ऐहोळे ही शिल्पकलेची प्रयोगशाळा मानली जाते. एखादे भव्य देवालय साकारण्याआधी त्या देवालयाचा छोटा नमुना तयार करावा, शिल्पकारांनी शिल्पांचे अनेक नमुने तयार करावेत अशा पद्धतीने अनेक देवालयांची निर्मिती इथे झाली. पाना-फुलांच्या, कमळांच्या वेलींनी नटलेल्या चौकटी, खांब, गरुड, सर्प, नटराज, कार्तिकेय अशी अनेक सुंदर शिल्पे इथे बघायला मिळतात. शिल्पकला हे भारतीय संस्कृतीचं अनमोल वैभव आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ओडिशापर्यंत असलेलं हे प्राचीन शिल्पवैभव मंदिरे, गुहा, लेणी, राजप्रासाद, वाडे, किल्ले, विहिरी अशा अनेक स्वरूपात पाहायला मिळतं. सातव्या शतकात चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याचे साम्राज्य संपूर्ण दक्षिण भारतावर होते. हा चालुक्यांच्या भरभराटीचा कालखंड होता. राज्यात शांतता आणि समृद्धी नांदत होती. या काळात शिल्पकलेने नटलेल्या अनेक मंदिरांची उभारणी झाली. सध्याच्या कर्नाटक राज्यात असलेली बदामी, बनशंकरी, ऐहोळे, लक्कुंडी, पट्टदकल इथली मंदिरे पाहिली की सुसंस्कृत, संपन्न राजसत्ता आणि राजाश्रयाने बहरलेली शिल्पकला, गायन व नृत्यकला तसेच शिक्षण, शेती, धर्म यांतील प्रगती अशा अनेक अंगांनी विकसित झालेल्या संस्कृतीचं दर्शन घडतं. चालुक्य राजघराणे सर्वधर्माचा आदर राखणारे होते. त्यामुळे शैव आणि वैष्णव मंदिराप्रमाणेच, कलात्मक जैन व बौद्ध मंदिरांचीही निर्मिती झाली.

बदामीहून साधारण चाळीस किलोमीटरवर ऐहोळे हे मलप्रभा नदीकिनारी वसलेले छोटेसे गाव आहे. ऐहोळेचे संस्कृत नाव आर्यपूर असे होते. ऐहोळे इथली एकाहून एक सुंदर मंदिरे पाहिली की डोळे आश्चर्याने विस्फारतात. सातव्या शतकात बांधलेले दुर्ग देवालय बाहेरूनआपल्या पार्लमेंट हाऊससारखे वाटते. या लंबवर्तुळाकार देवालयाच्या सभागृहाला शिल्पकामाने भरगच्च मजबूत चौकोनी  खांब आहेत. नृसिंह, वराह, विष्णू, शिव, अर्धनारीश्वर अशी अनेक कोरीव शिल्पे आहेत.

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Central Government Launches Dekho Apna Desh People s Choice 2024 Survey
देशातलं कोणतं पर्यटनस्थळ ठरणार सर्वांत लोकप्रिय? होणार ऑनलाइन मतदान!
bullcart race sculpture created in bhosari
भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी

कुटीर देवालयाचे छत छपरासारखे आहे. गर्भगृहाच्या वरील बाजूला गजलक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. दोन हत्तींच्या मध्ये कोरलेली लक्ष्मीची मूर्ती म्हणजे चालुक्य राजांच्या शक्ती व समृद्धीचे प्रतीक मानले जाते. नायीदर देवालयाचे द्रविड शैलीत बांधकाम केलेले शिखर अपूर्णावस्थेत आहे. लाडखान देवालयाच्या द्वारमंडपाला एका बाजूला गंगानदी व दुसऱ्या बाजूला यमुना नदी देवता स्वरूपात आहेत. स्त्री-पुरुष शृंगार शिल्पे, गरुड, शिवलिंग, नंदी यांची शिल्पे आहेत. छतावर सूर्य व विविध देवता यांच्या मूर्ती कोरल्या आहेत.

सातव्या शतकातील सूर्यनारायणाच्या देवालयाचे शिखर वक्राकार आहे. गाइडने एका चकचकीत पत्र्याच्या साहाय्याने बाहेरील उन्हाचे किरण गाभाऱ्यात पाडल्यावर, कोरीव दगडी अर्धकमानीतली उंच, उभी अशी सूर्यदेवांची सुंदर मूर्ती दिसली. मूर्तीच्या चेहऱ्याभोवती प्रभावळ आहे आणि  पायाखाली बारा घोडय़ांचे शिल्प आहे.

