दराच्या आणि प्रेमाच्या भावनेने एकूण २० व्यक्तींविषयी रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकामध्ये आहे. १९७४ ते २०१४ या कालावधीत लिहिलेले आणि प्रकाशित झालेले हे लेख आहेत. ‘आकाशातील ताऱ्यांकडे आपण नेहमी पाहतो आणि त्यांचे आपले एक नाते तयार होते. या संग्रहातील व्यक्तींशी माझे असे नाते जडलेले आहे, त्या त्या व्यक्तीच्या थोरपणाचे विश्लेषण जसे आपण केले आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तींच्या दोषांविषयी लिहिण्याचे आपण टाळलेले नाही,’ असे मतकरी यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले आहे.

रत्नाकर मतकरी नाटककार, कथालेखक आणि चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. साहजिकच ‘सादर सप्रेम’ मध्ये नट-नटी, नाटककार, नाटय़-चित्रपट दिग्दर्शक, नाटय़ समीक्षक, चित्रकार यांच्याविषयीचे लेख संख्येने अधिक आहेत आणि त्यांच्या थोरवीबद्दल त्यांनी भरभरून लिहिले आहे. आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन दिवसातल्या मित्रांच्या मोठेपणाची त्यांनी आठवण काढली आहे, त्याचबरोबर कौटुंबिक परिवारातल्या काही व्यक्तीही इथे आपल्याला दिसतात.

‘दिसतात’ असे म्हटले ते खरेच आहे. आठवणींना उजाळा देता देता त्या त्या माणसांचे रंग-रूप, त्यांची जडणघडण, त्यांची स्वभाववैशिष्टय़े यांची मतकरी अगदी सहजपणे पखरण करीत जातात. त्याचे एक कारण असे आहे, की मतकरी जसे उत्तम चित्रकार आहेत, त्याचबरोबर एक सुरेख रचना कौशल्य त्यांच्यापाशी आहे; आणि याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पानोपानी येतो. उदाहरणार्थ, स्नेहप्रभा प्रधान यांचा ‘ठेंगणा बांधा, रुसलेल्या लहान मुलीसारखा चेहरा, डोळ्याभोवती काळी वलयं पण ओठ मात्र कोवळे वाटणारे’ किंवा, ‘पांढुरका टेरिकॉट झब्बा आणि तशीच सुरवार, गृहस्थ असा दणकट, उंचच उंच, आणि वर्णानं शिसवी-अस्सल धनगर’ असे विठ्ठल उमप या लोक कलाकाराचे आलेले वर्णन. आणि मग नंदकुमार रावते यांच्याबद्दल त्यांचे हे नेमक्या शब्दांत व्यक्त झालेले निरीक्षण- ‘ मी त्यांना चिडलेले पाहिले आहे पण भांडताना नाही’, ‘मजेत जगावे अशी परिस्थिती नसली तरी तसे जगण्याची तिची शैली आहे’ अशा आशयाचे एखादेही वाक्य डॉ. अनिता पाटील देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वाची  साद्यंत ओळख करू देते. हे पुस्तक म्हणजे व्यक्तिचित्रे नाहीत, असे मतकरी यांनी मनोगतात म्हटले असले, तरी  त्यांच्या बहुविध आठवणींमधून ती त्यांच्या लेखनामध्ये अलगद उतरली आहेत.

नाटककाराचे नाटक रंगमंचावर यावे म्हणून नाटय़ संस्थांना नाटकांची आवर्जून शिफारस करणारे नट-दिग्दर्शक दामू केंकरे, नाटय़ प्रयोगात अनेक मार्गानी चतन्य भरणारी, नाटय़ संहितांचे अप्रतिम संकलन करणारी विजया (मेहता), दुसऱ्यांना ज्ञानापासून वस्तूंपर्यंत सारे काही वाटत राहण्याच्या वृत्तीचे (मतकरी यांचे सासरे) माधव मनोहर, नवजात अर्भकांच्या आजारपणाचा खास अभ्यास केलेली, भित्र्या व सोशिक स्वभावाची, आणि आपली सुख-दुखे लपवण्याचा प्रयत्न करीत जगलेली डॉ. अनिता पाटील देशमुख, ‘पुण्यप्रभाव’ नाटकात ‘वृन्दावन’ची भूमिका करून, ‘दुष्टतेमध्ये एक सौंदर्य असते आणि पापालाही स्वत:चा डौल असतो’ असा साक्षात्कार घडविणारे नटश्रेष्ठ नानासाहेब फाटक, शिक्षणमंत्री पदावरून अगदी     सहज पायउतार होऊन, शिक्षण क्षेत्रातच रमलेले आणि नजरेत भरावे असे कार्य केलेले गोपाळराव मयेकर, खानदानीपणाचे कायदे मोडून ‘शकुंतला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक संस्कृत काव्य घरोघर पोहोचविणारे व्ही. शांताराम, दिशा न सोडता, कुठल्याही मोहाला बळी न पडता एका रोखाने प्रवास करीत राहिलेली दुर्मीळ सामाजिक कार्यकर्ती मेधा पाटकर, जन्मत:च माळावरचा आवाज घेऊन आलेले आणि अंगोपांगात लोककला भिनलेले विठ्ठल उमप, किशोरी आमोणकरांचे यजमान, पण त्यांच्या लोकप्रियतेविषयी आकस नसणारे आणि कुठलाच फायदा न घेणारे किंवा उदासीनताही न दाखविणारे रवींद्र आमोणकर, दिव्य दृष्टीचा, राक्षसी ताकदीचा आणि अलौकिक हातांचा एक प्रचंड माणूस, चित्रकार दीनानाथ दलाल, एखाद्या सामाजिक सत्याने भारावून जाऊन ते सत्यच ज्यांच्या लेखनाचा स्थायीभाव झाले असे कादंबरीकार-नाटककार जयवंत दळवी.. एक-दोन नाही, तर २० व्यक्तींचे मतकरी यांच्या दृष्टीने असलेले थोरपण अनेक घटना-प्रसंगांची अगदी सहज सय करीत इथे समोर येते.

