01 December 2020

News Flash

यादवी युद्धाची सुरस कथा

गोष्ट १८६१ ची’ हे माधवी सामंत यांचे पुस्तक प्रामुख्याने अमेरिकेच्या यादवी युद्धाचा थरार मांडते.

गोष्ट १८६१ ची’ हे माधवी सामंत यांचे पुस्तक प्रामुख्याने अमेरिकेच्या यादवी युद्धाचा थरार मांडते.

‘गोष्ट १८६१ ची’ हे माधवी सामंत यांचे पुस्तक  प्रामुख्याने अमेरिकेच्या यादवी युद्धाचा थरार मांडते. नावामध्ये विशिष्ट सालाचा उल्लेख असला तरी असंख्य सनावळ्या व गुंतागुंतीचे युद्ध आदी प्रसंग यांचेच केवळ वर्णन यात नाही; तर अतिशय रंजक पद्धतीने सांगितलेला हा गोष्टीरूप, परंतु वास्तववादी इतिहास आहे. ही ललित कादंबरी आहे. त्यामुळे युद्धादी प्रसंगांबरोबरच अनेक पात्रे व प्रसंगांना उठाव येण्यासाठी व वातावरणनिर्मितीसाठी कल्पना, भावभावना, रंजकता यांचा आधार यात घेतलेला दिसतो. ललित कादंबरीत अभिप्रेत कलात्मक स्वातंत्र्य येथे घेतलेले आढळते. पण कुठेही त्याचा अतिरेक झालेला मात्र दिसत नाही.

१२ एप्रिल १८६१ या दिवशी अमेरिकेत यादवी युद्धाची ठिणगी पडली. या ठिणगीने रौद्ररूप धारण केले आणि चार वर्षे सारा देश वेठीला धरला. ही घटना व तिचा कालावधी हा या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. पण त्याचबरोबर त्यात राष्ट्रपिता अब्राहम लिंकन, जनरल ग्रँट, जन. मॅक्मिलन, शेरमन, जेम्स, रोलंड, ट्रोबीज इत्यादींची व्यक्तिमत्त्वेही चित्रित होतात. लष्कर व लष्करी सेवा हा प्रांत स्त्रियांसाठी त्याकाळी पूर्णपणे वज्र्य होता. भारताप्रमाणेच पाश्चिमात्य देशांतही स्त्रियांवर जाचक बंधने होती. परंतु तरीही या युद्धात काही स्त्रिया ‘पुरुष सैनिक’ म्हणून अत्यंत चतुराईने सैन्यात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यापैकी फार थोडय़ाजणी शेवटपर्यंत कार्यरत राहू शकल्या. आणि त्यातही गौरवास्पद कामगिरी बजावणे एक-दोघींनाच शक्य झाले. त्यापैकी एक होती- एमा. देशप्रेम आणि कृतज्ञतेपोटी एमाने पुरुषी वेश व वृत्ती धारण करून फ्रँकलिन थॉम्पसन या नावाने यादवी युद्धात उडी घेतली अन् त्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले. अमेरिकेच्या या यादवी युद्धात आपण या एमासोबत युद्धाचा मागोवा घेत जातो. युद्धाबरोबरच ही एमाचीही गोष्ट बनते. एमाचे बालिश, खटय़ाळ बालपण, धाडसी व आक्रमक तारुण्य, जाज्ज्वल्य देशभक्ती, कामाप्रति असलेली बांधिलकी, फ्रँकलिनच्या भूमिकेत तिला आलेल्या समस्या, तिची चतुर हेरगिरी, सैनिक म्हणून केलेला पराक्रम, तिचे सेवाभावी परिचारक रूप.. या सगळ्याने आपण भारावून जातो. तिचे आत्मसमर्पण आपणास अचंबित करते. तिच्यावर लागलेल्या कलंकाने आपण अस्वस्थ होतो. बाहेरून कणखर, आक्रमक, पुरुषी वाटणारा ‘फ्रँकलिन’ पुढील आयुष्यात वैवाहिक जीवनात रमणारी, तीन मुलांत गुंतलेली एक कुटुंबवत्सल स्त्री ‘एमा’ म्हणूनही आपलीशी वाटते. एका स्त्रीची ‘एमा’ व ‘फ्रँकलिन’ ही दोन रूपे, दोन पैलू, अपार कर्तृत्व याने आपण भारावून जातो. लहानपणी नकोशी असणारी एमा आपल्याला मात्र हवीशी वाटते. केवळ ५७ व्या वर्षी झालेला तिचा केविलवाणा मृत्यू मनाला चटका लावतो. मृत्यूनंतर का होईना, तिला सन्मानित होण्याचे भाग्य लाभलेले पाहून आपण निश्चितच सुखावतो. ही गोष्ट युद्धाची, एमा- फ्रँकलिनची, तसेच अब्राहम लिंकन, अनेक जनरल, असंख्य सैनिक, अनेक अनाम वीरांची, डावपेचांची, शौर्याची, त्यागाची, हार-जीत, विध्वंस, राखेतून उभं राहण्याची.. अशा अनेक गोष्टींची ही ‘गोष्ट १८६१’ची आहे.

