|| डॉ. सुरेश सावंत

मराठी वाङ्मयीन नियतकालिकांच्या समृद्ध परंपरेत ‘अनुष्टुभ’ या द्वैमासिकाला आणि अनुष्टुभ प्रतिष्ठानला महत्त्वाचे स्थान आहे. ‘अनुष्टुभ’च्या चळवळीत गो. तु. पाटील यांनी तीन दशके कार्यकर्ता, विश्वस्त, व्यवस्थापक, संपादक आणि अनुष्टुभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने वैशिष्टय़पूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या ‘ओल अंतरीची’ या आत्मकथनाला केवळ एका प्राध्यापकाचे आत्मकथन म्हणून नव्हे, तर वाङ्मयीन चळवळीतील एका समर्पित कार्यकर्त्यांचे आत्मकथन म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गो. तु. पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यतील जामनेर तालुक्यातील सुनसगाव या चिमुकल्या खेडय़ातला. चार भाऊ  आणि तीन बहिणी असा मोठा परिवार. वडिलांची वृत्ती मुळातच रंगेल. वडिलांनी दुसरी पत्नी करून सावत्रपण लादलेले. उपजीविकेचे साधन म्हणजे कोरडवाहू शेती आणि शेतमजुरी. खाणारी तोंडं नऊ. सभोवती दारिद्य्राचे दशावतार. परिणामी ससेहोलपट झालेली. अशा प्रतिकूल परिस्थितीत लेखकाचे बालपण करपून गेलेले.

लेखक गावातील व्हालंटरी (खाजगी) शाळेतून १९५५ साली चौथी उत्तीर्ण झाल्यावर पाचवीसाठी गावापासून तीन कोसावरच्या नाचनखेडातील शाळेत पायी जाऊ  लागले. शाळेला जाण्यापूर्वी सकाळी लेखक विसपुते गुरुजींच्या घरी पाणी भरणं, कपडे धुणं, घर सारवणं, पोतारणं, चुलीसाठी सरपण आणणं, इ. कामं करीत. त्या मोबदल्यात गुरुजी गोईंदाला रात्रीची उरलेली खिचडी देत. दलितेतर बहुजन समाजातील लेखकाच्या जीवनातही अभावग्रस्तता आणि दाहकता असते, हे या आत्मकथनाने अधोरेखित केले आहे.

पुढे विसपुते गुरुजींची बदली चोपडा तालुक्यातील अनवर्दे-बुधगावमध्ये झाली. गुरुजींनी गोईंदालाही आपल्यासोबत नेले. तिथेही गुरुजींच्या घरातील कामं करत लेखकाने सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. येथील वास्तव्यात लेखकाने तमाशा पाहण्याचा आनंद लुटला. कारण तेच करमणुकीचे एकमेव साधन होते. शिवाय अहिराणी बोलीही आत्मसात केली.

शिक्षणासाठी चाललेल्या अशा त्रिस्थळी यात्रेत घरापासून लांब राहिल्यामुळे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची कोवळी फांदी विकसित होत होती. सातवीनंतर त्यांना कुऱ्हे येथील चुलत- बहिणीच्या घरी शिक्षणासाठी ठेवण्यात आले. तिथे त्यांनी आठवीपासून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. या काळात त्यांना अवांतर वाचनाचा छंद लागला. याच काळात त्यांनी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील, कॉ. डांगे, ना. ग. गोरे अशा नेत्यांची भाषणे ऐकली. सत्यशोधकी जलसे पाहिले.

मॅट्रिक झाल्यावर कुऱ्हे येथील डॉ. देशमुख यांनी गोईंदाला बसस्टँडवर पाणपोई टाकून दिली आणि निकाल लागायच्या आधीच पुढाकार घेऊन त्यांनी लेखकाचे लग्न गावातील शेतमजूर चौधरी यांच्या शांता या मुलीशी लावून दिले. तेव्हा लेखक १९ वर्षांचे आणि शांताबाई १२ वर्षांच्या होत्या. लग्नानंतर लगेच लेखकाने शिरपूर येथील ज्युनिअर पी. टी. सी. (प्राथमिक शिक्षक प्रमाणपत्र) अभ्यासक्रम पूर्ण करून प्राथमिक शिक्षकाचे प्रशिक्षण पदरात पाडून घेतले. त्यामुळे त्यांना मालेगाव नगरपालिकेत प्राथमिक शिक्षकाची नोकरी सहज मिळाली. शिक्षक म्हणून त्यांनी अनुभवजन्य ज्ञानावर भर दिला. विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रभेटींचे आयोजन करून त्यांना जीवनदर्शन घडवले. मालेगाव येथील वास्तव्यात लेखकाने १९६३ च्या गणेशोत्सवातील हिंदू-मुस्लीम दंगल अनुभवली.

