वाचकांना करून दिली ती डॉ. उमा कुलकर्णी यांनी. डॉ. शिवराम कारंत, यू. आर. अनंतमूर्ती, कृष्णमूर्ती पुराणिक, पूर्णचंद्र तेजस्वी, डॉ. गिरीश कार्नाड, वैदेही, त्रिवेणी, सुधा मूर्ती यांसह इतर अनेक कन्नड साहित्यिकांचं लेखन त्यांनी मराठीत अनुवादित केलं असलं तरी भरप्पांच्या साहित्याशी त्यांची नाळ अधिक घट्ट जुळलेली आहे. त्यांनी संपादित केलेलं ‘भरप्पा साहित्य : मराठी समीक्षा’ हे पुस्तक याला पुष्टी देणारंच आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात भरप्पांच्या मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांविषयीच्या पंधरा निबंधांचा समावेश आहे. याखेरीज भरप्पांची उमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि बंगलोरमधल्या कनकपुरा इथे १९९९ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय कन्नड साहित्यसंमेलनात भरप्पांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संक्षिप्त अंशही पुस्तकात समाविष्ट आहे. डॉ. द. दि. पुंडे यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. २००३ साली पुणे विद्यापीठात भरप्पांच्या कादंबऱ्यांवर झालेल्या चर्चासत्रात वाचण्यात आलेले आणि नंतर प्रसिद्धही झालेले निबंध आणि काही आवर्जून नव्यानं लिहून घेतलेले निबंध या पुस्तकात एकत्र आले आहेत.

‘माझं नाव भरप्पा’ या भरप्पांच्या आत्मचरित्रावरचा डॉ. अंजली जोशी (मुंबई) यांचा लेख भरप्पा या व्यक्तीचा मानसशास्त्रीय अंगाने शोध घेणारा आहे. भैरप्पांचं खडतर बालपण, कुटुंबातल्या आणि परिचयातल्या व्यक्तींसोबतचं त्यांचं नातं, अत्यंत कटू अनुभवांविषयी लिहितानाही संयत राहणारी त्यांची लेखणी, आत्मप्रगटीकरणाच्या वाटेवरचा त्यांचा प्रवास, त्यांना भेटलेल्या गुरुतुल्य व्यक्ती, त्यांनी घेतलेला स्वत्वाचा शोध या सगळय़ातून स्पष्ट होणारी त्यांची उच्च बुद्धिमत्ता, अत्यंत उत्कट भावनिक संवेदनशीलता, पारदर्शी बुद्धिप्रामाण्यवाद, पराकोटीची नतिकता डॉ. जोशी यांनी उलगडून दाखवली आहे. आक्रस्ताळेपणा, पश्चात्ताप, आत्मकरुणा अशा आत्मनाशी भावनांपासून स्वत:ला कायम दूर ठेवणाऱ्या भरप्पांनी स्वत:च्या वैवाहिक जीवनाविषयी केलेल्या त्रोटक उल्लेखांचं मानसशास्त्रीय विश्लेषणही त्यांनी या निबंधात केलं आहे. या पुस्तकात ‘काठ’ या कादंबरीची डॉ. जोशी यांनीच केलेली चिकित्साही समाविष्ट आहे. विवाहबाह्य़ संबंधानं जोडल्या गेलेल्या दोन व्यक्तिरेखांमधले भावनांचे अनेक तरल पदर, त्यांची अस्सलता, त्या दोघांमधली सहभावना आणि समजूत, परस्परांचा त्यांनी केलेला बिनशर्त स्वीकार यांची उकल करताना, भरप्पांना खुणावणारी माणसाच्या ‘आत्मशोधाची वाट’ या निबंधात डॉ. जोशी यांनी अधोरेखित केली आहे.

‘धर्मश्री’ या कादंबरीतून भरप्पांनी उलगडून दाखवलेला तरुण पिढीच्या मनातला धर्मविषयक संभ्रम, धर्मातरानंतरचा प्रचंड वैचारिक गुंता आणि समर्पणाचा भक्कम पाया असलेलं धर्मनिरपेक्ष प्रेम यांसंबंधी भाष्य करणारा डॉ. अंजली जोशी (पुणे) यांचा लेख या पुस्तकात आहे. कामवासना आणि संगीत यांचा परस्परातून होणारा आविष्कार, स्त्री आणि पुरुष यांच्यातलं आदिम नातं, कलावंत आणि माणूस यांच्यातलं द्वंद्व यांचा ‘मंद्र’ या शोकांतिकेतून येणारा प्रत्यय स्पष्ट करणारा डॉ. जोशी (पुणे) यांचा आणखी एक लेख या पुस्तकात आहे. या कादंबरीतून जाणवणारे कला आणि कलाकार यांच्यातल्या नात्याचे अनेक पदर प्रा. अनंत मनोहर यांच्या लेखातूनही स्पष्ट झालेले दिसतात. वंश या हिंदू जीवनसंकल्पनेचा वेध घेणाऱ्या ‘वंशवृक्ष’ या कादंबरीची समीक्षा डॉ. मृणालिनी शहा आणि डॉ. अनंत गणेश जावडेकर या दोघांनी केली आहे. तर नैसर्गिक सृष्टी व तिच्या घटकांकडे पाहण्याचा पारंपरिक भारतीय दृष्टिकोन आणि चलन मिळवून देणारं साधन म्हणून त्यांच्याकडे पाहणारा व्यावसायिक दृष्टिकोन यांच्यातला संघर्ष स्पष्ट करणाऱ्या ‘पारखा’ या कादंबरीचं विश्लेषण डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे आणि आरती अरुण देवगावकर या दोन्ही अभ्यासकांनी आपापल्या पद्धतीनं केलं आहे. इतिहासाकडे सत्यान्वेषी दृष्टीने पाहणाऱ्या आणि ‘हिंदुत्ववादी’ म्हणून टीका झालेल्या ‘आवरण’ या कादंबरीतून सामथ्र्य आणि सिद्धान्त, चळवळी आणि आदर्श यांच्या गुंत्यातून स्वत:ला मुक्त करून वास्तवाकडे तटस्थपणे पाहण्याचा भरप्पांचा आग्रह याविषयीचं डॉ. सहस्रबुद्धे यांचं विवेचनही या पुस्तकात आहे.

