24 November 2017

News Flash

सकारात्मक यशोकथा

इव्हा अथाव्हिया हिचे जीवन सर्वसामान्य मुलांसारखे होते

लोकसत्ता टीम | Updated: September 10, 2017 1:03 AM

आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत समाजात सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या काही दिव्यांगांच्या जिद्दीची कहाणी सांगणारे ‘ग्रेट दिव्यांग’ हे पुस्तक. इव्हा अथाव्हिया हिचे जीवन सर्वसामान्य मुलांसारखे होते, परंतु तिच्या सायकलचे चाक रेल्वेरुळात अडकल्याने झालेल्या अपघातात तिचे दोन्ही हात कोपरापासून वेगळे झाले. पण घरच्यांनी तिला साथ दिली आणि इव्हाने आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे तिने समाजसेवेमध्ये स्वत:ला गुंतवून घेतले आणि आज ती सेवाव्रती म्हणून जगत आहे. लहानपणी साधे तापाचे निमित्त होऊन सेरेब्रल पाल्सीचा शिकार झालेला सुनील दशपुत्रे याला आपल्या आजारपणावर मात करून स्वावलंबी बनायचे होते. त्याने ते स्वप्न पूर्ण केले आणि आज मुंबईच्या उपनगरांमधील अनेक अपंगांचा तो आधारवड बनला आहे. प्रसाद फणसाळकर तर महाविद्यालयीन जीवन हसतखेळत जगत होता. पण अचानक त्याला मस्क्युलरडिस्ट्रोफीने ग्रासले आणि तो एका जागीच खिळला. त्याचे आयुष्य एका व्हीलचेअरपुरते बंदिस्त झाले. पण संगणक प्रशिक्षण घेत त्याने आपल्या आयुष्याचे चित्रच बदलून टाकले. त्याने अपंगांना चालविता येणारी चारचाकी गाडी विकसित केली आणि त्यातूनच अपंगांनाही सहलीला जाता येईल अशा गाडीची समर्थ ट्रॅव्हल एजन्सी सुरू केली. सत्यप्रकाश तिवारी हा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूही असाच रेल्वे अपघातामध्ये दोन्ही पाय गमावून बसला. पण मुळातच खेळाडू असल्यामुळे त्याने त्यातच आपले ध्येय गाठले. त्याने एशियन गेम्समध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला छत्रपती पुरस्कार मिळाला. आज अनेकांसाठी तो आदर्श ठरला आहे. शारीरिक मर्यादांवर मात करून जीवनाला सकारात्मक आकार देणाऱ्या लढवय्यांच्या या यशोकथा मनाला उभारी देणाऱ्या आहेत.

  • ग्रेट दिव्यांग’ – उषा धर्माधिकारी,
  • पॅराप्लेजिक फाऊंडेशन आणि ग्रंथाली प्रकाशन,
  • पृष्ठे- ९४, मूल्य- १२५ रुपये.

First Published on September 10, 2017 1:03 am

Web Title: loksatta book review usha dharmadhikari