संपर्क माध्यमांच्या या युगात आंतरजालाचे (इंटरनेट) महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशी-परदेशी साहित्याचा आस्वाद घेणे जसे या जालामुळे शक्य झाले आहे, तसेच पाश्चात्त्य संगीत, नृत्य, नाटय़ाचा रसास्वाद घेणेही शक्य झाले आहे. सिंफनी, ऑर्केस्ट्रा, ऑपेरा, बॅले यांचाही घरबसल्या मनसोक्त आस्वाद घेणे ही आज सहजसाध्य गोष्ट झाली आहे. ही सहजसाध्य गोष्ट आता ‘ऑपेराच्या गोष्टी’ बनून अनुवादक श्रीकृष्ण पंडितांनी वाचकांसाठी पुस्तकरूपाने सादर केली आहे.

श्रीकृष्ण पंडित हे भारतीय आणि पाश्चात्त्य अभिजात संगीताचे भोक्ते आहेत. सिंफनी, ऑर्केस्ट्रा, ऑपेरा यांची ध्वनिमुद्रणे ऐकण्याच्या छंदातून त्यांनी ऑपेरांच्या कथांचा शोध सुरू केला आणि मग त्यांच्या हाती गाजलेल्या ऑपेरांच्या स्वतंत्र कादंबरिकांचा खजिनाच लागला. त्याआधारे कहाणी, कथा, गोष्ट, लोककथा, दीर्घकाव्य अशा विविध रूपांमधून प्रवास करत करत ‘ऑपेरा’ या स्वरूपात तो कसा सादर होत गेला, तो कुणी लिहिला, कुणी व कसा संगीतबद्ध केला, या साऱ्याचा वेध लेखकाने यात घेतला आहे.

‘ऑपेराच्या गोष्टी’मध्ये तीन कादंबरिकांचा अनुवाद आहे. डॉन पेद्रो अंतोनीओ द अलार्कोन इ अरीझा या लेखकाची ‘तीन टोकी हॅटची कथा’, जोसेफ बेदिएची ‘ट्रिस्टन आणि इसोल्डा’ व प्रॉस्पर मेरिमीची ‘कारमेन’ या त्या तीन कादंबरिका आहेत. मुळात या कादंबरिका स्पॅनिश आणि फ्रेंच भाषेतल्या आहेत.

‘तीन टोकी हॅटची कथा’ या डॉन पेद्रो या स्पॅनिश लेखकाने लिहिलेल्या कादंबरिकेची मुळे ‘रेपेला’ नावाच्या मेंढपाळाने सांगितलेल्या लोकप्रिय लोककथेची आहेत. आणि म्हणून अशा कथेची जी निवेदनशैली असते- आख्यान सांगितल्याप्रमाणे गोष्टीचा ओघ कायम ठेवत हकीकत सांगण्याची  पद्धत- त्यानुरूप या कथेचा बाज आहे. अशा कथांमध्ये जशी शिकवण आणि उपसंहार असतो, तसेच इथेही आहे. स्पॅनिश वाङ्मयात अशा कथाख्यानाला ‘पिकारो’ म्हणतात. साधारणत: अठराव्या शतकातल्या उत्तरार्धातली ही कथा आहे. ‘गव्हर्नर साहेब आणि चक्कीवाल्याची बायको’ असे त्याचे मूळ आणि सन्माननीय प्रेक्षकांसाठी- श्रोत्यांसाठी त्याचे भारदस्त नाव : ‘तीन टोकी हॅटची कथा’!

