14 December 2017

News Flash

मराठी भाषेच्या वर्तमानाची चिकित्सा

मराठी प्रमाण लेखनाबाबत ऊहापोह केला आहे.

अनिल गोरे | Updated: October 8, 2017 3:06 AM

‘माझा मराठीचा बोलु कौतुके’ हा माधव राजगुरू यांच्यावरील गौरवग्रंथ डॉ. यशवंत पाटणे यांनी संपादित केला आहे. असे असले तरी या पुस्तकातील एकही लेख या गौरवग्रंथाशी संबंधित गौरवमूर्ती माधव राजगुरू यांच्याशी थेट संबंधित नाही. हे नावीन्यपूर्ण असले तरी गौरवमूर्तीचा त्रोटक, अत्यावश्यक परिचयदेखील या ग्रंथात नाही, ही महत्त्वाची त्रुटी ठळकपणे जाणवते. या ग्रंथाच्या संपादकीयात नमूद केल्यानुसार, मराठी भाषा, मराठी भाषक आणि मराठी भाषिकांचा एकूण जीवनव्यवहार यांवर माधव राजगुरू यांचे प्रेम असल्याने ‘मराठी’ या संज्ञेच्या आवाक्यात येणारा अधिकाधिक आशय १६६ पानांच्या चिमटीत पकडण्याचा चांगला प्रयत्न ग्रंथाचे संपादक डॉ. यशवंत पाटणे यांनी केला आहे.

मराठी भाषेचे अभिजात स्वरूप आणि स्वतंत्र अस्तित्व यांचा ऊहापोह डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि डॉ. हरि नरके यांच्या लेखांमधून आला आहे. सत्ता, संस्कृती व भाषा यांचे नाते कोत्तापल्ले यांनी बारकाईने उलगडून दाखवले असून, मराठीच्या विकासासाठी सत्तेच्या पाठबळाचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.

आजच्या व्यवहारी जगात भाषेचे जतन व संवर्धन यासाठी संगणक व भाषा यांची परस्पर सुलभता किती महत्त्वाची आहे यावर विवेक सावंत यांनी विवेचन केले आहे. मराठी व संगणक या संदर्भात आजवर झालेले काम व मराठीच्या खऱ्या विकासासाठी संगणकाची जोड मिळण्याबाबत अपेक्षित काम याची मुद्देसूद मांडणी सावंत यांनी सामान्यांना समजेल अशा भाषेत दिली आहे.

भाषांचे परिवर्तन कसे व किती अटळ असते या बाबत प्रत्यक्ष अनुभवाने व पत्रकारितेतील सर्वसमावेशक बदल जाणणाऱ्या डॉ. महावीर जोंधळे यांच्या लेखातून स्पष्ट होते. शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांनी सर्व विद्याशाखांमधील उच्चशिक्षणाचे माध्यम मराठी असावे, असा प्रतिपादन केले आहे. हा मराठीच्या विकासासाठी सवरेत्कृष्ट उपाय ठरेल. ‘उच्चशिक्षण मराठीतून झाले की मराठी समृद्ध’ असा अनेकांचा समज आहे. पण विज्ञानाधारित आधुनिक विद्याशाखांचे उच्चशिक्षण मराठीतून झाले, की या विद्याशाखाच अधिक समृद्ध होतील, हे गावडे यांचा लेख वाचून जाणवते.

प्रगत संगणन केंद्र उपाख्य सी-डॅक या संस्थेतील महेश कुलकर्णी यांनी मराठी उत्कृष्टता केंद्र व मराठीच्या प्रमाणीकरणाची आवश्यकता या बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांच्या लेखात केले आहे. जग जितके आधुनिक होत जाईल तितकी मराठीही संगणकाच्या साहाय्याने आधुनिक होईल, असा विश्वास ते व्यक्त करतात.

विलास खोले, रमेश धोंगडे, अशोक ठाकूर, राजशेखर शिंदे यांनी मराठी भाषेच्या सर्वात महत्त्वाचे अंग असलेल्या कोशवाङ्मयाची समृद्धी अचूक टिपली आहे. भूतकाळात समृद्ध असलेले कोशनिर्मिती क्षेत्र सध्या रोडावल्याची खंतही या ज्येष्ठ अभ्यासकांनी नेमकी मांडली आहे. कोशनिर्मितीत अधिक विविधता, शिस्त व उपयोगिता असावी, हे या सर्वानी अधोरेखित केले आहे.

ग्रंथाच्या अखेरच्या भागात मराठी प्रमाण लेखनाबाबत ऊहापोह केला आहे. स्वत: गौरवमूर्ती माधव राजगुरू आणि मराठी व्याकरणाच्या तपस्विनी तज्ज्ञ सत्त्वशीला सामंत यांच्या दोन छोटेखानी लेखांत व्याकरणाचे विविध पैलू व अंगभूत समस्या यांचा ऊहापोह आढळतो.

एकूणच मराठी घरात जन्मलेल्या नागरिकांनी मराठीचा बोल कौतुकाने उच्चारावा, अशी आग्रही व प्रेमळ मागणी हे पुस्तक करीत आहे. केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे, तर जगभरातील प्रत्येक भाषिक कार्य सुलभतेने व तुलनेने कमी वेळात करण्याची क्षमता मराठी भाषेच्या अंगी आहे. मराठी भाषेची व्यापकता, समृद्धी, संपन्नता, ओघवते स्वरूप आणि उज्ज्वल भवितव्य यांचे यथास्थित विवेचन करणारा हा गौरवग्रंथ सर्व मराठी भाषकांसाठी संग्रहणीय आहे.

मराठीचे गतवैभव आठवतानाच मराठीला पुन्हा अधिक वैभवी स्थितीत नेण्यासाठी, मराठीला एक प्रमुख जागतिक भाषेचे स्थान मिळण्यासाठी या ग्रंथात विविध मान्यवरांनी सुचवलेले उपाय पुरेसे ठरतील, यात शंका नाही. जगातील प्रमुख भाषांपैकी एक असलेल्या मराठीचा वापर तरुण पिढीने करून घ्यावा, यासाठी या गौरवग्रंथातील विचार तरुण वर्गापर्यंत पोचणे आवश्यक व उपयुक्त ठरेल, असे वाटते.

अलीकडच्या काळात वृत्तपत्रीय, ललित तसेच वैचारिक लेख वाचताना अपवाद वगळता अनेक मुद्रणदोष आढळतात. या गौरवग्रंथात मात्र कोठेही मुद्रणदोष दिसत नाही. लेखांची निवड, लेखांचा क्रम यांकडे लक्ष देतानाच संपादकांनी तितकाच काटेकोरपणा नियमबद्ध लेखनाबाबतही दाखविला आहे. ‘माझा मराठीचा बोलु कौतुके’ हा गौरवग्रंथ अनेकांनी ‘वाचू कौतुके’ अशी भूमिका घेऊन वाचावा, असे सुचविल्यावाचून राहवत नाही.

‘माझा मराठीचा बोलु कौतुके’

संपादक- यशवंत पाटणे,

सुविद्या प्रकाशन,

पृष्ठे- १६६, मूल्य- १६० रुपये.

– अनिल गोरे

First Published on October 8, 2017 3:06 am

Web Title: loksatta book review mazya marathichi bolu kautuke