जेव्हा जगणं इतकं परावलंबी होतं, की जगण्याला कुठलाच अर्थ उरत नाही. औषधोपचारही निरुपयोगी ठरतात. हे जगणं नसतं, तर वेदना सहन करत मरण लांबवणं असतं. अशा अर्थशून्य आयुष्याची अखेर करण्याचा माणसाला अधिकार हवा. आयुष्याचा शेवट करण्याचा हा अधिकार म्हणजेच आजवर जगलेल्या आयुष्याचा सन्मान होय. मात्र, इच्छामरणाचा प्रश्न धर्म, संस्कृती, भावना आणि कायदा यांच्या गुंत्यात अडकलेला आहे. हा गुंता उलगडून स्वेच्छामरणाचा प्रश्न तर्कशुद्ध विचारासाठी सर्वासमोर ठेवणारे मंगला आठलेकर यांचे ‘जगायचीही सक्ती आहे..’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे पुन:प्रकाशित करण्यात येत आहे. त्यातील हा संपादित अंश..

स्वेच्छामरण ही वैयक्तिक बाब आहे. तो एक अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे आणि मुख्य म्हणजे तो नाइलाजाने घेतला जाणारा निर्णय नाही, ही गोष्ट इच्छामरणाच्या प्रश्नाचा विचार करताना लक्षात ठेवली पाहिजे. स्वेच्छामरणाचा हक्क म्हणजे ‘सुखाने मरू देण्याच्या प्रक्रिये’चा हक्क! हा हक्क बजावण्याची इच्छा ज्याला आहे, त्याला तो बजावता आला पाहिजे. इतर देशांप्रमाणेच आपल्या देशालाही जरी स्वेच्छामरणाचा एक इतिहास दिसत असला, तरी त्यासाठी चळवळ उभारण्याच्या कल्पनेने कधी आपल्या समाजात जोर धरला नाही. कारण इच्छामरणाचा संबंध हा फक्त संतमहात्म्यांशीच, अशी सर्वसामान्यांची एक समजूत असते. त्यामुळे ‘स्वेच्छामरण’ या शब्दाचा वापर करीत आपले आयुष्य संपवणाऱ्या मंडलिक किंवा या विषयावर पुस्तके लिहून ‘स्वेच्छामरण’ या विषयाचा पाठपुरावा करीत जगाचा निरोप घेणाऱ्या वि. रा. लिमयांसारखे एक-दोन अपवाद वगळता एरवी आपला समाज स्वेच्छामरणाविषयी आजही फारसे मोकळेपणाने बोलायला तयार नाही. जन्मलेल्या प्रत्येकाला मरण काही सांगून येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला जाणीवपूर्वक ते चांगले करण्याची सवड मिळेलच असेही नाही. अपघातात माणसे मरतात, नैसर्गिक उत्पातात माणसे मरतात, बॉम्बस्फोटात माणसे मरतात. अशा वेळी त्यांना आपल्यावर कोसळणाऱ्या संकटाची तो क्षण येईपर्यंत कल्पनाही नसते आणि तो क्षण जेव्हा त्यांच्यासमोर उभा ठाकतो, तोपर्यंत काही लक्षात येण्याच्या आतच त्यांचा प्राण गेलेलाही असतो. घरून छान निरोप घेऊन कामासाठी बाहेर पडलेल्या माणसाला रस्त्यात असा अपघात होतो की, त्याचा चेहरा, शरीर ओळखताही न येण्याइतके छिन्नविच्छिन्न झालेले असते. मग घरून जाताना घातलेल्या कपडय़ांवरून तो मृतदेह आपल्या माणसाचा आहे हे सांगण्याची वेळ घरातल्या माणसांवर येते. अशा वेळी चांगले मरण आणि वाईट मरण तर सोडाच, पण मरण तरी आपल्या हातात आहे की नाही, असा प्रश्न माणसाला पडला तर नवल नाही. पोहायला गेलेली, समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून पाण्यात उतरलेली मुले वाहून जातात. त्या मरणाला चांगले मरण म्हणायचे की वाईट मरण म्हणायचे? मरण हे मरणच! मरण आले की, मनुष्य हे जग सोडून जातो. त्याचे अस्तित्व संपून जाते. उरलेले त्याच्या चांगल्या-वाईट मरणाबद्दल स्वत:च्या कल्पनेने बोलत राहतात. मरणाऱ्यासाठी मात्र ते सारे त्या एका क्षणातच संपून गेलेले असते. मग अशा परिस्थितीत चांगले मरण आपल्याला यावे या आपल्या इच्छेचा किती भाग आपल्या स्वत:च्या हातात आहे, हा प्रश्न शिल्लक राहतोच. म्हणूनच असे म्हणता येईल, की फक्त मृत्युपर्यवसायी आजार, अपघातात अथवा जन्मत:च वाटय़ाला आलेले कमालीचे अपंगत्व आणि विकलांग वृद्धत्व यांच्याशीच खऱ्या अर्थाने स्वेच्छामरणाचा संबंध असतो. मृत्युपर्यवसायी