स्पेनमध्ये अंदालूसियात घडलेली ही कथा. लुकास नावाचा एक द्राक्षांचा बागायतदार. त्याचा चक्कीचाही व्यवसाय आहे. दिसायला कुरूप; पण व्यवहारकुशल आणि संभाषणचतुर. सचोटीने, निष्ठेने जगणारा. चारित्र्य, नीतिमत्तेवर विश्वास असलेला. फ्रास्किता लुकास ही त्याची अत्यंत लावण्यखणी बायको. प्रेमळ, कामसू जोडपे म्हणून अंदालूसियात त्यांचा लौकिक. त्यांच्या द्राक्षांच्या बागेतल्या द्राक्षांवर जसा येणाऱ्या-जाणाऱ्यांचा डोळा असतो, तसाच लुकासच्या बायकोवर- फ्रास्कितावर गव्हर्नरसाहेबांचा (डॉन युजोनिओचा) डोळा आहे. गव्हर्नरचा उजवा हात- त्याचा बेलिफ विझट ऊर्फ विझ्झा फ्रास्किताला फशी पाडण्यासाठी सापळा रचतो. लंपट गव्हर्नर, त्याची सुंदर, कर्तृत्ववान बायको डोन्या मेर्सीदेस, लुकास आणि फ्रास्किता यांच्या वैवाहिक प्रेमसंबंधांतील विश्वासाची ही कथा आहे. पूज्य बिशपमहाराजही यात आहेत.

इ. स. १८९६ मध्ये हुगो वोल्फ या ऑस्ट्रियन संगीतकाराला या कथेने भुरळ पाडली आणि त्याने या कथेवर ऑपेरा लिहिला. मॅन्युअल द फाया या संगीतकाराने कादंबरीवरून बॅलेची रचना केली. हा स्पॅनिश संगीतकार होता. लिओनिद मॅसीन या प्रसिद्ध रशियन नर्तक आणि नृत्यरचनाकाराने नृत्यांच्या रचना केल्या. स्पेनमध्ये या बॅलेच्या प्रयोगांवर एका गटाकडून टीका झाली. या गटाचा रोष संगीतावर आणि अति-नवतेच्या भंपक प्रदर्शनावर होता. पण जसजसा काळ गेला, तसतसा हा बॅलेही अत्यंत लोकप्रिय होत गेला. नामांकित बॅलेमध्ये आज त्याची गणना होते. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या लंपट, लोभी कचाटय़ातून सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धा आणि निष्ठाच शेवटी त्यांना तारून नेतात.. अशा यातल्या संदेशामुळेच कदाचित ही कादंबरिका आणि बॅले लोकप्रिय झाला असावा.

दुसरी कादंबरिका आहे- ‘ट्रिस्टन आणि इसोल्डा’! अनेक रूपांमध्ये प्रचलित असलेली ही पुरातन लोककथा जोसेफ बेदिए यांनी फ्रेंचमध्ये आणली आणि सुप्रसिद्ध लेखक वॉल्टर स्कॉट, थॉमस मॅलरी, कविराज टेनिसन, मॅथ्यू अर्नोल्ड यांनीही आपापल्या शैलीत ती रंगवली. अशी अनेक प्रतिभावंतांना भुरळ घालणारी ही कथावस्तू शेवटी जर्मन संगीतरचनाकार रिचर्ड वाग्नर याने संगीतबद्ध केली आणि जगप्रसिद्ध संगीतिका म्हणून ती गाजली. ही शोकात्म प्रेमकथा आहे. ब्लॉशफ्लॉर आणि रिआले या दोन राजकुटुंबांतील युगुलाच्या प्रेमाची अखेर युद्धभूमीवर होते. ट्रिस्टन हा या कादंबरिकेचा नायक आहे आणि इसोल्डा ही नायिका. ट्रिस्टन म्हणजे दु:खात जन्माला आलेला. तो शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून रोहाल्ट हा राजसेवक त्याचा पालक मार्गदर्शक बनतो. त्याला लहानाचा मोठा करतो. राजपुत्राला अत्यावश्यक असणारे शिक्षण देतो आणि टिंटाजेलचा राजा मार्कला ट्रिस्टन हा त्याचा भाचा आहे, ही ओळख पटवून देतो. शूरवीर ट्रिस्टनवर मार्कचेही विलक्षण प्रेम आहे. पुत्रवत प्रेम आहे. पुढे ट्रिस्टनची प्रेयसी आणि मार्कची राणी एकच निघते- इसोल्डा. ट्रिस्टन आणि इसोल्डा एक अद्भुत पेय प्यायल्यामुळे एकमेकांवर अनुरक्त होतात आणि नियतीचा दुर्दैवी खेळ सुरू होतो, तो ट्रिस्टन-इसोल्डाच्या अंतापर्यंत! ट्रिस्टन आणि इसोल्डाचे संगीत पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत प्रांतात क्रांतिकारक आणि अत्युच्च दर्जाचे मानले जाते.

