16 October 2019

News Flash

व्यक्तिचित्रांची वेधक गाथा

अनेक राजकीय नेत्यांशी लेखकाचा जवळून संबंध आला. यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते.

‘मराठवाडी माणसं’, ‘अजून आठवतं’ या दोन संग्रहांनंतर यु. म. पठाण यांचा ‘स्मरणगाथा’ हा तिसरा व्यक्तिचित्रांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. संतसाहित्याशी असलेल्या अतूट संबंधांचा विचार करता ‘स्मरणगाथा’ हे शीर्षक अतिशय उचित वाटते. स्मरणगाथेचे तीन विभाग केले आहेत. पहिल्या विभागात पंचवीसहून अधिक शिक्षक, मार्गदर्शक, सहकारी आणि विद्यार्थ्यांच्या आठवणी आहेत.

महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक भाऊसाहेब कोलते यांच्या जन्मशताब्दीच्या सांगतेनिमित्त लिहिलेल्या लेखाने पहिला विभाग सुरू होतो. भाऊसाहेबांच्या आग्रहास्तव पठाणांनी शासकीय महाविद्यालयात मिळत असलेली सुखाची नोकरी सोडून विद्यापीठातले काम स्वीकारले. भाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवरसनारायणविरचित ‘शल्यपर्व’ च्या हस्तलिखित पोथ्या मिळवून त्यांचे संपादन करून शल्यपर्व प्रकाशित केले. याच लेखात मा. गो. देशमुख आणि टी. जी. देशमुख या बंधूद्वयांच्याही काही आठवणी दिल्या आहेत.

शंकर पाटील आणि ‘कवितारती’चे पुरुषोत्तम पाटील यांच्याशी लेखकाच्या मत्रीचा धागा जुळला तो सत्यकथेमुळे. ‘कविताव्रती’ या लेखात पुरुषोत्तम पाटलांचा साधा स्वभाव आणि प्रसिद्धिपराङ्मुख वृत्ती रेखाटली आहे. त्या तुलनेत व. दि. कुलकर्णी सरांचे व्यक्तिचित्र फारच त्रोटक आहे.

य. दि. फडके आणि भालचंद्र फडके हे बंधू लेखकाचे बालमित्र. सोलापूरला कॉलेजमध्ये आणि नंतर काही वर्षांनी औरंगाबादमध्ये त्यांना एकत्र काम करण्याचे योग आले. अकरावीत असताना या मित्रांनी हिंदी कथांचे अनुवाद केले आणि ते विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशितही झाले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातदेखील त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली.

अनेक राजकीय नेत्यांशी लेखकाचा जवळून संबंध आला. यशवंतराव चव्हाण हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. तर संतसाहित्याविषयी खास आस्था असल्याने शंकरराव चव्हाण त्यांच्या निकट आले. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्याशी जवळची मत्री. ९ मार्च हा लेखकाचा आणि विलासरावांचा वाढदिवस. त्या दिवशी आवर्जून एकमेकांना फोनवर शुभेच्छा दिल्या जात. सुशीलकुमार शिंदे राज्यपाल झाल्यावर त्यांनी आवर्जून पहिला फोन लेखकाला केल्याची आठवण एका लेखात आहे. शंकरराव मोहिते-पाटील आणि विजयदादा मोहिते-पाटील यांच्यावर ‘पिता-पुत्र’ शीर्षकाचा स्वतंत्र लेखच आहे. लेखकाचे वडील, धाकटे मामा आणि पद्मश्री विखे-पाटील यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे बाळासाहेब विखे-पाटील आणि लेखक यांच्यातही स्नेह जडला. बाळासाहेबांची एक सुंदर आठवण ‘स्वप्नं..’ या लेखात आहे. पठाणांना ‘पद्मश्री विखे-पाटील जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला. त्या कार्यक्रमात बाळासाहेब व्यासपीठावर फार वेळ न थांबता बाजूला बसले. मात्र कार्यक्रम संपेपर्यंत थांबले.

