|| वर्षां गजेंद्रगडकर

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात आजही अनेक पारंपरिक लोकसमूह ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. विकास, शहरीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ात त्यांची वैशिष्टय़पूर्ण लोकसंस्कृती मात्र हळूहळू लोप पावते आहे. या समूहांना ‘मुख्य प्रवाहा’त आणण्याच्या प्रयत्नात अनेकदा सांस्कृतिक वैविध्यावर घाला घातला जातो. खरं तर दुर्गम भागांत, जंगलात किंवा ग्रामीण भागांत राहणाऱ्या या समूहांच्या भाषा, जीवनधारणा, संस्कृती या सगळय़ामध्ये पिढय़ान्पिढय़ांचं ज्ञान सामावलेलं आहे. हे पारंपरिक ज्ञान टिकवण्यासाठी बोलीभाषांचं योगदान लक्षात घेऊन डॉ. गणेश देवी यांच्या भाषा संशोधन केंद्राच्या वतीने दोन वर्षांपूर्वी एक बृहद् प्रकल्प सिद्ध झालेला आहे. या प्रकल्पांतर्गत प्रसिद्ध झालेल्या कोशांनी देशातल्या विविध लोकभाषांच्या दस्तावेजीकरणाचं महत्त्वपूर्ण काम केलं आहे. अनेक स्थानिक स्वयंसेवी संस्थाही आपल्या भागातल्या लोकसमूहांना विकासाच्या वाटेवर आणताना त्यांची निसर्गपूरक जीवनशैली, त्यांचे रीतिरिवाज, सण-उत्सव, शेतीच्या पद्धती अशा अनेक प्रकारच्या नोंदी ठेवताहेत. डॉ. जीजा सोनवणे यांनी अलीकडेच केलेला महाराष्ट्रातल्या मालेगाव तालुक्यातल्या भिल्ल आदिवासींचा अभ्यास या पाश्र्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो. ‘भिल्ली लोकसाहित्य’ हे त्यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक केवळ भिल्लांच्या साहित्यावरच नव्हे, तर त्यांच्या एकूण संस्कृतीवरच प्रकाश टाकणारं आहे.

डॉ. सोनवणे यांनी नाशिक जिल्ह्यतल्या ज्या मालेगाव तालुक्याची अभ्यासक्षेत्र म्हणून निवड केली आहे, त्याच तालुक्यातल्या त्या रहिवासी आहेत. लहानपणापासून घरच्या शेतीवर काम करणाऱ्या भिल्ल शेतमजुरांचं आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं आणि त्यांची जीवनपद्धती, मूल्यं, श्रद्धा, आचार-विचार यांच्याशी त्यांचा सहज परिचय होत गेला. त्यामुळेच नागरी संस्कृतीपेक्षा अगदी भिन्न अशा भिल्लांच्या विश्वाचा धांडोळाही त्यांनी अतिशय आत्मीयतेनं घेतला आहे आणि पूर्ण अशिक्षित असलेल्या या भिल्लसमूहाकडे मौखिक स्वरूपात असलेली ज्ञानसंपदा संकलित करून जतन करण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.

महाराष्ट्रातल्या एका मोठय़ा आदिवासी समूहाची सांस्कृतिक वीण उलगडणाऱ्या या पुस्तकात डॉ. सोनवणे यांनी लोकसाहित्याची संकल्पना आणि स्वरूप स्पष्ट करणारं एक प्रकरणही समाविष्ट केलं आहे. दुर्गाबाई भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. प्रभाकर मांडे यांच्यासारख्या लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी देशी दृष्टी स्वीकारून फार पूर्वीच या विषयाचा भक्कम पाया घातला असला तरी पुस्तकाला परिपूर्णता येण्याच्या दृष्टीनं पूर्वसूरींचे संदर्भ देत डॉ. सोनवणे यांनी केलेली मांडणी सयुक्तिकच आहे.

मालेगाव तालुक्याची सांस्कृतिक पाश्र्वभूमी अतिशय विस्तृतपणे विशद करताना आदिवासींचा भारतीय राज्यघटनेतला उल्लेख, आदिवासी जमातीची खास वैशिष्टय़ं, त्यांचा देशभरातला विस्तार आणि संख्या, महाराष्ट्रातले आदिवासी यांसह भिल्ल आदिवासींची पूर्वपीठिका, भिल्लांचे ऐतिहासिक उल्लेख, त्यांच्या जन्माविषयीच्या दंतकथा, आदिवासींची स्वातंत्र्यलढय़ातली कामगिरी, भिल्लांचे विवाह, वेशभूषा, आहार, अलंकार, व्यवसाय अशा अनेक गोष्टींचा मागोवा त्यांनी घेतला आहे.