रूढार्थानं भारतीय युद्धावर आधारलेल्या, पण या महाभारत कथेपलीकडे जाऊन युद्ध या संकल्पनेचा, भिन्न प्रकृतीच्या लोकसमूहांच्या परस्पर संबंधांचा, स्त्री-पुरुष संबंधांचा, विवाहसंस्था आणि बदलत जाणाऱ्या मूल्यव्यवस्थेचा, धर्मव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचा विशाल पस कवेत घेणाऱ्या ‘पर्व’ या भरप्पांच्या महाकादंबरीचा वेध डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. महाभारतातल्या व्यक्तिरेखा बारकाईनं रंगवणारा प्रतिभावंत चित्रकार, या व्यक्तिरेखांचा मनोव्यापार उलगडून दाखवणारा मानसतज्ज्ञ आणि भोवतीच्या जीवनातून जन्मणाऱ्या तत्त्वज्ञानाचा अदमास घेणारा सहृदय तत्त्वज्ञ असे भरप्पांचे अनेक पलू त्यांनी स्पष्ट केले आहेत.

भरप्पांच्या या ठळक कादंबऱ्यांखेरीज ‘परिशोध’ (नीलिमा पालवणकर), ‘जा ओलांडूनी’ (डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर), ‘तंतू’ (विवेक जोग), ‘तडा’ (डॉ. लतिका जाधव) या कादंबऱ्यांची समीक्षाही या पुस्तकात समाविष्ट आहे. डॉ. उमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या सविस्तर मुलाखतीतून आणि त्यांच्या कनकपुरा इथल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून भरप्पांच्या जीवनदृष्टीचा प्रत्यय तर येतोच, पण एका प्रतिभावंत लेखकाची निर्मितिप्रक्रिया, ‘लिहित्या’ शब्दांचं त्याला वाटणारं महत्त्व, अनुभवाला साहित्यकृतीचं रूप देताना त्याच्या मनात उमटणारी अलिप्तता, हिंदुत्ववादी म्हणून होणाऱ्या टीकेचा भरप्पांनी घेतलेला परामर्श, समाजातली सहिष्णुता वाढीला लागण्यासाठी आणि अम्लान रसानुभव घेण्यासाठी कुठलीही विशिष्ट विचारसरणी दूर ठेवून साहित्याकडे केवळ साहित्य म्हणून पाहण्याचा त्यांचा आग्रह याचंही प्रत्ययकारी दर्शन घडतं. भरप्पांच्या साहित्याच्या समीक्षेला मिळालेली त्यांच्या थेट आणि पारदर्शी विचारांची ही जोड व्यक्ती आणि साहित्यिक भरप्पा यांच्यातलं अद्वैत स्पष्ट करणारी आहे.

मुळात भरप्पांचं साहित्य मराठीत आणून मराठी साहित्यविश्व आणि मराठी वाचक या दोहोंना समृद्ध करणाऱ्या डॉ. उमा कुलकर्णी यांनी ‘भरप्पा साहित्य : मराठी समीक्षा’ या संपादनाद्वारे भरप्पांच्या साहित्याचं समग्र दर्शन तर घडवलं आहेच, पण त्याच्या बरोबरीनं या तत्त्वज्ञ लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचेही कवडसे पकडले आहेत. आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण असणाऱ्या या पुस्तकात काही लेखांमध्ये ग्रांथिक आणि बोलीभाषेची सरमिसळ, थोडीशी विस्कळीत वाक्यरचना, मुद्रितशोधनाचे दोष यांसारख्या किरकोळ उणिवा राहिल्या आहेत. संपादकीय संस्कार अधिक बारकाईनं झाले असते आणि निर्मितीही अधिक देखणी असती तर पुस्तक सर्वार्थी परिपूर्ण झालं असतं, असं वाटतं.

‘भरप्पा साहित्य : मराठी समीक्षा’

संपादन – उमा कुलकर्णी,

कॉन्टिनेन्टल प्रकाशन,

पृष्ठे – १९९, मूल्य – २०० रुपये.