|| डॉ. मनोहर जाधव

मराठीतील बहुचर्चित लेखक आनंद यादव यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आढावा घेणारा ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ कीर्ती मुळीक आणि आप्पासाहेब जकाते यांनी संपादित केला आहे. या ग्रंथात एकूण १७ लेख संकलित केले आहेत. पकी पाच लेख आनंद यादवांसंबंधी आहेत आणि बारा लेख त्यांच्या विविध साहित्यकृतींची, ग्रामीण साहित्य चळवळीची चर्चा करणारे आहेत. यात दोन मुलाखतींचाही अंतर्भाव आहे.

lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

मराठीत दलित साहित्य चळवळीनंतर ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय झाला. या चळवळीतील अग्रणी म्हणून आनंद यादव यांचा उल्लेख होतो. सर्जनशील लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली. त्यांनी लेखनात विविध वाङ्मयप्रकार हाताळले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक सन्मान त्यांना मिळाले. ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत. इंद्रजित भालेराव यांनी यादवांच्या समग्र काव्यलेखनाचा परामर्श घेतला आहे. ‘यादव शेतकरी कवी आहेत. त्यांची कविता शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्याची कविता आहे. शेतकरी वास्तवाचा सच्चेपणा या कवितेत आहे. कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनातील शृंगार, सौंदर्य, दु:ख, दारिद्रय़, संघर्ष याचे चित्रण या कवितेत आहे,’ अशी निरीक्षणे भालेराव यांनी नोंदवलेली आहेत.

यादवांचे व्यक्तिचित्रण करणारा भालेराव यांचाच दीर्घ लेखही या ग्रंथात आहे. तारुण्याच्या उंबरठय़ावर असतानाच भालेरावांना यादवांचा सहवास लाभला. तो दीर्घकाळ टिकला. १५ वष्रे दोघांचा पत्रव्यवहार होता. प्रसंगपरत्वे त्यांच्या अनेक भेटी झाल्या होत्या. भालेरावांच्या या लेखात भारावलेपण असले तरी एक प्रकारची तटस्थताही आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीपेक्षा शरद जोशींची शेतकरी संघटनेची चळवळ व्यापक झाली. परंतु ग्रामीण साहित्य चळवळीने या चळवळीशी समन्वय ठेवला नाही,’ अशी खंत भालेराव यांनी व्यक्त केली आहे.

मंदा खांडगे यांनी यादवांच्या ललित गद्याची आस्वादक चिकित्सा केली आहे. त्यांनी यादवांच्या ललित गद्यातील काव्यात्मकता अधोरेखित केली आहे. यादवांच्या ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची समीक्षा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केली असून, त्यांच्या आधीच्या कथासंग्रहांपेक्षा या कथासंग्रहाचे वेगळेपण काय आहे, हे त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले आहे. प्रारंभी आपल्या कथांमधून ग्रामीण जनजीवन चित्रित करणाऱ्या यादवांचा जाणीव विस्तार होत गेला, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि तो मान्य होण्यासारखा आहे.

रवींद्र ठाकूर यांनी यादवांच्या एकूणच कथालेखनाचा आढावा घेतला आहे. यादवांच्या कथालेखनाचा विकास विषयाच्या आणि आविष्काराच्या अंगाने कसा होत गेला, त्यासंबंधी ठाकुरांनी भाष्य केले आहे. ‘आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’ (शुभांगी पातुरकर) व ‘यादव आणि ग्रामीण साहित्य’ (सुरेश देशपांडे) हे दोन लेख चिकित्सेऐवजी वर्णनात्मक अंगाने लिहिले गेले आहेत. पातुरकर यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांच्या प्रेमात इतक्या अडकून पडल्या आहेत, की त्यांचे भारावलेपण या लेखातून ठायी ठायी जाणवते.