प्रॉस्पर मेरिमी या फ्रेंच इतिहासकार, पुरातत्त्ववेत्ता, नाटककार असलेल्या लेखकाची गाजलेली कलाकृती म्हणजे ‘कारमेन’ ही लघुकादंबरी. हीसुद्धा प्रेमकहाणीच आहे. डॉन होसे आणि जिप्सी तरुणी कारमेन यांच्या प्रेमसंबंधांची ही कथा आहे. कथा म्हटली म्हणजे गुंतागुंत, मानवी स्वभावांचे विविध कंगोरे, त्यातून निर्माण होणारा संघर्ष, अतक्र्य घटना असा मालमसाला आलाच. ‘कारमेन’मध्ये तो ठासून भरलेला आहे. जिप्सी संस्कृतीतल्या काही विशिष्ट संकेतांनी तर ही कथा अधिकच रंजक, गूढ झाली आहे. डॉन होसे या साध्यासुध्या, सरळमार्गी शिपाईगडय़ाचे अट्टल गुन्हेगारात कसे रूपांतर होते, आणि त्याच्या या स्थित्यंतरणाला कारमेनवरचे त्याचे प्रेम कसे कारण ठरते, हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. ‘कारमेन’ला विलक्षण लोकप्रियता लाभली, ती फ्रेंच संगीतकार बिझे यांच्या ‘कारमेन’ ऑपेरामुळे! सुरुवातीच्या काळात हा ऑपेरा जबरदस्त टीकेचा धनी झाला होता. कारण कारमेनची कथा प्रस्थापित मूल्यांविरुद्ध जाणारी होती. एका गुन्हेगार स्त्रीची ही प्रेमकथा आज दीडशे वर्षे होऊन गेली तरी जनमानसावर गारूड करून आहे. कारण कारमेन ही कोणतीही किंमत देऊन स्वत:चे स्वातंत्र्य जपणारी आणि स्वत: स्वीकारलेल्या मूल्यांसाठी प्राणपणाने झुंजणारी होती.

ऑपेराच्या या अनुवादित गोष्टी वाचकांसाठी नवीन आहेत, हे निश्चित. पण अनुवाद अधिक सुरस, सरस असता तर त्या अधिक रंजक, मनमोहक झाल्या असत्या. ज्या वाचकांना बॅले, ऑपेरा, बॅलड यासंबंधी काहीच माहिती नाही, अशांसाठी लेखकाने परिश्रमपूर्वक त्याबद्दलची परिशिष्टे दिली आहेत. ती थोडी रसग्रहणात्मक असती तर सर्वसामान्य वाचकांसाठी अधिक उपयुक्त ठरली असती. एखाद्या लोककथेचे कादंबरिका ते संगीतिका किंवा संगीत नाटक असे अवस्थांतरण कसे घडत/ बिघडत गेले, हा विषय सर्वस्वी नवीन प्रयोग आहे. प्रयोगाची यशस्वीता ही त्या कलाकृतीच्या अनुभूतीवर अवलंबून असते. प्रत्येक कलाकृतीची माध्यमानुरूप अनुभूती बदलत जाते. घटनाक्रमांची जाणीव हे कथानुभवाचे मुख्य अंग असते, तर तर्काधिष्ठित नसलेला अर्थपूर्ण, प्रतीकात्मक अनुभव कविता बनतो. काळाच्या विस्तृत संबंधातल्या निवेदनाने, वर्णनाने, स्पष्टीकरणाने कादंबरी होते, तर कृती-उक्तीच्या माध्यमातून अभिनय, संगीत, नृत्यातून जी अनुभूती जीवनदर्शन घडवते, ती नाटकरूपाने उभी राहते. हा अनुभूतींमधला समृद्ध करणारा फरक जर ‘ऑपेराच्या गोष्टी’मधून वाचकांपर्यंत पोहोचला असता तर या पुस्तकाचे मोल अधिक वाढले असते.

  • ऑपेराच्या गोष्टी
  • अनुवादक- श्रीकृष्ण पंडित
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- २४२, मूल्य- ३०० रुपये.

 

– डॉ. कल्याणी हर्डीकर

hardikarkalyani@gmail.com