शिक्षकी पेशात स्थिरावले तरी लेखकाची ज्ञानलालसा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मालेगावच्या वास्तव्यात त्यांनी प्री-डिग्री कोर्स पूर्ण केला. सकाळ सत्रात महाविद्यालय आणि दुपार सत्रात शाळा, दरम्यान काही खासगी शिकवणी असा दिनक्रम ठेवला. खरे तर ही तारेवरची कसरत होती, परंतु उच्च शिक्षणाच्या ओढीनं त्यांनी ती केली. मराठी विषयात एम. ए. केले. या काळात त्यांना प्रा. भालचंद्र खांडेकर, प्रा. एम. पी. पाटील, प्रा. म. सु. पाटील, प्रा. ह. श्री. शेणोलीकर आदी निष्णात प्राध्यापकांचे मार्गदर्शन तर लाभलेच; शिवाय वैयक्तिक स्नेहही लाभला. एम. ए.नंतर लेखकाने गेवराई येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून वर्षभर नोकरी केली.

प्राथमिक शिक्षकापासून महाविद्यालयीन प्राध्यापकापर्यंतचा लेखकाचा हा शैक्षणिक जिद्दीचा थक्क करणारा प्रवास आहे. गेवराईतील वास्तव्यात त्यांनी प्राध्यापक म्हणून स्वत:ला सिद्ध केले. पुढे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात नेमणूक मिळाल्यामुळे ते  मालेगावला रूजू झाले. ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले, तिथेच प्राध्यापक म्हणून गुरुवर्र्यासोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. वर्षभर मालेगावात नोकरी केल्यानंतर संस्थेच्याच येवला येथील महाविद्यालयात त्यांची बदली झाली. सुरुवातीला अनिच्छेने ते येवल्याच्या महाविद्यालयात रूजू झाले खरे; परंतु पुढे तीच त्यांची कर्मभूमी बनली. या ठिकाणच्या मामलेदार गल्लीतील वाडासंस्कृतीचे वर्णन आणि त्याच्या आठवणी अतिशय रम्य आहेत. हा वाडा एकेकाळी ‘अनुष्टुभ’ चळवळीचे मध्यवर्ती केंद्र बनला होता. अधूनमधून गावाकडील नातेवाईकांच्या जीवनातील उलथापालथींचेही हृदयस्पर्शी संदर्भ येतात. ‘मनातलं घर’ हा मानवी जीवनातील एक हळवा कोपरा असतो, तसा तो लेखकाच्या बाबतीतही आहे. लेखकाने मोठय़ा कष्टाने उभारलेल्या घराचे नाव ‘कृतज्ञता’ असे ठेवले. ‘कृतज्ञता’ हा केवळ शब्द नसून लेखकाच्या बाबतीत ती एक उच्चतम भावना आहे, एक जीवनमूल्य आहे. जीवनात आलेल्या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता या आत्मकथनाच्या पानापानांतून पाझरते.

‘कसोटीचा काळ’ हे प्रकरण लेखकाच्या मुलांची शिक्षणं, त्यांना नोकरी-व्यवसायात स्थिर करणं, त्यांची लग्नं, त्यातील अनिश्चिततेचे हेलकावे, मुलांची जडणघडण, पत्नी शांताचे आजारपण आदी घटना-घडामोडींनी गजबजले आहे. ‘कडूगोड’ या प्रकरणात लेखकाने आपल्या आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगांना उजाळा दिला आहे. त्यातून गो. तु. पाटील यांच्या जीवनविषयक धारणा आणि दृष्टिकोन पुरतेपणी स्पष्ट झाला आहे.

