|| विवेक प्र. नवरे

भारतातील ब्रिटिश राजवट हा केवळ दोन देशांमधला संबंध नव्हता. जेव्हा एक देश दुसऱ्या देशावर जुलमी राजवट लादतो तेव्हा ती राजकीय, सामाजिक, आर्थिक व एकंदरीत जागतिक मानवी समूहाच्या पाश्र्वभूमीवरील घटना होत असते. या विचारांचा आवाका असणारे आणि त्यादृष्टीने विचार करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक नेते होते. जागतिक घटनांचा आपल्या स्वातंत्र्यासाठी कसा उपयोग करून घ्यावयाचा याचा सुभाषबाबू नेहमी विचार करत. दुसऱ्या महायुद्धाची नांदी व त्याचे पडसाद ही त्यांना यादृष्टीने मोठी संधी वाटली. ‘राष्ट्र’ व ‘राष्ट्रवाद’ या संकल्पना ही दुसऱ्या महायुद्धाची परिणती आहे, हे ते जाणत होते.

Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
Loksatta sanvidhan bhan Secular citizenship of India
संविधानभान: भारताचे धर्मनिरपेक्ष नागरिकत्व
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…

पॅसिफिक मंचावर मित्रराष्ट्रांनी आघाडी मारली होती. पूर्व आशियातील भारतीय चळवळ यावेळी शिथिलावस्थेत होती. आजारी रासबिहारी बोस जपानमध्ये नेताजींची चातकासारखी वाट पाहत होते. १९४३ च्या जूनमध्ये नेताजींचे टोकिओत आगमन झाल्यानंतर परिस्थितीत खूप फरक पडला. नेताजींनी एक मुद्दा स्पष्टपणे मांडला आणि तो जपानचे पंतप्रधान तोजो यांच्याकडून वदवून घेतला. तो म्हणजे : ‘आमचे अंतिम लक्ष्य भारत आणि भारतात आहे. ते कोणत्याही परिस्थितीत साध्य झाले पाहिजे.’ जपानच्या मदतीने इम्फाळमधून ब्रिटिशांना हाकलून दिल्यानंतर बंगालमध्ये मोठा उठाव होऊ शकतो. तसे झाले तर त्याचे परिणाम संपूर्ण भारतभर होतील असा नेताजींचा अंदाज होता. भारतीय सरहद्दीवरील कोणताही प्रदेश ताब्यात आल्यानंतर लगेच तो प्रशासकीय नियंत्रणाखाली आणणे, हा त्यापुढचा टप्पा होता.

सुभाषबाबूंचे मोठे यश म्हणजे त्यांनी जपान्यांना आपल्या राजकीय हालचालींचे महत्त्व पटवून दिले. त्यांची राष्ट्रभावना एवढी प्रबळ होती की ते कोणत्याही राष्ट्राच्या अधीन होणे अशक्यच होते. त्यामुळेच सुभाषचंद्र  आग्नेय आशियातील या लष्करी आणि राजकीय चळवळीच्या केंद्रस्थानी आले होते. जपानसोबतच आर्यलड, जर्मनी, इटली, बर्मा, क्रोएशिया आदींचा त्यांना नैतिक पाठिंबा होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या पाश्र्वभूमीवर भारताचा स्वातंत्र्यलढा सुरू होता. आग्नेय आशियात जपान एकेक राष्ट्र पादाक्रांत करत निघाला होता. तेथील ब्रिटिश भारतीय नागरिक शरणार्थीच्या रूपात असहायतेने जागतिक घडामोडींकडे लक्ष ठेवून होते. क्रांतिकारक रासबिहारी बोस जपानच्या साहाय्याने आझाद हिंद सेनेतर्फे भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत होते. ते वाट बघत होते एका ध्येयवादी राष्ट्रवेडय़ा माणसाची!

या पाश्र्वभूमीवर नेताजींचे सिंगापूर येथे आगमन झाले आणि त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी सर्वत्र सुभाषबाबूंच्या नावाची चर्चा होती. भारतीय युद्धकैदी आणि स्थानिक भारतीय नागरिक यांच्या अनोख्या संमीलनातून हा समुदाय गोळा झाला होता; ज्याचे रूपांतर एक शिस्तबद्ध सेनेत होणार होते.

