News Flash

आई-मुलीच्या नात्यातला पारंपरिक तिढा

 ‘डायरी’ ही मनीषा दीक्षित यांची नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

‘डायरी’ ही मनीषा दीक्षित यांची नवी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. आई आणि मुलगी यांच्यातील भावबंध हा या कादंबरीचा विषय आहे.

नंदिनी ही रंगभूमीवरची एक अभिनेत्री. नाटक हा केवळ तिचा पेशा नाही, ते तिचं ‘पॅशन’ आहे. कुठल्याही अस्सल कलाकाराची नाळ त्याच्या कलेशी आतूनच जोडलेली असते. व्यावहारिक जगातील समस्या आणि इतर लोकांच्या अपेक्षांनुसार कलेची ही नाळ तोडणं कलाकारासाठी फार कठीण असतं. नंदिनी ही जातिवंत अभिनेत्री आहे. नंदिनीच्या लहानपणापासून तिच्या तिरसट वडिलांचा तिच्या नाटकाला विरोध असतो. तो विरोध पचवूनच नंदिनी उभी राहते. आयुष्यभर नंदिनीला तिच्या आईची- शारदेची मोलाची साथ लाभते. तिच्या या प्रवासात श्री हा नाटय़-दिग्दर्शक तिला भेटतो आणि आयुष्यभराचा जिवलग मित्र होतो. एका नाटकातील भूमिकेमुळे नंदिनीला अजय हा श्रीमंत, खानदानी कुटुंबातील कर्तबगार मुलगा लग्नासाठी मागणी घालतो. अजय-नंदिनीचं लग्न होतं.

आभा ही अजय आणि नंदिनीची एकुलती मुलगी. नंदिनीच्या नाटय़व्यवसायामुळे लहानपणापासूनच आभाला तिचा पुरेसा सहवास लाभत नाही. त्यामुळे आभाच्या मनात हळूहळू तिच्याबद्दल परकेपणाची अढी बसायला सुरुवात होते. आभासाठी तिची आजी आणि तिचा बाबा हेच घर असतं. आईला ती खिजगणतीतही धरत नाही. आभा स्वत:ही आधुनिक जगातली करीअर करणारी तरुणी असूनही तिला आईने केलेलं करीअर हा गुन्हा वाटतो. असामान्य व्यक्ती बऱ्याचदा पालक म्हणून अयशस्वी ठरतात. वडिलांना एक वेळ माफी असते, परंतु मुलांना आई ही नेहमीच पारंपरिक स्वरूपात हवी असते. त्यातून अभिनयासारखं क्षेत्र असेल तर मुलांना आई अनेक रूपांत वाटून टाकल्यासारखी वाटते. या कादंबरीत एक प्रसंग आहे. नंदिनीचं नाटक बघायला चार-पाच वर्षांची आभा आजीसोबत जाते. नाटक संपल्यावर आभा आईला भेटायला येते, तर तिच्या भोवताली लोकांचा गराडा पडलेला. आभाला प्रचंड असुरक्षित वाटतं आणि ती आजीकडे धाव घेते. आभा या प्रसंगाने खचते. इथंच तिच्या आणि नंदिनीतलं अजून नीटसं न गुंफलं गेलेलं नातं निखळून पडतं. आभा या तुटलेल्या नात्यासहच मोठी होते. दिल्लीला शिकायला जाते. तिथे एका अपयशी प्रेमप्रकरणात अडकते. इकडे तिची आजी वारते.

आभाच्या आजीने अनेक वर्षे डायऱ्या लिहून ठेवल्या आहेत. आजी वारल्यावर आभाच्या हाती त्या लागतात. नात्याच्या बाबतीत आभा आता अतिशय असुरक्षित बनली आहे. तिची प्रिय आजी तिने गमावलेली आहे. प्रियकराने तिला फसवलेलं आहे. आपलं विखंडित आयुष्य सावरण्यासाठी आधार म्हणून आभा आजीच्या डायऱ्या वाचू लागते. त्यातून तिला आपल्या आईकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळत जातो. आईकडे आपण कायम वडिलांच्याच दूषित नजरेतून पाहिलं, हे आभाला चरचरून जाणवतं. हे काहीसं कटू सत्य समजल्यावर आभाला धक्का बसतो. आपण जे बघतो तेच प्रत्येक वेळी सत्य असतं असं नाही; सत्याच्याही अनेक बाजू असू शकतात, हे आभाला प्रकर्षांनं जाणवतं.

गेली हजारो वर्षे सुरळीत चालू राहिलेली आपली कुटुंबव्यवस्था ही खरं तर शारदेसारख्या अगणित स्त्रियांच्या मनाचे आणि छंदांचे बळी घेऊनच तरली आहे. जग कितीही बदललं तरी स्त्रियांसाठी कुठल्याही क्षेत्रातील वाटचाल ही अवघडच गोष्ट आहे, हे नंदिनी या पात्राधारे लेखिकेने दाखवलंय.

ही कादंबरी दोन काळांमध्ये घडत जाते. शारदेच्या (आजीच्या) डायरीतून दिसणारा भूतकाळ आणि नंदिनी व आभाच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडत जाणारा वर्तमान काळ. शारदा, नंदिनी आणि आभा या तिघींची भाषा वेगवेगळी राहील याचं भान लेखिकेने जपलं आहे. विशेषत: आभा ‘मिंग्लिश’ (मराठी-इंग्रजीची सरमिसळ असलेली) आणि हिंदीत व्यक्त होते; जे आवश्यकच होतं. कादंबरीत जागोजागी विनाकारण आलेली उद्गारचिन्हं मात्र खटकतात. हा सहज टाळता येईल असा दोष होता. हे सोडल्यास ‘डायरी’ ही एक वाचनीय कादंबरी आहे.

  • ‘डायरी’- मनीषा दीक्षित,
  • मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
  • पृष्ठे- २१६, मूल्य- २५० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 2:37 am

Web Title: manisha dikshit diary book
Next Stories
1 नवउद्यमींसाठी कल्पकनामा!
2 चटकदार कोशिंबीर
3 इतिहासाचा कच्चा खर्डा
Just Now!
X