वासुदेव मुलाटे यांनी यादवांच्या ‘ग्रामसंस्कृती’ आणि ‘साहित्यिक जडणघडण’ या दोन ग्रंथांची मीमांसा केली आहे. यादवांच्या चिंतनशीलतेचा परीघ कसा विस्तारलेला होता, हे तर ते नमूद करतातच; परंतु नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांसाठी ही पुस्तके कशी उपयुक्त आहेत, हेही ते नोंदवतात.

‘बहुआयामी लेखक’ (रवींद्र शोभणे) आणि ‘साहित्यातले काटकोनी वळण’(सुनीलकुमार लवटे) या दोन लेखांतून यादवांची वाङ्मयीन वाटचाल उलगडण्यात आली आहे. त्यांच्या सर्वच लेखनाविषयी या लेखांतून काही मते मांडण्यात आली आहे. विशेषत: सुनीलकुमार लवटे यांनी यादवांच्या लेखनसामर्थ्यांचा तिरकसपणे वेध घेतला आहे आणि जाता जाता एकूण वाङ्मयीन पर्यावरणासंबंधी भाष्य केले आहे.

‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ या लेखात सुधाकर शेलार यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची वाटचाल विस्तृतपणे मांडली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय, प्रेरणा आणि प्रयोजन यांचा आढावा घेऊन त्यांनी या चळवळीची भूमिका आणि सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक योगदान या अंगाने चर्चा करून या साहित्य चळवळीची नेमकी फलश्रुती काय आहे, त्याचा निर्देश केला आहे. हा निर्देश करताना या चळवळीतील अनेक लेखकांच्या मतांचा हवाला त्यांनी दिला आहे.

तानाजी पाटील आणि द. ता. भोसले यांनी घेतलेल्या यादवांच्या मुलाखतीमधून यादवांची लेखक आणि समीक्षक म्हणून असलेली भूमिका समोर आली आहे. यादवांच्या निर्मितिप्रक्रियेवरही या मुलाखतीतून प्रकाश पडतो. लेखकाचा जीवनानुभव, वाङ्मयप्रकारांची अपरिहार्यता, कलावादी दृष्टिकोन, लेखकाची सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे या मुलाखतीमध्ये चर्चिले गेले आहेत. साहित्याच्या अभ्यासाला ते पूरक असेच आहेत.

‘आमचे बाबा’ या लेखात कीर्ती मुळीक यांनी यादवांमधील वडील चित्रित केले आहेत. त्यांचा कुटुंबवत्सलपणा वर्णन करतानाच महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान वडिलांना भूषवता आले नाही याची दुखरी बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आप्पासाहेब जकाते यांनी यादवांचं मोठेपण, कर्तृत्व आणि कौटुंबिक जबाबदारीचं भान त्यांना कसं होतं, यासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. रा. रं. बोराडे यांनी यादवांशी असलेल्या मत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत. यादवांसोबत मतभेद असूनही त्यांनी त्या मतभेदांचा उल्लेख न करता, यादवांशी कशी मत्री झाली, ग्रामीण साहित्यसंमेलने कशी व कुठे आयोजित करण्यात आली आणि ग्रामीण साहित्य चळवळीची बांधणी कशी झाली, याचा ऊहापोह केला आहे. बोराडे लिहितात, ‘ग्रामीण साहित्य परिषदेची घटना तयार झाली खरी, परंतु मनुष्यबळाअभावी तसंच आर्थिक पाठबळाअभावी ही घटना अमलात आली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला हळूहळू शैथिल्य येत गेलं..’ लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘मनात विचार आला, आनंद यादव अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या फंदात पडले नसते, तर त्यांना आणखी आयुष्य लाभलं असतं का?’

एकूणच ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकांना आणि लेखकांना तर उपयुक्त आहेच, परंतु त्या पलीकडे अभ्यास करणाऱ्यांनीही आवर्जून वाचावा असा आहे.

  • ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’
  • संपादन- कीर्ती मुळीक/ आप्पासाहेब जकाते-यादव
  • मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
  • पृष्ठे- १८४, मूल्य- ४९५ रुपये.