सिंगापूरमधील कॅथे इमारतीतील सिनेमागृह. नेताजींच्या सिंगापूरमधील आगमनानंतर होणारी पहिलीच जाहीर सभा. तारीख- ४ जुलै १९४३. सकाळपासूनच लोकांचे लोंढे सभास्थानी येत होते. गर्दी एवढी प्रचंड होती, की कित्येकांना रस्त्यावर उभे राहूनच समाधान मानावे लागले. ठीक साडेदहा वाजता मोटारींचा एक ताफा चित्रपटगृहासमोर आला. सुभाषचंद्र, रासबाबू आणि कर्नल जगन्नाथ भोसले त्यातून उतरताच घोषणा सुरू झाल्या. सभागृह तीन हजार प्रतिनिधींनी खचाखच भरले होते. नेताजींचे आगमन होताच सर्वानी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर टाळ्यांचा जो गजर सुरू झाला तो पाच मिनिटे अविरत सुरू होता. मंचावर तिरंगा आणि जपानी ध्वज फडकत होते. जमादार रामसिंगच्या व्हायोलिन वादनानंतर कु. सरस्वतीने गीत गायले. एव्हाना वातावरण भारावलेले होते. व्यासपीठावर विराजमान होते- पहिल्या महायुद्धाचे साक्षीदार रासबिहारी आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट भारतीय स्वातंत्र्यात करू इच्छिणारे सुभाषचंद्र बोस! एकच आठवडा आधी रासबाबू तेथे येऊन गेले होते. नेताजींच्या भेटीची वार्ता गुप्त ठेवताना त्यांनी एका मोठय़ा घटनेविषयी सूतोवाच केले होते. जमलेल्या समुदायाला आता त्याचा प्रत्यय येत होता. ६४ वर्षांच्या रासबाबूंचे अवघे जीवन क्रांतीमय होते. त्यांच्या अनुभवांचे बोल, त्यापाठोपाठ कर्नल भोसले यांचे आझाद हिंद सेनेबद्दलचे विवेचन झाल्यावर नेताजी भाषणासाठी उठले..

‘गेल्या दोन वर्षांपासून मी जगाच्या कानाकोपऱ्यांत वणवण भटकतो आहे. युद्धस्थितीचा जवळून अभ्यास करतो आहे. युद्ध कितीही लांबू दे; त्याची परिणती होणार आहे ब्रिटिशांच्या ऱ्हासात आणि हिंदुस्थानच्या मुक्ततेत! बंधूंनो, आमच्या डोळ्यांपुढे मोठा संघर्ष आहे. आमचा शत्रू जितका बलवान, तेवढाच तो धूर्त, कपटी आणि उलटय़ा काळजाचा आहे. आपण सर्वजण आझादीच्या अखेरच्या टप्प्यावर आहोत. तहान, खडतर प्रवास, अनन्वित अत्याचाार हेच आमचे आता सोबती असणार आहेत. पण त्यातूनच आपल्याला स्वातंत्र्याचे दर्शन होणार आहे. चला उठा. पेटा! आपल्या मंगल मातृभूमीला मुक्तीचा आणि वैभवाचा राजरस्ता मिळवून देऊ या.’

यानंतर ती क्रांतिकारी घोषणा : ‘तुम मुझे खून दो.. मैं तुम्हे आझादी दूंगा!’ ही घोषणा त्रिखंडात गाजली. ब्रिटिश राजवटीला तिने भूकंपाचे हादरे बसले. ‘हिंदुस्थानात यशस्वी क्रांती घडवून आणण्यासाठी हंगामी सरकारची स्थापना करणे हे आमचे कर्तव्य आहे..’ असे म्हणणाऱ्या या महानायकाच्या या भाषणाने इतिहास घडवला. लोक मंत्रमुग्ध झाले. आझाद हिंद सेनेचे शंख फुंकले गेले होते. कॅथे सिनेमागृह धन्य झाले.

हा दिवस होता आझाद हिंद सेनेच्या जवानांचा! आग्नेय आशियातील जवान या दिवसाची कित्येक दिवस वाट पाहत होते. त्यांचा आवडता नेता आज त्यांची मानवंदना स्वीकारणार होता. कोणतेही अधिकृत पद नसताना, अंगाखांद्यावर कोणत्याही पदकांची रांग वा चमकता कातडी पट्टा नसणारा नेता आज आपल्या जवानांची सलामी घेणार होता. जगाच्या इतिहासात घडलेली ही दुर्मीळ घटना. महायुद्धाच्या पडझडीचे पडसाद दर्शविणाऱ्या सिंगापूरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारीत नेताजी बसले होते. गाडीच्या पुढील भागात तिरंगी ध्वज फडकत होता. आय. सी. एस. असलेला हा गृहस्थ आज संपूर्ण लष्करी गणवेशात होता. बरोबर होते रासबिहारी आणि कर्नल भोसले. पुढे १०-१२ मोटारसायकलस्वारांचा ताफा चालला होता. पाठीमागून लष्करी वाहने धावत होती.

