News Flash

तरल वळणाची गज़ल

नुकताच सुधीर कुबेर यांचा ‘झेलताना चांदवा’ हा गज़लसंग्रह प्रकाशित झाला आहे.

|| रमण रणदिवे

गज़ल अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दूत आली. मराठीत गज़ल आणण्याचे श्रेय माधव ज्यूलियनांकडे जाते. मात्र माधवरावांची गज़ल मराठीत तग धरू शकली नाही, कारण त्यांनी शेराच्या स्वयंपूर्णतेकडे आणि संज्ञाप्रवाहाकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. त्यानंतर मात्र  १९५६-५७ साली सुरेश भट नावाचा एक झंझावात मराठी गज़ल काव्यप्रांतात अवतरला. मराठी प्रतिमा, प्रतीके वापरून त्यांनी मराठी गज़ल लोकप्रिय केली. साहजिकच भटांच्या गज़लेकडे तरुण पिढी आकर्षित झाली. त्यातलेच एक नाव म्हणजे- गज़लकार सुधीर कुबेर!

नुकताच सुधीर कुबेर यांचा ‘झेलताना चांदवा’ हा गज़लसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांच्या एकूण १९८ रचना आहेत. त्यात बव्हंशी गज़ल आहेत. विविध विषयांवर लिहिलेल्या या गज़ल निर्दोष आहेत. वियदगंगा, आनंदकंद, मंजुघोषा, भुजंगप्रयात आणि इतरही काही अल्पाक्षरी वृत्ते कुबेर यांनी वापरली आहेत. त्यातून त्यांचा व्यासंग जाणवतो.

शब्दांचे तरल वळण गिरवणाऱ्या व अव्यक्त मनाच्या तळघरापाशी घुटमळणाऱ्या अनुरागी संवेदना कुबेर यांनी समर्पक शब्दांत अभिव्यक्त केल्या आहेत. उदाहरणार्थ, पुढील ओळी पाहा-

‘मी तुझ्या श्वासातुन दरवळेन आसपास

रसगंधीत मासातुन घमघमेन आसपास

सूर्य नभी ढळल्यावर हो सदनी अंधकार

काजळय़ा पणतीसम मिणमिणेन आसपास’

प्रीतीची तरल भावना जेव्हा व्यंजित होऊन येते, तेव्हा त्या रचनेची गुणवत्ता शतपटीने वाढते.  दु:ख, संकटे आल्यावर माणूस उन्मळून पडतो. त्याला आप्त, सहकारी, कोणीही मदतीचा हात द्यायला तयार नसतात. कुबेर लिहितात-

‘घरटय़ासहित जळले माझेच रान आता

वनवास जीवनाचा झाला निधान आता

ऐकून घेतले मी त्यांचे जरी खुलासे

ना ऐकती कुणीही माझे विधान आता ’

गज़लेतील प्रत्येत शेर गोटीबंद असावा लागतो, त्यात प्रासादिकताही असावी लागते. अशा शेरांना उर्दूमध्ये ‘आमद’ म्हणतात. अन्यथा कारागिरी केलेल्या शेरांना ‘आवुर्द’ म्हणतात. ‘रदीफ’च्या बंधनामुळे कुबेर यांचे काही शेर कृत्रिम भासत असले तरी तशा जागा कमी आहेत. त्यांची गज़ल आशयसंपृक्त आणि जीवनाची व्यामिश्रता मांडणारी आहे.

ही गज़ल साचलेल्या सुखापेक्षा, वाहते दु:ख बरे आहे असे म्हणते. तिला तहान लागलेली असताना, तळे मात्र कुठेच दिसत नाही; मृगजळ तिला खरे भासते. आपल्या वेदना या आंधळय़ा जगाला कळाल्याच नाहीत, अशी तक्रार ती करते. माणसाच्या आतला माणूस कोणीच शोधत नाही. परंतु देवाचे दर्शन घेण्यासाठी हीच माणसे दूर दूर धावतात, यात्रा करतात, अशी खंत ही गज़ल व्यक्त करते. तिला जुने रुचत नाही, तसे नवेही पचत नाही.

गज़लचे बा निकष छंद, रदीफ, काफिया, इ. असले तरीही आंतरिक निकष सुबोधता, संप्रेषणीयता तथा तरलता हे आहेत. या निकषांवर कुबेर यांची गज़ल खरी उतरते.

  • ‘झेलताना चांदवा’ – सुधीर न. कुबेर,
  • कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
  • पृष्ठे- २०३, मूल्य- २२५ रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 12:10 am

Web Title: loksatta book review 9
Next Stories
1 आदिभारतीय परंपरेतला कलाधर्मी
2 यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक
3 जीवन गौरव : आनंदडोह
Just Now!
X