पाचव्या शतकातील गौडर देवालय हे दुर्गाभगवती देवीचे असावे असे तेथील शिलालेखावरून समजतात. नवव्या शतकातील बडिगेर देवालय हे सूर्य मंदिर होते. छतावर सूर्याचे शिल्प व प्रवेशद्वारावर ब्रह्मदेवाचे शिल्प आहे. रामलिंगेश्वर देवालयात शिव-पार्वती व गणेश यांच्या सुंदर मूर्ती आहेत. गाभाऱ्यासमोरील नंदी खूप मोठा आहे. त्याची बसण्याची ढब, त्याच्या गळ्यातील, पाटीवरील दागिने सुंदर कोरीव कामाचे नमुने आहेत. आजही या देवालयात पूजा-अर्चा होते. रथोत्सव व यात्रा फेब्रुवारी-मार्च महिन्यात असतात.  एका देवालयात हिरवट, चकचकीत ग्रॅनाइटचे मोठे शिवलिंग आहे. कुठे मकर-तोरण, नाग-नागिणी, सप्तमातृका, दिक्पाल, इंद्र, कुबेर, यक्ष-याक्षिणी, वाद्ये वाजविणाऱ्या, नृत्य करणाऱ्या कमनीय सुंदरी अशा अनेक शिल्पांचा खजिना आहे.

ऐहोळे ही शिल्पकलेची प्रयोगशाळा मानली जाते. एखादे भव्य  देवालय साकारण्याआधी त्या देवालयाचा छोटा नमुना तयार करावा, शिल्पकारांनी शिल्पांचे अनेक नमुने तयार करावेत अशा पद्धतीने अनेक देवालयांची निर्मिती इथे झाली. पाना-फुलांच्या, कमळांच्या वेलींनी नटलेल्या चौकटी, खांब, गरुड, सर्प, नटराज, कार्तिकेय अशी अनेक सुंदर शिल्पे बघायला मिळतात.

एक मजली गुंफेसारख्या बौद्ध चैत्यालयात पद्मासनात  बसलेली छत्रधारी बुद्धमूर्ती आहे. चेहऱ्यावर शांत भाव, कुरळे केस आणि गुडघ्यापर्यंत वस्त्र आहे. जैन देवालयात भगवान महावीरांचे बसवलेले शिल्प, दोन्ही बाजूला पाच-पाच हत्ती, घोडे असे आहे. इथल्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्खननात सापडलेली अनेक भग्न व अखंड शिल्पे निगुतीने जतन केली आहेत. तसेच छायाचित्रे, नकाशे, माहितीचे कॅटलॉग आहेत.

ब्रिटिश राजवटीत १९१४ साली पुरातत्त्व संरक्षण कायदा करण्यात आला. इतिहास व पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कर्झन व पर्सि ब्राऊन ऐहोळे इथे सर्वेक्षण करण्यासाठी आले असताना त्यांना या देवालयांमध्ये स्थानिक रहिवाशांनी आपली घरे थाटली असल्याचे आढळले. त्या रहिवाशांची त्यांनी नोंद करून घेतली. पुरातत्त्व खात्यामार्फत ही सारी देवालये  रिकामी करून ताब्यात घेण्यात आली. पण ब्रिटिश सव्‍‌र्हेअर्सनी केलेल्या नोंदीप्रमाणे आजही ही देवालये त्या ठिकाणी रहात असलेल्या लोकांवरून ओळखली जातात. उदाहरणार्थ लाडखान देवालय, गौडर (गौडा म्हणजे गावप्रमुख) देवालय, बडिगेर (सुतार) देवालय वगैरे.

इथल्या अनेक मंदिरांमधील मुख्य मूर्ती नाहीशा झालेल्या आहेत. अनेक मूर्तीचे हात तुटलेले, चेहरे विद्रुप केलेले आहेत. तरीही त्या भग्न मूर्तीमधून मूर्तीचे सौंदर्य, सौष्ठव, प्रमाणबद्धता, वस्त्रे, अलंकार पाहून त्या अज्ञात शिल्पकारांपुढे आपण नतमस्तक होतो. त्या काळातील स्थापत्यविशारदांचे ज्ञान व कला यांना विस्मयाने, आदराने दाद द्यावी लागते.

आता इथली १२३ देवालये पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत. कर्नाटक सरकारच्या मदतीने सगळीकडे स्वच्छता व गाइड्सची उपलब्धता आहे. मुख्य दरवाजांपासून आत दूरवर असलेल्या देवालय समूहांकडे जाण्या-येण्यासाठी एअरपोर्टवर असतात तशा उघडय़ा, छोटय़ा ट्रॉली बसची व्यवस्था आहे. आतमध्ये चांगले रस्ते, झाडे, हिरवळी आहेत आणि मुख्य दरवाजाबाहेर आल्यावर शहाळ्याचे पाणी, पेरू, मडक्यातील दही अशी जिव्हा तृप्त करणारी व्यवस्था आहे.

ऐहोळे इथून गदग या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी चांगली हॉटेल्स आहेत. गदगहून साधारण बारा किलोमीटवर पूर्वेला लक्कुंडी आहे. इथली शिल्पकला अतिशय देखणी आहे. कल्याणी चालुक्यांच्या काळात म्हणजे अकराव्या-बाराव्या शतकात इथे साधारण पन्नास देवालये उभारली गेली. परकीय आक्रमणांमुळे व कालौघात यातील बरीच मंदिरे नष्ट झाली. लक्कुंडी हे चालुक्य राजांचे उपराजधानीचे ठिकाण होते. इथे चालुक्यांची सोन्याच्या नाण्यांची टांकसाळ होती. इथले काशिविश्वनाथ मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उकृष्ट नमुना आहे. काळ्या आणि हिरवट पातळ कपचांचा दगड (स्लेट) मंदिर उभारणीसाठी वापरला आहे. मंदिरात मूर्ती नाही. मंदिराचे भक्कम गोलाकार खांब लेथचा वापर केल्यासारखे गुळगुळीत आहेत. त्यावर भरगच्च  शिल्पकाम आहे. प्रवेशद्वारावर  जाळीदार नक्षी व त्यावर गजलक्ष्मी कोरली आहे. या देवालयात  नंदी नाही तर देवालयाला सन्मुख असे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. मंदिरातील रिकाम्या सिंहासनाखाली सात अश्वांचे शिल्प कोरले आहे. मंदिरातील सूर्य नारायणाची देखणी मूर्ती इथल्या म्युझिअममध्ये  बघायला मिळते. देवालयाच्या बाह्य़ भिंतींवर रामायण-महाभारतातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. मल्लीकार्जुन, वीरभद्र, नानेश्वर, माणिकेश्वर, सोमेश्वर अशी अनेक शिल्पसमृद्ध मंदिरे इथे आहेत.

लक्कुंडीचे एक वैशिष्टय़ म्हणजे इथल्या विहिरी.  या विहिरींना  कल्याणी किंवा पुष्करणी म्हटले जाते. लांबट दगडांच्या उतरत्या १०१ पायऱ्या (एकशे एक पायऱ्या) असलेल्या या विहिरींमध्ये मोठमोठे कोनाडे कोरले आहेत. त्यात लहानसा घुमट असलेली छोटय़ा शिवमूर्तीची अनेक मंदिरे कोरली आहेत. अनेक विहिरींत कन्नड भाषेतील शिलालेख कोरले आहेत.

इथले बाराव्या शतकातील जैन मंदिर साध्वी अट्टिंबे हिने बांधले आहे. मंदिरातील नेमिनाथ यांची मूळ भग्न, दगडी मूर्ती आता इथल्या म्युझिअममध्ये आहे. आता मंदिरात पंचधातूची, पण सोन्यासारखी चकाकणारी मूर्ती आहे. मूर्तीच्या एका बाजूला पाय तिरका करून उभी असलेली पद्मावती देवी आहे. तिच्या डाव्या नाकात चमचमणारी चमकी आहे. इथल्या चतुर्मुख ब्रह्मदेवाचे शिल्प म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. तरुण वयापासून वृद्धत्वाकडे जाणारे असे आयुष्याचे चार टप्पे या चार मुखांमधून दाखविले आहेत. पुरातत्त्व खात्यातर्फे उभारलेल्या म्युझिअममध्ये अनेक भग्न, पण सुंदर शिल्पे, मोठमोठे रांजण, नक्षीकामाच्या पट्टीका जतन केलेल्या आहेत.

भारतात अशी अनेक शिल्पकाव्ये उघडय़ा आकाशाच्या छताखाली, ऊन पाऊस, झेलत शेकडो वर्षे उभी आहेत. या कलाकृतींची झीज होणे अपरिहार्य आहे. पण अजूनही पैशाच्या लोभापायी या अमूल्य कलाकृतींची चोरी होते, त्यांची परदेशात विक्री होते याचे वाईट वाटते. आज अनेक तज्ज्ञ या शिल्पांचा अभ्यास करीत आहेत. त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून धडपडत आहेत. आपणही आपली उदासीन वृत्ती सोडून या शिल्पवैभवाचा आस्वाद घेतला पाहिजे. गड-किल्ले, लेणी, शिल्पसमृद्ध मंदिरे पाहताना ती जाणत्या, तज्ज्ञ व्यक्तींकडून समजावून घेतली, तर निदान तिथल्या गाइडची मदत घेऊन त्यातील सौंदर्य व बारकावे यांचा आस्वाद आपण घेऊ शकतो.

पुष्पा जोशी

pushpajoshi56@gmail.com