भिल्ली लोकगीतं आणि लोककथांचा लोकतत्त्वीय अभ्यास मांडणारी दोन प्रकरणं या पुस्तकात आहेत. यामध्ये पूर्वीच्या अभ्यासकांनी केलेली ‘लोकतत्त्व’ या संकल्पनेची उकल अधोरेखित करून डॉ. सोनवणे यांनी या कथा-गीतांतून दिसणारं भिल्लांचं आयुष्य, त्यांचा भवताल, त्यांच्या जीवनधारणा, श्रद्धा, मूल्यं, समजुतीही स्पष्ट केल्या आहेत. याखेरीज या लोकसमूहाची दैवतं, त्यांचे पूजाविधी, वाद्यं, ही वाद्यं तयार करण्याच्या कृती अशा अनेक गोष्टींचाही परिचय करून दिला आहे. लोककथा आणि गीतं यांचा मराठी अनुवाद आणि वैशिष्टय़ं स्पष्ट करताना महाराष्ट्रातल्या या पारंपरिक समूहाचं लोकमानस, शतकानुशतकं त्यांनी जपलेल्या मौखिक परंपरा वाचकांपुढे उलगडत जातात. भिल्ल समूहात रूढ असणारे लोकभ्रम, त्यांच्या यातुक्रिया आणि त्यांचं लोकवैद्यक यांची नोंद करणारं एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. यामध्ये भगताची भूमिका, त्याचं आचरण, त्याला आवश्यक शिक्षण, त्यांचे मंत्र, वनौषधी, जडीबुटी, तोडगे यांविषयीची माहितीही डॉ. सोनावणे यांनी विस्तारानं दिली आहे. यात लोकभ्रमाची चिकित्सा केलेली नसली तरी भिल्ल समूहानं अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धा टाकून द्यायला हव्यात आणि त्यासाठी त्यांचं शिक्षित होण्याचं प्रमाण वाढायला हवं, असं डॉ. सोनवणे यांनी आवर्जून नोंदवलं आहे.

भिल्लांच्या बोलीविषयी एक अगदी लहानसं प्रकरण पुस्तकात समाविष्ट आहे. शिवाय भिल्लांच्या लोकसाहित्याची वैशिष्टय़ंही लेखिकेनं स्पष्ट केली आहेत. लोककथा आणि गीतांमधून दिसणारी भिल्ली भावनिकता, सहजता, प्रसंगचित्रणातली नाटय़मयता, अद्भुतता, त्यांच्या व्यक्तिचित्रणातली उत्कटता यांचा त्यांनी सोदाहरण वेध घेतला आहे. भिल्ल स्त्रियांच्या स्त्रीसुलभ भावना, शृंगार आणि प्रेम त्यांच्या साहित्यातून कसं व्यक्त होतं, याची चर्चाही समाविष्ट आहे. शिवाय त्यांचे वाक्प्रचार, म्हणी, उखाणे यांचे वाङ्मयीन विशेषही त्यांनी संक्षेपानं सांगितले आहेत.

महाराष्ट्रातल्या एका मोठय़ा लोकसमूहाच्या साध्या, निसर्गपूरक आयुष्याचा सर्वागीण वेध घेणाऱ्या या पुस्तकामुळे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती या दोन्ही अभ्यासक्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण दस्तावेज तयार झाला आहे. भारतीय समाजाचाच एक भाग असणाऱ्या व तरीही नागर संस्कृतीपेक्षा अतिशय वेगळं आणि वैशिष्टय़पूर्ण आयुष्य जगणाऱ्या भिल्लसमूहाचं लोकजीवन उलगडणारं हे पुस्तक अभ्यासकांसाठी उत्तम संदर्भग्रंथ आहे आणि सर्वसामान्य वाचकांना आपल्याच समाजबांधवांची ओळख करून देणारं आहे.

  • ‘भिल्ली लोकसाहित्य’- डॉ. जीजा सोनवणे,
  • स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे,
  • पृष्ठे- ४१२, मूल्य- ४१० रुपये.