‘झेप’ या लेखात सोलापूरने दिलेल्या अनेक स्नेह्यांची यादीच आहे. य. दि. आणि भालचंद्र फडके, रा. ना. पवार, माधव मोहोळकर, प्रा. भोगीशयन, प्रा. निशिकांत ठकार, प्रा. रंगनाथ तिवारी, विश्वनाथ ढंगे, श्रीराम पुजारी आदी. त्यातच कॉम्रेड मनोहर पंधे आणि मधुकर पंधे या भावंडांच्या काही आठवणी येतात. मधुकर पंधे यांनी स्कॉलरशिपवर दयानंद कॉलेजात प्रवेश घेतला आणि दुसऱ्याच वर्षी कॉलेजातल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी मोर्चा आयोजित केला. प्राचार्याना याचे तर्कसंगत स्पष्टीकरणदेखील दिले. विद्यार्थी असतानाच तेलंगणाच्या चळवळीत भाग घेऊन ते काही काळ भूमिगतदेखील झाले.

लक्ष्मण देशपांडे, सुहासिनी इल्रेकर, नागनाथ कोत्तापल्ले हे त्यांचे विशेष लाडके शिष्योत्तम. त्यांच्या अनेक व्यक्तिगत आठवणी पुस्तकात दिल्या आहेत.

कथाकार शंकर पाटील यांचे काही उल्लेख अतिशय हृदयस्पर्शी आहेत. शंकर पाटलांनी पाठय़पुस्तकासाठी मिळणाऱ्या मानधनातील काही भाग ‘साधना’ साप्ताहिकाला दिला होता. ‘म.सा.प.’मध्ये स्वखर्चाने वृद्ध साहित्यिकांना कृतज्ञता पुरस्कार देत असत, पण ते स्वत: वृद्धपणी किडनीच्या विकाराने आजारी पडले. उपचारांचा खर्च आटोक्याबाहेर गेला. पठाणांनी तेव्हा शरद पवारांना विनंती केली व मग बानू कोयाजी ट्रस्टच्या माध्यमातून पाटलांना काही वैद्यकीय मदत लाभली.

पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात परिवाराच्या आठवणी आहेत. वडिलांना ते रावसाहेब आणि आईला अम्माजी अशी हाक मारीत. आईने आयुष्यभर अनेक खस्ता खाल्ल्या. शेवटी तिला सोलापूरला जाऊन राहायची इच्छा होती. पण या ना त्या कारणाने ते राहून गेले व आईचे नव्या घरातच निधन झाले. ती खंत लेखकाने मांडली आहे. पत्नी नजमा यांचा उल्लेख ते बेटर हाफ नव्हे, बेटर फुल आणि स्वयंसिद्धा अशा शब्दांत करतात. त्यांची मुलगी आणि पत्नी एकाच वेळी एम.ए. झाल्या. नजमा यांना प्राध्यापक होण्याची इच्छा होती, पण ती दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही.

तिसऱ्या विभागात फक्त निर्मलकुमार फडकुले यांच्या आठवणी आहेत. त्यातली एक मजेदार आठवण म्हणजे आचार्य अत्रेंच्या ‘चहाच्या कपात पडलेल्या माशीला उद्देशून’ लिहिलेल्या कवितेतल्या पहिल्या ओळीवरून फडकुले चहाला कषाय पेय म्हणायचे. (मात्र पुस्तकात कषाय हा शब्द सगळीकडे ‘कशाय’ असा अशुद्ध छापला आहे. कदाचित ही मुद्रितशोधकाची चूक असावी. असो!) निर्मलकुमार यांच्यावर लेखकाचा विशेष स्नेह दिसतो, कारण या तिसऱ्या विभागात त्यांच्यावर तब्बल नऊ लेख आहेत.

 ‘स्मरणगाथा’ –  यु. म. पठाण, 

दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे,

पृष्ठे – १७९, मूल्य – २०० रुपये

विजय तरवडे

First Published on October 9, 2016 1:50 am

Web Title: marathi book smaranagatha by author yu ma pathan