रोमन वास्तुशास्त्राचा प्रभाव असलेली टाऊन हॉल इमारत! दर्शनी असलेले उंच व भव्य खांब. डौलदार कमानी ही त्याची खासियत. समोर एक ओटा. त्यावर व्यासपीठ उभारलेले. समोर भव्य पटांगण, मग डांबरी रस्ता आणि अमर्यादतेची जाणीव करून देणारा विशाल समुद्र. पटांगणावर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढावयास सज्ज झालेले दहा हजारांहून अधिक जवान. व्यासपीठावर भारतमातेची आणि गांधीजींची भव्य प्रतिमा. मध्यवर्ती तिरंगी ध्वज. कमतरता होती ती फक्त एका स्फूर्तिदेवतेची! पांढऱ्या मोटारीतून नेताजी उतरले. कर्नल भोसले, जपानी अधिकारी कनिझुका आणि रासबिहारी त्यांच्यापाठोपाठ उतरले. गणवेशधारी नेताजींकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. डोक्यावर घडीची खादी टोपी. त्यावर ब्रासची दोन बटणे. टोपीच्या कोनामुळे मूळच्याच आकर्षकतेत भर घालणारा त्यांचा चेहरा. गुडघ्यापर्यंत लांब चामडय़ाचे बूट. मांडय़ांजवळ फुगीर आणि गुडघ्यापासून खाली घट्ट खाकी विजार. कोटावर दोन बिल्ले. एक तिरंगी, तर दुसऱ्यावर अखंड भारताचा नकाशा. या पेहेरावात ते अत्यंत देखणे दिसत होते. पुढचे दोन तास त्यांचे ओजस्वी भाषण झाले. नेताजींच्या वाक्यागणिक जवानांची बेहोषी वाढत होती..

‘बोला, हिंदमातेच्या रक्षणासाठी मृत्यूला माळ घालावयाची कोणाची तयारी आहे? माझ्या जवान बंधूंनो, आज मोठय़ा आनंदाने मी जगापुढे घोषित करीत आहे, की हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सेना सज्ज झाली आहे. ज्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही तो सूर्यही आमच्या मदतीस येत आहे. कोणतेही साम्राज्य जसे भरभराटीस येते, तसेच ते लयालाही जाते. तो काळ आता जवळ आला आहे. थोडय़ाच काळात इंग्रजी साम्राज्य इतिहासजमा होईल. तो इतिहास लिहिणे आज आपल्या हातात आहे. जॉर्ज वॉशिंग्टनने अमेरिकेसाठी जे केले, इटलीच्या एकीकरणासाठी गॅरिबाल्डीने जे केले, तेच आम्हाला हिंदुस्थानसाठी करावयाचे आहे. त्यांच्याजवळ सैनिकी बळ होते म्हणून ते यशस्वी झाले. आतापर्यंत आमच्याजवळ ते नव्हते, मात्र आज या दहा हजार जणांच्या स्वरूपात ते आमच्यापाशी आहे. त्यात दररोज वाढ होणार आहे. तेव्हा आमचा विजय निश्चित आहे.’

समुदायातून त्यांच्या भाषणाला प्रतिसाद म्हणून ‘चलो दिल्ली, चलो दिल्ली’च्या घोषणा होत होत्या. नेताजी बोलत होते- ‘आज माझ्यापाशी तुम्हाला देण्यासारखे काही नाही. भूक, तहान, खडतर आगेकूच, कदाचित मृत्यूही.. याच गोष्टी मी देऊ शकतो. पण शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमची सोबत करेन. मग तो दुर्दैवी अंध:कार असेल वा स्वातंत्र्याचा राजरस्ता असेल.’

त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होते. आपले स्वप्न अर्धे तरी सत्यात उतरले याबद्दल ते उत्साहाने बोलत होते. भाषण संपता संपता सैनिकांच्या एकेक तुकडय़ा पुढे सरकल्या. लष्करी बँडच्या तालावर प्रत्येक तुकडीची सलामी नेताजी स्वीकारत होते. रणगाडे, चिलखती गाडय़ा, तोफा अशी सुसज्ज लष्करी यंत्रणा संचलनाची शोभा वाढवत होती. आग्नेय आशियातील ते लष्करी संचलन एका मोठय़ा देशाचे भवितव्य ठरवणार होते. ब्रिटिशांनी धसका घेतला तो या संचलनाचा. एखाद्या देशाचे अनिवासी नागरिक एकत्र येतात, त्यांना शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते आणि ते लढाईसाठी तयार होतात, ही जगाच्या इतिहासातील एक दुर्मीळ घटना. पडांग मैदानाने तो इतिहास घडविला.