आजार किंवा विकलांग वृद्धत्व यासारखेच कोणतेच सबळ कारण नसताना धडधाकट अवस्थेत आपणहून मरणाला जवळ करणे हा जरी स्वेच्छामरणाचाच भाग असला, तरी या प्रकाराला आत्महत्या म्हणतात. आणि आत्महत्या हा अगदी ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हटले, तरीही आपले धडधाकट शरीर होत्याचे नव्हते करून टाकणे हे कुणाला मान्य होण्यासारखे नाही. शारीरिक परावलंबन जे स्वेच्छामरण मागण्यामागचे तर्कशुद्ध कारण आहे, ते अशा आत्महत्यांच्या मागे नाही. शिवाय आपल्या आत्महत्या करण्याने जर आपले आईवडील, भावंडे, एकूणच आपली माणसे आयुष्यभर दु:खी राहणार असतील, तर स्वत:ला संपवून दुसऱ्याला दु:खी करणाऱ्या मरणाला चांगले मरण कसे आणि का म्हणायचे? जगण्यातली गुणवत्ता संपलेली आहे या जाणिवेनिशी जो चांगल्या मरणाला सामोरा जातो, तो दुसऱ्यांची दु:खातून सोडवणूक करतो. दुसऱ्यांना संकटात, दु:खात टाकत नाही, जननिंदेला तोंड देण्यासाठी त्यांना एकाकी करून जात नाही. त्याच्या जाण्याच्या निर्णयाने तोही सुटतो आणि मागे राहणारेही सुटतात; पण वर उल्लेखलेल्या कारणांशिवाय केवळ परिस्थितीला तोंड देता येत नाही म्हणून मरणाला जवळ करणारी माणसे स्वत:ही वाईट पद्धतीने आपले आयुष्य संपवतात आणि उरलेल्यांनाही जणू आयुष्यभर शिक्षा देतात. एखाद्याने निवडलेले मरण चांगले की वाईट ते असे दोघांच्या निर्णयावर अवलंबून असायला हवे. ज्याने तितकेच सबळ कारण नसताना आणि इतरांचा विचार न करता आपल्या आयुष्याचा शेवट केला, त्याला मरण चांगले आणि वाईट ठरवण्याचा हक्क नसतो. तसा अधिकार तो हातात घेणार असेल, तर त्याची ती कृती स्वार्थी ठरेल. म्हणूनच स्वेच्छामरण या विषयाची चौकट ठरवताना मृत्युपर्यवसायी आजार आणि विकलांग वृद्धत्व या दोन अवस्थांचाच त्यासाठी विचार करावा लागेल हे प्रथम आपल्याला मान्य झाले पाहिजे. मला कंटाळा आला म्हणून मी मरतो, हे काही मरण्याचे कारण होऊ शकत नाही. अगदी जरी अशा गोष्टीला कायद्याने मान्यता दिली आणि सारी माणसे लगेच मरणाला जवळ करणार नाहीत हे खरे असले, तरी एकाने तरी असा आपल्या आयुष्याचा शेवट का करून टाकावा? आणि त्याचे मरण हे चांगले मरण होते हे कोणी आणि कोणत्या आधारावर ठरवायचे? साहजिकच युथनेशिया या शब्दाचा, इच्छामरण या शब्दाचा अर्थ ‘चांगले मरण’ असा असेल, तर प्रथम चांगले मरण म्हणजे काय आणि कोणत्या परिस्थितीत आयुष्य संपवले तर त्याला चांगले मरण म्हणता येईल, हे स्पष्ट व्हायला हवे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ती माणसे मरताना आपल्या जवळ असणे हे चांगले मरण? आयुष्यात आपण कुणालाही दुखावले नाही, लुबाडले नाही, कुणाचे काही वाईट केले नाही ही समाधान देणारी भावना जातानाच्या क्षणी मनात असणे, हे चांगले मरण? आपली सगळी कर्तव्ये आपण पार पाडली, मुलेबाळे मार्गाला लागली, आता मरायला हरकत नाही, अशी कृतकृत्यतेची भावना मनात घेऊन जाणे हे चांगले मरण? ‘चांगले मरण’ या कल्पनेत मनाच्या समाधानी वृत्तीचा समावेश आहे की शरीराला वेदना सहन कराव्या लागू नयेत, शरीराचे हाल होऊ नयेत, कुणावर आपले ओझे पडू नये, कुणाला आपले काही करावे लागावे इतके आपण परावलंबी बनू नये, ही इच्छा आहे? मुलांचे आजार, त्यांची दुखणी-खुपणी आई-वडील काढतात, मग म्हातारपणी मुलांनी आई-वडिलांची दुखणी-खुपणी काढली, तर त्याचे आई-वडिलांना ओझे का वाटावे? बालपण जसे परावलंबी असते, तसेच म्हातारपणही परावलंबीच असते ही तर सर्वज्ञात गोष्ट आहे. मग तरीही आयुष्यच संपवून टाकण्याइतकी ओझ्याची भावना वृद्धपणी आई-वडिलांच्या मनात का निर्माण व्हावी?