‘देणं अनुष्टुभचं’ हे या आत्मकथनातील महाराष्ट्राच्या वाङ्मयीन इतिहासाच्या दृष्टीने  महत्त्वाचे प्रकरण आहे. ५० पृष्ठांच्या या दीर्घ प्रकरणात ‘अनुष्टुभ’च्या स्थापनेपासून विस्थापनापर्यंतचा साद्यंत वृत्तान्त आला आहे. ‘अनुष्टुभ प्रतिष्ठान’च्या स्थापनेची पहिली बैठक नरहर कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली येवला येथे गो. तु. पाटील यांच्या घरी झाली. म. सु. पाटील, वा. रा. सोनार, पुरुषोत्तम पाटील, रमेश वरखेडे, उत्तम कोळगावकर, प्रभाकर पाध्ये, गंगाधर पाटील, भा. ज. कविमंडन या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांसोबत गो. तु. पाटील यांनी ‘अनुष्टुभ’च्या साहित्य चळवळीत जवळजवळ ३० वर्षे झोकून देऊन कार्य केले. प्रतिष्ठान आणि द्वैमासिकाच्या व्यवस्थापनाची दुहेरी धुरा त्यांनी दीर्घकाळ निष्ठेने सांभाळली. ‘अनुष्टुभ’ने केवळ पाटलांच्या आयुष्यालाच नव्हे, तर संपूर्ण पाटील कुटुंबाला व्यापले होते. वर्गणी जमा करणे, देणग्या गोळा करणे, अंकांचे वितरण करणे, वर्गणीदार व देणगीदारांना पावत्या पाठवणे, बिले पाठवणे, वसुली करणे, नवीन वर्गणीदार व जाहिरातदारांचा शोध घेणे.. अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केली. या कामांतही एक प्रकारचे झपाटलेपण होते. ही सर्व कामे त्यांनी विनामानधन आणि स्वत:च्या खर्चाने केली. एका मोठय़ा वाङ्मयीन कार्याशी आपण जोडले गेलो आहोत याची त्यांना यथार्थ जाणीव होती. या कामी त्यांनी मानाचे तसेच अपमानाचे प्रसंगही पचवले. सोबतच्या ज्येष्ठांच्या ‘अकॅडमिक’ उंचीची त्यांना कल्पना होती आणि आपल्या न्यूनत्वाचीही. प्रसंगी प्रकृतीवर ताण पडला, कौटुंबिक कामे रेंगाळली, तरी ‘अनुष्टुभ’ हेच त्यांच्या अग्रस्थानी होते. त्यांनी प्रसार व गुणवत्ता या दोन्ही अंगांनी चळवळ वाढवली. महाराष्ट्राच्या साहित्य-सांस्कृतिक पर्यावरणात ‘अनुष्टुभ’ची म्हणून एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्याचे श्रेय त्यांनी कधीच स्वत:कडे घेतले नाही.

‘‘अनुष्टुभ’ चळवळीनं, चळवळीतील माणसांच्या मूल्यगर्भ जगण्यानं, चळवळीतून होणाऱ्या संस्कारांनी मला पैशांच्या दुनियेपासून नेहमीच लांब ठेवलं. हातून कोणतंही भरीव लेखन न होताही साहित्य क्षेत्रात ‘अनुष्टुभ’नं मला उदंड प्रतिष्ठा दिली. उच्च सांस्कृतिक मूल्यं जगणारी माणसं जवळून अनुभवता आली आणि त्यातून जगण्याचं सुखनिधान मिळालं..’ अशा शब्दांत त्यांनी ‘अनुष्टुभ’विषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. या प्रकरणात विविध मान्यवरांच्या पत्रांचे संदर्भ येतात. कवी ग्रेस यांचा लहरीपणा आणि फटकळपणा, तसेच त्यांच्या दिलदारपणाचे किस्सेही लेखकाने कथन केले आहेत. भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत पाटील यांच्या तुच्छतावादाचे किस्सेही सांगितले आहेत. रमेश वरखेडे आणि ‘अनुष्टुभ’ द्वैमासिक, प्रा. पुरुषोत्तम पाटील आणि ‘कविता-रति’ नियतकालिक यांवर लख्ख प्रकाश टाकला आहे. ‘अनुष्टुभ’ चळवळीत कसे मतभेद झाले, त्यासंदर्भातील दुही, दुफळी आणि विसंवाद यानिमित्ताने उजागर झाले आहेत. ‘‘अनुष्टुभ’ म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याच्या यशाचे श्रेय सर्वाचेच आहे,’ असे नमूद करून लेखकाने सर्वाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. चळवळीच्या माध्यमातून मने दुखावली जाऊन मैत्रीच्या संबंधांत कटुता आली असली तरी ती त्यांनी व्यक्तिगत जीवनात पाझरू दिली नाही.