‘मतकरी यांच्या दृष्टीने असलेले थोरपण’ असे म्हटले, त्यामध्ये पुस्तकाचे एकंदर स्वरूप येते, त्याचबरोबर कदाचित त्याची एक मर्यादाही येते. मनोगतामध्ये मतकरी यांनी आकाशातील ताऱ्याचा दृष्टांत दिला आहे. तो निदान सुचवतो तरी असे की कल्पनातीत अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तींच्या सर्वागीण उत्तुंग उंचीचे स्वरूप आणि शक्य तर त्या उंचीवर पोहोचण्याची जी काही प्रक्रिया घडली असेल ती मतकरी उलगडून दाखवू पाहताहेत.

पुस्तक वाचत असताना आणि ते वाचून संपल्यानंतरही लक्षात येते की, मतकरींनी त्या त्या व्यक्तींची, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली कदाचित ऐतिहासिक म्हणावी अशी कामगिरी आपल्यासमोर सादर केली आहे. त्या कार्यामध्ये त्या त्या व्यक्तीचे काही एक थोरपण अर्थातच अनुभवाला येते. प्रश्न आहे तो आकाशातील तारा आणि या पुस्तकामधील बहुतेक सगळ्या व्यक्ती यांच्यामधील साधम्र्याचा.  आपापल्या क्षेत्रामध्ये अविचल राहून निष्ठापूर्वक कार्य करीत आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांची आजच्या भ्रमिष्ट काळातही वानवा नाही. पण ते सगळेच काही तारे नाहीत. टिळक आणि आगरकर यांची थोरवी गाताना गडकऱ्यांनी आकाशातील ताऱ्यांची आठवण करून द्यावी हे ठीक आहे. आज ज्याप्रमाणे आपल्या भोवती सगळेच ‘महा’ होत चालले आहे, महाआरती, महाएकांकिका स्पर्धा.. त्याप्रमाणे सगळ्यांकडे दूरवरचे तारे आणि तारका म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. मतकरींनीच एका लेखात म्हटले आहे, की कालपरवा एखादे-दुसरे पारितोषिक मिळविलेल्या मुला-मुलीचा पानभर फोटो प्रसिद्ध करणाऱ्या कफल्लक पुरवण्या आता आपण पाहतो. प्रशस्तिपत्र ज्याला मिळावे त्याला मतकरीसुद्धा एखादे पदक बहाल करीत असल्याचे इथे जाणवत राहते.

मतकरी यांनी प्रसंगाप्रसंगाने हे लेख लिहिले आहेत. कधी आनंद व्यक्त करण्यासाठी, कधी दु:खात सहभागी होण्यासाठी. त्यामुळे सगळ्या लेखांना एक भावनिक डूब असणारच होती. त्या भावनेच्या भरात माधव मनोहर यांच्या आवडत्या शब्दात म्हणायचे तर ते जरा जास्तच ‘उदारमनस्क’ झाले आहेत असे दिसते.

दोन लेखांचा स्वतंत्र उल्लेख केला पाहिजे. एक, विजय तेंडुलकर यांच्या विषयीचा. नाटककार म्हणून तेंडुलकर सामान्य दर्जाचे असल्याचा मतकरींचा एकंदर अभिप्राय आहे. जे काय थोडेफार श्रेय ते तेंडुलकरांना देतात, तेही ‘वरच्या वर्गात घातला आहे’ अशा स्वरूपाचे आहे.

त्यांच्या मतांबद्दल इथे काहीच म्हणायचे नाही. तो विषय इथे नाही. एवढे मात्र म्हटले पाहिजे की अशा प्रकारच्या लेखाचा अशा स्वरूपाच्या पुस्तकात समावेश करायला नको होता. व्यक्तीच्या ‘थोरवी’च्या संदर्भात तो लेख अगदीच अप्रस्तुत ठरला आहे. दुसरा लेख आहे, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे आद्य संचालक इब्राहिम अल्काझी यांचा ‘व्यक्ती व कार्य’ अशा स्वरूपाचा परिचय करू देणारा  प्रतिभा मतकरी यांचा. स्वत: मतकरी अल्काझीना गुरू मानत असले, तरी सहचारिणीच्या लेखाचा समावेश पुस्तकात करण्याचे काही कारण नव्हते. कारण शक्य आहे की रत्नाकर मतकरी अल्काझी यांचे थेट विद्यार्थी असते तर कदाचित त्यांना काही वेगळेच म्हणावेसे वाटले असते.

ज्या व्यक्ती लौकिक अर्थाने सुप्रसिद्ध नाहीत, अशा मित्र व कौटुंबिक परिवारातील लोभस व्यक्तींच्या थोरपणाची ओळख करून देणारे मतकरींचे या पुस्तकातले लेख वाचनीय आणि मननीय आहेत. या पुस्तकाचे सौंदर्य त्या लेखांमध्ये आहे.

‘सादर सप्रेम’- रत्नाकर मतकरी,
मत्रेय प्रकाशन, मूल्य : रु. १८०. 
vazemadhav@hotmail.com