चांगले मरण आणि स्वेच्छामरण या दोन्हीतील संबंध स्पष्ट करताना अशा अनेक प्रश्नांचा गुंता सोडवण्याची आवश्यकता आहे. जगातले किती धर्म ‘माणसाने आपल्या स्वत:च्या इच्छेप्रमाणे मरावे’ या कल्पनेला पाठिंबा देतात, हा प्रश्नही माणसाला मरणाचा हक्क वापरता यावा की नाही या प्रश्नाशी संबंधित आहे. वस्तुत: कुठलाही धर्म माणसाला कोणत्या पद्धतीने मरावे आणि कोणत्या परिस्थितीत मरावे याबाबत मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडत नाही. उलट जीवनपद्धतीविषयी, जीवन कसे जगावे याविषयी सारेच धर्म काही ना काही सांगत असतात. त्या विवेचनात योग्य-अयोग्य, पाप-पुण्य, भलेबुरे अशा वर्तनपद्धतीची चर्चा जरूर असते. ‘दुसऱ्याला मारू नये’ अशा अर्थाचे एक तरी वाक्य प्रत्येक धर्मसंहितेत असतेच. धर्म जसा माणसाच्या जगण्याविषयी अनेक गोष्टी सांगतो, तसा तो माणसाच्या मरणाविषयीही सांगतो. मृत्यू ही जीवनाशी अत्यंत अपरिहार्यपणे जोडली गेलेली घटना असल्यामुळे सर्व धर्मात मृत्यूचे चिंतन असतेच, पण त्या मृत्यूच्या चिंतनात माणसाच्या मनात मृत्यूचे भय निर्माण होऊ नये, तो सार्वत्रिक आहे, तो अटळ आहे याची जाणीव त्याला करून द्यावी आणि मृत्यूमुळे त्याच्या आयुष्यात निर्माण होणारे दु:ख कमी व्हावे, हीच भावना असते. उदा. आपल्याला जन्म ‘तो’ देतो, आपला मृत्यूही ‘त्याच्या’ हातात! प्रत्येकाची वेळ त्याने ठरवून टाकलेली आहे. ती वेळ आपली की आपण जाणार. शिवाय पुनर्जन्म आहे तेव्हा कुणीच पूर्ण नाहीसे होत नाही. कुठे तरी आपण परत जन्म घेतच असतो.. अशी दिलासा देणारी, आपल्या हातात काहीच नाही असे सुचवणारी आणि मरणासाठी माणसाचे मन तयार करणारी अनेक वाक्येही जगातल्या बहुतेक धर्मग्रंथांत सापडतात.
पण ज्याला जगायचे नाही, ज्याला मरण्याची इच्छा आहे, त्याला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे असे कुठलाही धर्म म्हणताना दिसत नाही. ‘दुसऱ्याला मारू नका’ असे म्हणत हिंसेचा धिक्कार प्रत्येक धर्म करतो, पण स्वत:चे आयुष्य संपवले तर ती हिंसा होत नाही, असे कोणताही धर्म स्पष्टपणे नमूद करत नाही. म्हणजेच स्वेच्छामरणाच्या संदर्भात कोणताही स्पष्ट निर्देश एकाही धर्मात दिसत नाही.

Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार