सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीने तर हे संक्रमण अधिक प्रवाही बनवले आहे. आधीच्या पिढीची आणि आताच्या पिढीची जीवनमूल्ये यांच्यातील अंतरही झपाटय़ाने वाढते आहे. अशात या जीवनमूल्यांचा संघर्ष अटळ ठरत जातो. ‘पाऊस निनादत होता..’ या छाया पिंगे यांच्या कथासंग्रहात याच मूल्यसंघर्षांचे सौम्य चित्रण आले आहे. हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह. विविध दिवाळी अंक व विशेषांकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या व आकाशवाणीवर सादर झालेल्या कथांचा या संग्रहात समावेश आहे. त्यात गूढकथेपासून विनोदी कथनापर्यंतचे विविध कथनप्रकार वाचायला मिळतात.

निरीक्षणं मांडण्याची हातोटी हा कथालेखनातील एक गुण म्हणून सांगितला जातो. पिंगे यांच्या या पहिल्याच कथासंग्रहामध्ये तो पुरेपूर दिसतो. आजच्या सामाजिक-सांस्कृतिक संक्रमणकाळाविषयीची अनेक निरीक्षणं या कथांतून ओघाने मांडली गेली आहेत. ‘लिमिट्स’ ही या संग्रहातील पहिली कथा स्वतंत्र स्वभावाच्या दोन मैत्रिणींमधील भावनिक द्वंद्वाचे चित्रण करते. या कथेतील मुक्त जीवनाचे आकर्षण असणारी मानसी आणि परंपरागत चौकटीत आपलं करिअर घडवणारी नेहा यांच्यातील संवादातून लेखिका पारंपरिक संस्कार आणि आधुनिक मूल्यं यांच्यातील द्वंद्वावर भाष्य करते. तर ‘शांती’ या कथेतून एकटय़ा राहणाऱ्या स्त्रीची अगतिकता चित्रित झाली आहे. शिक्षणासाठी परगावी गेलेल्या मुलाच्या पालकांचं विशेषत: आईचं मन त्याची काळजी करत असतं, तर ते मूल मात्र नव्या जगाचा अनुभव आत्मविश्वासाने घेत असतं, ही भावनिक गुंतागुंत ‘मनातलं’ या कथेतून मांडण्यात आली आहे. तरुणवयातील मुलीने आत्महत्या केल्यानंतरचं तिच्या आईच्या मनाचं आक्रंदन मांडणारी ‘मागे परतोनी पाहे’ व मनातील उलटसुलट विचारांचा फोलपणा दाखवणारी ‘चकवा’ या दोन्ही कथा वाचनीय आहेत. याशिवाय ‘साहेब, बीवी और..’ व ‘लग्नाला जाते मी..राजपुरिया’ या दोन विनोदाच्या अंगाने जाणाऱ्या कथा किंवा ‘सुखशांती’ व ‘भाकीत’ या गूढकथाही लेखिकेच्या कथालेखनाचे सामथ्र्य दाखवणाऱ्या आहेत. यातील अनेक कथांतून सध्याचे कॉर्पोरेट जग, नवे तंत्रज्ञान, त्यातली भाषा, विविध संस्कृती-संस्कारांच्या लोकांचे तिथे एकत्र येणे, त्यातून उमटणारे आंतरिक हिंदोळे, मानसिक द्वंद्व आदींचे चित्रण आले आहे. आजूबाजूच्या घडत्या जगाचे, त्यातील सुख-दु:खाचे, घुसमटीचे वास्तवदर्शी कथन करणाऱ्या या कथा नक्कीच वाचनीय आहेत.

 ‘पाऊस निनादत होता..’-  प्रा. छाया पिंगे,

सुकृत प्रकाशन,

पृष्ठे – १६०, मूल्य – १८५ रुपये