‘‘अनुष्टुभ’ चळवळीने मला समृद्ध केले,’ असे गो. तु. पाटील नम्रतेने नमूद करतात. जलसंपर्कातील कमलपत्रासारखी अलिप्तता आणि कमालीचा संयम त्यांनी वेळोवेळी दाखवला. या आत्मकथनातून लेखकाच्या मूल्याधिष्ठित आचरणाचे आणि समंजस व प्रांजळ व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन घडते. हा ग्रंथ म्हणजे या चळवळीचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. ‘मानवी आयुष्य हे संबंधांचं एक गाठोडं असतं. या गाठोडय़ातील ‘माणूस’, ‘माणूसपण’ आणि ‘मानवीय श्रद्धा’ या गोष्टीच माणसाच्या जगण्याला समृद्धता आणतात,’ असे लेखकाने समारोपाच्या प्रकरणात म्हटले आहे. या विधानाच्या प्रकाशात विचार केला असता हे ध्यानात येते, की ‘ओल अंतरीची’ या आत्मकथनात लेखकाने आयुष्य नावाच्या गाठोडय़ाच्या अनेक खासगी गाठी मोकळेपणाने सोडून भावना मोकळ्या केल्या आहेत. इथे कसलीच लपवाछपवी नाही. आहे तो सगळा प्रांजळपणा!

‘ओल अंतरीची’ ही ‘गोईंदा’ या नायकाच्या आत्मशोधाची आणि आत्मभानाची उज्ज्वल कथा आहे. त्यात कुठलाही आवेश नाही किंवा अभिनिवेशही नाही. आत्मगौरव नाही की आत्मसमर्थनही नाही. आरंभी अतिशय अभावग्रस्त आयुष्य लेखकाच्या वाटय़ाला आले. ते त्यांनी जसेच्या तसे स्वीकारले. विचित्रपणे वागलेल्या प्रत्येक माणसाला समंजसपणे समजून घेण्याची त्यांची मानसिक तयारी आहे.

लेखकाने आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची नेमकेपणाने निवड करून त्यांची कौशल्याने कलात्मक मांडणी केली आहे. अनुभवलेल्या गावांविषयी लिहिले आहे, तसेच अनुभवलेल्या माणसांविषयीही अतिशय आत्मीयतेने लिहिले आहे. निसर्ग, देवधर्म, रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यांविषयीही लिहिले आहे. त्यादृष्टीने हे एका व्यक्तीचे आत्मचरित्र न राहता समाज आणि समकालाचे चरित्र झाले आहे. कष्टाचे मूर्तिमंत प्रतीक असणारी आई, कौटुंबिक जबाबदारी झटकणारे आणि सावत्रपण लादणारे वडील, गोईंदाच्या शिक्षणासाठी खस्ता खाणारा भाऊ, अडीअडचणीत मदत करणारा मामा, लेखकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे आणि नंतर आर्थिक अपेक्षांचे ओझे लादणारे प्राथमिक शिक्षक विसपुते गुरुजी, भाऊराव गुरुजी, शिक्षणासाठी आपल्या घरी ठेवून घेणारे चुलत बहिणीचे पती सुपडू पाटील, अग्रवाल सर, लग्न जुळवून देणारे आणि शिक्षणासाठी अर्थसा करणारे डॉ. व्ही. जी. देशमुख, शिरपूरच्या बोर्डिगचे व्यवस्थापक शांताराम पाटील, मालेगावात भेटलेले सहकारी शिक्षकमित्र, गुरुवर्य म. सु. पाटील, प्रा. एम. पी. पाटील, प्रा. पुरुषोत्तम पाटील, प्रा. रमेश वरखेडे,  मुली मनीषा आणि पिंटी, मुलगा सारंग यांची व्यक्तिचित्रे चांगलीच ठसठशीत उतरली आहेत. सहधर्मचारिणी शांताबाई यांचे व्यक्तिचित्र तर नजरेत भरण्यासारखे आहे.

‘ओल अंतरीची’ ही एकलव्याच्या निष्ठेने, उत्कट ज्ञानलालसेने उच्च शिक्षणासाठी धडपडणाऱ्या गोईंदाच्या जिद्दीची आणि झटझोंबीची यशोगाथा आहे. नायकाचे जीवन विविधांगी अनुभवांतून कसकसे विकसित होत गेले याची त्यातून प्रचीती येते. नायकाबरोबरच इतर पात्रांच्याही जीवनसंघर्षांची ही गाथा आहे. गो. तु. पाटील यांचे हे आत्मकथन म्हणजे अर्धशतकाचा सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक इतिहास आहे असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

  • ‘ओल अंतरीची’- प्रा. गो. तु. पाटील
  • प्रकाशक : जयप्रकाश लब्दे, मुंबई,
  • पृष्ठे- ४८०, मूल्य- ४०० रुपये.