लेखिकेने हा अत्यंत अवघड विषय, अनेक घटना, व्यक्तिमत्त्वे, कालावधी हे सर्व ३३० पानांमध्ये सामावले आहे. एकीकडे युद्धाचा थरार त्यांनी उत्कंठावर्धकरीत्या मांडला आहे, त्याचबरोबर अनेक व्यक्तिमत्त्वे अत्यंत खुबीने जिवंत केली आहेत. १८६१ सालची अमेरिकेतील राजकीय परिस्थिती, सामाजिक वातावरण, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक घडामोडी यांचाही मागोवा लेखिकेने घेतला आहे. त्यातून आपणही नकळत अमेरिकेशी जोडले जातो. लेखिकेने एकूणच त्या परिस्थितीचे व व्यक्तींचे केलेले अध्ययन, असंख्य संदर्भग्रंथांचे केलेले वाचन आणि त्याबरहुकूम कादंबरीची केलेली मांडणी अचंबित करणारे आहे. तळटिपांमध्ये दिलेली अनेक महत्त्वाच्या बाबींची माहिती वाचक-अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. लेखिकेची भाषाशैली साधी, पण उत्कंठापूर्ण, गतिमान अशी आहे.

माधवी सामंत यांनी ‘गोष्ट १८६१ ची’ या कादंबरीतून अमेरिकेचे यादवी युद्ध, तत्कालिन स्त्री-सैनिकांपुढील समस्या, सैनिकांची वीरता, युद्धातील विध्वंस व त्याचे परिणाम, असंख्य अमेरिकन नक्षत्रे आणि या सर्वात केंद्रस्थानी असणारी एमा ऊर्फ फ्रँकलिन ऊर्फ मिसेस एमा लायनस सिले या सर्वाचा व आपला भावबंध जुळवला आहे. ही कादंबरी इतिहास, समाजशास्त्र या विषयांचे अध्ययन व अध्यापन करणाऱ्यांनी तर जरूरच वाचायला हवी. जरी यात अमेरिकन युद्धाची पाश्र्वभूमी असली तरी लेखिकेच्या लेखनशैलीमुळे आणि एमा-फ्रँकलिनच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वांमुळे रूक्ष न बनता सुरस बनली आहे.

‘गोष्ट १८६१ ची’- माधवी सामंत,

डिंपल पब्लिकेशन्स,

पृष्ठे- ३३२, मूल्य- ३५० रुपये. 

सुनेत्रा टिल्लू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2017 1:31 am

Web Title: marathi book gosht 1861 chi review by sunetra tillu
Next Stories
1 तू आर्त मला जो ऐकविलास अभंग
2 ‘नजर’ देणाऱ्या किशोरीताई
3 हृदयाला भिडणारं गाणं..
Just Now!
X