सीमा भानू

प्रत्येकाचे आयुष्य ही एक कथाच असते आणि ती तिच्या परीने तरी सुरसच असते. हे स्वारस्यच मग लेखनाला प्रवृत्त करते. ‘मॅग्नोलिया’ हे अनिता कुलकर्णी यांचे आत्मकथनही तसेच आहे.

सुरुवातीलाच हे नेहमीसारखे आत्मकथन नाही, हे लेखिकेने स्पष्ट केले आहे. म्हणजे शाळेतल्या गमतीजमती, कुटुंबाची माहिती, एकूणच ‘मी कशी घडले?’ किंवा त्या स्वरूपाचे वैयक्तिक तपशील याबद्दल जवळजवळ काहीच या पुस्तकात नाही. त्यामुळे त्या अपेक्षेने हे पुस्तक वाचायला जाणाऱ्या वाचकांचा भ्रमनिरासच होईल. लेखिकेने आसुसून जगलेल्या आयुष्यातील त्यांना जे भावलं, भिडलं ते इतरांना सांगावे या हौसेतून, तशी गरज वाटल्याने हे लेखन केले आहे. आपल्या व्यवसायातील टप्पे आणि आयुष्यात घेतलेल्या रसरशीत अनुभवांना उजाळा.. थोडक्यात- ‘जगले अशी’ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.

अनिता कुलकर्णी या व्यवसायाने वास्तुविशारद आहेत. जे. जे. आर्किटेक्चर कॉलेज आणि अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे वास्तव्यही दोन देशांत असते. वास्तुशास्त्राचे अध्यापन, लिखाण याबरोबरच त्यांनी ललित लिखाणही केले आहे. शास्त्रीय संगीताचा त्यांचा दीर्घ व्यासंग आहे. आणि मुख्य म्हणजे आयुष्य भरभरून जगण्याची आस त्यांना आहे. त्यामुळे जिथे सौंदर्य दिसते, मनाला ओढ लावणारे काही सापडते, तिथे त्या रेंगाळतात. त्यामुळे आठवणी, वेगवेगळे अनुभव, चिंतन यांचा एक मोहक कोलाजच आपल्याला या पुस्तकात पाहायला, वाचायला मिळतो. अर्थातच त्यात सुसंगतपणा किंवा नियमितपणा नाही. लेखिका म्हणतात त्याप्रमाणे, भौतिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक पातळ्यांवर जगत असताना मनात सहज उलगडलेले हे पदर आहेत. आपल्याला सुरुवातीला अशा आत्मकथनात्मक लेखनाची सवय नसल्याने गांगरायला होते. परंतु नंतर हाच मांडणीतील मोकळेपणा आवडायला लागतो.

सुरुवातीलाच जे. जे. महाविद्यालयातील आठवणी आल्या आहेत. त्या इतक्या छान उतरल्या आहेत, की त्यांच्या मनातला तो परिसर, वर्गातील प्रयोग, प्रेझेन्टेशनची धावपळ, पायऱ्यांवर बसून मित्र-मत्रिणींबरोबर मारलेल्या गप्पा, वाटून घेतलेले हास्यविनोद हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. पुढे अमेरिकेत लँडस्केप डिझाइनमधले प्रगत शिक्षण घेताना त्यांच्या मनाच्या कक्षा अजून रुंदावल्या. तिथली मोकळीढाकळी शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा, क्षमतेचा अंदाज घेत पुढे जाण्याची मुभा, कुठलाही अभ्यासक्रम विशिष्ट वर्षांतच पुरा न करण्याचे स्वातंत्र्य या गोष्टींमुळे ‘ही वर्षे समृद्ध करणाऱ्या कष्टांची वर्षे आहेत..’ असे लेखिका म्हणतात. तेव्हा आपल्या चौकटबद्ध शिक्षणपद्धतीशी त्याची नकळतच मनात तुलना होते, हे नक्की.

जे. जे. महाविद्यालयातील आयुष्यात त्यांच्या विचारांना एक शिस्त लागली होती. पण त्यात लवचिकपणा आला तो अमेरिकेतील अभ्यासक्रमाने. या गोष्टीचा उपयोग त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केल्यावर झाला. वास्तुरचनेकरता सल्ल्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या आपल्याला बांधायच्या असलेल्या रचनेबाबत काही कल्पना असतात. त्या सौंदर्यशास्त्रात नीट बसवण्यासाठी त्यांना मदत करणे आणि आपले म्हणणे किती योग्य असले तरी त्यांच्यावर न लादणे, ही पथ्ये त्यांनी कायम पाळली. आपल्या काही विशिष्ट कामांचा त्यांनी उल्लेख केला आहे. त्यातही उत्तर कर्नाटकातील एका प्रकल्पाबाबत त्यांनी सविस्तरपणे लिहिले आहे. त्यांच्या निरनिराळ्या प्रकल्पांत त्यांनी इतक्या वेगवेगळ्या झाडांचा वापर केलेला आहे, की ते वाचूनच अचंबित व्हायला होते.

त्यांनी देशात आणि परदेशात दोन्हीकडे काम केलेले असल्याने दोन्ही देशांच्या कार्यपद्धतीची तुलना होणे साहजिकच आहे. अमेरिकेतील नेमकेपणा, सुबकता, रेखीवपणा आणि अनेक गोष्टी लक्षात घेऊन काम करण्याची पद्धत हे गुण असले तरी भारतातला साधेपणा, माणसांचा इरसालपणा, आपुलकी याच्या प्रेमात लेखिका आहे. इथल्या कामाचे स्वरूप अधिक जिवंत आणि उत्कट आहे असे त्यांना वाटते. चांगल्या रचनांचा महागडेपणाशी किंवा दिखाऊपणाशी काही संबंध नाही. त्याचे खरे नाते आहे ते गुणवत्ता, सौंदर्याशी. ‘हवामान, व्यवहार यांची सांगड घालून नजरेला आणि मनाला आनंद देणारे, राहणीचा दर्जा वाढवणारे ते आर्किटेक्चर’ अशी या शास्त्राची व्याख्याही त्या सहजगत्या करून जातात.

मित्रांबद्दलही त्यांनी फार आत्मीयतेने लिहिले आहे. या मित्रांत जे. जे.च्या सहाध्यायांपासून वयाने खूप ज्येष्ठ असलेले डॉ. गोसावी वा नलिनी इनामदार यांच्यापर्यंत अनेक जणांचा समावेश आहे. या बहुतेक सगळ्या व्यक्ती खूप हरहुन्नरी आहेत. या पुस्तकातील नेपाळच्या निर्वासित मुलांवरचा भाग मुळातूनच वाचावा असा आहे. लेखिकेची कलंदरी या पुस्तकात खूप ठिकाणी दिसत असली तरी त्यांनी केलेली भटकंती हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर भाग असावा हे जाणवते. त्या म्हणतात, ‘एकमेवाद्वितीय ठिकाणं आम्ही पाहिली. रौद्र बर्फवादळात, प्रलयकारी वृष्टीत, दुधाळ, नीरव चांदण्यात पाहिली. अस्सल मराठी शिखरं, पर्वत, टेकडय़ा, नद्या, समुद्र, उन्हाळी उघडं आकाश, भरून येणारे ढग, किनारे, पळस-पांगारे, कॅशिया-गुलमोहोर आणि रसरसलेली चेरी ब्लॉसम्स, जलप्रपात, निळ्या समुद्रावर झुकलेले काळकडे, अटलांटिक महासागरातल्या बेटांवरचा भन्नाट वारा.. ही शेकडो निसर्गरूपं माझ्यासाठी रूपक बनली. या भटकंत्यांनी माझ्या आयुष्याचा रंगच बदलून टाकला. सूर, अक्षर, रंग सगळ्यांना त्या प्रेरणा झाल्या.’ कामाच्या निमित्ताने किंवा केवळ भटकण्यासाठी- कुठल्याही रूपानं त्यांनी खूप प्रवास केले आहेत. कधी एकटय़ाने, कधी साथीने. परंतु प्रत्येक वेळेस हा प्रवास त्यांना काही ना काही देऊनच गेला आहे. भारत, अमेरिका, युरोप फिरताना रस्ते, वेगवेगळ्या वास्तुरचना, निसर्ग या सगळ्याबरोबरच त्यांनी माणसेही खूप वाचली आहेत याचा प्रत्यय येतो.

लेखिकेची शैली सहज संवाद साधल्यासारखी आहे. आपण घडण्यात कुटुंबीयांचा, मित्रांचा वाटा आहे हे लेखिकेला मान्य आहेच; पण तरीही ‘आपलं’ असं एक कर्तृत्ववान, रसिक व्यक्तिमत्त्व आहे याचं भानही त्यांना आहे. त्यामुळे त्यांचे हे कथन खऱ्या अर्थाने  ‘आत्मकथन’आहे. ‘मॅग्नोलिया’ हे उत्तर अमेरिकेत फुलणारे फूल त्यांनी रूपकासारखे वापरले आहे. हे पांढरेशुभ्र फूल म्हणजे सौंदर्य, आनंद आणि शांतीचे प्रतीकच! आपल्या वाटचालीत लेखिकेलाही हे सौंदर्य कुठंतरी सापडलं आणि मग सगळी बेचनी दूर होऊन या फुलासारखेच ‘लेट इट बी’असं म्हणणं त्यांना सहज शक्य झालं.

‘मॅग्नोलिया’- अनिता कुलकर्णी,

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- २४६, मूल्य- २९५ रुपये.